(जुलै २०२५ मध्ये झालेल्या आमच्या स्पिती बाईक राईडबद्दल )
स्पिती डायरी (दिवस १)
आठवड्यावर आलेल्या स्पिती बाईक सफरीकडे डोळे लागलेले असताना अचानक चार नवीन प्रकल्प सुरू करायचे आव्हान अंगावर पडले होते.बांधकाम क्षेत्रातील जे प्रकल्प ऐन उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यातही वेगाने पळत नाहीत ते इथल्या व्यवस्थेला ऐन पावसाळ्यात सुरू करायची खुमखुमी आल्याने आम्ही बळीचे बकरे झालो होतो .काहीही झालं तरी आता सुट्टी घ्यायची नाही असे संदेश वारंवार आमच्या अभियांत्रिकी विभागात फिरत होते. खरे तर गेली आठवडाभर सकाळी लवकर कामावर जाऊन रात्री उशीरापर्यंत काही कामे मार्गी लावण्याचा केविलवाणा प्रयत्न माझ्याकडून झाला पण त्याला म्हणावे तसे यश आले नव्हते .सारासार विचार करून शेवटी आपल्या कनिष्ठ लोकांवर जबाबदारी सोपविली आणि स्पिती बाईक सफरीसाठी तयारी केली.
तसे बाईक राईड करणे माझ्यासाठी नवीन नव्हते अनेक लांब पल्ल्याच्या राईड या आधी झाल्या असल्या तरी या वेळी हिमाचल प्रदेशातील घाटवळणाचे रस्ते, थंड हवामान आणि अवेळी पडणाऱ्या पावसाचे वेगळेच आव्हान असणार होते. त्यासाठी आवश्यक ती सर्व वस्त्र सामग्री मित्रांकडून गोळा केली,काही सामग्री विकत घेतली.आज तीन जुलैच्या पहाटे पहाटे अस्मादिक विमानतळाकडे रवाना झाले.एव्हाना चिंतामणीने त्याचे आणि माझे वेब चेक इन केले होते तरीही बाईक राईडासाठी लागाणारे हेल्मेट , जॅकेट , नी गार्ड आणि दहा बारा दिवसांची कपडे वगैरे असे हातातील अवजड सामान देण्यासाठी वेळेत विमानतळावर पोहचणे क्रमप्राप्त होतेच.साधारण साडेसहाच्या दरम्यान आम्ही दोघेही पुणे विमानतळावर पोहचलो.घर ते विमानतळ या प्रवासात एक ना अनेक विचार डोक्यात घोळत होते. बरीच महत्वाची कामे फाट्यावर मारल्यामुळे होणारे नुकसान उगाचच टोचत होते पण स्पितीची संधी त्यापेक्षा मोठी होती.कामे परत आल्यावर करता येतील. ही ट्रीप पुन्हा होणार नाही वगैरे वगैरे....
पोटात सकाळीच कावळे ओरडायला लागले तसे विमानतळावरील दोनशे रुपड्याची पांचट कॉफी पोटात ढकलली. चिंतामणीबरोबर गप्पा मारताना बोर्डिंगची वेळ झाली.
अपेक्षित वेळेपेक्षा उशिरा विमानाने केलेले उड्डाण, दिल्ली विमानतळावर तीन तासाची प्रतीक्षा आणि त्यानंतर चंदिगडकडे झेपावलेले दुसरे विमान असा पहिल्याच दिवशी कंटाळवाणा प्रवास करत आम्ही दोघे संध्याकाळी साडेचार वाजता चंदीगडला पोहचलो.एकंदरीत प्रवासाचा शीण आलेला असताना तिथल्या टॅक्सी वाल्याबरोबर त्याने उगाचच आकारलेल्या हरियाणा टॅक्स वरून किरकोळ वाद झाले.संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान शगुन हॉटेल झिरकपूरला पोहचलो. तिकडे पोहचून राईड आयोजक नितीन जोशी आणि बाकी रायडरची तोंडओळख झाली.
आम्हाला बाईक जिथून ताब्यात घ्यायच्या होत्या ते 'सेक्टर बेचाळीस' हॉटेलपासून तासाभराच्या अंतरावर होते.चंदीगडच्या ट्राफिकचा अंदाज तिथे आला. रस्ते ऐसपैस असले तरी एकंदरीत गाडी चालविणारे फार काही शहाणे नसल्याची जाणीव झाली. बाईक शॉपवर चांगला दीड तास टाइमपास झाला.नाय म्हटले तरी सोळा गाड्या, कुणाला कोणती द्यायची हे सगळे ठरविण्यात थोडा गोंधळ झाला होता. नितीन आणि दोरजेने तो गोंधळ निस्तारला. नऊच्या दरम्यान अस्मादिक बाईक घेऊन पुन्हा हॉटेलवर परतले.आजच्या दिवसाची सर्व कामे आटपली होती त्यामुळे मस्त आंघोळ आणि जेवणावर ताव मारत उद्याच्या राईडचे प्लॅनिंग झाले. उद्या बाईकवर शिमल्याला निघायचे होते. आम्ही सर्व रायडर एका मोठ्या प्रवासासाठी सज्ज झालो होतो.
