आज मी लिहीणारे त्या व्यक्तीबद्दल काय आणि किती सांगू असंच होतं नेहमी. सतत आपल्या बरोबर असणाऱ्या, आपल्याला साथ देणाऱ्या व्यक्तीबाबात असेच होत असणार सगळ्यांना, नाही का?
"कोण विचारताय?" अहो तुम्ही ही भेटला आहात बरं का त्याला. अहो असं काय करताय, सगळीकडे त्याचे अस्तित्त्व असते. सगळ्यांचा लाडका आहे बरं. हां.. कळाले ना आता? बरोब्बर! तोच तो.. कुणी त्याला नटखट म्हणावे, कुणी लीलाधर, कुणी गोपाल तर कुणाचा गोविंद.
आजचा विषय हा "मला भेटलेला देव माणूस" आहे. या अनुषंगाने मी मला भेटलेल्या, भेटणाऱ्या कृष्णा बद्दल लिहायचा प्रयत्न करणारे.
हो, कृष्ण हा आधी एक माणूसच होता, नंतर त्याच्या अचाट कामगिरीने त्याने देवत्व मिळविले असे माझे ठाम मत आहे. पण असे असले तरीही तो माझा लाडका आहे हे ही खरे. त्याचे चरित्र, त्याच्याविषयी वेगवेगळ्या ग्रंथातून, पुस्तकातून वाचताना, आपल्या आत नकळतपणे तो झिरपत जातो. आणि मग, एक अशी वेळ येते की त्या सावळ्याबाधेने, माणूस त्याच्यात सामावून जातो. मीरे सारखा!
त्याच्यावर बरेच आक्षेपही आहेत बरं! कुणी त्याला रणछोड म्हणतो तर कुणी खोटारडा, नाटकी. अगदी लहानपणा पासून याच्या खोड्यातर पहा. कुणाची मटकी फोड, कुणाच्या घरचे लोणी चोरून खा. पण एक आश्चर्य असे की गोपी कितीही या लहानग्याची तक्रार करू देत, पण त्याच्यावर मायाही तेवढीच. निस्पृह प्रेम काय ते गोपींकडून शिकावे. अगदी यानी त्यांची वस्त्रेही पळवली म्हणे, पण याचे सारे अपराध पोटात घालून गोकुळाने त्याच्यावर प्रचंड प्रेम केले. खरंतर अश्या खोड्या बघताना, असा मुलगा हाताबाहेर जाईल, मोठेपणी चुकीच्या मार्गाला लागेल असे कुणालाही वाटु शकते. त्या चुकीच्याच होत्या, आहेत. पण कृष्णाने त्या खोड्या वाढत्या वयानुसार मागे सोडलेल्या दिसतात. एक महान राजा, योगेश्वर असे त्याचे रूप आपल्याला दिसते. हेच ते माझे आवडते रुप. सगळ्यात असूनही वेगळेपण जपणारा, निर्मोही!
कृष्णाचे अनुकरण म्हणजे त्याच्या रासलीला, त्याच्या १६हजार बायका अशी उदाहरणे लोकं घेतात. अगदी भागवत कथेतही नाच, गाणे होते. कथेचा आणि श्रद्धेचा मान राखूनही मला प्रश्ण पडतो की याची गरज काय? कथेचे सार महत्वाचे ना? त्याच्या नावाखाली भोंदुगिरी जास्त बघायला मिळते. म्हणूनच त्याला देवत्व बहाल करायचे असते लोकांना. म्हणजे यांच्या सगळ्या भानगडी कृष्णाच्या नावावर खपवून राजरोसपणे समाजात माना उंचावून वावरायला हे मोकळे.
तुम्हाला खरंच कृष्णाचे अनुसरण करायचे आहे का? मग त्याच्या सारखे जबाबदारी घ्यायला शिका. तारणहार व्हायला शिका. कृष्णाने अनेक युद्धे जिंकली. पण त्याने राजेपद कधीही घेतले नाही. आजूबाजूला बोकाळलेल्या भ्रष्टाचारातही समाजासाठी सातत्याने झटणारी माणसे पाहिली की मला तो गोविंद भेटतो.
