आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई

Submitted by सुबोध खरे on 26 September, 2025 - 10:42

आई व्हावी मुलगी माझी मी आईची व्हावे आई

हे गाणे श्री गदिमा यांनी एका लहान मुलीच्या तोंडी लिहिले आहे कि लहानपणी आई कसा जाच करते, ते मी तिची आई झाले तर तिला दाखवून देईन या अर्थाने.

आता स्थिती उलटी होऊ घातली आहे. मुलगा किंवा मुलगी आज आईबापांना जास्त दिवस सांभाळतो अशी स्थिती आली आहे

हि आज अनेक घरात दिसणारी कहाणी आहे. सत्य घटनांवर आधारित आहे. नावे अर्थात बदलली आहेत.

शंकरराव पाटील हे खान्देशातील एक बडे प्रस्थ. ते आणि पार्वतीबाई एरंडोल येथे एका मोठ्या वाड्यासारख्या घरात राहत असत त्यांची भली मोठी शेती होती आणि व्यापार होता.

त्यांना वसुधा नावाची एकुलती एक मुलगी. पुढे तिचे लग्न एका सुस्थितीत असलेल्या घरी करून दिले.

जावई वसंतराव आर्किटेकट असून मुंबईत व्यवसाय करत असे. वसंतराव अत्यंत सुस्वभावी हसतमुख आणि मितभाषी होते.

वसंतराव आणि वसुधा याना एक गोंडस मुलगा होता. हे तिघे आपल्या मुंबईतील दोन बेडरूमच्या घरात राहत असत. वसंतरावांचे आईवडील मुंबईतच दुसऱ्या घरात राहत असत.

दुर्दैवाने शंकरराव याना कसला तरी कर्करोग झाला आणि मुंबईत टाटा रुग्णालयात उत्तम उपचार करून केवळ ५३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

पार्वतीबाई गावच्याच घरात राहत होत्या. कारण तेथे त्यांचे भाडेकरू आणि इतर सर्व नोकर चाकर होतेच. शंकरराव गेले तेंव्हा त्यान्चे वय केवळ ४८ होते.

अंगात धमक होती शिवाय सासरचा आणि माहेरचा पैसा होता. मुलगी जावई जाऊन येऊन होते.

करायला कोणी नाही म्हणून गावची शेती विकून टाकली. घर (वाडा) होता तो तसाच ठेवला. कालांतराने भाडेकरू सुद्धा सोडून गेले.

मग वाडा पाडून तेथे दुमजली इमारत बांधली. दोन मोठे फ्लॅट ठेवले आणि बाकी विकून टाकले. पार्वतीबाई एका फ्लॅट मध्ये राहत आणि शेजारचा तसा बंदच होता.

जशी साठी जवळ आली तसे मुलीने निर्णय घेतला आता आईला एकटे ठेवायला नको. मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले आणि पार्वतीबाई कायमच्या मुलीच्या घरी राहायला आल्या.

कानाला ऐकू कमी येऊ लागले तसे त्यांच्याशी बोलायला इतरांना मोठ्याने बोलावे लागे. यासाठी त्यांना मुलीने एका चांगल्या कानाच्या तज्ज्ञाला दाखवले त्याने कानाला वयपरत्वे कमी ऐकू येऊ लागले आहे त्यासाठी यंत्र लावा म्हणजे स्पष्ट ऐकू येईल असा सल्ला दिला.

अर्थात मला काही कमी ऐकू येत नाही आणि मी काही कानाला यंत्र लावणार नाही असे पार्वतीबाईनी ठणकावून सांगितले.

त्यातून जरा चांगले यंत्र पंचवीस हजार रुपयाला येते असे ऐकल्यावर तर त्या कान नाक घसा तज्ज्ञांच्या सात पिढ्यांचा उद्धार झाला

सुंभ जळला तरी पीळ सुटत नाही तसे पार्वती बाईंचे होते. दोन बेडरूम पैकी एक बेडरूम मध्ये त्यांनी आपला डेरा टाकला आणि नातवाला बाहेरच्या खोलीत झोपायला लागले.

नातू इंजिनियरिंग ला गेला तसा हॉस्टेल ला गेला त्यामुळे आता घरात पार्वतीबाई मुलगी आणि जावई असे तिघेच.

पार्वती बाईंचा स्वभाव चिडचिडा झाला होता. आपल्या बेडरूम मध्ये त्या दुसरे कोणतेही सामान ठेवू देत नसत. मुंबईत खोल्या लहान म्हणून जातायेता मुलीकडे उद्धार चालू असे. त्यातून आपले सामान बेडरूम मध्ये ठेवले तरी त्या मात्र बाहेरच सोफ्यावर बसत असत.

दिवसभर काहीही काम करत नसत कि बाहेर जात नसत. त्यामुळे वजन प्रमाणाबाहेर वाढलेलं होतं त्यामुळे गुढघे दुखीचा त्रास चालू झाला होता. नको तितके खाल्ल्यामुळे आणि वयपरत्वे गॅसेस चा त्रास होता.

त्यामुळे बाहेर सोफ्यावर बसून वेळी अवेळी कायम ओ~~ब्बा अशी भयाण ढेकर देत असत.

दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता त्यांना जेवायला लागायचे. जावई दुपारी एक दीड ला जेवायला आला तरी त्या त्याची वाट पाहत नसत किंवा रात्री आठ वाजेपर्यंत थांबण्याची त्यांची तयारी नसे. त्यामुळे मुलीला त्यांना प्रथम वाढून द्यायला लागायचे.

आपण गरम गरम जेवून झालं आणि मुलगी जेवायला बसली कि त्या बेडरूम मध्ये जाऊन ठणठणीत आवाजात अग मला सुपारी आणून दे, माझं औषध आणून दे, पंखा कमी कर, पाणी आणून दे अशी काहींना काही मागणी करून तिला जेवणावरून उठवत.

