डायरीतलं पान ३ : कृपया इकडे लक्ष द्या!

Submitted by नवदुर्गा on 30 July, 2025 - 03:18

(आजचं पान हे मला अस्वस्थ करणार्‍या काही गोष्टींबद्दल आहे. लेखाचा उद्देश कुठेही बॉडी शेमिंग किंवा तत्सम नाही, परंतु ज्या गोष्टी खरोखरंच स्पष्ट बोलणं गरजेचं आहे तिथे तसा काही उल्लेख आल्यास गैरसमज नसावा.)

नुकत्याच काही दिवसांपूर्वी आमच्या परीक्षा पार पडल्या आणि आता आमचं नवीन सेमिस्टर चालू झालं आहे. परीक्षा काळात सुपरव्हिजन करताना काही गोष्टी खूप प्रकर्षाने जाणावल्या त्या इथे मांडाव्याश्या वाटल्या. मुलं-मुली १२वी नंतर इथे अ‍ॅडमिशन घेऊन येतात, १७-१८ वय असतं त्यांचं. मग वर्षभरात ती जेव्हा प्रत्यक्षात फर्स्ट यिअर संपवून आपापल्या डिपार्टमेंट्सना येतात तेव्हाही त्यांची उंची वाढत असते. ती मोठी होतच असतात. सर्वसामान्यपणे कॉलेजमधे बेंचेस जे असतात ते या वयाच्या मुलामुलींना नीट बसून वह्या-पुस्तकं डेस्कवर ठेवता येतील असे असतात. पण पेपर लिहिताना मात्र बर्‍याच अडचणीच्या वाटू शकतील अशा गोष्टी माझ्या मलाच लक्षात आल्या!
आजकाल जंक फूड/ बाहेरचं भेसळयुक्त खाणं आणि एकूणच बदललेली जीवनशैली याचा एकत्रित परिणाम म्हणून असेल, मुलंमुली वयापेक्षा जास्त मोठी दिसतात. ती लवकर वयात येतात हे तर आता सगळेच मान्य करतात, पण अंगकाठीसुद्धा जरा थोराडच दिसते. आता हे उदाहरण बघा -
"तू जरा सरळ बस रे. तिरका का बसलायस?"
"मॅम, मला नीट बसताच येत नाहिये सरळ. पेपर कसा लिहू?" असं म्हणून त्या मुलाने मला सरळ बसून दाखवलं. त्या पोझिशनमधे सलग अडीच तास बसून पेपर लिहिणं शक्यच नव्हतं! असं का झालं त्याचं माहितेय? तो खूप जास्त स्थूल होता. दणकट शरीरयष्टी आणि स्थूल शरीर यांत फरक असतो. तो रूढार्थाने दणकट दिसतच नव्हता. त्याच्या अंगकाठीमुळे तो बसू शकत नव्हता ही वस्तुस्थिती होती. असे १-२ नव्हे, प्रत्येक वेळाच्या सुपरव्हिजनम्धे ५-६ नमुने प्रत्येक क्लासरूममधे दिसतच होते Sad

मुलींचीही काही वेगळी स्थिती नव्हती. पण तिथे अजून एक उदाहरण होतं. डाएट, बारीक होणं वगैरे गोष्टी इतक्या मनावर घ्यायच्या की उपासमार करून जाणीवपूर्वक बारीक रहायचं असाही एक ट्रेंड आम्ही नेहमी बघतो. त्यामुळे आजकाल वयाला साजेशी उंची-उंचीला साजेसा बांधा अशा प्रकारच्या नीटनेटक्या बांधेसूद मुली दिसतच नाहीत. (इथे एक गोष्ट क्लिअर करते, मुलींनी "असंच असलं/ दिसलं पाहिजे" "तसंच असलं/ दिसलं पाहिजे"... वगैरे त्यांच्या बांध्याबद्दल/ शारीरिक ठेवणीबद्दल कुठलंही स्त्रीमुक्तिवादी किंवा विरोधी किंवा त्या प्रकारचं मला मत मांडायचं नाहिये. )
एकतर खूप बारीक किंवा स्थूल अशाच मुली खूप दिसतात दुर्दैवाने. लवकर वयात येणं, भेसळयुक्त दुधदुभतं आहारात असणं, हॉस्टेलवर असल्यामुळे नाईलाज म्हणून बाहेरचं खावं लागणं अशी अगणित कारणं आहेत, पण व्यायामाचा आळस आणि सतत स्क्रीनला चिकटून रहाणं हा खूप मोठा काँट्रिब्यूटिंग फॅक्टर आहे असं वाटतं. शारीरिक कष्ट नकोतच, पण २ मजले किंवा १ मजला वर डिपार्टमेंट असेल तरी लिफ्टने जायचं, लिफ्ट नसेलच तर कुरबुरत संथ चालीने कसेतरी ते २ मजले चढा-उतरायचे... विशीतच ही स्थिती तर पुढे कसं निभणार?

नुकतीच एक मुलगी आम्ही बघितली जिने प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणून स्वतःचं वजन २०-२५ किलोने तरी घटवलं. तिची अगोदरची ओळख ही तिच्या फ्रेंड सर्कलमधेही "वो मोटी है" अशीच होती. आणि मग परीक्षा-सुट्टी संपवून आली तेव्हा तिने ऑल्मोस्ट १० किलो घटवले होते. पद्धतशीर आहारनियमन, पुरसं चालणं या २ गोष्टींनी तिने हे साध्य केलं होतं. आणि तिचा तिलाच फरक समजत होता. नंतरही तिने जवळपास १०-१५ किलो घटवून आता ती स्थिर आणि अर्थातच जास्त हेल्दी झाली आहे.

आजकाल सोशल मिडियावर जो उठतो तो आहार-व्यायाम-कॅलरी डिफिसिट... नुसती बडबड करत असतो. पण तरुणाईपर्यंत हे खरंच कितपत पोहोचतंय? जरी पोहोचत असेल तरी त्यांची गत जर ''कळतंय पण वळत नाही" अशी असेल तर अशा मुलांचे पालक म्हणून घरातले काही लक्ष घालत नाहीत का? न ऐकणं हे तर तरुणाईचं व्यवच्छेदक लक्षण! नको म्हटलं की तेच जाऊन आधी करायची हौस दांडगी, आणि बंडखोरी अंगात भिनलेली असतेच. पण तरीही, जे काही पोटात ढकलतोय ते नक्की शरिरात काय परिणाम करतं याचा किमान विचार करायची सवय लावणं खूप गरजेचं आहे. बाहेर खाणं हा नाईलाज असला तरी पुरेसं पाणी, आवश्यक तो व्यायाम आणि रील्स वरखाली न करता मस्त झोप हे तरी निदान करूच शकतो ना?
अजून काही उदहरणं देऊन मी थांबते. सगळे संवाद १००% खरे आहेत, जिथे नावांचे उल्लेख आहेत ती नावं अर्थातच बदललेली आहेत.
१.
"मॅम.... मी सेमिनार टायटल सबमिट नाही केलं गेल्या आठवड्यात. मल बरं नव्हतं." (आजारपणाची कारणं ही आता थातुरमातुर मानतो आम्ही, कारण ती ९०% खोटी असतात.)
"काय झालं होतं?"
"पिरिएड्स आले होते."
" मग त्यात काय? त्याचा आणि सेमिनारचा काय संबंध? फार तर एखादा दिवस किंवा २ दिवस आराम करून मग सबमिट का नाही केलंस?"
"मला पीसीओडी आहे मॅडम, गायनॅकोलॉजिस्टकडे जावं लागलं..." ... हिचं वय १९ असेल Uhoh
"ठीक आहे. कर आता १-२ दिवसांत सबमिट."