त्याने नेहमीच योग्य राजा बघून त्याला गादीवर बसवले. आपलेच नातेवाईक आहेत, त्यांच्या अपराधांकडे दुर्लक्ष, अगदी सहज करू शकला असता. त्याचे चरित्र बघता, अगदी मामापासून्, आत्ते भावंडांपासून, मुला पर्यंत कुणाकुणाचीही चूक त्याने पदरात घातली नाही. हो! पोटच्या मुलाला, सांबलाही त्याने गैरवर्तनाबद्दल शाप दिला आहे. असा न्यायप्रिय, शिस्तप्रिय माणूस भेटला की मला कृष्णाचे दर्शन होते. अशी माणसे सामाजिक जीवनात जरी दुर्मिळ झाली असली तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र शिस्तप्रिय, न्यायप्रिय माणसे मी पाहिली आहेत. त्या सत्यप्रिय, सर्वेश्वराच्या अस्तित्वाची खूण, या लोकांमधे मला दिसते.
हे झाले दुसऱ्यांबाबत. त्याचे स्वत:चे आयुष्य तरी काय सोपे होते? हल्ली काय ते न्युमरोलॉजीवाले सांगतात ८नंबर हा शनीचा असतो. शनी म्हणजे न्यायप्रिय देवता. तुमच्या भल्याबुऱ्या कर्माचे फळ इथेच देणारी. कान्हाचा जन्म अष्टमीला झाला म्हणून की काय, त्याचेही आयुष्य खडतरच दिसते. जन्मल्याबरोबर आई वडिलांचा विरह, नंतर स्वत:च्याच माणसांकडून होणारे हल्ले. मग तो मामा असो की भावंडे. मागे लागलेला जरासंध आणि अनेक युद्धे. सगळ्यात त्यानी शांत डोक्याने, विपरीत परिस्थितीतही मार्ग काढलेला दिसतो. द्वारकेची रचना असो की महाभारताची. कठीण आयुष्याबद्दल कुठेही कडवटपणा किंवा तक्रार दिसत नाही. अशी सदैव आनंदी माणसांच्या समाधानी हास्यात वीतरागी मनोहर भेटतो.
त्याला जे जे कार्य दिले गेले किंवा त्याच्याकडे आले, ते त्याने प्रामाणिकपणे केलेले दिसते. कंसाचा वध झाल्यानंतर कृष्णाला शिक्षणासाठी सांदिपनी ऋषींच्या आश्रमात पाठवल्यावर दिवस रात्र एक करून त्याने शिक्षण पूर्ण केलेले दिसते. त्यानंतर प्रथेप्रमाणे गुरुदक्षिणाही त्याने दिलेली आहे. स्वकमाईने पांचजन्य मिळवला. कौमोदकी गदा व सुदर्शनचक्रही अग्निला मदत केल्यावर अग्निकडून मिळाले आहे. आपण त्याला शारंगपाणी म्हणतो, ते धनुष्य सुद्धा स्पर्धेत जिंकले आहे. जे काही त्याच्या जवळ आहे ते स्वकष्टाचे. नाहीतर तसा तो राजवंशातील. राजकुमार म्हणून ऐष आरामातही जीवन जगला असता तरी चालले असते. पण त्याने तसे केलेले दिसत नाही. हे स्वकमाईचे लेणे मला नेहमी कष्ट करायला स्फूर्ती देते. कधी चारीबाजूनी घेरले असता कठोर परिश्रमातून, ज्ञानार्जनातून आपण बाहेर पडू शकू असा विश्वास देते.
मधे एका पॉडकास्ट मधे ऐकले की कृष्णाने अनेक योगआश्रम बांधले होते. योगाचा प्रसार करण्याचा प्रयत्न त्याने केला. योगज्ञान हे शरीराला मनाबरोबर जोडते असे म्हणतात. त्याला ज्ञानोपासने बरोबर आत्मोन्नतीही अपेक्षित होती का? आज जेंव्हा योगाचा प्रसार होतो आहे तेंव्हा, यासाठी कष्टावलेल्या जीवांतून मला तो महायोगी दिसतो.
स्त्रियांचा सन्मान असो की गुरुजनांचा. त्याने वेळोवेळी तो योग्यरितीने राखला आहे. नरकासुर वधानंतर केलेले पाणीग्रहण असो की सुदाम्या सारख्या मित्राचे अगत्य. गोपसखा, मुरारी म्हणूनच मला भावतो. तो सखाच आहे सगळ्यांचा.
