"अय फुकणीच्यांनो चला की लवकर, त्यो नित्या पार डोंगर माथ्यावर पोहचला आसल आत्तापोतूर, तासभर झाला त्याला पुढं निघून, थांब म्हटलो तर म्हणतोय माझा स्पीड कमी असतोय तुमच्यापेक्षा म्हणून हळूहळू पुढ जातो, काय एक एक नमूने भेटल्यात मला... एक गेलं पुढ कव्हाच आन तुम्ही दोघं वरातीमागून घोडं दामटत आत्ता उगावले"
संज्या गरम डोक्यानी विन्या आणि संत्याला झापत हुता तसं परिस्थिती बघून काही न बोलता त्यांनी सायकल पुढे दामटली, तिघांना एकत्र उताराला लागलेलं पाहून माळावरल्या खोपटीतून म्हातारी रोजच्यागत बेंबीच्या देठापासून वरडली
" पोराहो लांब जाऊ नका, पारावरचा मुंज्या मानगुटावर बसला तर घरचा रस्ता घावणार नाय" पोरं तशीही ऐकणारी नव्हती.एकामागं एक तीन जण वासोट्याच्या जंगलाकडं सायकलवर उतारानी बुंगाट सुटली.समद्यांच्या मागून सायकल हाकणाऱ्या संज्याला का कुणास ठाऊक पर त्या म्हातारीला उत्तर द्यावं वाटलं "काय नाय हुत म्हातारे, मुंज्या बिंजा काय नसतया,आलुच बघ आम्ही मावळायच्या आत" संज्याने पॅडेलवर अजून जोर लावला.
तापोळा वासोटा ह्यो पट्टा सायकलवनं फिरायचं सपान लय दिसापासून पोरांच्या डोस्क्यात घोळ घालत हुतं. संज्या, विन्या, संत्या यांचा म्होरक्या म्हणजे नित्या हुता. सहसा सायकलवर कुठबी जायचे म्हटलं की हीच चौकडी कायम मिळूनशान जाणार, मज्जा मस्ती करणार आणि तशीच एकत्र परत येणार हे आख्ख्या वाई गावात आन झेड्पीच्या साळंत पोरं आन मास्तरलाबी चांगलच ठाव झालं व्हतं. पोरांनी शनवारी शाळला जायचं म्हणून घरातून धूम ठोकली ती थेट सायकल हाणत वासोट्याच्या॑ रस्त्याला लागली हुती. 'शाळेची सहल जाणार हाय महाबळेश्र्वरात आन तिथंच मुक्काम बी हाय' ही धडधडीत थाप घरी सांगीतल्यानं आज आनी उद्या घरी गेलो नाय म्हणून कोण इचारायला येणार नव्हतं. सुरुवातीचा चढ पोरास्नी तसा नवा नव्हता ह्याच्याआधी पण त्यांनी लय वेळा सायकलीवर त्यो चढला व्हता .चढानंतर कोयनेच्या बाजूला सरळ उतरत पोरं म्हणता म्हणता नागिन माथ्यावर पोहचली हुती.अजून सावली पायाखाली आली नव्हती. जोशात पोरं सायकल दामटत हुती. चांगली प्रहरभर सायकल चालवून पण अजून नित्या दिसला नव्हता. वाट बघून पुढं गेला आसल बहुतेक असं समजून य तिघांनी पण सायाकल चालवणे थांबवलं नव्हतं.
दुपारी कडक ऊन पडलं हुतं खरं पर म्हणता म्हणता आभाळानी मळवटं भरलं. अचानक सूर्य झाकून उदास काळं काळं ढग दाटायला लागलं.आधी ठरल्याप्रमाणे सर्वांनी निघताना घरातच पोटात भाकर ढकलली होती त्यामुळं अजून पोटात म्हणावं तसं कावळं वरडत नव्हते. कुठबी न थांबता गावठी रायडर पुढं निघाले. नित्या कधीच पुढ गेला हुता. घनदाट झाडीच्या एका वळदार चढावरुन पुढे निघाल्यावर एका कच्च्या रस्त्यावर सायकलच्या टायराचे व्रण स्पष्ट दिसत होते. " नित्या ह्याच वाटंनं गेलाय बघ" संज्याने दोघांनापण खूण दाखवत सांगितलं तसं "व्हय त्या झाडातल्या रस्त्याने गेलं आसल ते बेनं,चल आपण बी तिकडून जाऊ" विन्या उत्तरला. तिघांची टीम पुढं सरकली. 'आत्तापोतूर नित्या दिसायला पाहिजे' संज्या मनातच पुट्पुतत म्हातारीच बोलणं आठवू लागला.. 'पारावरचा मुंजा.... रस्ता घावणार नाय....'