स्पिती डायरी (दिवस २)
कालच्या प्रवासाचा शीण रात्रीच्या गाढ झोपेने पार उतरला होता. चंदीगडमध्ये पहाटे साडे पाचला जाग आली तेव्हा तर चक्क उजाडले होते. अजून थोड्या आरामाची आवश्यकता वाटली आणि मी पुन्हा पांघरून ओढले. सकाळी सात वाजता उठलो तेव्हा चिंतामणी सगळे आवरून बसला होता. साडे सात पर्यंत माझेही आवरून आम्ही खाली उतरलो आणि नाष्टा पाहून प्रसन्न झालो ,सँडविच ,पुरी भाजी , शेवईचा उपमा, फळे वगैरे असे आवडीचे पदार्थ असल्याने आम्ही भरपेट नाष्टा केला . आज चंदीगढवरून बाईकने थीऑगला पोहचायचे होते. एकूण अंतर एकशे चाळीस किमी होते. आमची पहिली टीम सकाळी साडे आठ वाजता निघाली. सुरुवातीचे काही किलोमीटर गाडी वाऱ्याशी बोलू लागल्याने दुपारीच पोहचू असे वाटले होते मात्र पहिल्या अर्ध्या तासातच आमचा भ्रमनिरास झाला. मिलिंदची बाईक पंचर झाल्याचा निरोप मिळाला. ट्रिपच्या आयोजकांपैकी असलेला दोरजे माझ्या गाडीवर बसला होता त्यामुळे आम्ही मिलिंदच्या मदतीसाठी मागे फिरलो. आम्ही चार लोक मागे थांबून टिपरे गावाजवळ बाईक टायर दुरुस्त केली. तोपर्यंत बाकी टीम पुढे गेली होती. पुन्हा बाईकने वेग पकडला. वेलकम टू हिमाचल प्रदेश असा फलक काही मिनिटातच लागला आणि घाटवळणे सुरू झाली.इथे बाईकला स्पीड मिळणे शक्य नव्हते तसेही आजुबाजूला इतका सुंदर निसर्ग होता की बाईक पळविण्याचा विचारही आला नाही. सोलन गाव ओलांडून आम्ही जरा क्षणभर विश्रांतीसाठी पुन्हा थांबलो. मॅगी ,कॉफी ग्रहण करून पुन्हा शिमल्याकडे प्रयाण केले.
शिमला अजूनही पन्नास किलोमीटर दूर होते. अधेमधे दरडी कोसळू नये म्हणून जाळी लावण्याची कामे चालू होती.त्यामुळे दोन ठिकाणी ट्रॅफिक थांबले होते. सकाळी एक टीम म्हणून बाहेर पडलेलो आम्ही आता तीन टीममध्ये विभागलो होतो. अमेरिकेहून आलेल्या ॲलन आणि त्याची पत्नी जूवीने त्यांची वेगळीच टीम करून भरधाव वेग पकडला होता.बाकी टीम पुढे जाऊन शेर ए पंजाब हॉटेलवर जेवणाचा आस्वाद घेत होती . सकाळच्या पंचर मुळे मागे पडलेली आमची टीम अजूनही शिमल्यात होती. शिमला सोडले तसे मिलिंदची बाईक पुन्हा पंचर झाली आणि आमच्या एकंदरीत प्रवास लांबला. पोटात कावळे ओरडत होते आणि ज्या पंचर दुकानाजवळ बाईक नेली तिथे आधीच चार गाड्या पंचर काढायला आल्या होत्या. थोडा विचार करून आयोजक टीम मधील दोरजे तिथे थांबला . मी, सौरभ आणि मिलिंदने पुढे जाऊन शेर ए पंजाब गाठले. तासाभराने दोरजे पंचर काढून तिथेच पोहचला तोवर आमचे जेवण उरकले होते. दोरजे पोहचला त्यानंतर थोड्याच वेळात चंदीगड वरून तब्बल तीन तास उशिरा निघालेला मुख्य आयोजक नितीन जोशी पोहचला. दोरजे आणि नितीननेही 'चिकन रारा' भाजीवर ताव मारला. त्यानंतर चहा कॉफी झाली. शेर ए पंजाब पासून थिओग अवघ्या वीस किमी वर होते त्यामुळे पुढचा प्रवास सहज होईल असे