त्यांनी दीड ला झोपायची सवय लावून घेतली होती. जावई परत गेला आणि मुलगी मागचं आवरून अडीच वाजता झोपायला गेली कि तीन वाजता यांचा गजर सुरु होत असे, अग मला चहा करून दे. चहा बरोबर मारीची बिस्किटं लागत असत.

चहा झाला कि चार वाजता त्या आपल्या जुन्या भ्रमणध्वनीवरून कोणा तरी मैत्रिणीला बाहेरच्या खोलीत सोफ्यावर बसून फोन करत असत आणि मग अर्धा तास मोठ्या आवाजात त्यांचं बोलणं चालत असे.

त्यांना मुलीने सांगितले कि संध्याकाळी जरा बाहेर जाऊन ये चार बायका भेटतील वेळ चांगला जाईल पण नाही माझे गुढघे दुखतात आता चार जिने ( दोन मजले) कोण उतरणार आणि परत चढणार? असे सांगितले. बिचारी मुलगीच संध्यकाळी बाहेर जात असे बाजार करून चार मैत्रिणीना भेटून परत येत असे.

परत आल्या कि मला जळजळ होते आहे जेवायला वाढ हा तगादा सुरु होत असे. मुलगी स्वयंपाक करे पर्यंत त्या टीव्ही वर कुठल्या ना कुठल्या मालिका लावून बसत. आता नीट ऐकू येत नसे म्हणून मोठ्या आवाजात टीव्ही लावला जात असे ज्यामुळे कोणत्याही खोलीत त्याचा भरपूर आवाज येत असे.

सात ला त्या जेवायला बसत. जावई आठ वाजता परत आला तरी सारखं मला हे दे ते दे करत मुलीला नवऱ्याबरोबर चार गोष्टी बोलायला सवड देत नसत.

नातू इंजिनियर होऊन नोकरीला लागला तो नोकरी नंतर रात्री उशिरापर्यंत बाहेरच असे त्यामुळे त्याचे फारसे नडत नसे. पण यथावकाश त्याचे लग्न झाले तेंव्हा नातसुनेला या गोष्टी खटकत असत. यामुळे नातवाने आखाती देशात नोकरी पत्करली आणि तो बायकोला घेऊन तिकडे निघून गेला.

सुटीवर आला तरी तीन चार दिवस घरी येत असे मग आठवडा भर सासरी( पुण्याला) जाऊन परत जाताना एक दोन दिवस राहून परदेशात जात असे.

नातू काही आजी जिवंत असेपर्यंत तिकडची नोकरी सोडून परत आला नाही.

पुढे वयामुळे पार्वतीबाई जास्तजास्त गलितगात्र होत गेल्या पण त्यांचा ताठा कधी कमी झाला नव्हता. शेवटची दोन वर्षे त्या अक्षरशः अंथरुणात होत्या पण मुलीने कधी तोंडातून अक्षर काढले नाही.

जावई भला माणूस होता त्यामुळे किंवा खेड्यातील पार्श्वभूमीमुळे आपल्या आईला वृद्धश्रमात ठेवावे असा विचार मुलीने कधीही केला नाही.

शेवटची आठ नऊ वर्षे त्या परावलंबी झाल्यामुळे वसुधाताईंना कुठे दूर सहलीला किंवा पर्यटनाला जाणे पण अशक्य झाले होते. त्यांची स्वतःची पण साठी जवळ आल्याने त्यांची दमछाक होत असे. अर्थात घरात काही कुरबुरी होती असतील पण त्या आमच्या पर्यंत आल्या नव्हत्या

वसुधा ताईंची चुलत बहीण माझ्या संपर्कात असल्यामुळे यातील काही गोष्टी ज्या अन्यथा बाहेरच्याला दिसल्या नसत्या त्या आमच्या लक्षात आल्या. "पार्वती काकू आपल्या मुलीला फार छळतात" या शब्दात तिने आम्हाला सांगितले तेंव्हा या बाबीचे गांभीर्य आमच्या लक्षात आले

हि स्थिती पार्वती बाईंचे वय वर्षे ८४ मध्ये निधन होईपर्यंत कायम होती.

म्हणजे आईने मुलीला १९ वर्षे सांभाळले आणि मुलीने आईला २४-२५ वर्षे.

आज डॉक्टर म्हणून मी लोकांच्या घरी जातो तेंव्हा या अशा अनेक कथा ऐकायला आणि पाहायला मिळतात.

समाजमन अजूनही अशा वृद्धांना वृद्धाश्रमात ठेवण्याच्या बाजूने तयार झालेलं नाही.

घरातच राहून वृद्धांची काळजी घेणारी माणसे मिळू शकतात पण मागच्या पिढीतील लोकांचे अशा गोष्टीवर पैसे खर्च करावे अशी मनोवृत्ती सुद्धा नाही.

या प्रश्नाला नक्की असे उत्तर नाही. प्रत्येक कुटुंबाला आपला प्रश्न आपल्या आहे त्या परिस्थितीतच सोडवावा लागतो.

बऱ्याच वेळेस हे प्रश्न घरच्या बाईलाच सोडवावे लागतात आणि मुंबईत तर जागांचे भाव आभाळाला भिडलेले असल्याने एक अतिरिक्त खोली असणे हि चैन आहे आणि ती बहुसंख्य लोकांना परवडत नाही.

Group content visibility: 
Use group defaults

पण प्रिव्हलेज असताना, उच्च मध्यमवर्गीय असताना तसेच जगले पाहिजे ना? प्रिव्हलेज असताना ते नसल्यासारखे जगणे, पैसे असताना दोन बेडरुम मध्ये राहुन कोंडमारा करणे यात नक्की काय गंमत आहे?
जगाचे प्रश्न आपण कशाला सोडवावे? आपले आपले सोडवावे आणि आनंदात शांततेत जगावे. म्हणजे ज्यांना समाजकार्य म्हणून करायचे आहे त्यांनी जरुर करावे.
इथे बहुसंख्य प्रिव्हलेज क्लास येतो असं गृहित धरुन त्यांनी तरी त्या प्रिव्हलेजचा वापर स्वतःच्या आयुष्यात करुन घेतलाच पाहिजे असं वाटतं.

