सहकाराची ऐशी तैशी

Submitted by अविनाश जोशी on 13 August, 2025 - 08:27

सहकाराची ऐशी तैशी
सहकार सम्राट असताना बऱ्याच आश्चर्यजनक घटना घडायच्या अशीच हि एक सत्य कथा. सहकार सम्राट हे बऱ्यापैकी मध्यम आकाराच्या गावातले वतनदार असायचे. हि प्रतिष्ठीत व्यक्ती त्यांच्या नात्यागोत्यातील माणसे आणि त्यांचे पाहुणे असे सर्व सहकार संचालक मंडळ असायचे. साखरकारखाना असो, स्थानिक बँक असो, अथवा सूत गिरणी असो , दूध डेअरी असो अशा सर्वच संस्थांवर हेच मंडळ आलटूनपालटून असायचे. अर्थातच अशा संस्थांमध्ये चेअरमन यांची जवळजवळ हुकूमशाही असायची त्याच्या अनेक सुरस कथा त्यावेळेला झालेल्या आहेत. दक्षिण महाराष्ट्रात असाच एक साखर सम्राट होता. त्याची एक अत्यंत आवडती अशी ठेवलेली बाई होती. लोकही पत्नीपेक्षा त्या बाईकडे आपली कामे सांगायची या बाईसाहेब साखरकारखान्यातून हवी तेव्हा कॅश घेऊन जायच्या. अर्थातच चेअरमनच्या सांगण्यावरून बाईने घेतलेली सर्व रक्कम 'कॅश ऑन हॅन्ड' या सदराखाली जायची. पाच-सहा वर्षातच सुमारे सत्तरच्या दशकात ही रक्कम सत्याऐंशी लाख रुपये एवढी झाली.
सेवक वर्गात या विषयी कुजबुज सुरु झाली. या कुजबुजीचे रूपांतर सहकार आयुक्त आणि इतर काही अधिकाऱ्यांना लेखी तक्रारी झाल्या. तक्रारी इतक्या वाढल्या की शेवटी सहकार रजिस्टरला चौकशीचे आदेश मिळाले. त्यांची भेट हि अत्यंत गुप्त ठेवण्याची सूचना सगळ्यांना मिळाली अशा गुप्त बातमीचे नेहमीप्रमाणेच सर्व योग्य ठिकाणी प्रसारण झाले. त्यामुळे साखर सम्राटाने आपल्या सर्व नोकर वर्गाला कामाला लावले.
ठरल्याप्रमाणे सहकार खात्याची चार पाच मंडळी कारखान्यात संध्याकाळी पोहचली कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर पाहुण्यांचे यथास्थित तीर्थप्राशन झाले. काही कोंबड्यांचेही बळी गेले. दुसऱ्यादिवशी सर्व टीम कारखान्यात गेली. साखरेच्या पोत्यांचा आणि साठ्याचा अंदाज घेतल्यावर मंडळी अकाउंट्स सेकशनला आली. तिथे त्यांनी लेजर बघता बघता कारकुनाला सहज विचारले , तुमची'कॅश ऑन हॅन्ड' किती आहे ? कारकुनाने त्यांना सांगितले ' थांबा साहेब बघून सांगतो असे म्हणून त्याने एक लेजर उलटे पालटे केले आणि एक पण उलघडून तो म्हणाला ' साहेब आपल्याकडे फक्त दोन लाख बत्तीस हजार कॅश ऑन हॅन्ड आहे'. लेजर तपासले असता कारखान्याची शिल्लक दोन लाख बत्तीस हजारच होती व अगोदरच्या दोन आठवड्यात पंच्यांशी लाख कॅश बँकेत भरल्याची नोंद होती. साहेबांनी सहज विचारले की तुमच्याकडे जेव्हा पंच्याऐंशी / नव्वद लाख कॅश होती त्या वेळी ती कुठल्या तिजोरीत ठेवत होतात. तेवढी रक्कम बसू शकेल अशी एकही तिजोरी कारखान्यात नव्हती. अर्थातच कुठलाही आक्षेप घेणे शक्य नव्हते कारण अकाउंट एंट्री बरोबर होत्या आणि व्हॅलिड होत्या. मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा होऊन टीम कारखान्याबाहेर पडली. स्थानिक बँकही सहकारी असल्याने ऑडिटच्या लोकांनी आपला मोर्चा बँकेकडे वळविला. या नोटा तुमच्याकडे आल्या तर त्याचा व्हॉल्युम किती झाला होता ? अर्थातच कारकून मंडळी गडबडली त्यांना उत्तर देता येत नाही असे पाहून पुढचा प्रश्न विचारला गेला त्या पंच्याऐंशी लाखाचे काय झाले? कुठे ठेवले? तुमच्याकडे एवढी मोठी तिजोरी आहे का ? कारकून मंडळी एकमेकांकडे पाहतच बसली.
अशा अडचणीच्या वेळी साखर सम्राट पुढे झाले आणि म्हणाले गेल्या आठवड्यात आम्ही कर्ज मेळावा केला होता त्यात आम्ही पंच्याऐंशी सभासदांना प्रत्येकी एक लाख रुपये कर्ज दिले आहे. त्यांनी कर्जाची फाईल आणायला सांगितली. त्या फाइल मध्ये ग्राहकाची माहिती , त्याच्या मिळकतीची माहिती आणि त्याच्या जमीनदारची माहिती असे सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार होती.
थोडक्यात पंच्याऐंशी लाख नसलेली कॅश बँकेत जमा झाली होती आणि त्यातून पंच्याऐंशी लाखाचे कर्जवाटप सुद्धा झाले होते.
अर्थातच अशी कर्जे काही दिवसांनी सरकार माफ करते आणि सर्व कर्जदार आणि त्यांचे सम्राट मोकळे सुटतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users