वाटले होते पण तिथेही माशी शिंकली , थोड्याच वेळात माझ्या बाईकचा मागचा ब्रेक लागत नसल्याचे लक्षात आले. ही गंभीर बाब मी चिंतामणीला फोनवरून सांगितल्यावर तो काही अंतरावर पुढे थांबला . हिमालयन सारख्या बाईक चालवताना ब्रेकवर पाय ठेवल्यास ब्रेक घासल्यामुळे डिस्क गरम होते आणि ब्रेक लागत नाही हा साक्षात्कार मला झाला. त्यामुळे यापुढे मागचा ब्रेक कमीत कमी वापरायचा हा अत्यंत मोलाचा धडा मिळाला. डिस्क थोडी थंड करून आम्ही हळूहळू पुढे सरकलो. साधारण सहा किलोमीटर नंतर आम्ही 'डे एक्सॉटीका' हॉटेलवर म्हणजेच थिओग गावात पोहचलो. आमचे कपडे वगैरे मागून गाडीत येणार असल्यामुळे खालीच बराच टाइमपास झाला. समोर सुंदर हॉटेल ताज दिसत होते. धुक्याने पांघरलेले रस्ते , दऱ्या पाहून प्रसन्न वाटत होते. काही वेळाने लगेज आले आम्ही रूमवर आराम करायला निघालो. आयोजकांनी सुंदर वॉकी टॉकी दिल्याने त्याचा भलता उपयोग चिंतामणी करत होता.पार्टी वगैरे आहे का , जेवन तयार आहे का? वगैरे गप्पा त्याच्यावरून चालू होत्या. संध्याकाळी एकमेकांची ओळखपरेड होताना निवांत गप्पा रंगल्या.
स्पिती डायरी ( दिवस ३)
सकाळी लवकर निघायचे असे आयोजकाने सांगितले खरे पण हॉटेलवाल्यांनी नाष्टा सव्वा आठ वाजता लावला त्यामुळे सगळेच काही वेळ निवांत होऊन बसले होते. नाष्टा नेहमीप्रमाणे छान होता. सगळ्यांनी आपले रायडिंगचे दागिने अंगावर चढवले आणि नारकांडा कडे प्रवास सुरू झाला . वीस किलोमीटरवर तेही आले .तिथे सर्वांनी पुढच्या आठवड्यात लागणारे गमबूट खरेदी केले आणि पुढचा टप्पा गाठण्यासाठी आम्ही कन्नूर कडे वळालो तिथे दगडाच्या फटीतून जाणारा रस्ता पहायचा होता त्याआधीच दुपार झाल्याने रिव्हर व्ह्यू हॉटेलमध्ये व्हेज थाळी ओढली.
जास्त वेळ न दवडता किन्नर गाठले आणि जोरदार फोटोसेशन झाले . त्यानंतरचा प्रवास जवळपास पन्नास किलोमीटरचा होता त्यातील तीस नदीच्या बाजूने मख्खन रस्त्यावर असल्याने लवकर झाला.
सांगल्याच्या अलीकडे असलेले अठरा किलोमीटर म्हणजे अतिरेक होता. अतिशय निमुळता रस्ता तोही दगड गोट्याने भरलेला आणि एका बाजूला खोल खोल दरी रस्ता पाहूनच धडकी भरली होती. कालच्या अनुभवामुळे आज मागचा ब्रेक फार वापरला नाही त्यामुळे तो चांगल्या स्थितीत होता सर्व रायडर एकामागे एक मुंग्यांच्या रांगेसारखे चालले होते. मध्ये मध्ये फोटोग्राफीसाठी थांबणे ओघाने आलेच. मला तर कधी एकदा सांगला गाठतोय आहे झाले होते. अठरा किलोमीटरसाठी तब्बल तासभर राईड झाल्यानंतर सांगला गाठले आणि सुटकेचा निःश्वास टाकला. कॉफी घेऊन रूमवर गरम पाण्याने आंघोळ केल्यावर कुठे शांत झाल्यासारखे वाटले. हॉटेलवर कँप फायर आणि म्युझिक सिस्टम ,स्पीकर वगैरे होते त्यामुळे संध्याकाळी मैफिल जमली. नाइंटीज आनि त्यापुर्वीच्या गाण्यात सर्व मंडळींनी सूर धरला.
