
काल फेसबुकावर भागीरथीबाई आष्टीकर यांच्याविषयी एक टिपण लिहिलं होतं. तेच इथे पुन्हा लिहितोय. हेतू हा की, कुणाला त्यांच्याविषयी काही माहिती असेलत्यांती मिळेल.
भागीरथीबाई आष्टीकर या स्वत:चा फोटो स्टुडिओ सुरू करणार्या पहिला महाराष्ट्रीय स्त्री होत्या. म्हणजे त्या पहिल्या महाराष्ट्रीय व्यावसायिक स्त्री फोटोग्राफर होत्या. पुण्यात बुधवारात त्यांचा स्टुडिओ होता. १९३० सालच्या दिवाळीत त्यांनी तो सुरू केला.
भागीरथीबाई बालविधवा होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्या हिंगण्याच्या स्त्री शिक्षण संस्थेत आल्या. इंग्रजी चौथीत त्यांना पर्वते नावाचे शिक्षक होते. ते चित्रकला शिकवीत. या पर्वत्यांकडे कॅमेरा होता. भागीरथीबाईंना या कॅमेर्याबद्दल आकर्षण वाटलं असावं कारण पर्वत्यांनी त्यांना फोटोग्राफी शिकवली. वयाच्या चोविसाव्या वर्षी १९३० सालच्या दिवाळीत भागीरथीबाईंनी स्वत:चा स्टुडिओ थाटला.
ही स्टुडिओ सुरू केल्याची आठनऊ ओळींची बातमी मी वर लिहिलेल्या तपशिलांसह (कॅमेर्याचं आकर्षण वाटलं असावं, हे वगळता) १४ डिसेंबर १९३०च्या केसरीत छापून आली. भागीरथीबाई या पहिल्या महाराष्ट्रीय स्त्री फोटोग्राफर आहेत, व स्वत:चा फोटो स्टुडिओ सुरू करणार्या त्या पहिल्या महाराष्ट्रीय महिला आहेत, असं केसरी सांगतो.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात फोटोग्राफीची कला भारतात आली. मुंबईत फोटोग्राफी सोसायटी सुरू झाली. लगोलग कलकत्ता, मद्रास या शहरांत फोटोग्राफी सोसायट्या स्थापन झाल्या. बूर्न ऍण्ड शेफर्ड हा स्टुडिओ मुंबईत सुरू झाला. फोटोग्राफांची प्रदर्शनं भरू लागली. महत्त्वाचं म्हणजे भारतात ही कला स्त्रियांनीही काही प्रमाणात अवगत केली.
१८६० सालच्या वृत्तान्तानुसार ’द फोटोग्राफिक सोसायटी ऑफ बेंगॉल’च्या दीडशेच्या आसपास असलेल्या सभासदांपैकी सहा स्त्रिया होत्या. मिसेस ई मेयर यां त्यांपैकी एक होत्या. त्यांनी कलकत्त्यात आपला स्टुडिओ १८६३ साली सुरू केला. एका स्त्रीनं सुरू केलेला भारतातला हा पहिला स्टुडिओ होता. १८६६ साली तो बंद झाला.
पुढे १८७७ साली मिसेस गॅरिक यांनी स्टुडिओ उघडला. तोही दोनेक वर्षांत बंद झाला. हे दोन्ही स्टुडिओ केवळ स्त्रियांसाठी होते. लाला दीन दयाळांनी १८९२ साली स्त्रियांसाठी हैद्राबादेत स्टुडिओ उघडला.
१८८५ साली कलकत्त्यात एक महत्त्वाची घटना घडली. ब्राह्मो समाजाच्या पाठिंब्यानं मिसेस बिबि वॅन्स यांनी बंगाली स्त्रियांसाठी फोटोग्राफीचे वर्ग सुरू केला. या वर्गांमध्ये टागोर घराण्यातल्या अनेक स्त्रिया फोटोग्राफी शिकल्या.
त्याच सुमारास सरोजिनी घोष यांनी ’द महिला आर्ट स्टुडिओ’ कलकत्त्यात सुरू केला. सरोजिनी घोष या पहिल्या भारतीय व्यावसायिक स्त्री फोटोग्राफर!