२.
"सर, मला ट्यूटोरिअल साठी चौथ्या मजल्यावर येता येणार नाही."
"का रे बाबा? काय प्रॉब्लेम आहे?"
"मी ओव्हरवेट आहे, त्यामुळे मला कधीपण बीपी वाढायचा त्रास आहे. पायर्‍यांवरून येताना मला जास्तीचा घामपण येतो. ट्रीटमेंट चालू अहे. पण काही दिवस चढायचं जमणार नाही."

३.
"सायली सलग ४ लेक्चर्स आली नाही. काय झालं आजारी आहे का?"
"हो मॅडम. तिला सारखा ताप येतोय तर पेरेंट्स येऊन गावी घेऊन गेले."
मेंटॉर कॉल म्हणून तिला कॉल केला. तिचं हिमोग्लोबिन कमी झालं होतं, व्हिटॅमिन डीफिशिअन्सी होतीच, शिवाय प्रतिकारशक्ती खूप कमी झाली.
"मी तिची आई बोलतेय. मॅडम, ती कायच खात नाही मेसमधे. आम्ही जेवलोय मेसमधे. तसं बरं असतं. आणि कॉलेजच्या गेटच्या बाहेर पण चपाती-भाजी मिळते १-२ ठिकाणी चांगली. तिला पैसे देतो आम्ही मॅडम पण ती खात नाही. जाड झाले तर चांगली दिसणार नाही म्हणून खात नव्हती काही. आता जरा डॉक्टरांनी रागवलंय तर नीट जेवतेय. तिची जी काय परीक्षा आणि लेक्चर बुडली असतील ते ती भरून काढेल, तेवढं तुम्ही थोडं समजून घ्या."

४.
"तू मास्क बाजूल करून दाखव चेहरा. हॉलटिकिट वर पण बघूदेत मला." - परीक्षेच्या स्कॉडमधले एक सर एका मुलाला म्हणाले.
त्याने नाईलाजाने मास्क काढून दाखवला. खूप पुरळ आले होते, लाल झाला होता चेहरा. सरांनी व्हेरिफिकेशन करून पाठवून दिलं त्याला, पण अनुभवी नजरेला काहीतरी गडबड वाटली. मग कंट्रोल रूममधे विषय निघाला.
"तो ना, अभिमन्यू नाव त्याचं. आता बराच बराय, मधे तर इतकी अ‍ॅलर्जी आली होती की लेक्चरला येत नव्हता. पेरेंट्स येऊन भेटून गेले होते आपण होऊनच."
"कसली अ‍ॅलर्जी?"
"काय सांगू सर?! बॉडी बिल्डींगच्या काय गोळ्या घेत होता वाटतं, हेवी झालं ते सगळं. मग दुखणं उपटलं. त्याचे मम्मी-पप्पा सांगत होते. आता काहीतरी औषधाने कमी झालंय ते."
---
वयात येताना होणारे बदल, मानसिक चंचलता, अस्वस्थपणा या सगळ्या फेजेस असूच शकतात. पणा योग्य मार्ग असतोच ना? घरी मोठी माणसं असतातच ना? ती लक्ष देत नाहीत? आपलं पोर काय खातं-पितं, कुठल्या चुकीच्या प्रलोभनाला बळी तर पडत नाही ना, सौंदर्य आणि इतर गोष्टींच्या नादी लागून मोठं नुकसान तर होत नाहिये ना, अगदी "मेंटेन्ड फिगर/ बॉडी" राहूद्याच, पण आरोग्यपूर्ण दिनक्रम आहे की नाही, न ऐकण्याची तारुण्यसुलभ वृत्ती असली तरी काही वेळा थोडं कंट्रोल करावं लागतं मुलांना ते करणं यात आई-बाप म्हणून काही रोल असतो ना? परगावी असाल तरी मुलांना जाणीव करून देणं गरजेचं नाही का?
का नाहीच अपेक्षा करायची तीही? असा प्रश्न पडतो कारण भेटायला येणारे पालकही एकेकदा नमुनेच असतात! स्वतःच्या दिसण्याबद्दल, समाजातल्या स्टेटसबद्दल, कमालीच्या पॉलिश्ड मॅनर्स बद्दल असे जागरूक पालक आले की आम्हीपण चक्रावून जातो.
"आम्ही कधी आमच्या मुलांना रागवत नाही. त्यांचं जे काही नुकसान होत असेल ते आम्ही भरून काढू जादाच्या असाईनमेंट्स लिहून. आणि तुम्ही सारखे अटेंडन्स बद्दल फोन करू नका, आमचा बिझनेस असल्यामुळे वेळ होतच नाही आम्हाला फोन रिसीव्ह करायला."
असो.

कुठेतरी काहीतरी चुकतंय हे नक्की. मीपण एका लेकराची आई आहे, घरातल्यांच्या मुखी चांगलं अन्न मिळावं यासाठी धडपडणारी एक गृहिणी आहे, चुकीच्या कल्पना मनाशी बाळगून भरकटणारी पिढी समोर दिसत असताना गोंधळून जाणारी एक शिक्षकी पेशातली व्यक्ती आहे. आम्ही आरोग्यजागृतीसाठी उपक्रम राबवतो तेव्हा जमेल तसं या मुलांना समजावत असतो. तेवढाच एक खारीचा वाटा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१६-२२ वयातील मुलं-मुली असलेल्या घरी असेच संवाद होत असतील. काही पालक मान्य करत असतील मुले सांगत आहेत ते किंवा काही त्यांना समजावून सांगत असतील. आमच्या घरी पण मोठ्या मुलाचे जिमला जायला सुरुवात केल्यावर काही दिवसांनी सुरु झाले व्हे प्रोटीन हवे आहे, खूप समजावले, त्याचे परिणाम कसे वाईट होतात सांगितले, हे देखील विचारले कि तुला शिक्षण सोडून शरीर सौष्ठव करायचे आहे का, जर उत्तर नाही असेल, तर जिमला जाऊन जे काही फायदे होतात ते पुष्कळ आहेत.