स्पिती डायरी ( दिवस ४)
तिथल्या सकळी सकाळी ( म्हणजे आपल्या पहाटे साडे चार वाजता) आम्ही सगळे तयार होऊन तिबेट बॉर्डरवरील चितकुला कडे प्रयाण केले. रस्ता कालसारखाच निमुळता आणि भन्नाट थ्रिल देणारा होता. खिडकीतून डोकावणाऱ्या एखाद्या लहान मुलाप्रमाणे हिलालय आपले दर्शन देत होता. वातावरण कोरडे आणि आल्हाददायी थंड होते. चितकुल ठिकाण तसे थेट सीमेवर नसले तरी त्यापुढे सामान्य माणसांना प्रवेश नव्हता त्यामुळे आम्ही तिसरी सीमा घोषित केलेल्या जागेवर थांबलो .तिथे थांबून फोटोग्राफी आणि भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.
येताना हिंदुस्तान का आखरी ढाबा असलेल्या टपरीवजा हॉटेलवर मॅगी खाल्ली. तिथून परतताना जबरदस्त उतार असल्याने आम्हाला थोडी भीती नक्कीच होती. बाईकवर उतारावर चालविणे जास्त अवघड असते ते आम्ही अनुभवले पुन्हा घाट उतरायला चालू केले लवकर सांगला गाठू असे मनात होते पण साला रस्ता संपत नव्हता .... खूप वेळाने ते ठिकाण आले जिथे आम्ही काल राहिलो होतो . तिथे जाऊन फ्रेश होऊन नाष्टा केला. तसा तिथे वेळ फार कमी होता पण तरीही आमच्याबरोबर असणारे सर्वजण वेळ पाळणारे असणारे असल्याने वेळेत पुढची राईड सुरू झाली. पुन्हा खाली उतरणे क्रमप्रात होते. आम्ही कालच्याच मुख्य हायवेपासून सांगलाकडे गेलेल्या रस्त्याने परत फिरलो. खडबडीत रस्ता तुफान उतार आणि निव्वळ अप्रतिम निसर्ग हे मिश्रित वातावरण आम्हाला मिळाले पुन्हा अठरा किलोमीटर उतरताना खरे तर प्रत्येक जण करचछुम अमूक किलोमीटर ( जिथून घाट चालू झाला ते ठिकाण) ते बघत होता कारण वळणे फारच धाडसी रायडिंगची होती. सरते शेवटी हायवे लागल्यावर लोकांना बरे वाटले तिथून पुढे शिमला काझा हाववे निव्वळ अप्रतिम आणि खास आमच्याच गाड्यांसाठी बनवला असावा असे वाटले. मख्खन रस्त्यावरून बाईक रायडिंग ची धमाल मजा आली .
पुढे आम्हाला शीपकूल पासचा प्लान होता. फाट्यावरून आत वळण्यापूर्वी आमचे आयोजक नितीनला काही कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करण्यासाठी मागे थांबावे लागले त्याआपुढची सूत्रे चिंतामणीने हाताळली. आम्ही मुख्य हायवे सोडून शिपकुला पासकडे प्रयाण केले ... हा रस्ता पूर्ण डांबरी होता मात्र अशक्य प्रकाराचा होता. दर दोनशे मीटरवर अवघड यू टर्न आणि त्याबरोबर तीव्र चढ हे आव्हानात्मक होते.
सर्वांनी सावध पवित्रा घेत गाडी हाकली. या रस्त्यावर पण निसर्ग कमाल अदा दाखवत होता. शिपकुला पास जवळपास बत्तीस किमी लांब होता. तिथे प्रवेश देण्यासाठी एक गेट आठ किलोमीटर वर होते तिथे वेळेचे बंधन होते. सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत इथे प्रवेश मिळत होता. जे आम्हाला तिथे पोहचल्यावर कळाले आणि निराशा पदरात पडली, मात्र अत्यंत सुंदर पर्वतरांगा इथे दिसत होत्या.
येताना पुन्हा उतार असल्याने कसरत करत पुन्हा शिमला नाको हायवेवर पोहचलो. तिथून पुढे अवघ्या सत्तावीस किमीवर नाकोची किन्नोर कॅम्पिंग साईट होती आणि अजूनही आमच्याकडे चिकार वेळ होता. थोडेसे अंतर कापून आम्हीं एका लोखंडी ब्रिजजवळ थांबून हलके फुलके खाल्ले आणि चहा कॉफी घेऊन पुढचा प्रवास सुरू झाला.
हायवे पुढेही भन्नाट होता त्यामुळे थोड्याच वेळात नाकोला पोहचलो.
तिथे असलेली कॅम्पिंग साईट म्हणजे निव्वळ अप्रतिम ठिकाण होते. आत त्याने केलेले बागकाम वाखण्याजोगे होते, बऱ्याच दिवसांनी कोणतेही धुके नसलेले निळेशार आकाश पाहून दिवसभराची राईड करून आलेले शरीर सुखावले .