आम्ही आई वडिलांना बघणार नाही सोबतच त्यांची प्रॉपर्टीही नको म्हणावे मुलांनी.
ते पैसे त्यांच्याच उपचारांसाठी आणि मदतनीस, वृध्दाश्रमसाठी वापरावेत.

>>>>>ते पैसे त्यांच्याच उपचारांसाठी आणि मदतनीस, वृध्दाश्रमसाठी वापरावेत.
त्याकरता प्रॉपर्टी विकावी लागेल. पण जर आइ-वडीलांनी प्रॉपर्टी विकली आणि आई वडील जास्त जगले (आऊटलिव्ह मनी) तर? कोणीच हा जुगार खेळायला तयार होणार नाही.

आम्ही आई वडिलांना बघणार नाही सोबतच त्यांची प्रॉपर्टीही नको म्हणावे मुलांनी>>>>

मलाहे फारसे पटत नाही. संबंधच नको ही भुमिका पटत नाही. जन्मदात्यांशी संबंध नको तर जोडीदार व झालीच तर मुलेबाळे तरी कशाला?? तीही नको व एकटेच राहायचे तर जगायचे तरी
का असे वाटते.

माणसाला इतर माणसांसोबत राहायला एकाचवेळी आवडते व नावडते. आवडते म्हणुन हंटरचा रोल सोडुन गुहेत कम्युन करुन राहायला सुरवात केली आणि त्यातुन आजचा समाज निर्माण झाला. पण मनाला सुप्तावस्थेत हे नावडत असावे म्हणुन समाजाला नाकारण्यासाठी हेकट तिसरट स्वभाव बनत असावेत.

प्रिव्हलेज असताना ते नसल्यासारखे जगणे, पैसे असताना दोन बेडरुम मध्ये राहुन कोंडमारा करणे यात नक्की काय गंमत आहे?
>>>
प्रिव्हिलेज नाकारण्यामागे आपल्या समाजाची साधी राहणी व उच्च विचारसरणी वगैरे मानसिकता कारणीभूत आहे. ज्यांना साधं राहायचं त्यांनी जरूर रहावं. पण मग स्वतःचं सुख मिळवण्यासाठी कुणी चार पैसे खर्च केले तर इतरांच्या नजरा बदलतात.

'आम्ही नाही का संसार केले' किंवा 'असा संसार केला असता तर' ही वाक्य ममव घरात सासर माहेरी सहज ऐकू येतात.

परवडत असून स्वयंपाकी/जास्त वेळासाठी मदतनीस न लावणे आणि स्वयंपाक कुणी करायचा यावरून घरात रोज कटकट करणे, तात्पुरती नर्स/आया वगैरेचा वापर न करता घरातल्या ५०-६०च्या माणसांनी नोकरी, मुलं, इतर जबाबदाऱ्या सांभाळत दिवसरात्र (डायपर चेंज करण्यापर्यंत) आपली सेवा करावी अशी अपेक्षा ठेवणे हे सर्रास होते.

पैसे वाचवण्याच्या नादात आपण आपला व दुसऱ्यांचा अमूल्य असा वेळ आणि मनःशांती गमावतोय याची कुणाला फिकीर नसते.

प्रिव्हलेज असताना ते नसल्यासारखे जगणे, पैसे असताना दोन बेडरुम मध्ये राहुन कोंडमारा करणे यात नक्की काय गंमत आहे?

त्या कुटुंबाची आर्थिक स्थिती किती उत्तम आहे ते सांगणे कठीण आहे. परंतु मुंबईत २ बेडरूमचे घर पावणे दोन कोटी रुपयाला आहे. त्यात ७५ लाखाची भर घालून तीन बेडरूम चे घर घ्यायला बहुसंख्य वरिष्ठ नागरिक तयार होत नाहीत. कारण आपली संचित ठेव वापरून टाकणे म्हणजे मुलावर अवलंबित्व येईल हि सार्थ भीती वरिष्ठ नागरिकांना असते. आणि हे पैसे मुलाला कर्ज म्हणून मिळू शकत असेल तरी एवढं कर्ज घेतल्यावर मोठ्या घरावर त्याचे नाव पहिले असणे हे बऱ्याच आर्थिक संस्थामध्ये कर्ज घेण्यासाठी आवश्यक असते. अशी तयारी फारशा कुटुंबांची नसते.

आताच काळ स्थित्यंतराचा आहे. पूर्वी एकत्र कुटुंब होतं. शिवाय माणसं इतकी जगतच नसत. १९४७ मध्ये आपली आयुर्मर्यादा ३१ होती. आज ७१ झाली आहे त्यामुळे माणसं जास्त जगू लागली आहेत आणि विभक्त कुटुंबं झाल्यामुळे अशा आईवडिलांचा भार मुलांवर जास्त पडू लागला आहे.

आताच्या वरिष्ठ नागरिकांनी आपल्या आईवडिलांची वृद्धापकाळात थोडी फार काळजी घेतली होती पण तेंव्हा हा वृद्धावस्थेचा काळ इतका जास्त नव्हता आताचे ज्येष्ठ नागरिक यांच्या वृद्धावस्थेचा काळ २० २५ वर्षे सुद्धा सहज असतो.पूर्वी हा ४-५ वर्षे असे.

शिवाय इतक्या वैद्यकीय सुविधा नव्हत्या / सहज उपलब्ध नव्हत्या / परवडणाऱ्या नव्हत्या. पण आम्ही आमच्या आईवडिलांची काळजी घेतली तशीच काळजी आमच्या मुलांनी घेतली पाहिजे हि त्यांची अपेक्षा झाली आहे. ती चूक आहे असं माझे म्हणणे नाही. त्यातून तेंव्हाच्या एकत्र कुटुंबाच्या घरात एखादी बालविधवा सुद्धा असे जिच्या आयुष्यात केवळ कुटुंबासाठी कष्ट काढणे हे लिहिलेले असे. अशा स्त्रीच्या कष्टावर आणि त्यागावर बऱ्याच वरिष्ठ नागरिकांची शुश्रूषा उभी असे.

