चौकटींतील 'रत्ने' (३)

Submitted by हेमंतकुमार on 31 July, 2025 - 23:05

भाग १
भाग २

मराठी व इंग्रजी शब्दखेळांशी असलेले माझे नाते वीस वर्षांपूर्वी आकारास आले आणि ते आता अगदी घट्ट झालेले आहे. या विषयावर पूर्वी दोन लेख लिहिलेले असून त्यामध्ये मी शब्दखेळांकडे का ओढला गेलो आणि त्यात हळूहळू प्रगती कशी होत गेली याचा आढावा घेतला होता. त्या लेखनाला आता ६ वर्षे होऊन गेलीत आणि या कालावधीत हा शब्दविहार अधिकाधिक वाढतच गेलाय व विविधांगी झालाय. मराठी शब्दखेळाच्या बाबतीत तो रोजच्या एका छापील दैनिकातल्या चौकटींच्या खेळापुरता मर्यादित आहे. परंतु इंग्लिश शब्दखेळांच्या बाबतीत तो अधिक व्यापक असून तो पूर्णपणे आंतरजालावर करतो. त्यामध्ये दैनंदिन चौकटीवाला मोठा खेळ (crossword) आणि ‘वर्डल’ मालिकेतल्या काही सुधारित खेळांचा (Phrazle, Clue Hurdle, इ.) समावेश आहे. हे सर्व शब्दखेळ अमेरिकी संस्थळांवर रोज प्रकाशित होत असतात. ते नियमित सोडवल्याने इंग्लिश व खास करून अमेरिकी संस्कृतीची बऱ्यापैकी ओळख होते. त्याचबरोबर या शब्दखेळांमधून सामान्यज्ञानात चांगल्यापैकी भर पडल्याचे जाणवते. हे ज्ञान जागतिक आणि काही बाबतीत खास करून अमेरिकेशी संबंधित आहे.

या दैनंदिन इंग्रजी शब्दविहारातून ज्ञान आणि रंजन या दोन्ही पातळ्यांवर समाधान लाभलेले आहे हे वे सा न ल. तर अशा काही रंजक माहितीमध्ये वाचकांनाही सहभागी करून घेण्यासाठी हा तिसरा भाग लिहीतोय. मराठी शब्दक्रीडांमधून सर्वसाधारणपणे ज्या माहितीशी आपला नित्य संपर्क येत नाही अशा विशेष गोष्टींचा उल्लेख पुढील विवेचनात असेल. जागतिक सामान्यज्ञानातला हा फेरफटका वाचकांना पसंत पडावा. सामान्यज्ञानाच्या कक्षा अफाट असतात. म्हणून त्यांचे विवेचन करण्यासाठी काही निवडक विषयांची विभागणी अशी केलेली आहे :

  • वनस्पती व प्राणी
  • खाद्यपेयपदार्थ
  • इतिहास व संस्कृती
  • भूगोल
  • क्रीडा
  • समाज व राज्यव्यवस्था
  • भाषा व साहित्य

वनस्पती प्राणी/निसर्ग
आजपर्यंत मला या खेळांमध्ये दिसलेली सर्वाधिक वनस्पती म्हणजे कोरफड(Aloe) ! तिचा औषध आणि सौंदर्यवर्धक म्हणून बराच वापर होताना दिसतो. सुटसुटीत असलेला हा चार अक्षरी शब्द इथे भरपूर ‘पेरायची’ त्या निर्मात्यांना सवय लागलेली आहे. इथे आठवड्यातून दोनदा तरी तिचे दर्शन हमखास होते. हे त्यांच्या कोरफडप्रेमाचे निदर्शक म्हणावे लागेल.
शोभिवंत डेरेदार झाडांमध्ये Elmचा क्रमांक बराच वरती आहे. एकंदरीत उत्तर अमेरिका आणि युरोपात हे झाड रस्त्यांच्या कडेने आणि बागांमध्ये भरपूर प्रमाणात लावल्याने त्याचा इथला सातत्यपूर्ण उल्लेख समजून येतो.
त्याच्या मागोमाग pine & cedar ही झाडे नंबर लावून उभी असतातच.

प्राणी जगतात पाणमांजर (Otter) आणि तरस (Hyena) या दोन सस्तन प्राण्यांचा उल्लेख बऱ्याचदा येतो तर पक्ष्यांमध्ये लालबुंद कार्डिनल आणि सोनेरी canary हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ऑस्ट्रेलियाचे प्रतिक असलेला कांगारू सर्वपरिचित असतो परंतु तिथलेच अजून एक प्रतिक असलेला koala इथे नव्याने समजला.