रात्री चांदण्या बघत बाहेरच बैठक झाली , वारे खूप असल्याने शेकोटी पेटवता आली नाही कारण आजुबाजूला कापडी टेन्ट होते ज्यावर ठिणग्या उडू शकल्या असत्या. थोड्या वेळात आम्ही सर्वजण जेवण्यासाठी डायनिंग रूमकडे वळालो . तिथे भारत इंग्लंड टेस्ट मॅच चालू होती. शेवटचा आणि निर्णायक दिवस भारताच्या बाजूने फिरला आणि भारताने टेस्ट मॅच जिंकली. तिथे जोरदार जल्लोष झाला.रात्री पुन्हा गप्पा टप्पा झाल्या. मी नितीन आणि हॉटेलचे मालक अकरा वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो. मला त्या मालकाचा स्वभाव आणि आयुष्यावर स्पष्ट बोलणे फार आवडले होते. रात्री अकरा वाजता आलो तेव्हा माझा टेन्ट शोधण्याचे दिव्य केले कारण सर्व टेन्ट एकसारखे होते त्यात चिंतामणी लाईट बंद करून पडदा लावून आत झोपला होता. टेन्ट सापडला आणि मीही आत पांघरुणात शिरलो.
स्पिती डायरी ( दिवस ५)
सकाळी सात वाजता जाग आली खरी पण अजून झोपायची इच्छा होती , तिला आवर घालून डायनिंग हॉल वर चहा ,सँडविच आणि पोहे पोटात ढकलले. कॅम्प हॉटेलचा मालक शांताभाई देगी याच्याबरोबर फोटो घेतले .बाईक आणि बाईकर तयार झाले आज कन्नोर कॅम्प वरून पहिल्यांदा लापचा पासवर जायचे होते.
गाड्या सुटल्या आणि जवळपास तासाभरात वेलकम टू स्पिती व्हॅली असा बोर्ड दिसला. तिथे लापचा पासवर जाण्यासाठी ITBP सैनिकांची परवानगी लागणार होती.ती परवानगी मिळायला जवळपास एक तास गेला. प्रत्येकाच्या गळ्यात घालायला त्यांनी एक ओळखपत्र दिले होते. तिथून लापचा पास जवळपास 23 किलोमीटरवर होता. रस्ता मोठा आणि खूपच छान पण वळणावळणाचा आणि चढाचा होता. सर्वजण पुन्हा मुंग्यांच्या रांगेसारखे निघाले. ही पलटण तिबेट सीमेवर पोहचली. रस्त्यांमध्ये कुठेही फोटोग्राफी साठी मनाई होती मात्र जिथून तिबेटचा भाग सुरू होतो तिथे फोटो काढता येत होते.भर कडक उन्हात आम्ही चीनने ठेवलेला रोबोट , त्यांचे एक गाव आणि आजूबाजूचे डोंगर नदी तासभर न्याहाळत बसलो .
भारताचा झेंडा घेऊन फोटो काढला आणि जत्रा परत माघारी फिरली. तिथे आमची ओळखपत्र जमा केली आणि ड्रायव्हिंग लायसनं परत मिळवले.त्या ठिकाणावरूनच पुढचा रस्ता ममी ठेवलेल्या मॉनेस्ट्री कडे जात होता. मुख्य रस्ता सोडून साधारण दहा किमीवर आत असलेल्या मॉनेस्ट्री कडे आम्ही निघालो. नदीच्या बाजूने पाच सहा किमी आणि नंतर पुन्हा स्पिती व्हॅली चे वैशिष्ट्य असलेला वळणाचा घाट पार करून आम्ही मॉनेस्ट्री वर पोहचलो. ममी जवळून बघितली.
मॉनेस्ट्री मधील सुबक लाकडी बुद्धाच्या मुर्त्या पाहिल्या थोडा वेळ शांत बसून शेजारी असलेल्या टपरीवर मोमो आणि थेंतूक खाल्ला. खरेतर जेवायची वेळ झाली होती पण जेवण थेट टाबोला मिळणार होते ज्यासाठी अजून दीड तास रायडिंग करावे लागणार होते म्हणून आहे ते पोटात ढकलून आमची जत्रा पुढे निघाली. ग्यो गावापासून टाबो पर्यंतचा अत्यंत निमुळता आणि खळखळ वाहणाऱ्या नदीशेजारील खोल खोल दरीबाजूचा रस्ता धडकी भरवत होता. वळणे सोपी असली तरी समोरून एखादी मोठी गाडी आली की आमची चलबिचल व्हायची आणि आपोआप वेग कमी व्हायचा . सरते शेवटी पोहचलो.टाबो गावात अजून एक मॉनेस्ट्री पाहिली ज्यात हजारो वर्षापूर्वी काढलेली चित्र आणि लाकडाच्या खूप मूर्ती बघायला मिळाल्या.