माणसे जितके जास्त जगतात तितक्या जास्त त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी वाढत जातात. तुम्ही मोटार कार विकत घेता तेंव्हा पहिली ५ वर्षे / ५०००० किमी पर्यंत त्याच्या देखभालीवर काहीच खर्च करावा लागत नाही यानंतर गाडी जितकी जुनी होत जाते तितका तिच्या देखभालीसाठी द्यायला लागणार खर्च आणि वेळ वाढत जातो तद्वतच आज ज्येष्ठ नागरिकांनाही स्थिती आहे.

यात केवळ वैद्यकीय उपचारांचा खर्च आहे असे नव्हे तर वयोमानानुसार येणाऱ्या तक्रारी भूमिती च्या वेगाने वाढत जातात. उदा. सत्तरीच्या पुढच्या वरिष्ठ नागरिकांना कमी ऐकू येऊ लागते. परंतु १०० % माणसे चाळिशीचा चष्मा आला (चाळीशी पन्नाशी केंव्हा तरी येतोच) कि तो सहज वापरू लागतात पण कानाचे यंत्र लावण्याचे प्रमाण १० % सुद्धा नाही. हा मेंटल ब्लॉक फार मोठ्या प्रमाणावर आहे.

यामुळे होते काय कि घरात टीव्हीचा आवाज मोठा करावा लागतो ज्यामुळे घरच्या इतर माणसांना नको असलं तरी तो ऐकावाच लागतो. त्यातून या नागरिकांना भरपूर रिकामा वेळ असल्याने टीव्ही वरच्या मालिका कायम चालूच असतात.

त्यातुन बरीच मुले शिक्षणासाठी १८ व्या वर्षांपासून घराबाहेर/ गाव /शहरा बाहेर राहत असल्याने बऱ्याच वेळेस असे दिसून येते आहे कि आईवडिलांनी १८ वर्षे मुलाची काळजी घेतली पण मुलगा/ मुलगी आईवडिलांची काळजी त्याहून जास्त वेळ घेत आहे.

आजचे बरेच ज्येष्ठ नागरिक हे स्वतःचा पैसा राखून आहेत परंतु अजून पैसे खर्च करण्याच्या बाबतीत ते हातचं राखूनच असतात. यामुळे स्वयंपाकाला बाई लावणे किंवा इतर कामांसाठी बाई मदतनीस ठेवणे यावरून घरात वाद होतात. कारण वरिष्ठ नागरिक स्त्रिया आमच्या वेळेस असे नखरे नव्हते अशा तर्हेने बोलताना सहज दिसतात. त्यानं त्यांच्या काळात कष्ट केलेले असतील म्हणून पिढ्यान पिढ्या कष्टच काढत राहायचे का हा विचार सहजासहजी पटत नाही.

मला यात वाढलेल्या जीवनमानाइतकाच झपाट्याने बदलणार्‍या जीवनशैलीचाही भाग असावा असं वाटतं.
आजच्या काळात आजीआजोबांनाच काय, आईवडिलांनाही मुलांच्या जगाशी संलग्न राहाताना धावपळ करावी लागते.
अगदी परवापर्यंत मागल्या पिढीच्या अनुभवाचा/ज्ञानाचा 'पुढच्यास ठेच' पद्धतीने काहीएक उपयोग असायचा, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.
आपली मुलं ज्यात जगतात ते जग फार निराळं आहे. मग इतकं आयुष्य आणि अनुभव निरुपयोगी असल्याचं अ‍ॅडिशनल फ्रस्ट्रेशन येत असेल का आता ज्येष्ठ नागरिकांना?
त्यातून येत असेल आणखी चिडचीड किंवा 'वागवून घेण्या'चा आटापिटा?

काही चक्रं उलट फिरवता येत नाहीत. आयुर्मानाचे, मेडिकल ट्रीटमेन्ट्स चे तसे आहे. त्यामुळे वृद्धांची लोकसंख्या वाढणारच. २०-२५ ची नातवंडे, ५०शी ची मुले, ७५-८० चे आई बाप हे चित्र आता कॉमन आहे. या पिढ्यांनी एकत्रच रहायचे म्हटले तर आपसात फ्रिक्शन ची कारणं अनेक असणार. कुणाची ना कुणाची कुचंबणा होणार. तरुणांना परदेशी करियर च्या संधी घेताना गिल्ट येणार, आई बापाला नातवण्डाला सांभाळण्यासाठी गृहित धरले जाणार , हा अट्टाहास करण्यापेक्षा आपापले वेगळे रहावे आणि जगावे स्वतःच्या मनाप्रमाणे! पुढच्या पिढीवर अपेक्षांचे ओझे लादू नये.
यासाठी मुळात सिनियर / असिस्टेड लिविंग हा ऑप्शन आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणे आणि लोकांनी तो सहज स्विकारणे हे गरजेचे वाटते . त्यामुळे पिढ्यांमधील संघर्षाची कारणं कमी होतील असं वाटतं.

आपापले वेगळे रहावे आणि जगावे स्वतःच्या मनाप्रमाणे! पुढच्या पिढीवर अपेक्षांचे ओझे लादू नये. >> +१
प्रश्न हा आहे की असे करायला किती जण तयार होतील?

डॉ व स्वातीची पोस्ट फारच वास्तवदर्शी आहे. आमची पिढी व आधीची पिढी ह्यात जनरेशन गॅप कमी होती पण पुढच्या पिढीतील दरी दुप्पट झाली ये. नाही इतक्या वेगाने पाळण्यात दमछाक होते. त्यामुळे >>>>आपापले वेगळे रहावे आणि जगावे स्वतःच्या मनाप्रमाणे! पुढच्या पिढीवर अपेक्षांचे ओझे लादू नये. >> असे राहतो/वागतो.