अचानक झटका लागल्यासार्खा संज्या थांबला...
" रस्ता गंडलाय जणू,चला मागं फिरू, इथं इचारायला कोण माणूस न्हाई का कुठली पाटी बिटी नाही.. हा काय वासोट्याचा रस्ता वाटत नाय"पाण्याची बाटली काढून दोन घोट घशात ओतत संज्याने डाव्या हाताच्या मनगटाने घाम पुसला.
विन्या आणि संत्याला मात्र परत फिरायचं नव्हतं. "आसल रं बरोबर ह्यो बी रस्ता... तापोळ्यातून नदीच्या बाजूचे सगळेच रस्ते वासोट्याला जात्यात असं आपल्या गावातली म्हातारी सांगत्यात की, जाऊ पुढं अजून .. सापडल नित्याबी तिकड्च, तसपण मागं जाण्यापेक्षा पुढं गेलेलं बरं "संत्या बिनधास्त स्वभावाचा असल्याने बोलत हुता.
गोंधळात पडलेल्या संज्याला संत्याचं म्हणणं पटत हुतं पण का कुणास ठाऊक नित्या दिसला नाही म्हणून त्याला थोडं दडपण आल्यासारखे वाटू लागलं हुतं . तिघजण पुन्हा त्योच रस्ता पकडून पुढं निघलं. आभाळाचा रंग बघून संज्याला आता उगाच भीती वाटाया लागली हुती.ऐन उन्हाळ्यात अचानक ढग यायचे तसंबी काही कारण नव्हतं.डोंगरात सहसा या दिवसात लगडणारी काळी मैनाही कूठल्याच झाडाला दिसत नव्हती. निव्वळ कच्चा रखरखीत लांबवर रस्ता ज्याच्यावर गेल्या दीड तासांपासून चिटपाखरू दिसलं नव्हतं त्यात हे त्रिमूर्ती धूळ उडवत सायकल दामटत होते. संज्याला नित्याची जास्त काळजी हुती. नित्या आणि संज्या रहायला शेजारीच असल्याने नित्याबद्दल सर्वात आधी विचारणा त्यालाच होणार हुती. आमावशेला निघायला नव्हतं पाहिजे असपण राहून राहून त्याला वाटायला लागलं हुतं. कच्चा रस्ता संपून पुन्हा पक्का लागला आणि वासोटा तीन कि.मी. असा लिव्हलेला मैलाचा दगड लागला तशी ही मंडळी जाम सुखावली.उरलेल्या ताकदीनं सायकल दामटत त्यांनी फटदिशी वासोटा गाठलं . संज्याची नजर कावरीबावरी होऊन नित्याला शोधत हुती. आजुबाजूला शोधून पण नित्याचा काही पत्ता न लागल्याने संज्याची अवस्था जाम अवघड झाली हुती. कुठं राहिला आसल नित्या. इथं नाय पोहचला ,रस्त्यात नाय दिसला... काय वंगाळ तर ......." त्याची धड्धड वाढत हुती.
"बिबटे , तरस फिरत्यात इकडं" एवढा येळ गप्प राहणाऱ्या विन्याने तोंड उघडले तेही अभद्र बोलायला. तिघबी काळजीत पडले हुते.अंधार पडायला लागला हुता त्यामुळं लगेच मागं फिरणं शक्य नव्हतं.आज वासोट्याच्या पायथ्यालाच मुक्काम करायचा आणि उद्या उजेड पडल्यावर लगेच माघारी फिरायच एवढंच काय ते त्यांच्या हातात राहिलं हुतं. गावातल्या एकमेव टपरीवजा हॉटेलवर भात आणि आमटीची व्यवस्था झाली. त्याच टपरीत चटईवर झोपायला टपरीवाल्या म्हाताऱ्याने जागा दिली.दिवसभराच्या थकव्याने पोरं पडल्या पडल्या घोरायला लागली. आजूबाजूच्या किर्र काळोखात गळून पडलेल्या पानाचाही आवाज स्पष्ट्पणे कानावर आदळत हुता.
