शोध

Submitted by विशाल कुलकर्णी on 31 August, 2025 - 02:20

बऱ्याच वर्षांनी माबोवर आलोय. पुन्हा सुरुवात करावी असे वाटतेय. बघू , किती दिवस उत्साह टिकतोय ते. काही दिवसांपूर्वी सोमीवर कुठेतरी जोन एलियाच्या दोन ओळी वाचण्यात आल्या...

"मुझसे मिलने आए हो?
बैठो, बुलाकर लाता हूं ..."

आणि झरकन आतापर्यंतचा सगळा प्रवास डोळ्यासमोरून फिरला. स्वप्नांचा पाठपुरावा करण्याच्या नादात स्वतःला भेटणं कधी कमी होत गेलं कळलंच नाही. जे मनात आलं ते इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय.

भेटण्या आलास मजला? ये बैस शेजारी
शोधतो आहे मीही, गेली कूठे स्वारी?

भेटलो नुकताच मजला केस विंचरताना,
धुसर झाला आरसा, रिक्त झाल्या तसबिरी

पाठीवर थोपटले माझ्या, म्हणालो मला
भेटत जा रे असाच मित्रा येता-जाताना

हळूच हसलो, हलकेच; दिली स्वतःला टाळी
वेळ नसे भेटाया, तू इच्छांचा हरकारी

ओळखीचे स्वर सगळे विखुरले वाऱ्यावरी
उगाच भटकशी कुठे? शोध स्वतःच्या अंतरी

© विशाल कुलकर्णी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्ण कविता जमली आहेच, त्यात पण
शेवटच्या ओळी तर एकदम सम गाठून आल्यात...

वेलकम बॅक..
लिहित रहा.. खूप कमी जणांना ही देणगी असते.

अजून एक वाक्य लिहायचे आहे पण लिहिणार नाही...
Happy Happy

व्वा ! सुरेख आहे. पोचली. Happy
मला कुन फाया कुन गाण्यातील ओळी आठवल्या -
तेरे बिन खाली आजा खालीपनमें
(रिकाम्या वेळात रिक्त होऊन भेटीस ये)

सामो, हरकारी किंवा हरकारा म्हणजे लाक्षणिक अर्थाने संदेशवाहक. एकाच संदेश दुसऱ्याला पोचता करणारा. इथे इच्छांचा हरकारी म्हणजे इच्छा नाचवतील तसे नाचणारा, त्या पळवतील तसे पळणारा. एक प्रकारे स्वतःच्या इच्छांचा गुलाम. धन्यवाद.