Koala.jpgखाद्यपेय पदार्थ
इथल्या शब्दप्रांतात मासे व मांसाच्या पदार्थांना महत्त्वाचे स्थान असते. माशांमध्ये tuna हा चविष्ट गुबगुबीत मासा आघाडीवर असतो. तर सापाच्या आकाराचा असलेला eel (इलेक्ट्रिक फिश) त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण स्पेलिंगमुळे इथे वारंवार डोकावतो.
डुकराच्या मांसाचे bacon & ham हे पदार्थ देखील इथे सतत दिसतात. पास्ताच्या काही प्रकारांसह bagel या वैशिष्ट्यपूर्ण ब्रेडरोलचा परिचय इथल्या वावरातूनच झाला. केक्स, बिस्किटे आणि वेफर्सची दुनिया तर अजब आणि अफाट असून त्यामध्ये Oreo हे तर अतिप्रिय दिसते आणि mocha ही चॉकलेटयुक्त कॉफी देखील त्यांची आवडती दिसते.
_Oreo_Cookies_4_(32619975810).jpg
(Oreo)

चीज आणि मांसाहारी सँडविचेस विकणाऱ्या दुकानाला deli असे लाडिक नाव असून मुळात ते delicatessen या शब्दाचे लघुरूप आहे. अमेरिकेचा शेजारी असलेल्या मेक्सिकोची खाद्यसंस्कृती देखील इथे अधूनमधून लुडबूड करते. त्यातला मक्याच्या रोटीसारख्या आवरणात विविध प्रकारचे मांस, चीज, बीन्स आणि भाज्या घातलेला enchilada विशेष वाटला. तसेच जागतिक खाद्यपदार्थांमध्ये sushi हा जपानी पदार्थ अलीकडे लोकप्रिय दिसतो.

या खेळांत मद्यसंस्कृतीलाही चांगल्यापैकी स्थान असते हे काय सांगायला पाहिजे? त्यात विविध मद्यांच्या नावांबरोबरच त्यांच्या पिण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चषकांची goblet & tumbler सारखी नावे देखील मोहक असतात. बियरचे पिंप असलेले keg तर आठवड्यातून एकदा तरी हमखास हजेरी लावतेच लावते.

keg.pngइतिहास व संस्कृती
जागतिक इतिहासात इस्तंबूलचे स्थान महत्त्वाचे. शालेय इतिहासात शिकून विसरून गेलेल्या इस्तंबूलच्या जुन्या नावाची (Constantinople) उजळणी इथेच झाली. दोन्ही महायुद्धांशी संबंधित बरेच शब्द अधूनमधून येतात. त्यापैकी जर्मनीच्या U boats या वैशिष्ट्यपूर्ण.
अमेरिकेच्या लिंकन, केनेडी आणि ओबामा या राष्ट्राध्यक्षांचे उल्लेख नित्याचे असून काही राष्ट्राध्यक्षांच्या मजेशीर व प्रसिद्ध टोपणनावांना इथे महत्वाचे स्थान असते. गुलामगिरीची निंदनीय प्रथा नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे अब्राहम लिंकन यांचे Honest Abe हे नाव विशेष लोकप्रिय दिसते.
त्या समाजाच्या ऐशोआरामी जीवनाबद्दलचे अनेक शब्द इथे अधूनमधून उधळतात आणि त्यात अत्यंत महागड्या कार्सची पण चलती असते. Limo अर्थात लिमोझिन हे त्यातले ठळक उदाहरण.

भूगोल

डोंगर व टेकड्यांच्या संदर्भात उंच पठारासम असलेले mesa इथे नित्यनेमाने विचारतात. साधारणपणे डोंगरावरील ‘टेबल’ असा हा प्रकार आहे.
mesa.jpg

बर्फ आणि त्याचे वातावरणातील काही प्रकार युरोप आणि अमेरिका खंडांच्या हवामानात महत्त्वाचे आणि नित्याचे. भारतात आपल्याला पावसाळ्या दरम्यानच्या गारा चांगल्या माहीत असतात. परंतु hail आणि sleet या दोन प्रकारांमधला फरक या शब्दक्रीडांमुळे माहिती झाला. तापमान जेव्हा शून्य सेल्सिअसखाली जाते तेव्हा होणाऱ्या बर्फ आणि पावसाच्या मिश्रणाला sleet म्हणतात. आकाशातून पडणाऱ्या hail चा अर्थातच hell या पाताळाशी काही संबंध नाही !
hail and.jpeg
बेटांच्या प्रकारांत island,islet, atoll & coral reef हे शब्द नेहमीचेच. नद्यांमध्ये नाईल व सीन या दोन्ही इथे सदा वाहतच असतात.