डोंगरावर प्रकाशाची चाहूल लागली आन पक्ष्यांच्या किलबिलाटाने संज्याला पहिली जाग आली. नित्याचा विचार लख्ख प्रकाश पडल्यासारखा डोक्यात पुन्हा घोंगावला. नित्या घावला पाहिजे नाहीतर काय खरं नाय..त्याला उगाच कापरं भरल्यासारखे वाटतं हुते. विन्या आणि संत्या उठले तसे त्यांनी तोंडावर पाणी मारले आनी लगेच सायकलवर बसायचे ठरवले.एकूणच परिस्थिती गंभीर आहे हे सर्वांना कळून चुकले होते. आता परतीचा मार्ग सुरू झाला हुता.काल खिदळणारे रायडर आज कोणाशी काहीच बोलत नव्हते.प्रत्येक जण आपापले तर्क मनातच मांडण्यात गुंग होता. 'नित्या निघाल्यापासून गप्प गप्प का हुता..काय बिनसलं हुते का त्याचे घरी आणि अचानक रस्त्यातून गायब कसा झाला ?' एक ना अनेक प्रश्न संज्याच्या डोक्याची मंडई करत हुते. म्हातारी बोलली तसा मुंजा तर बसला नसेल ना मानगुटीवर...
रस्ता चुकला असेल आन नंतर माघारी फिरला असेल बहुतेक नित्या.. छ्या.... आता पहिलं वाडी गाठली पाहिजे" संज्या एक लयीत विचार करत सायकल चालवत हुता.कालच्यासारखा कच्चा पक्का रस्ता कापत तिघेही पॅडेलवर जोर लावत होते. एक झरा पाहिल्यावर तिथे थोडं थांबून पाणी पिऊन पुन्हा परतीचा प्रवास सुरु झाला. वाडी जवळ आली तसा तिघांचाही वेग वाढला. काहीही झाले तर पहिले नित्या आला का ते समजणे त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचे होते.
"तुम्ही दोघं इथच थांबा , मी नित्याला बघून येतो" संज्या त्या दोघांना बोलून नित्या ज्या जुनाट वाड्यात राहत होता तिथे शिरला.
नित्याची सायकल दाराबाहेरच्या झाडाला पाहून मन्याचा जीव भांड्यात पडला.
लगबगीनी आत जाऊन त्याने हाक मारली "नित्या, कुठं हाईस तू"
कोण संज्या काय, कुठं हायसा तुम्ही दोन दिसापासनं" नित्याची आईने आतून उत्तर दिलं
"काकू इथंच गेलतो वासोट्याला, नित्या आम्हाला सोडून आला परत ..न सांगता म्हणून पहिलं त्याला बघायला आलो , कुठं हाय त्यो" त्याने रांजणावरचे झाकण सरकवून तांब्या भरून घेतला.
"काय म्हणतोय तू..... झोप झाली नव्हं तुझी..... त्यो तर तीन दिस झालं साठ्याच्या इस्पितळात हाय आनेवाडीच्या, नुसता तापानी फणफणलाय , खायची प्यायची सुध नाय त्याला आन त्यो कशाला येतोय वासोट्याला.. जा जाऊन बघ त्याला, सकाळपासून ताप कमी हाये म्हनालाय डाकटर. थांब जरा भाकर देते ती ब्वी घेऊन जा आणि खायला घाल. तीन दिस पोटात अन्न नाय बघ त्याच्या"
कोसळत्या पावासात अगदी शेजारी एखादी वीज कडाडून पडावी आणि त्याच्या नुसत्या आवाजाने धडकी भरावी असे संज्याला झालं हुतं .काल सकाळी नित्या आमच्याबरोबर वासोट्याला आला आणि काकू म्हणती तीन दिवसापासून इस्पितळात हाय "ह्यो मुंजा नेमका कुणाच्या मानगुटावर बसलाय. संज्या तडक बाहेर पडून वेशीजवळ आला. "चला संत्या विन्या......नित्या साठेच्या इस्पितळात हाय" संज्या स्वतः विचारांच्या गर्दीत होता, त्याने या दोघांना फार काही सांगितलं नव्हतं कारण अजून खरं काय घडलं याचा उलगडा होणं बाकी होतं. तिघबी साठे इस्पितळत पोहचली.सायकली बाहेर लावून आत शिरले. नित्याला तिथे पाहून संज्या चक्रावला. संत्या आणि विन्याला वाटले की काल काहीतरी वंगाळ घडून अपघात झाला असावा आणि कुणीतरी नित्याला साठेच्या दवाखान्यात आणले असावे पण ते दोघेही तेवढ्याच गूढ विचारात मुकाट उभे राहिले.
