संध्याकाळची वेळ होती. खिडकीबाहेर संध्याकाळचा केशरी रंग पसरला होता. पाऊसही होता. ढगांनी सूर्य आच्छादला होता. मी खुर्चीवर बसून निवांत पुस्तक वाचत होतो. दिवसभराच्या धावपळीनंतर आलेली ती शांतता मनाला सुखावत होती. तेवढ्यात फोनची रिंग वाजली.
मैत्रेयीनं फोन घेतला. एक दोन वाक्यांत मी ओळखलं, फोन माझ्या एका मैत्रीणीचा होता. ती मैत्रीण शिक्षिका आहे. विद्यार्थी हे जणू तिचं दैवत आहे. अध्यापनाचे नवनवीन प्रयोग करते.
नेहमीप्रमाणे आधी मैत्रेयी, मग आमची सौभाग्यवती यांच्याशी बोलते आणि नंतर अध्यक्षीय समारोपाला फोन आमच्याकडे येतो.
मी हसतच फोनवर बोलायला सुरुवात केली..
"नमस्कार, काय म्हणतेस?" मी हसत विचारलं.
ती हसून म्हणाली, "आज फक्त बोलायला नाही, एक खास काम आहे तुझ्याकडे."
मी म्हणालो, "खास काम? सांग ना."
ती थोडी गंभीर झाली. "बघ, मला माझ्या विद्यार्थ्यांना भारतीय तत्त्वज्ञान समजावून द्यायचं आहे. मी विचार केला की कविता हा एक सुंदर मार्ग असू शकतो. मला तुझ्याकडून एक कविता हवी आहे—भारतीय तत्त्वज्ञानाची, पण अगदी सोप्या, गोड भाषेत."
क्षणभर मी निःशब्द झालो. मी मनाशी म्हणालो, भारतीय तत्त्वज्ञान… हे तर महासागरासारखं आहे. त्याचं सौंदर्य, त्याची गहराई कवितेत आणणं म्हणजे मोठं आव्हानच आहे. पण तिचा विश्वास… तिची खात्री की मी हे करू शकेन…
"हं…" मी हळू आवाजात म्हणालो, "हे काम सोपं नाही बरं का. प्रयत्न करतो."
ती लगेच म्हणाली, "मला ठाऊक आहे. You can do it."
मी हसून उत्तर दिलं,
"ठीक आहे, मला थोडा वेळ दे. मी लिहीन.."
ती आनंदाने हसली, "वा! हेच मला ऐकायचं होतं.."
फोन ठेवला. खिडकीजवळ गेलो. मेघांचं आक्रमण होऊनही आकाश केशरीच दिसत होतं. होय भगवंच! पहा ना, कितीही आक्रमणं झाली तरी भगवंपण संपत नाही. शीर्षक सूचलं, "संपत नाही."
कंप्युटर मैत्रेयीनं सुरू केला. मी टाईप करत होतो. १६ संस्कारांचं प्रतीक म्हणून १६ मात्रा......
अवश्य आस्वाद घ्या. शेअर करा.
संपत नाही.
©️ हसरा चन्द्र
मीपण इथले संपत नाही
तोवर ये-जा संपत नाही
माझे माझे म्हणता म्हणता
संपणे कधी संपत नाही
हा तो ही ती भेदच सारे
हे परकेपण संपत नाही
गोष्ट उद्याची हवी कशाला
ताटामधले संपत नाही
बाजाराचे भाव आजचे
घासाघीसच संपत नाही
देतोस कान्हा खूप काही
मागणे तरी संपत नाही