आता घरून प्लान्ट बेस्ड प्रोटीन पावडर हवी अशी मागणी होत आहे. परत एकदा त्या प्रोटीन पावडर मध्ये काय पदार्थ असतात आणि त्यातील तुम्ही किती रोजच्या जेवणातून मिळवता असा उदाहरण दाखवत सं"वाद" साधला त्यामुळं सध्या तरी विषय थंड आहे. पण ज्या नातेवाईकाने हे सांगितले तो भेटला की परत सुरु होते, पण आता या वेळी त्या नातेवाईकाची पण शाळा घेणार आहे. तो नातेवाईक लोकां सांगे ब्रह्मज्ञान चे तत्वज्ञान आचरतो.

एकंदरीत हल्लीची पिढी कमीत कमी श्रमात अधिकाधिक फायदे शोधत असते, त्याकरता ते कितीहि वेळ वाया घालवातील, पण आत्मनिरीक्षण करणार नाहीत.

अतिकृष होण्याचे फॅड चिंताजनकच आहे. त्या वयात मुले किती भरभर वाढत असतात. बाह्य वाढ- आतील मेंदू आदि डेव्हलप होणे. त्यात कुपोषित राहून कसे चालेल.
.
तसेच अतिमेदही वाईटच.
.
आईने नेहमी हेच शिकविले की अन्न हे पूर्णब्रह्मच असते. पेरु, कोबीत, लिंबू, संत्र्यात क जीवनसत्व , दूध, अंडी, मासे, चीज यात ड जीवनसत्व व कॅल्शिअम, केळ्यात पोटॅशिअम , माशांत ओमेगा अ‍ॅसिडस, गाजरात ए व्हायटॅमिन. वगैरे वगैरे. त्यामुळे घरीच जागरुकता होती. बाहेर खाणेही तेव्हा कमी होते अर्थात बाहेर खाणे वाईटच वगैरे मला म्हणायचे नाही. बदलत्या जीवनमानाशी जुळवुन घेतलेच पाहीजे पण त्यातही काही मूल्ये शाश्वत हवीत.
.
>>>>>आम्ही आरोग्यजागृतीसाठी उपक्रम राबवतो तेव्हा जमेल तसं या मुलांना समजावत असतो. तेवढाच एक खारीचा वाटा!
छान.

हे फक्त कॉलेजवयीन मुलांपुरतं मर्यादित नाही. अगदी प्राथमिक शाळांतली मुलंसुद्धा ओबीस कॅटेगरीत मोडतात आणि ज्या वयात चैतन्याने सळसळलेलं असलं पाहिजे त्या वयात लिटरली हत्तीसारखी हलत डुलत चालतात.

पालकांचाही दोष आहेच. माझा मुलगा जेवतच नाही, भाज्याच खात नाही म्हणून त्याला रोज चीज पराठा किंवा दाल खिचडी बनवून देणारे किंवा शाळेत शुक्रवार सोडल्यास जंक फूड अलाऊड नाही म्हणून चपाती आणि केचपचा रोल करून देणारे पालक पाहिले आहेत. टीचरनी काय आता रोल उलगडून त्यात काय भरलं आहे ते चेक करायचं का?

स्पोर्ट्सच्या एक्सट्रा क्लाससाठी असलेल्या डब्यात इतर पालक कसे चिप्स, बिस्किटं देतात आणि तू तेवढं हेल्दी फूड देतेस म्हणून आमच्याकडे भांडणं झालेली आहेत किंवा मग त्या त्या मित्र मैत्रिणीबरोबर डबाच एक्सचेंज करून झालेला आहे.

लेख आवडला.
पिअर प्रेशर हा पण एक घटक असावा अती डाएट करणार्‍यांसाठी. समवयस्कच टवाळी करत आहेत हे फार जिव्हारी लागतं. मग तात्काळ बारीक होण्यासाठीचे मिळतील ते उपाय केले जात असावेत. तीच गोष्ट बॉडी बिल्डर्सची.

भारत मधुमेहींची राजधानी असे आजवर ऐकत होते, २०५०
पर्यंत तो स्थुल लोकांची राजधानी होणार असे आता रेडिओवर ऐकुन आहे.

पण मला चित्र संमिश्र दिसतेय. मुंबैत आले की दहा वर्षांपासुनची स्थुल मुले दिसतात, हे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. पालक थोडे प्रेमळ, थोडे अपराधी अशा भुमिकेत असतात. आत्ता लहान आहे अजुन, समजत नाहीये, मोठा झाला की समजणार अशी स्वतःचीच समजुत घालणे सुरु असते. मोठी झालेली ही मुले मग स्थुलत्व वाढवत तरी नेतात नाहीतर स्वतःची उपासमार करुन बारीक होतात. आरोग्य दोघांचेही धोक्यातच.

याचे कारण कदाचित हे असेल की पोटात अन्न जास्त जातेय पण
त्या प्रमाणात शारिरीक हालचाल नाही. सुरक्षित नाही/जागा नाही/खुप अभ्यास क्लासेस आहेत वगैरे कारणांनी घरी मुलांना खाली खेळायला सोडुन देणे आता होत नाही. कित्येक शाळांना खेळायची मैदाने नाहीत असे मध्यतरी वाचलेय. असले तरी त्यात मुले किती खेळतात माहित नाही. मी शाळेत होते तेव्हा शाळा भरताना मैदानावर कवायत करुन घ्यायचे. दर दिवशी/एक दिवस आड शारिरीक शिक्षणाचा तास असायचा. त्यात मैदानावर नेऊन खेळ घेत असत. शा शिचे वेगळे शिक्षक होते. आताचे चित्र माहित नाही. माझी लेक आठवड्यातुन एकदाच पिटीचा ड्रेस घालुन शाळेत जायची. कॉलेजातुन तर हा विषय हद्दपारच आहे. ज्यांना आवड आहे त्यांनी स्पर्धेतुन भाग घ्यायचा असेल तरच उशिरा थांबुन खेळावे ही अपेक्षा असते.