संज्या नित्याच्या जवळ गेला "काय भानगड आहे नेमकी, तू काल आमच्याबरोबर होता की इथंच पडून होता"
नित्याने स्मित करत उत्तर दिले तू म्हातारीला म्हणाला ना मुंजा बिंजा काय नसते ते"
"म्हणजे तू आमच्याबरोबर होतास ना" नित्याने डोळे मोठे करून विचारले.
नाही रे, परवा आम्ही नदीवर पव्हायला गेलो होतो तेव्हा पाटलाचा रंग्या भवऱ्यात अडकला, बुडायला लागला तसा मी जाऊन त्याला वाचवायला गेलो. भवरा चांगलाच खोल होता.त्याला मी कसाबसा बाहेर काढला तव्हाच पाय घसरुन खडकावर माझं डोकं आपटलं, आधीच नाकातोंडात पाणी शिरलं होतं, बाहेर आलो तसा दोन चार मिनिटातच शुद्ध हरपली.बाकीच्या पोरांनी इथं आणलं परवापासून इथंच हाय....
नित्या पुढे सांगत राहिला "काल झोपपण गाढ लागली मल,, सपान पडलं की आपण वासोट्याला चाललो हाय म्हणून मी पुढं गेलो. एक म्हातारी काय बाय मुंजाबद्दल सांगत हुती ,तिला तू असले काय नसते म्हणून सांगून पुढं गेला.अन् मुंजा बसला माझ्या मानगुटीवर मी रस्ता चुकलो आणि परत आलो तुम्ही वासोटा गावात गेले आणि परत आले. तुम्हाला माझी काळजी लागली... आता जाग आली तर तेच सपान परत परत आठवतंय, डोकंबी लय जड जड वाटतयं"
संज्याला काय कळायचं ते कळून चुकलं हुतं.नित्या आपल्याला का सापडला नाही हे त्याच्या लक्षात यायला लागलं. त्याने नक्की काल नित्याला पाहिल्याचेही आता त्याला स्पष्ट आठवत नव्हते. मुंजा नित्यावर नाय तर आपल्यावर बसला व्हता चांगला वासोट्याला जाईपोतर.... तिकडचाच आसल त्यो मुंजाबी साला माझ्या मानगुटावर बसून गेला त्याच्या गावाला. त्याला वाटू लागलं. त्याचं डोकं गरगर फिरायला लागलं. संत्या आन विन्या अजूनही आपण कुठे गेलोच नव्हतो, नित्या आपल्याबरोबर आलाच नव्हता अशा निरागस भावनेने या दोघांकडे बघत होते.इस्पितळाच्या बाहेर उभ्या असलेल्या पिंपळावर उगाच कुणीतरी मोठमोठ्याने हसल्याचा भास आता सगळ्यांना व्हायला लागला.
"घरी सोडा डॉक्टर, इथं जीव गुदरमरतोय" नित्याने डॉक्टरला पाहून पुन्हा तोंड उघडले होते.
कथा आवडली
कथा आवडली
नित्याने रांजणावरचे झाकण सरकवून तांब्या भरून घेतला. << इथे संज्या हवंय ना?
भारी कथा.
भारी कथा.
छान कथा.. शेवटपर्यंत उत्सुकता
छान कथा.. शेवटपर्यंत उत्सुकता राहिली नक्की काय ते!
आवडली गोष्ट. मस्त लिहिली आहे.
आवडली गोष्ट. मस्त लिहिली आहे.
धन्यावाद मित्रांनो ..........
धन्यावाद मित्रांनो ........../\............
...आभाळानी मळवटं भरलं. <<<<
...आभाळानी मळवटं भरलं. <<<< ही उपमा खासच आवडली. सहजी वापरली न जाणारी...
कथेचा जीव छोटा असला तरी ती gripping वाटली. एकदा वाचून लगेच कळणारी नव्हती.
लेखकाचे अभिनंदन त्यासाठी.
हीच कथा थोडी अजून पार्श्वभूमी अन् विस्ताराने वाचायला आवडेल.
कथा आवडली
कथा आवडली