आपापले वेगळे रहावे आणि जगावे स्वतःच्या मनाप्रमाणे! पुढच्या पिढीवर अपेक्षांचे ओझे लादू नये.

बरोबर.

आताच एप्रिल २५ मध्ये माझ्या मुलाचे लग्न झाले. त्या वेळेस त्याच्यासाठी माझ्या घराच्या जवळच एक २ बेडरूमचे घर मी भाड्याने घेऊन दिले आहे.माझे सध्याचे घर तीन बेडरूमचे असून सुद्धा.

मुलगा आणि सून दोघे नोकरी करतात त्यांच्या साठी पुरेल एवढा पैसा ते मिळवतात.

मुलगा आतापर्यंत आमच्या बरोबर रहात होता. पण १ एप्रिल पासून ते घर भाड्याने घेतले आणि हनिमून हुन परत आल्यावर ते तिथे राहायला गेले. एक तर भाड्याचे पैसे द्यायला सुरुवात झाली आणि सगळं खर्च स्वतःच करायला लागल्यावर हिंदीत म्हणतात तसं "आटे दाल का भाव मालूम" पडायला लागतो.
त्यामुळे महिन्याचा खर्च किती लागतो याची दोघांना कल्पना यायला लागली आहे.

राजाराणीच्या संसारात राणीची सासू कुठेच फिट होत नाही.

त्यातून त्यांचा प्रेमविवाह आहे एका शाळेत होते आणि दोघेही एम बी ए झालेले आहेत त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार बराच मोठा आहे. त्यांचे बरेच येणे जाणे असते. शिवाय सुनेचे आईवडील किंवा नातेवाईक याना यायचे असेल तर आमच्या घरात त्यांची कुचंबणा/ अडचण होऊ शकते.

जवळ राहून भांड्याला भांडे लागण्यापेक्षा दूर राहून नातेसंबंध जास्त चांगले राहतात. अर्थात आमच्या बऱ्याच नातेवाईकांच्या हे पचनी पडलेले नाही. तीन बेडरूम असून मुलाने वेगळे कशाला राहायचे? मुलाला घराबाहेर का काढतोस हे माझ्याच आईने विचारले.

जवळ राहूनही त्यांना त्यांचे स्वातंत्र्य उपभोगू द्यावे असा माझा विचार होता. अर्थात सुनेचा आईवडिलांना हि मी हा विचार बोलून दाखवला तेंव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले.

हे सर्व आम्हाला पुरेसा पैसा मिळतो म्हणून शक्य आहे हेही मला मान्य आहे.

असो

ज्वलंत विषय आहे. सरासरी वयोमान हे आठ दशकांत दुपटीपेक्षा जास्त वाढले आहे.

पुढे परिस्थिती आणखी गंभिर होणार आहे. Sad आज नोकर्‍या लवकर लागत नाही, ५-१० वर्षे स्थिर होण्यातच जात आहे. नोकरी पुढे टिकेलच याची पण हमी नाही. थोडे स्थिर झाल्यावर शरिराच्या तक्रारी सुरु होत आहेत. तुटपुंजा पगारांत आई- वडीलांचे आजार बघायचे का पुढच्या पिढीच्या शिक्षणासाठी पैसा मागे टाकायचा? या सर्व व्यापांत, स्वत: साठी बचत फार लांबची गोष्टी आहेत आणि सर्वांनाच पेंशन नाही आहे.

सर्व सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग कुठून आणायचे ? वेगळे घर हा पर्याय प्रत्येकाच्या आवाक्यातला नाही आहे. सर्वांनीच वेगळे घर घेतले तर जागा/ घरांचे भाव आकाशाला भिडतील आणि व्यावहारिकदृष्ट्या सर्वांनाच परवडणार नाही. घर वेगळे घेतले तरी इतर मेंटेनन्स तसेच पाणी, वीज, इंटरनेट अशा खर्चांची भर पडतेच.

<< जागा/ घरांचे भाव आकाशाला भिडतील आणि व्यावहारिकदृष्ट्या सर्वांनाच परवडणार नाही. >>
हे कधीच झाले आहे. पुढील पिढीच्या कित्येक जणांना स्वतःचे घर घेणे परवडणारच नाहीये. अनेक जण भाड्याच्याच घरात राहणार ही वस्तुस्थिती आहे. ते स्वतंत्रपणे, सुखात राहिले तर दोन्ही पिढ्यांना चांगलेच.

>>>>>>मुलगा आतापर्यंत आमच्या बरोबर रहात होता. पण १ एप्रिल पासून ते घर भाड्याने घेतले आणि हनिमून हुन परत आल्यावर ते तिथे राहायला गेले. एक तर भाड्याचे पैसे द्यायला सुरुवात झाली आणि सगळं खर्च स्वतःच करायला लागल्यावर हिंदीत म्हणतात तसं "आटे दाल का भाव मालूम" पडायला लागतो.
त्यामुळे महिन्याचा खर्च किती लागतो याची दोघांना कल्पना यायला लागली आहे.<<

पैसा असेल तर हेच करावे. वाढलेल्या मुलांना उगाच सांभाळत बसु नये. वादांमध्ये आपलीच तब्येत खराब होते.