इथे गावात चित्र उलटे. झाडुन सगळी मुले किडकिडीत, वयापेक्षा लहान दिसणारी. मुली तर जास्तच. शाळेत नववी-दहावीतल्या मुली वर्गात चक्कर येऊन पडण्याच्या घटना घडतात. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातुन लोहाच्या गोळ्या, कॅल्शियमची इन्जेक्शने वगैरेचा मारा सुरु असतो. पण सुयोग्य आहाराच्या अभावी लोहाच्या गोळ्या गरम पडतात आणि त्या घरात पडुन राहतात. तुम्ही शाळेत जाल तर अगदी पहिलीपासुन चेहर्‍यावर तेज असलेली मुले सापडणार नाहीत. खोल डोळे, आत गेलेले गाल असलेली मुले वर्गावर्गातुन दिसतील. ही कुपोषित मुले पुढे जाऊन जन्मतःच कुपोषित मुले जन्माला घालतात.

हे गरिबीमुळे होतेय असे अजिबात नाहीय. घरात खायला प्यायला भरपुर आहे. काय खायचे याची निवड करायची अक्कल नाही म्हणावे तर आंगणवाडीच्या आशाबाई सगळीकडे फिरतात, पोषक आहाराचे महत्व सांगतात, मुलांना पोटभर दुपारचे जेवण शाळेत मिळते. तरीही ही गॅप आहे. याची कारणे अनेक असतील, माझा तो अभ्यास नाही. पण डोळ्यांना दिसणारी कारणे म्हणजे चौरस अहाराचा अभाव. कोकणात डाळीचे पाणी व भात हेच मुले खातात. जेवणात फळे तर अजिबात नाहीत. कोकणात आंबे वगैरे आहेत त्यांच्यावर किटकनाशके व हार्मोन्सची अतिरेकी फवारणी होते. परसातील पेरु, चिकु, केळी, सिताफळे आता गायब झालीत कारण माकडासारख्या प्राण्यांच्या त्रासामुळे होती ती झाडे गेली आणि नवी लावली जात नाहीत. २५ वर्षांपुर्वी अन्नात जितकी जीवनसत्वे व खनिजे होती त्यात आता ५० टक्क्यापर्यंत घट झालीय असे पेपरातुन प्रसिद्ध होतेय. म्हणजे आज तितकीच जी. व ख. मिळवायची तर दुप्पट जेवायला हवे. मुले त्याजागी चिप्स जास्त आवडीने खातील. शहरातले माहित नाही पण गावी रेशनवरच्या तांदळात फॉर्टिफाईड तांदुळ घालुन दिला जातो. बायांना सांगितले गेलेय असा तांदुळ मिळणार हे. तरी तो पाण्यात तरंगतो म्हणुन बायका काढुन टाकतात आणि सरकारी प्रयत्नांवर पाणी ओततात.

मला हा विषय खुप गंभिर वाटतो. हळुहळु देश दोन्ही बाजुने कुपोषित होतोय. पुढच्या पुढच्या पिढ्यांमध्ये हे वाढत वाढत जाणार. कुपोषित मातापिता कुपोषित मुल जन्माला घालणार, ही साखळी अशीच पुढे जाणार. काहीतरी मार्ग निघायला हवा.

रेशनवरच्या तांदळात फॉर्टिफाईड तांदुळ घालुन दिला जातो. बायांना सांगितले गेलेय असा तांदुळ मिळणार हे. तरी तो पाण्यात तरंगतो म्हणुन बायका काढुन टाकतात आणि सरकारी प्रयत्नांवर पाणी ओततात.
>>>> बायका त्याला प्लास्टिकचा तांदूळ म्हणतात. हे व्हॉटस् ऍप ज्ञानाचे परीणाम.

सगळ्या प्रतिसादांसाठी धन्यवाद!

या यादीत पीसीओडी का टाकलं आहे समजलं नाही.>>> फक्त स्थूलपणाच असं नाही, अगदी लहान/ तरुण वयात हार्मोनल इंबॅलन्स होणं हेही आरोग्याच्या दृष्टीने अयोग्यच म्हणून उल्लेख केला.

अनेक डॉक्टरांच्या मते आजकाल दर १० मुलींमधे ३-४ जणींना काही ना काही हार्मोनल त्रास असतो जो सरतेशेवटी त्यांच्या पिरिएड सायकल्स बिघडणे आणि भविष्यात वंध्यत्वाकडे जाऊ शकतो. पुढचं पुढे (म्हणजे हे पुढचे विषय हे या लेखाचा सध्याचा मुद्दा नाहीत म्हणून) पण या सगळ्यामुळे आत्ता आपलं किती काय नुकसान होतंय याची किमान जाणीव तरी असावी असं वाटतं.
सगळ्या गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या आहेत. जीवनशैली, व्यायामाचा अभाव, प्रोसेस्ड फूड, वर प्रतिसादात आलंय तसं पीअर प्रेशर, सोशल मिडीयाचा प्रभाव वगैरे. आणि या सगळ्यामुळे दीर्घकालीन नुकसान होतंय हे वेळीच लक्षात यायला हवं.
काळ बदलतो, गरजा बदलतात पण अजूनतरी काही गोष्टी बदललेल्या नाहीत.
तब्येतीची हेळसांड केली तर जे होतील ते परिणाम भयावह आहेत हे आता दिवसागणिक दिसतंय.

>>> फक्त स्थूलपणाच असं नाही, अगदी लहान/ तरुण वयात हार्मोनल इंबॅलन्स होणं हेही आरोग्याच्या दृष्टीने अयोग्यच म्हणून उल्लेख केला.
होय, पण तो 'ओढवून घेतलेला'च असेल असं गृहित धरणं योग्य नाही. त्यापुढची इमोजीही मला आवडली नाही. तुम्ही केसची पूर्ण माहिती नसताना सहज आणि बहुधा नकळत एका व्यक्तीवर, एका कुटुंबावर जजमेन्ट पास करताहात.

बैठी जीवनशैली, खाद्यपदार्थांची उपलब्धता आणि विकत घेण्याची आर्थिक क्षमता, स्मार्टफोन्सचा वापर अशा काही बाबी आपण थोड्याफार (थोड्याफारच, कारण जागेचा अभाव, वेळेचा अभाव, ऑन्लाइन असाइन्मेन्ट्स इ. बाबी दैनंदिन आयुष्यातही एका व्यक्तीच्या नियंत्रणाबाहेरच्या असतात अनेकदा) नियंत्रित करू शकतो, पण मुळात अन्नधान्याचा / जमिनीचा कस, ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम (मुलंमुली लवकर वयात येण्यात याचाही वाटा आहे) यांसारख्या बाबी आपल्या नियंत्रणाच्याच काय आकलनाच्याही पलीकडच्या असू शकतात.