संध्याकाळचे पाच वाजले होते. सकाळपासून ठोस काही जेवण झाले नव्हते म्हणून नितीनने तिथेच हॉटेल पाहून जेवणाची ऑर्डर दिली. पनीर फुलके डाळ आणि जीरा राईसवर सर्वांनी ताव मारला.आता पुढे लवकरात लवकर काझा गाठायचे वेध लागले . अठ्ठेचाळीस किलोमीटरचा हा ही रस्ता तसाच निमुळता होता .
बऱ्याच ठिकाणी अत्यंत खडबडीत असल्याने आधीच कंटाळलेले रायडर अजून वैतागले . जिथे चांगला रस्ता मिळाला तिथे भन्नाट स्पीड पकडू लागले. अठ्ठेचाळीस किलोमीटर चालवायला आम्हाला साधारण दीड तास लागला आणि आठ वाजता आम्ही काझा मध्ये पोहचलो. जेवण तर टाबोमध्येच झाले होते त्यामुळे संध्याकाळी खिचडी आणि पापड पुरे होईल असे नितीनला वाटले आणि त्याने तशी सोय केली . किन्नोर पेक्षा काझाची उंची कमी होती त्यामुळे इथे आंघोळ करण्यास मनाई नव्हती .आम्ही रूमवर फ्रेश होऊन खिचडी खायला खाली गेलो.
स्पिती डायरी ( दिवस ६)
आजचा दिवस काहीसा आरामाचा असेल असे आयोजकांनी सांगितले जवळपासची तीन ठिकाणे आज बघायची होती. काजा वरून प्रथम आम्ही हिक्किम कडे वळालो तिथे जगातील सर्वात उंचीवरील पोस्ट ऑफिस होते. सकाळीच नितीनने आम्हाला पोस्टकार्ड दिली होती "ती लिहून त्या पोस्टमध्ये टाका आणि आपल्या लोकांपर्यंत आठवण पोहचवा" असे सांगितले होते .
रस्ता त्या मानाने खूप चांगला होता .( गेल्या दोन तीन दिवसाच्या खतरनाक राईड नंतर आम्हाला जरा सोपा असलेला मार्गही महामार्ग वाटत होता . वातावरण खूपच छान होते आकाशात इंद्रधनुष्याची कमान आली होती.
साधारण वीस किलोमीटर वर हिक्कीमवर सर्वांनी आपापली पत्र पोस्ट केली.
त्याच वाटेने पुढे आम्ही कोमिट येथील मॉनेस्ट्री वर पोहचलो तिथे छान जिंजर हानी टी, न्यूडल आणि फ्राय राईस खाऊन मॉनेस्ट्री मध्ये पाच दहा मिनिटे ध्यान केले तिथून पुढे लांग्जा येथील एका पस्तीस फूट बुद्धाच्या मूर्तीकडे आम्ही निघालो तेही दहा किमीवर असल्याने लगेच आले.
तिथे काही वेळ फोटोग्राफी करून जत्रा काझा मध्ये दुपारीच परतली .रूमवर थोडा वेळ आराम करून मार्केट मध्ये जायचे प्लॅनिंग होते.
दुपारी चार वाजता मात्र अचानक वातावरण बदलले आणि वादळ सुटले.
वादळाबरोबर प्रचंड प्रमाणात धूळ नदीवरून वाहताना आम्हाला रुममहून दिसत होती. उद्या आम्ही ज्या मार्गाने जाणार होतो त्या बाजूचे सर्व काही वातावरण हळूहळू खराब होत असलेले दिसू लागले.
रूमवर जराशी झोप काढून आम्ही काजा मार्केटला पोहचलो. किरकोळ खरेदीसोबत T शर्ट, बंडाना, मफलर अशी चंद्रताल लेक साठी तयारी केली. संध्याकाळी हिमालयन कॅफे वर मस्त बटर टी घेतला. पीटी कॅफे वर चिकन विंग आणि हिमालयन सूप घेऊन थोडा फ्राय राईस खाल्ला.थंडी पडायला चालू झाली आम्ही बाईक काढून पुन्हा रूमवर पोहचलो. डोळ्यावर झोप होती मात्र उद्या सकाळी लवकर प्रयाण करायचे असल्यानं रात्री बॅग पॅक केली. झोप मात्र छान लागली.
स्पिती डायरी ( दिवस ७)
आज सकाळी लवकर जाग आली तेव्हा लोकांची आवारायची गडबड चालू झाली होती. मी सहा वाजता उठून आवरून घेतले. नाष्टा आणि चहाची वाट बघत थोड्या गप्पा झाल्या.