पुण्यात त्या काळात फोटोग्राफीबद्दल भीती निर्माण झाली होती. विष्णुशास्त्री चिपळूणकर कॅम्पात फोटो काढायला गेले. फोटो काढण्यास त्या काळी बराच वेळ लागत असे. विष्णुशास्त्र्यांना उन्हाचा तडाखा बसला आणि त्या आजारात ते गेले. फोटोग्राफीनं विष्णुशास्त्र्यांचा बळी घेतला, असा समज पसरला. ्फोटो काढून घेणं महाग होतंच. पण कोणी फारसं त्याच्या वाटेला जाईनासं झालं. आगरकरांचेही जेमतेम दोन फोटो अस्तित्वात आहेत.
पुण्यात १९२०नंतर ’फोटोग्राफिक स्टुडिओं’च्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मुंबईत फोटोग्राफीचे वर्ग सुरू झाले होते. या वर्गांत पुण्याच्या सहा तरुणांनी प्रवेश घेतल्याचं २२ एप्रिल १८९५चा ’इंदुप्रकाश’ सांगतो.
या वर्गांमध्ये किंवा ज्येष्ठ फोटोग्राफरांकडे शिकून तयार झालेले महाराष्ट्रीय फोटोग्राफर पुढे महाराष्ट्राबाहेर ग्वाल्हेर, इंदूर, सवाई माधोपूर, अजमेर अश्या ठिकाणी गेले आणि आपापले स्टुडिओ उघडले. उदाहरणार्थ, वाय. सदाशिव हे पुण्याचे तरुण मुंबईत जी.डी. आर्ट झाले होते आणि त्यांचा ग्वाल्हेरला स्टुडिओ होता. ते फोटो काढत, फोटो एनलार्ज करत, शिवाय वॉटर आणि ऑइल पेंटिंग्ज विकत.
भागीरथीबाई फोटोग्राफी शिकत असण्याच्या काळात, म्हणजे १९२०नंतर पुण्यात पूना स्कूल ऑफ फोटोग्राफी सुरू झाली होती. भागीरथीबाईंचा स्टुडिओ सुरू झाल्यानंतर कॅमेरा आर्ट सर्कल सुरू झाली. फोटोग्राफी एक कला असून ती फुरसतीच्या वेळी सहजसाध्य आहे, हा विचार तेव्हा पसरला होता. हौशी फोटोग्राफरांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू झाले होते. त्यांना फेलोशिप्स दिल्या जात होत्या. स्पर्धा भरत होत्या. परदेशी मासिकं पुण्यामुंबईत उपलब्ध होत होती. कॅमेरा आर्ट सर्कल प्रत्येक पंधरवड्यात सभा भरवून सभासदांनी काढलेल्या फोटोंवर चर्चा घडवून आणत असे. हा क्लब श्री. भट आणि श्री. फणसे या हौशी फोटोग्राफरांनी १९३१ साली सुरू केला होता. पहिल्याच वर्षी लंडनला भरलेल्या कलोनियल कॉम्पिटिशनीत श्री. भट, श्री. कोपरकर आणि श्री. भिडे यांचे फोटो निवडले गेले. त्यांपैकी कोपरकरांच्या ’कृष्णाताई’ या फोटोला ब्रॉन्झ प्लेट मिळाली.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फोटोग्राफी कॅम्पापुरती मर्यादित होती. एस. एस. दिनशा यांच्या कॅंपातल्या मोठ्या पोस्ट ऑफिसासमोर असलेला स्टुडिओ १९१२ साली सुरू झाला होता. त्या आधी १९०२ साली वामन, इराणी आणि कंपनी ईस्ट स्ट्रीटवर सुरू झाली होती. १९२४ साली तिनं बुधवारात शाखा उघडली. ती जाहिरात जोडली आहे. त्या आधीही स्टुडिओ होतेच, पण हे दोन बराच काळ टिकले. .
भागीरथीबाई आष्टीकरांचे समकालीन असलेल्या फोटोग्राफरांचे अनेक उल्लेख उपलब्ध आहेत. एम. बी. (मोरोपंत) लिमये यांचा अप्पा बळवंत चौकातला स्टुडिओ प्रसिद्ध होता. नाटकाच्या आधी प्रेक्षकांचा आणि नटसंचाचा फोटो काढायला त्यांना बोलावलं जाई. जी. जी. गोखले पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी ख्यात होते.