वर एका प्रतिसादात प्रोटीन पावडरबद्दल नाराजीचा सूर दिसतो आहे. पारंपरिक भारतीय आहारात पुरेसं प्रोटीन नसतं असं आहारतज्ज्ञांचं मत आहे. त्यात दीडशे वर्षांची गुलामी, सततचे दुष्काळ इत्यादींमुळे दक्षिण आशियाई देशांत जनुकीय जडणघडणीवर परिणाम झालेला आहे. आपण लाइफस्टाइल डिसीजेसना खूप अधिक प्रमाणात 'प्रोन' झालेलो आहोत. आपल्या मागच्या आणि आपल्या पिढ्यांची पापं आपली मुलं भोगताहेत. यातल्या कुठल्या बाबींवर आपलं नियंत्रण होतं?

'आजकालची मुलं' म्हणताना अगदी ५०-६० वर्षांपूर्वीपर्यंत भारतीयांची अ‍ॅव्हरेज लाइफ एक्स्पेक्टन्सी ४०-४५ वर्षांची होती. आपण त्याच्याशी तुलना करतो आहोत का?

पुन्हा लिहिते, तुमची कळकळ पोचली पण सरसकट जो 'काय बाई ही आजकालची मुलं आणि त्यांचे पालक!' हा आविर्भाव आहे तो मला पटलेला आणि आवडलेला नाही. जजमेन्ट पास करण्याव्यतिरिक्त तुम्ही यासंदर्भात माहिती मिळवण्याचा प्रयत्न वा काही कृती करताहात का हेही जाणून घ्यायला आवडेल.

छान विषय आहे.
लेखाचे शीर्षक कृपया इकडे लक्ष द्या ऐवजी लेखातील विषयानुसार असेल तर चांगले जेणेकरून हा विषय आणि येथील चर्चा अधिक लोकांपर्यंत पोहोचेल असे वाटते.

प्रतिसाद वाचतोय...
कारण याबाबत आमच्या घरच्या बरेच गोष्टी आणि मुलांच्या खाण्यापिण्याच्या बरेच सवयी मला पटत नाहीत, पण ते भांडून बदलायला ज्ञान कमी पडते.

तुमची कळकळ पोचली पण सरसकट जो 'काय बाई ही आजकालची मुलं आणि त्यांचे पालक!' हा आविर्भाव आहे तो मला पटलेला आणि आवडलेला नाही. >>> असा आविर्भाव नाही कारण लेखातच एका मुलीचं चांगलं उदाहरण दिलंय मी आणि त्याचंही कौतुकच आहे.
आजचं पान हे मला अस्वस्थ करणार्‍या काही गोष्टींबद्दल आहे.>>> हे माझ्या लेखाचं पहिलं वाक्य आहे, त्यामुळे इथे मी कुणालाही जज करायला बसलेली नाही, तो अधिकार मला नाही हे मला पूर्ण माहिती आहे. पण समोर जे दिसतंय ते बघून दुर्लक्ष करण्याइतकं मी ते कॅजुअली घेऊ शकत नाही, म्हणून ते मांडावंसं वाटतं.

त्यापुढची इमोजीही मला आवडली नाही. .>> ती इमोजी ही काहीसं अवाक होणं, बरीच हेल्पलेस भावना, त्या मुलीची नकळत वाटलेली काळजी या सगळ्याचं मिश्रण आहे. बाकी जो काही अर्थ निघायचा असेल तो तुम्ही काढू शकता. "उगीचच काहीही" अशा अर्थाने मी ती वापरलेली नाही.

यांसारख्या बाबी आपल्या नियंत्रणाच्याच काय आकलनाच्याही पलीकडच्या असू शकतात.>> माहितेय की ते मलाही! इन फॅक्ट, पुढच्या पिढीपुढे प्रचंड आव्हानं आहेत हे खरंच आहे. त्यामुळे आजार "ओढवून" घेतलेला असेलच असं नाही हेही खरंच आहे. पण त्यावरून त्या मुलीला किंवा तिच्या कुटुंबाला जज करत नाहिये मी.

जजमेन्ट पास करण्याव्यतिरिक्त तुम्ही यासंदर्भात माहिती मिळवण्याचा प्रयत्न वा काही कृती करताहात का हेही जाणून घ्यायला आवडेल.>> लेखात लिहिणं गरजेचं वाटलं नव्हतं, पण आता लिहायला हरकत नाही. आम्ही जेव्हा मेंटॉरिंग करतो तेव्हा प्रत्येक विद्यार्थी/ विद्यार्थिनीची माहिती आम्हाला घ्यावी लागते. अगदी वैयक्तिक किंवा खूप खोलात नाही, पण किमान बेसिक (अ‍ॅकॅडेमिक च्या बरोबरीने बेसिक कौटुंबिक माहिती, मेडिकल हिस्टरी असेल तर तीही.) माहिती आम्ही घेतो.
आमची टीम चांगली आहे, मेंटॉरिंग जरी कोणा एकाकडे असेल तरी महत्त्वाच्या गोष्टींत गरज वाटली तर आम्ही इतर कलिग्सना सामील करून घेऊन मुलांना/ मुलींना पूर्ण सहकार्य करतो. तिची वैयक्तिक जीवनशैली/ दिनचर्या याबाबत गरज पडली तेव्हा तिच्या आईशी फोनवर बोलून झालंय. पीसीओडी असणं हा काही गुन्हा नाही, पण त्यावर उपाय न करणं, चुकीच्या सवयी यामुळे तिला १२वीतही त्रास झालेला आहे असं समजलं. (अर्थात हे नंतर झालं, तिने त्या राहिलेल्या सेमिनार असाईनमेंट्स सबमिट केल्यानंतरच्या मेंटॉर कॉलमधे)

वुमन एम्पॉवरमेंट सेल च्या अंतर्गत जे कार्यक्रम होतात त्यात आरोग्याची काळजी, ब्लड गृप + हिमोग्लिबिन चेकिंग , अगदी सेल्फ डिफेन्स, करिअरमधल्या संधी, असं काही ना काही वर्षातून २ वेळा होत असतं. स्त्री कर्मचारी आणि विद्यार्थिनींसाठी हे उपयोगी यावं असा हेतू असतो.

असो.
अवांतर - वैयक्तिक कुणालाही उद्देशून नाही, पण हा प्रतिसाद म्हणजे पुन्हा सारवासारव वाटली तर माझा नाईलाज आहे. कारण लेखी पद्धतीने सगळंच नीट मांडलं जाईल आणि ते तसंच्या तसं इंटरप्रीट केलं जाईल असं नाही. मागच्या वेळीही असा अनुभव मी घेतला आहे त्यामुळे माझ्यापुरता मी हा विषय थांबवते. पोलिटिकली करेक्ट लिहिणं हे प्रत्येकालाच जमतं असं नाही, माझ्या कुवतीप्रमाणे मी लिहिलं. वाचकांच्या सगळ्या मतांचा पूर्ण आदर आहे.