आम्ही नवरा बायको आपापले करीयर धाब्यावर बसवून अमाप पैसा खर्च करुन सासु सासर्‍यंना सांभाळले. त्यांना कौतुकच न्हवते. पण जेव्हा माझ्या आई वडिलांचे आजारपण सांभाळायची वेळ आली तेव्हा त्यांनी नाकं मुरडली. पण ह्या सर्वांत आमच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरु झाल्या. अगदी ५० च्या आतच म्हातारे झालो आम्ही. मुलं नाराज झाली ते वेगळच कारण आम्ही अमेरीकेतील सर्व सोडून आलो. त्यामुळे भावन्निक निर्णय घेणं सरळ साधा सोपा कधीच नसतो, आणि समजुन घेणारी नसतील तर कठिण होतो.
आता नवरा एकुलता एकच मुलगा असल्याने पर्यायच न्हवता आणि असलेला पर्याय(सिनियर सिटिझन होम) कोणी विचारात घेणारे न्हवते कारण त्यांचे "न करणारे" कान पिचक्या मारत होते.

>> टपुंजा पगारांत आई- वडीलांचे आजार बघायचे का पुढच्या पिढीच्या शिक्षणासाठी पैसा मागे टाकायचा <<

कुणीतरी मला एकदा सांगा की हे पुढच्या पिढीच्या शिक्षणासाठी लोक इतका आटापिटा का करत आहेत? आम्हालाही मुले आहेत पण आम्हाला हे टेन्शनच नाही.

मी कितीही विचार केला तरी मला हे कळतच नाही की पुढच्या पिढीच्या शिक्षणाला लोकांना कोट्यवधी रुपये का लागतात?

काही शक्यता अशा :
१. तुमचे मूल जिनियस आहे : बहुतेक शिक्षण फुकट होऊ शकते. अगदी परदेशी जरी पाठवले तरी असंख्य स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत. काही देशांमध्ये उच्च शिक्षण देखील बऱ्यापैकी फुकट आहे फक्त जाण्या येण्या आणि काही काळ राहण्यपुरते पैसे लागतात जे उभे करायचे मार्ग अनेक आहेत. आणि जीनियस मुलांना अनेक सरकारे पोसायला तयार आहेत. आणि हे फक्त अकादमिक करियर साठीच बोलत आहे. अनेक कंपन्या जिनियस मुलांना थेट नोकरी द्यायला तयार आहेत आणि त्यासाठी फॉर्मल शिक्षणाची कोणतीही अट त्या घालत नाहीत.

२. तुमचे मूल हुशार, धडपड्या आहे : वरच्याप्रमाणेच. पण एक म्हणजे हुशार मुलांना कसेही नॅविगेट करता येते. पैसे हे खूपवेळा अजिबात अडसर ठरत नाहीत. आणि अशा मुलांना आता प्रचंड म्हणजे प्रचंड प्रमाणात ज्ञानाचा एक्सेस आहे. जो या जगात कधीही इतका कोणाला नव्हता. त्यातून तुमचे मूल फाइट मारून काहीतरी करूनच दाखवेल. यूट्यूब वर शिकून स्किल्स मिळवून पोरं काहीही करतात. महाग फॉर्मल शिक्षण अशा स्किल्स साठी आउटडेटेड झाले आहे. आणि समजा जिथे फॉर्मल शिक्षण लागणारच आहे उदा. मेडिकल, तिथे हुशार मुलांना पैसे उभे करायला खूप मार्ग उपलब्ध आहेत.

३. तुमचे मूल अवरेज आहे पण तुम्हाला तुमचे मूळ जिनियस वाटते : मुलांच्या शिक्षणाला पैसा मुलांच्या शिक्षणाला पैसा करणारे बहुतेक लोक याच कॅटेगरीतले पालक असतात असे माझे निरीक्षण आहे. म्हणजे या पालकांना असे वाटत असते की एम बी ए केल्यावर माझ्या एवरेज मुलाला चांगली नोकरी मिळेल इत्यादी इत्यादी. मग एम बी ए साठी लाखो रुपये खर्चायला ते तयार होतात. तुमचा मुलगा महाग शिक्षण घेऊन शिक्षणात एवरेजच राहणार आहे मित्रानो. त्यापेक्षा त्याला काही काम धंदा करायला भांडवल म्हणून पैसे द्या.

४. तुमचे मूल मूल अवरेज आहे आणि तुम्हाला तुमच्या मुलांची लायकी माहीत आहे : इथे शिक्षणावर लाखो आणि कोट्यवधी रुपये खर्च करायची फारशी गरजच नाही. तुम्हा दोघांनाही आपली लायकी कळत आहे त्यामुळे शिक्षणावर पैसे उधळण्यात काहीही अर्थ नाही हे तुम्हाला चांगलेच कळते त्यामुळे जरूरीपुरते नावापुरते स्वस्त शिक्षण घेण्याचे शेकडो पर्याय तुमच्यापुढे आहेत. शेजारचे कोणतेही सामान्य अनुदानित कॉलेज जिथे कोणतीही डिग्री काही हजार रुपयात करता येते हे तुम्हाला बेस्ट आहे. जस्ट फॉर फन.

५. तुमचे मूल माठ आहे : शिक्षणाचा प्रश्नच नाही. लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी एखादे स्पेशल स्किल बेस्ड शिक्षण देणे गरजेचे आहे. उदा. शिवणकाम, न्हावीकाम. ज्यासाठी लाखो रुपये लागत नाहीत.