अगदी खोडसाळ, व्रात्यमुलापासून एक पुरुषोत्तम अशी ओळख त्याने निर्माण केली आहे. एक गीतेचा उपदेशक म्हणून निरनिराळे भगवंताकडे जाणारे मार्ग तो आपल्याला सांगतो. मी स्वत: परमात्मा आहे, हीच माझी खरी ओळख आहे असे सांगणारा,वमला वाटते, एकमेव मानव म्हणजे सर्वज्ञ श्रीकृष्ण. अडीनडीला गीतेतील पान उघडावे आणि त्यातून दिशा मिळावी. माधवा, तूच तर दाखवत असतोस ती दिशा.
बरं इतके सगळे असताना, स्वत:च्या मृत्यूसमयी शांतपणे वनात वाट पहाणाराही हाच. आपल्या कुळाचा नाश झालेला आहे आणि आपल्यालाही आता सगळे सोडुन प्रस्थान करायचे आहे म्हणून जाताना दारुकाकरवी अर्जुनाला निरोप पाठवून शेवटची जबाबदारी पूर्ण करुन शांतपणे वनात बसलेला स्थितप्रज्ञ कृष्ण मला दिसतो. संसारात आणि जगण्यातही आपली कर्तव्ये नीटपणे पार पाडली जातील याकडे कटाक्षाने लक्ष देण्यास हा सर्वेश्वर मला शिकवतो. मला मृत्यु येईल तेंव्हा तु मला न्यायला यावेस आणि असेच अलगद तुझा हात धरून मला निघता यावे ही फार फार इच्छा आहे.
एकूणच काय, "कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या!" असे जन्मापासून, तरुणपणी मोहन, मुरारी बनून तर आयुष्याच्या तिन्हीसांजेला योगेश्वर कृष्ण म्हणून तु असतोसच. मलाही भेटत आला आहेस, नेहमीच.
आनंद तुझ्या भेटीचा
निसटून जातो केंव्हा
मलाच भेटे माझे
अस्तित्व परतूनी तेंव्हा
हाती धरुनी चालवी
मजला त्या शैशवकाळा
मनी मोरपीशी निळाई
स्मरता लाघववेळा
तु कसा होशी सख्या रे
मुरलीधर मोहन मुरारी
कुरुक्षेत्री पाऊल पडता
घेशी सर्वज्ञ, सर्वेश्वराची भरारी
कर्मासक्ती नको म्हणताना
लागे तुझीच आसक्ती
तुज अनुसरण्या जाता
षडरिपूंनाही लाभे मुक्ती
येता सोनपावलांनी तू
मी राही, रजकण व्हावे
चंद्रभागेच्या तीरी
रोज, भेटावे तुला नव्याने
त.टि. : मला भेटलेला च्या ऐवेजी मला भेटणारा देव माणूस झाला आहे
संयोजकांना चालणार नसेल तर लेख काढला तरी चालेल.
कशाला काढतील लेख. कल्पक लेख
कशाला काढतील लेख. कल्पक लेख आहे. आत्ता ऑफिसातुन वाचता येत नाहीये. मग वाचते.
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
अरे वाह सुंदर कल्पना आणि
अरे वाह सुंदर कल्पना आणि सुंदर लेख...थेट कृष्णावरच.. पण खरे आहे.. इतर देवांपेक्षा नटखट कृष्ण जास्त जवळचा वाटतो.
धन्यवाद सामो, रानभुली आणि
धन्यवाद सामो, रानभुली आणि ऋन्मेष!
देवांपेक्षा नटखट कृष्ण जास्त जवळचा वाटतो. >> अगदी खरंय!
छान.
छान.
धन्यवाद शर्मिला!
धन्यवाद शर्मिला!
लिहिल्यावर माझे मलाच कळेना की टाकावे की नाही, फार चिकित्सक वाटेल का. पण इथे आवर्जुन आवडल्याचे कळवल्याबद्दल सगळ्यांचे आभार!
छान आहे.
छान आहे.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
धन्यवाद सामो, निल्सन !
धन्यवाद सामो, निल्सन !