>>> पणा योग्य मार्ग असतोच ना? घरी मोठी माणसं असतातच ना? ती लक्ष देत नाहीत?
हे जजमेन्टच आहे.

>>> पोलिटिकली करेक्ट लिहिणं हे प्रत्येकालाच जमतं असं नाही
तुम्ही शिक्षिकी पेशात आहात, तुमच्यावर ती जबाबदारी जास्त आहे.

नवदुर्गा, लेख आवडला. तळमळ पोहोचली.
प्रतिसाद पण आवडले. जे तुझ्या हातात आहे ते करण्यासाठी धडपडत आहे हे कळले. तुझा प्रयत्न सुरू ठेव...

अतिशय इंटरेस्टिंग आणि तितकीच अस्वस्थ करणारी निरिक्षणे आहेत तुमची. त्या अनुषंगाने साधना ह्यांनी मांडलेली शहर आणि ग्रामीण परिसरातील फरक दाखवणारी निरिक्षणे पण अस्वस्थ करणारी आहेत.

शहरातील विद्यार्थ्यांमध्ये (शालेय आणि कॉलेज दोन्ही गटातील) ह्याबद्दल बरेच ठिकाणी वाचायला/ऐकायला मिळत. ते दुःखद असले तरी वाचुन आश्चर्य वाटले नाही. पण आपल्या भारतीय मुलींमध्ये काही कृत्रिम सौंदर्य कल्पनांच्या आहारी जाऊन डायटिंग चा अतिरेक होतो आहे. ह्ह्याबद्दल मला कल्पना नव्हती. फार धक्का बसला.

भारतीय मुलींमध्ये पीसीओएस चे प्रमाण साधारण २०% (दर पाचा मधील एक) इतके जास्त असुनही ह्या विकाराबद्दल फार कुणाला माहिती नसते/ करुन घेण्याची गरज वाटत नाही. हे अतिशय खेदजनक पण खरं चित्र आहे. साधारण ७५% पीसीओएस रुग्णांमध्ये इन्सुलिन चार अवरोध (insulin resistance) आढळतो. जो चुकीच्या जीवनशैलीमुळे तीव्र होत जातो. म्हणजे ७५% रुग्णांनी जीवनशैलीत योग्य ते बदल केलेत तर ह्या विकारांची तीव्रता बर्याच अंशी कमी करता येते आणि त्यामुळे पुढील आयुष्यात येणाऱ्या अनेक आरोग्य समस्या टाळता येतात. त्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांसाठी च्या कार्यक्रमात ह्याबद्दल एखादी कार्यशाळा आयोजित करण्याचा प्रयत्न करा, शक्य असल्यास. ऑनलाईन उपक्रम शक्य असेल तर मला ह्या संदर्भात मदत करायला आवडेल.

<<<वर एका प्रतिसादात प्रोटीन पावडरबद्दल नाराजीचा सूर दिसतो आहे. पारंपरिक भारतीय आहारात पुरेसं प्रोटीन नसतं असं आहारतज्ज्ञांचं मत आहे. त्यात दीडशे वर्षांची गुलामी, सततचे दुष्काळ इत्यादींमुळे दक्षिण आशियाई देशांत जनुकीय जडणघडणीवर परिणाम झालेला आहे. आपण लाइफस्टाइल डिसीजेसना खूप अधिक प्रमाणात 'प्रोन' झालेलो आहोत. आपल्या मागच्या आणि आपल्या पिढ्यांची पापं आपली मुलं भोगताहेत. यातल्या कुठल्या बाबींवर आपलं नियंत्रण होतं?>>>

काही मुलभूत गैरसमज आहेत तुमच्या वरील विधानांत. म्हणुन ह्याबद्दल सविस्तर लिहिते आहे.

(१) पारंपरिक भारतीय आहारात प्रथिनांची कमतरता अजिबात नाही. हे एक मिथक आहे. आहारात असणार्या प्रथिनांचे पचन म्हणजे विघटन होऊन सुटी झालेली नत्राम्ले (amino acids) रक्तात आणि रक्तातुन पेशींमध्ये प्रवेश करतात. आणि मग पेशी गरजेनुसार ती जोडुन त्या पासुन हवी ती प्रथिने निर्माण करतात. शरीराच्या दृष्टीने महत्त्वाची अशी ९ नत्राम्ले (essential amino acids)ही अन्नातुन च मिळवावी लागतात (उरलेली शरीरात तयार करता येतात). शाकाहारी घटकांमध्ये (सोयाबिन आणि किन्वा चा अपवाद वगळता) ९/९ नत्राम्ले नसतात. पण सामान्य पुणे एकंदर धान्ये (monocotyledons) आणि द्विदल कडधान्ये (dicotyledons) ह्यांच्या एकत्रित सेवनाने आपण सगळी अत्यावश्यक नत्राम्ले मिळवु शकतो. आपले बहुतांश पारंपरिक अन्नपदार्थ हे ह्या दोहोंच्या संयोगाने बनलेले आहेत. उदाहरणार्थ पिठलं भाकरी/भात, आमटी भात, डाळ ढोकळी, इडली सांबार इ. शाकाहारी प्रथिने ही प्रमाणात पचनादरम्यान वाया जातात हे कायम सांगितले जाते पण ही देखील समस्या नाही. कशी ते पिठलं भाताच्या उदाहरणातुन स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते.

सामान्यत: अगदी जास्तीत जास्त प्रथिनांची गरज गृहित धरली तरी प्रतिकिलो मागे १ ते १.२ ग्रॅम प्रथिने इतकी आहे. म्हणजे ६० किलो वजन असलेल्या व्यक्तीला दर दिवशी आहारातुन जास्तीत जास्त ७२ ग्रॅम प्रोटिन्स मिळवणे आवश्यक आहे. तांदूळ आणि चणाडाळ ह्यामध्ये साधारण २०% प्रोटिन्स म्हणजे नत्राम्ले असतात. शाकाहारी प्रथिनांचा ( डायजेस्टिबिलिटि फॅक्टर हा ०.७५ असतो. म्हणजे एकुण खाल्लेल्या प्रथिनांमधील ७५% रक्तात पोहोचते. म्हणजे दर जेवणात (न्याहारी +दुपार आणि रात्री चे जेवण) साधारण २४ ग्रॅम प्रोटिन्स मिळवण्यासाठी एकुण १०० ते ११० ग्रॅम पिठलं भात खाणे आवश्यक आहे!