>>आपापले वेगळे रहावे आणि जगावे स्वतःच्या मनाप्रमाणे! पुढच्या पिढीवर अपेक्षांचे ओझे लादू नये. >>
आमच्याकडे हे माझ्या आईबाबांच्या पिढीतच झाले. मात्र वयाच्या ७५-८० दरम्यान चित्र हळूहळू बदलायला लागते. सोबतीची आणि मदतीची गरज पडणे सुरु होते. शारीरिक आणि मानसिक परावलंबित्व वाढू लागते. पगारी माणसे ठेवली तरी त्यांना मॅनेज करावे लागते. पूर्वी २-३ दिवस बाई आल्या नाहीत तर सहज निभावून नेणारे आईबाबा आता एका दिवसातच थकतात. आर्थिक व्यवहार, डॉक्टर विझिट्स वगैरे साठी सोबात कुणीतरी हवे असे होवू लागते. लिटरली ६-६ महिन्यांनी परीस्थिती बदलते. बर्‍याच जेनांना त्यांचे हे असे दुबळे होत जाणे सुरवातीला स्विकारणेही कठीण जाते. त्यातून मग वाद-चिडचिड वगैरे. सुरवातीला कळतेही आणि वळतेही वाले जेना हळू हळू कळते पण वळत नाही आणि त्यापुढे कळतही नाही आणि वळतही नाही पर्यंत येतात.
आमच्याकडे आईबाबांची पिढी ही स्वतंत्र संसारवाली होती. शक्यतो स्वतंत्र रहायचे, गरज असेल तेव्हा मदतीला जायचे असे करत या पिढीने पुढे नातवंडेही वाढवली. बर्‍याच लेकी सुनांच्या करीयर (नोकरी नाही) आईवडील्/सासूसासरे यांच्या भक्कम आधारावर उभ्या राहील्या. जास्तीची लुडबुड न केल्याने बहुतेकांचे मुलांशी-नातवंडाशी नाते चांगले आहेत. मात्र त्यांचे ८०-८५ नंतरचे वृद्धत्व संभाळणे हे मुलां-नातवंडांसाठी आव्हानच आहे. रजा नाही, कामानिमित्त प्रवास, नोकर्‍या टिकवायचे आव्हान... जगण्याचा वेगच इतका वाढला आहे की दमछाक होते. दिवसभराचे मदतनीस, मुलांजवळ स्वतंत्र जागा वगैरे सर्व केले तरी जसे वयं वाढत जातात तशी एल्डर केअरची आव्हाने पेलणे कठीण होत जाते.

इथे अमेरीकेतही एल्डर केअर हा प्रश्नच आहे. स्वतंत्र संसार असले तरी वृद्धांची जबाबदारी असतेच आणि ती बरेचदा लेकी-सुना-विहिणी निभावतात. प्रंसंगी माजी सुना देखील 'कसे झाले तरी माझ्या मुलांची आजी' म्हणून जबाबदारी उचलतात. रिटायरमेंटचे वय हे भारता पेक्षा बरेच जास्त आहे. ६५ शिवाय सरकारी आरोग्य विमा नाही, पूर्ण सोशल सिक्युरिटी ६७ शिवाय नाही. त्या सगळ्याचे नियम समजून घेणे ही एक डोकेदुखीच असते. त्यात लहान गावात पुरेशी आरोग्य सेवा उपलब्ध नसते म्हणजे अर्धा दिवसाची रजा टाकून शहरात नेणे आले. आमच्या भागात पब्लीक ट्रान्सपोर्ट, रिक्षा, टॅक्सी नाही त्यामुळे वृद्धांच्या हातातून गाडीच्या किल्ल्या काढून घेणे हे तर एक वेगळेच प्रकरण. ७० वर्षाच्या आजीबाई ९० वर्षाच्या आईला तासभर ड्राईव करुन शहरात नेतात, ताण येतो पण इलाज नसतो.

माझ्या घराच्या जवळच एक २ बेडरूमचे घर मी भाड्याने घेऊन दिले आहे. >>
जवळ राहूनही त्यांना त्यांचे स्वातंत्र्य उपभोगू द्यावे असा माझा विचार होता.>>
हे सर्व आम्हाला पुरेसा पैसा मिळतो म्हणून शक्य आहे>> ही तीन वाक्ये वाचून खालील विचार मनात आले.

लग्नाला आलेले सज्ञान मुलामुलींचे सुशिक्षित, उच्चविद्याविभूषित,सुस्थितीतील पालक लग्न झाल्यावर मुलांनी कोठे रहायचं याचा निर्णय घेतात. त्यांना भाड्याने घर घेऊन देतात. तो सर्वस्वी नव दांपत्याचा निर्णय आहे असं ना नवदांपत्याला वाटतं, ना पालकांना वाटतं, ना समाजाला वाटतं. आणि वर ही सगळी चर्चा २०२५ मध्ये अशा धाग्यावर घडते जिकडे दीर्घकाळ वॄद्धांच्या जबाबदारीतून होणारी ससेहोलपट हा विषय आहे. त्यावर आजची ५०-५५-६० पिढी सज्ञान शिकल्यासवरलेल्या आर्थिक सुस्थितीतील मुलांच्या जबाबदार्‍या ओढवून घेत आहे. सगळंच त्रांगडं आहे.
हा धागा पेट पीव्ह मध्ये लवकरच विलीन करायची वेळ येणार आहे.

>>> लग्नाला आलेले सज्ञान मुलामुलींचे सुशिक्षित, उच्चविद्याविभूषित,सुस्थितीतील पालक लग्न झाल्यावर मुलांनी कोठे रहायचं याचा निर्णय घेतात. त्यांना भाड्याने घर घेऊन देतात.
मला वाटतं त्यांना 'मिळवून दिलं' म्हणायचं आहे, भाडं मुलंच भरतायत. आणि बहुधा पालकांच्या बाजूने 'निर्णय' हा 'आमच्याबरोबर राहू नका' एवढाच असावा - त्यांनी जागा मिळवायला मदतही केली इतकंच.

इन एनी केस यातल्या कुठल्याच गोष्टीचं जनरलायझेशन होऊ शकत नाही, अमित. अगदी निरनिराळ्या बॅकग्राउंडमधून आलेल्यांनी सिमिलर प्रॉब्लेम मांडलेला दिसतो आहे की.

मला वाटतं त्यांना 'मिळवून दिलं' म्हणायचं आहे, भाडं मुलंच भरतायत. आणि बहुधा पालकांच्या बाजूने 'निर्णय' हा 'आमच्याबरोबर राहू नका' एवढाच असावा - त्यांनी जागा मिळवायला मदतही केली इतकंच.