आजचा दिवस काहीसा खास होता चंद्र्ताल लेक खूप छान आहे असे बऱ्याच मंडळीकडून मी ऐकले होते आणि आजचा मुक्काम तिथे असल्याने मला वेगळाच आनंद होत होता. "रायडर S ss गिअर अप" म्हणत नितीनने आदेश सोडला आणि सर्व रायडर गाडीवर स्वार झाले. काजा पासून थोड्याच अंतरावर असलेल्या किब्बर गावात की मॉनेस्ट्री पाहणे हे आजचे पहिले ध्येय होते. अर्धा पाऊण तासात आम्ही पोहचलो आणि मॉनेस्ट्री पाहिली . त्यातील ध्यानाच्या खोल्या खूपच सुंदर होत्या .तिथून निघून पुढच्या अर्ध्या तासातच आम्ही जगातील सर्वात उंचीवर असलेल्या चिचम ब्रीज वर पोहचलो.
ब्रीज केबल टाइप होता आणि खूपच सुंदर होता. मनसोक्त फोटोग्राफी आणि जिंजर गार्लिक टी घेऊन आम्ही लोसर येथे जेवणासाठी थांबलो तोपर्यंत कच्च्या रस्त्यावर गाड्या वेगाने पळविण्याचा आनंद सर्वजण घेत होते.रस्ता कच्चा असला तरी रुंदीने ऐसपैस असल्याने रायडर सुसाट सुटले होते. जेवणाच्या वेळेपर्यंत सर्वकाही मनासारखे चालले होते. व्हेज थाळी खाऊन आम्ही पायात गमबूट घातले कारण पुढे नदी क्रॉस करावी लागणार होती.चंद्रताल कडे निघालो तसे जोरदार थंड वारे सुटले , मध्ये मध्ये पाऊस लागला. म्हणता म्हणता अंगात थंडी भरली. हाताची बोटे हँडग्लोस मध्ये सुन्न पडू लागली. गाड्यांचा वेग मंदावला.तरीही रायडर चालत होते. कुमझुम पासजवळ आम्ही फोटो काढायला थांबलो तिथे नाशिकची तीन पोरं चक्क ट्रॅक्टर वर स्पिती फिरायला आलेली पाहून आम्ही थक्क झालो. त्याच्याबरोबर फोटो काढून पुढे निघालो. रस्ता अपेक्षेपेक्षा फारच दयनीय अवस्थेत होता. पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. वारा तर हेल्मेटच्या आत कानात घुसतो की काय असे वाटत होते. बऱ्याच मेहनतीनंतर चंद्राताल आल्याचा बोर्ड वाचला खरा पण तो केवळ अभयारण्य सीमा सुरु झाल्याचा आहे हे लक्षात आले . चंद्रताल तिथून बराच लांब होता शिवाय वाटेत दोन ठिकाणी नदी क्रॉसिंग करायची होती. आमच्या गाड्या रस्ता मोकळा दिसला की पाळायच्या आणि घसरडा आला की आपोआप मंद व्हायच्या. दोन्ही रिव्हर क्रॉसिंग साठी नितीन आणि आणखी सहकारी मित्र मदत करत होते. मी आयुष्यात पहिल्यादाच असले काही दिव्य करत होतो.
दोन्ही रिव्हर माझ्याकडून पार झाल्या तेव्हा छातीतली धडधड वाढली होती कारण पाणी जवळपास मांडीच्या लेव्हल वर होते आणि खाली मोठे मोठे दगड गोटे चाकांना जोरदार प्रतिकार करत होते. बऱ्याच वेळाने आम्ही कॅम्प साईटजवळ पोहचलो, पण थेट टेन्ट वर जायचे नव्हते आहे त्या ओल्या कपड्यासह आणि गम बुटासह तिथून चार किमीवर असलेल्या चंद्राताल पार्किंगवर पोहचलो तिथून पुढे साधारण एक किलोमीटर ट्रेक करून चंद्राताल तलावावर पोहचलो. समुद्रसपाटीपासून इथली उंची सोळा हजार फूट असल्याने थोडे चालल्यानंतर थकवा जाणवत होता शिवाय थंड वार आता थेट अंगाला झोंबू लागले होते. चंद्राताल तलावावर फोटो काढले.खरे तर निरभ्र आकाश असते तर तो नजारा याच्यापेक्षा सुंदर असला असता हे आम्हाला माहीत होते. पण आज आकाशावर चढलेले मळभ हटायचे नाव घेत नव्हता. काही नाजूक सुंदर फुले गवतातून डोके वर काढून हसत होती .आम्ही त्यांचेही काही फोटो काढून परत फिरलो. येताना हिमालयाच्या काही कडा सूर्यकिरणाने चमकू लागल्या तसे आता वातावरण निरभ्र होईल असे वाटले. मात्र तिथेही भ्रमनिरास झाला.आम्ही पार्किंग पर्यंत पोहचलो. गाड्या काढून आमच्या मूनलाईट कॅम्प वर पोहचलो. खरे तर थंडीने आमची हालत नाजूक केली होती. पोहचलो त्या वेळी तापमान सहा सात डिग्री पर्यंत उतरले होते.रात्री अजून खाली जाणार याची जाणीव होती. आम्ही गाड्या सोडल्या आणि थेट तंबूत शिरलो. संध्याकाळी गप्पा टप्पा करत गरम चहा घेतला ,कदाचित थंडी कमी होईल अशा आशेने. रात्री हलके फुलके जेवण करून पुन्हा तंबूत शिरलो. आकाशगंगा , चांदण्या बघणे या प्लॅनवर ढगांनी पाणी फिरवले होते. धुक्याची चादर अजून घट्ट होत गेली. तापमान अजून खाली खाली जात चार पर्यंत पोहचले.तंबूत लाईट वगैरे नव्हती जे दिवे आम्ही बरोबर आणले होते त्यात भागवले आणि गाढ झोपलो.