हे मिथक वापरुन वेगवेगळ्या प्रोटीन पावडरी खपवल्या जातात विशेषतः तरुण मुला/मुलींना. बर्याच सप्लिमेंट्स मध्ये स्टिराॅइडस असतात. ज्याचे अतिरिक्त सेवन आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. मध्यंतरी एका १९ वर्षे वयाच्या विद्यार्थ्याचा ह्या प्रोटिन सप्लिमेंट्स च्या अतिरेकामुळे मृत्यू झाला. शिवाय अतिरेकी प्रमाणात प्रोटिन्स सेवनामुळे काही गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नरेन ह्यांनी लिहलेय ते अचुक आहे.

(२) जवळ जवळ सगळे जीवनशैलीशी संबंधित आजार (cardio-metabolic diseases) हे polygenic आहेत. म्हणजे एकाच वेळी तितके सगळे जनुकीय बदल एकाच वेळी झालेत तर ते होतिल. ज्याची व्यावहारिक शक्यता नगण्य असते. थोडक्यात व्यक्तीची (चुकीची) जीवनशैली ही त्या आजारांसाठी कारणीभूत असते ९९.९९%.‌ आजी-आजोबांच्या पिढीत ६०+ वयात, आई -वडिलांच्या पिढीत ४५+ वयात आणि मुलांच्या पिढित २०+ वयात ह्या आजारांचा प्रादुर्भाव दिसतो. एवढ्या प्रमाणात रोगांचे संख्याशास्त्रीय बदल होण्यासाठी जे जनुकीय बदल अपेक्षित आहेत ते होण्यासाठी हजारो वर्षे लागतील. १००-१५० वर्षे हा काळ त्यासाठी पुरेसा नाही.

साधारण २४ ग्रॅम प्रोटिन्स मिळवण्यासाठी एकुण १०० ते ११० ग्रॅम पिठलं भात खाणे आवश्यक आहे! >> हे कसं मिळालं?
१ किलो चणाडाळीच्या पिठात २२० ग्रॅम प्रोटिन्स असतात गूगल म्हणतंय म्हणजे साधारण ११० ग्रॅम मध्ये २४ असं काढलं असावं. म्हणजे दिवसाला ३३० ग्रॅम डाळीच्या पिठाचं पिठलं! बाबो!
हे काही तरी अचाट नाही आहे का? एकावेळी एक फारतर दोन टेबल स्पून कोरड्या पिठाचे पिठले मी खाऊ शकतो. म्हणजे १५ ग्रॅ. डोक्यावरुन पाणी म्हणजे ३० ग्रॅम. रोज तिन्ही त्रिकाळ पिठलं खाणे शक्य नाही. आणि खाल्लं तरी २४ ग्रॅम दर जेवणाला कसे मिळणार? भातातही प्रथिने असतीलच, पण कर्बोदके ही तितकीच वाढतील. डाळीतही ११० ग्रॅ मध्ये ७० एक ग्रॅ कर्बोदके आहेत. अर्थात सध्या कर्बोदकांकडे पूर्ण दुर्लक्ष करुन प्रथिनांवरच लक्ष केंद्रित करू.
का काही चुकतंय माझं?

१ किलो नाही १०० ग्रॅम. धान्ये/कडधान्ये ह्या मध्ये साधारण २०% प्रोटीन्स आणि ८०% कार्बोहाइड्रेट्स असतात. कुणी तिन्ही जेवणात पिठलं भात खाणार नाही अर्थातच. कुठलही एकदल +द्विदल असं कॉम्बिनेशन असेल तर १०० ग्रॅम मधील २०ग्रॅम प्रोटिन्स असतील. हे फक्त तृणधान्ये/कडधान्ये ह्यांच्या बद्दल. भारतीय आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असतो जे प्राणीज असल्याने त्यातुन ९/९ अमिनो ऍसिड्स मिळतात. म्हणजे आपल्या नेहमीच्या पारंपरिक आहारातुन प्रथिनांची गरज भागवता येते सहज.

"पारंपरिक भारतीय अन्नपदार्थात प्रोटिन्स ची कमतरता असते" असा जो एक गैरसमज आहे तो वस्तुस्थिती ला धरुन नाही हे स्पष्ट करण्यासाठी वरील उदाहरणात फक्त प्रोटिन्स वर फोकस आहे.

संदर्भः नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ न्युट्रिशन आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ह्या भारतीय संस्था, भारतीय अन्नपद्दार्थांचे विश्लेषण करुन दर दहा वर्षांनी अपडेटेड डेटा बेस प्रकाशित करतात. सध्याचा लेटेस्ट डेटाबेस २०१७ चा आहे. तो https://www.nin.res.in/ebooks/IFCT2017_16122024.pdf इथे उपल्ब्ध आहे. त्यातिल पहिल्या तत्क्त्यातुन एकुण प्रथिने आणि ८ व्या तक्त्यातुन विविध नत्राम्ले ह्यांच्याबद्दल माहिति मिळेल.

मी कुठे तरी हे वाचलं होतं, त्याची फार सत्यासत्यता माहित नाही पण लॉजिकली मला ते पटलं म्हणून इथे लिहून ठेवतेय. जाणकारांनी त्यावर अधिक प्रकाश टाकावा.
आपल्याला लागणाऱ्या प्रथिनांची गरज अन्नातून भागवण्यासाठी खूप क्वांटिटी मध्ये प्रथिने खावी लागतील जे प्रॅक्टिकली कठीण आहे. परंतु आपल्या शरीरातील पेशींमध्ये प्रोटीन हा एक घटक असतो. अनेक पेशी रोज मृत होत असतात आणि नव्या ही निर्माण होत असतात. तर ह्या मृत पेशींमधील प्रोटीन चा शरीर पुनर्वापर करून प्रोटीन ची गरज भागवते. म्हणून त्या प्रमाणात कमी प्रोटीन अन्नातून घेतलं तरी चालतं.
दुसरं माझं आवडतं वाक्य म्हणजे " अति सर्वत्र वर्ज्ययेत " आपण जनरली रोज जेवतो तो वरण भात भाजी पोळी कोशिंबीर दही हा आहार असेल तर काटेकोरपणे मोजमाप करायची गरज नाही. असो.

अनेक वाचकांपर्यंत मूळ मुद्दा पोहोचलाय हे बघून मला बरं वाटलं. (मतभेद असले तरी काहीच हरकत नाही) पण लेखनातून "मी काय करते/ कशी आहे/ जजमेंटल आही की नाही...." वगैरे पेक्षा बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टी पोहोचल्या हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.

सगळ्यांचे आभार.