पुष्करणीजवळ पोतनीस फोटोग्राफरांचा स्टुडिओ होता. १९२७ सालापासून ते त्यांनी काढलेला त्या वर्षातला सर्वोत्तम फोटो वापरून कॅलेंडर तयार करत असत. १९३३ साली त्यांनी काढलेल्या कॅलेंडरावर एक तरुणी आपल्या कॅमेर्यानं फोटो काढते आहे, असा फोटो होता. फोटोग्राफर सबनीस त्याच काळात प्रसिद्धीस आले होते, पण त्या मागचं कारण वेगळं होतं. ते जातीनं प्रभु होते. त्यांच्या कन्येनं, प्रमिलेनं, मोहनलाल शहा या जैन गृहस्थांबरोबर प्रीतिविवाह केला, तो बराच गाजला. सिटीपोस्टानजीक नाईक या स्टुडिओ होता. फोटोग्राफीची कला शिकण्यासाठी एस. एम. साळवी आणि बी. जी पारगे १९३६ साली वर्षभर युरोपात राहिले. परत आल्यावर त्यांचा मोठा सत्कार पुण्यात झाला होता.
नव्यानं उदयास आलेल्या मध्यमवर्गाला फोटोग्राफीचं कौतुक होतं. लग्नानंतर 'फॅमिली ग्रूप' काढून घेण्याची रीतच होती. मंगळागौर, डोहाळजेवण, ग्रॅज्युएशन अशा अनेक प्रसंगी फोटो काढले जात. मृतात्म्यांचे फोटो हा एक मनोरंजक प्रकारही १९३०च्या दशकात पुण्यात फार लोकप्रिय झाला होता. अर्थात फोटोग्राफी ही महागडी कला होती आणि मोजक्यांनाच ती परवडू शके.
वर्तमानपत्रांसाठी भारतीय फोटोग्राफर काम करू लागले होते. त्यांना क्वचित दुय्यम वागणूक मिळत असे, असंही दिसतं. ’कमलाकर ऍण्ड को.’ या फोटोग्राफी कंपनीचे श्री. के. एम. कुलकर्णी ४ डिसेंबर १९२९ रोजी पर्वतीवर सत्याग्रहींचे व तिथल्या पंचांनी नवीन लावलेल्या पाट्या, पायर्यांजवळ सुरू असलेलं बांधकाम यांचे फोटो काढायला गेले होते. पण तिथल्या रखवालदारांनी कुलकर्ण्यांना फोटो काढण्यापासून रोखलं. कुलकर्ण्यांनी पंचांकडे लेखी तक्रार दिली. ’टाईम्स’च्या ’परधर्मीय’ फोटोग्राफराला फोटो काढू दिले, पण त्यांच्यासारख्या हिंदुधर्मीयाला मात्र रोखले, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ’माझ्यासारख्याला त्रास झाला तर अस्पृश्यांना किती त्रास होत असेल याचा पंचांनीच विचार करावा’, असंही त्यांनी तक्रारीत लिहिलं.
सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर एक रंजक बाब आठवली. १९३०च्या दशकात म्युनिसिपल व प्रांतीय निवडणुकांच्या वेळी प्रत्येक पोलिंग स्टेशनवर मयत, आजारी, किंवा परगावी गेलेल्या मतदारांच्या नावानं मतं देण्यास पुढे येणार्या इसमांना शोधून काढण्यासाठी त्यांचा फोटो काढून घेण्याची व्यवस्था केली जाई. तिथे शहरातले सगळे फोटोग्राफर कामास बोलवले जात. या फोटोंचा खर्च मतं देण्यास आलेल्या इसमाला हरकत घेणार्या उमेदवारला करावा लागे.
भागीरथीबाईंनंतर दशकभरानं व्यावसायिक काम सुरू करणार्या होमाई व्यायारवाला यांच्यावर बरंच लेखन झालं आहे. अनेकदा त्यांनाच पहिल्या भारतीय व्यावसायिक स्त्री फोटोग्राफर म्हटलं जातं. त्यांना समकालीन असणार्या देबोलिना आणि मनोबिना मुजुमदार या कलकत्त्याच्या जुळ्या बहिणींनी काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन दोन वर्षांपूर्वी दिल्ली आणि कलकत्ता या शहरांत भरवलं गेलं.
पण भागीरथीबाई आष्टीकर हे नाव कुठेच नोंदलं गेलेलं नाही. त्या बालविधवा होत्या. त्या पुण्याच्या होत्या की बाहेरगावाहून पुण्यात आल्या, त्यांचा स्टुडिओ हा केवळ महिलांसाठी असण्याची शक्यता अधिक, पण केसरीत तसा उल्लेख अजिबात नाही. मग बंगाली स्त्री फोटोग्राफरांचा आर्ग न अनुसरता त्यांनी पुरुषांचेही फोटो काढए असतील का? त्या सकेशा होत्या की विकेशा? असे अनेक प्रश्न मला अनेक वर्षांपासून पडले आहेत.