क्रीडा
फुटबॉल, बास्केटबॉल बेसबॉल, गोल्फ आणि बर्फातल्या खेळांची तर इथे अगदी रेलचेल. गोल्फचा tee तर आठवड्यातून एकदा दिसलाच पाहिजे ! विविध खेळांनुसार त्यातील पंचांची अधिकृत नावे भिन्न आहेत. त्यामुळे referee, umpire, judge & arbiter या सर्वांची उजळणी होत राहते. बर्फातील खेळाचे sled हे वाहन लोकप्रिय दिसते.
sled.jpg

बैठ्या खेळांमध्ये पोकरचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यातल्या सुरुवातीच्या सक्तीच्या खेळीसाठी असलेला ante हा शब्द तर या मंडळींना विशेष प्रिय. Ante शब्द आणि anti हा प्रत्यय हे पूर्णपणे वेगळे असल्याचे ते वारंवार विचारून घटवून घेतले जाते.

समाज व राज्यव्यवस्था
अमेरिकी राज्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या प्रत्येकाला एक किंवा त्याहून अधिक टोपणनावे आहेत. त्या नावांमागे ऐतिहासिक, भौगोलिक किंवा सांस्कृतिक संदर्भ आहेत. काही राज्ये इथे वारंवार विचारतात. उदाहरणार्थ, टेक्सास हे Lone Star State या नावाने ओळखले जाते. ते अमेरिकेत सामील होण्यापूर्वी काही काळ स्वतंत्र राष्ट्र असल्याने त्याला असे म्हटले जाते. शब्दखेळांच्या राज्यात ते पहिल्या क्रमांकावर आहे असे म्हणायला काही हरकत नाही.
lonely Tex.png

Idaho हे प्रामुख्याने बटाटा पिकवणारे राज्य देखील या निर्मात्यांच्या आवडीचे असून Gem State हे त्याचे टोपणनाव. नेवाड्यातील Reno पण इथे वारंवार येते.

भाषा व साहित्य

हे शब्दखेळ (विशेषतः Phrazle) अनौपचारिक वाक्प्रचारांचा अक्षरशः खजिना असतात. त्यांचा उगम शोधायला गेल्यास आपल्यासमोर अमेरिकी इतिहास व संस्कृतीचे प्रशस्त दालन उघडते. नमुना म्हणून फक्त एक वाक्प्रचार पाहू :
Off the cuffs
याचा अर्थ कोणत्याही पूर्वतयारीविना सादर केलेली कला अथवा भाषण. Cuff म्हणजे पुरुषांच्या शर्टाची मनगटपट्टी. तिचा आणि या अर्थाचा काय संबंध असा प्रश्न पडतो. या वाक्प्रचाराचा उगम काहीसा वादग्रस्त आहे. एक उपपत्ती असे सांगते की, एकेकाळी अमेरिकेत कलाकार लोक शर्टच्या मनगटपट्टीवर महत्त्वाचे संवाद लिहून ठेवत आणि मग पाठांतर न करता त्या पट्टीकडे बघत ते म्हणायचे. त्या काळी शर्टांना वापरून फेकून देण्याच्या मनगटपट्ट्या देखील बसवत असत असे म्हणतात. तशी प्रथा असल्याचे नीटसे पुरावे मिळाले नसले तरी हा वाक्प्रचार मात्र त्याच्या लाक्षणिक अर्थाने टिकून आहे.
off cuff.jpg

साहित्यिक आणि त्यांची गाजलेली पुस्तके हे देखील इथले महत्त्वाचे अंग. त्यामध्ये डिकन्स, ट्वेन व मार्गरेट मिशेलसारखी जुनी मातब्बर मंडळी स्थान टिकवून आहेतच. त्याचबरोबर अलीकडच्या काळातील स्टीफन किंग, जे के रोलिंग आणि झुंपा लाहिरी सुद्धा उल्लेखले जातात.

वर उल्लेख न केलेल्या अन्य अनेक विषयांची माहितीसुद्धा या शब्दशोधातून झाली. विस्तारभयास्तव त्यांची स्वतंत्र विभागवार दखल घेणे टाळले आहे. तरी पण जाता जाता काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा उल्लेख करतो. आधुनिक कार्यालयीन कामकाजातील TGIF, PDQ(ASAP चा पर्याय) ही लघुरुपे आकर्षक आहेत. तसेच कॉलेज जीवनातील sopho, grad, alum & Elis (‘येल’चे विद्यार्थी) ही सुद्धा. संगीतातील alto, tenor, oboe आणि organ इथे येताजाता झंकारतात. कायद्याच्या जगातला आपल्याला सुपरिचित असलेला ‘अ‍ॅडव्होकेट’ इथे कधी भेटत नाही, मात्र त्याचे स्थान attorney ने घेतलेले दिसते. न्यायाधीश ‘ऑर्डर ऑर्डर’ करताना जो ‘हातोडा’ वाजवतात त्याला मराठीत काही विशेष नाव आहे का नाही याची कल्पना नाही, परंतु इंग्लिशमध्ये त्याला gavel म्हणतात हे ज्ञान इथूनच मिळाले आणि पक्के झाले.