मला वाटतं त्यांना 'मिळवून दिलं' म्हणायचं आहे, भाडं मुलंच भरतायत. आणि बहुधा पालकांच्या बाजूने 'निर्णय' हा 'आमच्याबरोबर राहू नका' एवढाच असावा - त्यांनी जागा मिळवायला मदतही केली इतकंच.

बरोबर

'निर्णय' हा 'आमच्याबरोबर राहू नका' असा नव्हता तर "तुम्हाला वेगळे राहायचे असेल तर खुशाल रहा". असा होता. आमच्या कडे तीन बेडरूमचे घर आहे त्यातिल दुसरी बेडरूम हि मुलाच्या पसंतीने रंगवली आणि फर्निचर केलेलं होतं.

अर्थात सून गोल गोल बोलत होती कारण एकदम वेगळं राहायचं आहे असं नवीन सून कसं सांगू शकेल? तिला आणि मुलाला जवळ घेऊन मी खुल्या मानाने सांगा असे सांगितल्यावर त्यांनी वेगळं राहू असं सांगितलं.

हे घर माझ्या भावाच्या बिल्डिंग मध्येच आहे आणि ती बिल्डिंग पूर्ण नवीन आहे. त्यामुळे मुलांना घर मिळाले ते कुणीही न वापरलेले एकदम नवोन आहे शिवाय ब्रोकरच्या पैसे हि वाचले. त्या घराचे डिपॉझिट आणि घराचे भाडे मुलगाच भरतो. याशिवाय घराला लागणारे फर्निचर फ्रिज वॉशिंग मशीन इ स्वयंपाकघरातील औजारे हे मुलाने आणि सुनेने स्वतःच्या पैशातून/ लग्नात नातेवाईक मित्रांकडून मिळणाऱ्या भेटीच्या पैशातून घेतलेले आहे.

हे घर आमच्या घरापासून अर्धा किमी अंतरावर आहे. मुलांनी म्हातारपणी आमची काळजी घ्यावी किंवा मुलगा म्हणजे म्हातारपणाची काठी अशा तर्हेचे विचार माझे नाहीतच. उगाच त्यांच्यावर मानसिक ओझे टाकण्याची आवश्यकता नाही. जोवर आम्ही दोघे डॉक्टर आहोत आणि मानसिक दृष्ट्या खंबीर आहोत तोवर मुलांच्यावर आपला भर पडणार नाही हे नक्की पाहणार आहोत.

पुढे दोघेही मानसिक दृष्ट्या अपंग झालो तर देवावर हवाला.

मलाही सुबोध खरेंचा निर्णय आवडला.
(मुलाला घराबाहेर काढण्याचा नव्हे, तर त्यांना वेगळे रहायची मोकळीक देण्याचा).
बेताचीच परिस्थिती असणार्‍या लोकांनी लग्नावर वारेमाप खर्च न करता नव्या जोडप्याला डाऊन पेमेंट साठी मदत करावी हा माझा विचार भारतात अनेक नातेवाईकांना वेडगळपणाचा वाटतो.

>>> दिवसभराचे मदतनीस, मुलांजवळ स्वतंत्र जागा वगैरे सर्व केले तरी जसे वयं वाढत जातात तशी एल्डर केअरची आव्हाने पेलणे कठीण होत जाते.<<<<
+१
बेडरिडन लोकांना सर्वच संस्था नाही ठेवत. मग काय करायचे अश्या पालकांचे?

वयपरत्वे आणि क्रोनिक आजांरामुळे कळतं पण वळतच नाही हि स्टेपही लवकर येते वृद्धांची. त्यात त्या दिवसाला १६-१७ गोळ्या, पथ्य हे कठिण होतं, त्यांनाही आणि आपल्याला त्यांचं सांभाळायलाही. नको तेवढ्या डॉ विझिट्स, ती ईंजेक्शनं वगैरे वगैरे… स्ट्रेस्सफुल व्हायला लागतं सगळ्यांनाच थोड्या कालावधीत.

वर बेड रिडनसाठी “डिएनार “ वगैरे पण अजुन कोणाच्या पथ्यावर पडत नाही. आपण एकदम खलनायक भासु लागतो.

जसं मुलाने वेगळं रहावं/ राहु द्यावं. लग्न रजिस्टर करुन खर्च वाचवून त्याचा दुसरीकडे उपयोग करावा वगैरे बाबतीत भारतीय समाज मागेच आहे. सर्वच नसले तरी बरेच जणं…

बेडरिडनचा घरात खर्चही खुप जास्त होतो. बाहेर ठेवायचे म्हणजे फुगलेले बँक अकाऊंट हवे.

आमच्या गावात एक दोन केसेस झाल्यात जिथे बेड रिडनची कंडिशन खुप खालावली, करणारे स्वतःच सत्तरीतले, त्यांना झेपेना. मग घरातल्या सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेऊन बेड रिडनचे जेवण बंद केले आणि वाट पाहात राहिले. एकाने स्वतःच स्वतःचे बंद केले. Sad

हे वाचायला कृर वाटते पण अशा घरांमधल्या लोकांची अवस्था खुप बिकट होते. तरी करत राहतात.

>>'निर्णय' हा 'आमच्याबरोबर राहू नका' असा नव्हता तर "तुम्हाला वेगळे राहायचे असेल तर खुशाल रहा". असा होता.>> उत्तम निर्णय!
माझ्या काकाकाकींनी सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी असे केले होते. फरक इतकाच की त्यांनी भाड्याच्या फ्लॅटऐवजी अंडर कंस्ट्रक्शन फ्लॅट विकत घेण्याचे सुचवले होते. पझेशन मिळेपर्यंत सुरवातीचे दीड वर्ष खुशीखुशी एकत्र होते. त्यात काकीला सणवारांची हौस करता आली आणि वहिनीलाही मनाप्रमाणे फ्लॅटमधे सोयी, इंटिरिअर वगैरे करता आले. त्या काळात जे छान बाँडिंग झाले, त्यामुळे पुढे शेवटपर्यंत संबंध खूप प्रेमाचे राहीले.

Pages