त्या कर्व्यांच्या संस्थेत वाढल्या होत्या. त्यांचा वारसा सांगणारं, नातं सांगणारं कुणी असण्याची शक्यता जवळपास शून्य आहे. तरी मी कुलवृतान्त तपासले. त्यात बहुतेक सगळा पुरुषी कारभार असतो. शिवाय ती सगळी चित्पावन घराणी. भागीरथीबाई त्यांत सापडल्या नाहीत. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अनेक कागद दिल्लीत आहेत. त्यातही हे नाव सापडलं नाही. एकदा पुण्यात संस्थेच्या ऑफिसात जाऊन चौकशी करायची आहे. ज्ञानप्रकाश, केसरी या वर्तमानपत्रांत काही उल्लेख सापडत नाहीत. पुणे नगरपालिका व्यावसायिक दुकानांवर कर लावत असे. दुर्दैवानं पानशेतच्या पुरात त्या काळातली कागदपत्रं नष्ट झाली. त्यामुळे तोही एक मार्ग खुंटला.
इथल्या कोणी त्यांच्याबद्दल ऐकलं किंवा वाचलं असेल, तर कृपया कळवा.
पुण्याच्या ईस्टर काळातल्या फोटोग्राफीविषयी हिंदुस्तान टाईमसमध्ये लिहिलं होतं.
त्याची लिंक - https://www.hindustantimes.com/cities/pune-news/taste-of-life-a-look-bac...
छान माहिती सर
छान माहिती सर
चांगली माहिती. इथे
चांगली माहिती. इथे दिल्याबद्दल मन:पुर्वक आभार. फेबुवर आता फारसे जाणे होत नाही.
कॅमेरा १९८० च्या दशकापर्यंत महागडा छंद होता. नंतर हॉटशॉट कॅमेर्याने क्रांती घडवली असे काहीसे आठवतेय.
पण मग विसाव्या शतकाच्या सुरवातीला हा महागडा छंद मराठी माणसाला कसा जोपासता आला??. स्टुडिओसाठी कॅमेरा विकत कसे घ्यायचे की त्यांची फिरंगी मित्रमण्डळी भेट म्हणुन द्यायचे?
भागिरथीबाईंना अशी कोणाची मदत झाली का वगैरे वाचायला आवडेल. पण ती माहिती आज उपलब्ध असेल का हा प्रश्न आहे.
अर्थात सगळेच मराठी किंवा भारतीय गरिब होते म्हणायचे नाहीय पण एका संस्थेत आधार शोधणार्या भागिरथीबाईंना हे कसे जमले असावे हा प्रश्न आहे. तेव्हाची फारशी माहिती मजजवळ
नाही त्यामुळे हा प्रश्न चुकीचा असु शकेल याची कल्पना आहे.
मराठी लोकांचे/एतद्देशियांचे असे खुप श्रेय नोंदले गेले नाही/नाकारले गेले असे वाचलेय. उदा. उडण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न मराठी माणसाने केला होता असे वाचलेय. यामागे महत्वाचे कारण लिहुन ठेवण्याचा अर्थात डॉक्युमेंटेशनचा आळस्/अभाव/महत्व न समजणे वगैरे असावे असे मला वाटते.
छान माहिती.
छान माहिती.
इथे ही माहिती दिल्याबद्दल खूप
इथे ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार.
सुरेख माहिती आहे. भागिरथी
सुरेख माहिती आहे. भागिरथी बाईंचे कौतुक वाटले.
पिनहोल कॅमरा बनवता येत होता.
पिनहोल कॅमरा बनवता येत होता. अजूनही काही लोक बनवतात. त्यातली फिल्म काचेवर सिल्वर ब्रोमाईड चा थर देऊन बनवत होते.
सुरेख माहिती.
सुरेख माहिती. कौतुकास्पद काम केलं त्या काळात.
रोचक टिपण.
रोचक टिपण.
शीर्षकावरून नीट अंदाज आला नव्हता.
देबोलिना आणि मनोबिना मुजुमदार या जुळ्या बहिणींचे celebratory status परिचयाचे होते- कारण बीबीसीने केलेले फीचर.
फारच छान लेख रे. आजोळचे जुने
फारच छान लेख रे. आजोळचे जुने फोटो पाहिले त्यात ऑपेरा स्टुडिओ असे नाव दिसले. बहुदा बुधवारात (जुना बुधवार नवीन शुक्रवार) असावा हा स्टुडिओ. पुणे २ लिहिले आहे.

पारगे स्टुडिओ मधले पण आहेत काही.