भारताबद्दलचेही काही संदर्भ वारंवार विचारले जातात जसे की, राजधानी, ताजमहालाचे शहर, योगसाधना आणि भारतीय बायकांचा पारंपरिक पेहराव (साडी). तसेच आपली रोटी ही त्यांच्या दृष्टीने ‘इंडियन फ्लॅटब्रेड’ असतो हे पण रोचक. शरीरविज्ञानातील Aorta ही महारोहिणी तर या खेळनिर्मात्यांना बरीच प्रिय. वरवर अर्थहीन दिसणारे काही ध्वनीजन्य शब्द सुद्धा गमतीशीर वाटतात जसे की, Psst, म्हणजे एखाद्याला हळूच ‘शुक शुक’ करणे.
असो. अजूनही काही माहितीपूर्ण रंजक गोष्टी सांगण्याचा मोह आवरता घेतोय. या बाबतीत किती लिहावे तेवढे थोडेच. सागराएवढे सामान्यज्ञान एखाद्या घागरीत थोडेच मावणार आहे? आता लेखणीला वेसण घातलेली बरी.

ब्रिटिश इंग्लिशच्या पठडीत वाढलेल्या आणि वावरलेल्या माणसाला या अमेरिकी शब्दविहारातून नक्कीच काहीतरी वेगळे गवसते. हे शब्दखेळ तयार करताना संगणकीय तंत्राची मदत घेतली जात असणार हे उघड आहे. त्यामुळेच रोज वेगवेगळ्या विषयांतील सामान्यज्ञान आपल्यापुढे नित्यनेमाने उलगडत जाते आणि आपण खरोखर समृद्ध होतो. शब्दखेळांच्या या विळख्यात सापडून आपण शब्दव्यसनी झाल्याचे आणि हे व्यसन आता आयुष्यभर सुटणार नसल्याची जाणीव झालेली आहे. या ज्ञानसागरातून वेचलेले काही शिंपले इथे सादर करताना आनंद वाटला.
************************************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. मनगटपट्टी हा नवीन शब्द मला कळाला.
Off the cuff वरून Off the top of my head हा वाक्प्रचार आठवला जो मी डिस्क्लेमर सारखा वापरतो. Happy
MESA वरून अश्या डोंगर माथ्यावरील धावपट्यांना 'Table Top Runways' म्हणतात हे आठवले. मागे दक्षिण भारतात विमान अपघात झाला तेंव्हा हा शब्द चर्चेत होता.

* Off the top of my head >>>
छान आहे हा !
म्हणजे एक प्रकारे आपण जे चू भू दे घे म्हणतो, ते.

सचित्र माहितीपूर्ण लेख आवडला.
छान शब्द आहेत.
<सुधारित खेळांचा (Phrazle, Clue Hurdle, इ.)> याची लिंक मिळेल का?

सचित्र माहितीपूर्ण लेख आवडला.
छान शब्द आहेत.
<सुधारित खेळांचा (Phrazle, Clue Hurdle, इ.)> याची लिंक मिळेल का?

धन्यवाद !
* (Phrazle, Clue Hurdle, इ.)>>>
https://solitaired.com/phrazle

दर बारा तासांनी तिथले खेळ बदलतात - मध्यान्ह व मध्यरात्र.

<< mesa>>>
काल पाचगणी टेबल लँडला गेलो होतो तेव्हा याची आठवण झाली.

अभिनंदन !
शब्दभ्रमर आवडले >>>> धन्यवाद कुमार१ सर
काही मायबोलीकर नित्यनेमाने खेळतात व खालील धाग्यावर दवंडी पिटतात. इच्छुकांसाठी खाली लिंक देत आहे. धन्यवाद.
https://www.maayboli.com/node/84991

conniption (fit)
= हिस्टेरियाचा झटका

हा खास अमेरिकी अनौपचारिक शब्द असून तो शब्दकोड्यातून गवसला. त्याचा उगम अनिश्चित आहे. बहुधा तो corruption या शब्दाच्या धर्तीवर बनवण्यात आला असावा. आतापर्यंतच्या वैद्यकीय वाचनात हा कधीही वाचला नव्हता.

https://www.etymonline.com/search?q=conniption