धन्यवाद, पर्णीका.
माझ्या स्वतःच्या न्यूट्रिशनिस्ट आणि गॅस्ट्रोएन्टरॉलॉजिस्टशी झालेल्या चर्चेतून मला समजलेले निष्कर्ष माझ्या पोस्टमध्ये मांडले होते. पण तुम्ही लिहिलेल्याच्या अनुषंगाने माझी माहिती पुन्हा पडताळून अद्ययावत करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. Happy

परंतु भारतीय खाद्यपदार्थांत प्रोटीन असतं की नाही हा मुद्दा नसून तो बहुतांश लोकांच्या आहारात पुरेसा आहे का हा प्रश्न आहे. याबद्दल स्टडीज झालेले आहेत आणि नेटवर त्यांबद्दलच्या लिंक्स सापडतील.
खेरीज रोज ताजा, सकस, चौरस आहार तिन्हीत्रिकाळ मिळणं ही अनेकांच्या बाबतीत अनेक कारणांनी चैनीची बाब असू शकते. तशी उपलब्धता असेल तरीही योग्य पर्याय निवडता येण्यासारखी परिस्थिती असावी लागते. अगदी. साधं उदाहरण म्हणजे ताणतणावामुळे किंवा झोपेच्या कमतरतेमुळे कार्ब्ज अधिक प्रमाणात खायची इच्छा होऊ शकते.

एक व्यक्ती आजारी दिसली तर डॉक्टर्स तिच्या आहारविहारांत बदल सुचवतातच.
एखादी पिढीच्या पिढी स्टॅटिस्क्टिकली अधिक आजारी दिसत असेल तर तिच्या आवाक्याबाहेरचे घटक त्यात कार्यरत असण्याची शक्यता अधिक असते. मी वर उल्लेख केल्यानुसार त्यात ग्लोबल वॉर्मिंग, अन्नाचा कस, हवा/पाणी/ध्वनी/प्रकाश यांतील प्रदूषण, स्थलांतरणाचं वाढतं प्रमाण आणि या सर्वांमुळे वाढलेले मानसिक ताणतणाव - हे आणि असे अनेक पॅरामीटर्स असू शकतात.

अचानक एखाद्या समुद्रकिनार्‍यावर मृत जेलीफिशेस ढिगांनी येऊन पडायला लागले तर शास्त्रज्ञ 'काय बै खातात, यांच्या पालकांचं लक्ष नाही का अगदीच!' असं म्हणत नाहीत, त्यांच्या पर्यावरणातले प्रॉब्लेम्स समजून घेऊ पाहतात. पाण्यात प्लॅस्टिकचं प्रमाण वाढलं आहे का, कुठे ऑइल स्पिल झाला होता का, एक ना दोन!

असो. समजून घेण्याची इच्छा असेल तर अशा एकेका अभ्यासाला आयुष्य पुरणार नाही. मुलांवर आणि पालकांवर जाता जाता एखादा ताशेरा ओढणं कितीतरी सोपं आहे.

म्हणजे आपल्या आवाक्यातले बदल आपण करायचे नाहीत का? अर्थातच करायचे!
पण ज्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी पहावं, त्यांनीच थोडी अभ्यासू वृत्ती आणि सहसंवेदना बाळगली तर किती बरं होईल!

क्रिश अशोक यांचे यूट्यूब चॅनेल मी अधून मधून पाहत असतो. आणि त्यांचे पुस्तक देखील मस्त आहे.

भारतीय अन्नाविषयी त्यांचे सांगणे अधिकाराचे मानायला हरकत नाही. त्यावरून भारतीय अन्न इतकेही वाईट नाही असे दिसते. परंतु मुख्य मुद्दा चयापचयाचा आहे असे दिसते. हे चयापचय शारीरिक श्रमांशिवाय नीट होत नाही. बहुतेक सगळ्या शहरी मुलांची आयुष्ये कमालीची सेडेंटरी झालेली आहेत.

आमचे कॉलेज मधले फोटो पाहिले तर आम्ही भयानक कुपोषित दिसत असू असे दिसते. कारण चालणे पळणे धावपळ प्रचंडच होती. शिवाय खिशात पैसे खुळखुळत नसल्याने चहा घेण्याची देखील मारामार होती. २००६ च्या दरम्यान आम्ही कॉलेज मधे प्रवेश घेतला तेव्हा उदारीकरणातून आलेला पैसा इतका सर्वव्यापी नव्हता अगदी त्याची सुरुवात झालेली होती. म्हणजे आम्हाला सेपरेट गाडी हवी हे आमच्या ध्यानी मानी देखील येत नसे. मात्र तेच. १५ १६ वर्षांत बदल खूप झाला आहे. आता सर्रास बारावीलाच मुलींना एक्टिवा वगैरे घेऊन देतात पालक. इयत्ता नववीत बऱ्याच मुलांची सायकल सुटते आणि ते थेट गाडीवर येतात.

मी गावी गेल्यावर स्टँडवरन घरी चालत जातो (अंतर १.५ किमी) त्यावरून घराचे हलकल्लोळ करतात की बाबा ते बरं दिसत नाही. सायकल सुद्धा वापरू नकोस. कसले दिवस आले आहेत. नशिबाने आम्हाला सध्या भरपूर चालावे आणि सायकल दामटवावी लागते. कधी कधी २० ३० किमी तर आरामात सायकलिंग होते. मुलांना शाळेत सोडण्यापासून ते ग्रोसरी आणण्यापर्यंत सगळी कामे सायकलवरून होतात.

परंतु माझ्या नुकत्याच बारावी झालेल्या भारतीय भाचरांना सायकल वापरणे हे अतिशय कमीपणाचे वाटते. शिवाय ते आमच्यापेक्षा खूपच स्थूल आहेत. मला हे स्टेटस चे काय काडीचेही समजत नाही.

रॉय यांच्या प्रतिसादाशी सहमत.
व्यायामाच्या अभावासाठी इतर अनेक कारणांबरोबर नागररचनाही कारणीभूत आहे. भारतातल्या शहरांतून आता चालणेच काय सायकल चालवणेही दुरापास्त झाले आहे. चालायला चांगले फूटपाथ नाहीत अन रस्त्यांवरच्या रहदारीत सायकल चालवणे म्हणजे जीवाशी खेळ. खरंतर शहरांतून दुचाकी सुद्धा धोकादायक आहेत. पण गैरसोयीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि महाग खाजगी वाहतूक व्यवस्था यांना कंटाळून माणूस दुचाकींचा धोका पत्करतो.
शहरातल्या हौसिंग सोसायट्या मध्ये ओपन पार्किंग च्या नावाखाली सगळ्या खुल्या जागा विकल्या जातात, मग रहिवाश्यांना पाय मोकळे करायलाही जागा नसते. ग्राऊंड्स व पार्क्स ची संख्या कमी असते व जिथे असतात तिथपर्यंत जाणे कठीण.
एकंदरीत शहरी जीवनात व्यायाम करणे कठीण होऊन बसले आहे.