स्पिती डायरी ( दिवस ८)
सकाळी थंडीत अंथरुणातून बाहेर पडायची इच्छा नव्हती पण ग्लेशिरचे पाणी वितळून नदीत येते पातळी वाढली तर नदी क्रॉस करणे अवघड जाते हे नितीनने आधीच सांगितले होते.
चंद्र्ताल कॅम्प वरून आम्ही सर्वजण सात वाजता बाहेर पडलो. कडक थंडी पडली होती. जवळपास चार डिग्री मधून आम्ही गाडीवर बसलो.हा रस्ताही ऑफरोड होता दगड गोटे खाच खळगे नदी क्रॉसिंग हे घाट वळणे हे ओघाने आलेच . एका ठिकाणी नदी क्रॉस करताना माझा आधाराच्या दगडावरील पाय सटकला आणि मी माझ्या गाडीसह दोन फूट खळ्खळ वाजत असलेल्या पाण्यात आडवा झालो. सुदैवाने काही लागले नाही. सेफ्टी गिअर मधले हँडग्लोज मात्र टरकले. पुन्हा गाडी उभी करून आम्ही त्याच रस्त्याने निघालो. आज एकूण अंतर साधारण ऐंशी किमी होते पण हे फारच हेक्टिक होते. तब्बल दोन तासाने चाचा चाची धाब्यावर आम्ही विश्रांतीसाठी थांबलो. सकाळी चंद्रताल येथे केलेला नाश्ता केव्हाच जिरला होता. मजला दरमजल करत आम्ही रोहतांगचा अटल टनेल गाठला तिथे चिंतामणीच्या गाडीचे बियरिंग गेले असल्याचे कळाले.तरीही तो गाडी दामटत होता.
अटल बोगदा तब्बल साडे आठ किमी लांबीचा होता . तो क्रॉस करून आम्ही फोटोग्राफी केली आणि परत बोगदा क्रॉस करून किलोंग कडे वळालो . नितीन तिथे चालवत असलेला कॅफे साधारण 24 किमी दूर तांडी गावात होता. पावसाची रिपरिप सुरू झाली होती.आम्ही गाड्या दामटत मनाली लेह हायवेवरील तांडी गावात पोहचलो. नितीनच्या कॅफे वर भरपेट स्नॅक्स खाल्ले आणि किलोंगच्या कॅम्पिंग साईटवर पोहचलो. मी जाम थकलो होतो. थोडेफार आवरून एक झोप काढली. संध्याकाळी शेकोटीसोबत गप्पा टप्पा झाल्या . उद्या सच पासचे आव्हान असल्याने आज लवकर झोपायचे ठरले आणि सगळे तंबूत पळाले.
स्पिती डायरी ( दिवस ९)
आजचा दिवस खास होता . सच पास म्हणजे भारतातील अनेक कठीण घाटापैकी एक घाट असे नितीनने सांगितले तेव्हा तर आम्ही गळपटलो होतो पण हा घाट आता रुंद केला आहे असे सांगितले तेव्हा आम्हाला हायसे वाटले.
आजचे एकूण एकूण अंतर 210 किमी असले तरी खतरनाक चढउतार लक्षात घेऊन नितीनने पहाटे पाचला लोकांना गाडीवर बसवले.फक्त चहावर मंडळी प्रस्थान झाली. नाष्टा पार्सल घेतला गेला होता सुरुवातीला चांगला डांबरी रस्ता मिळाल्यामुळे रायडर सुटले बघता बघता पन्नास किमीवर उदयपूर येथे नाश्त्यासाठी ब्रेक घेतला गेला.अतिशय सुंदर ठिकाण समोर डोंगरावर काही ठिकाणी बर्फ वितळत होते. बाजूनी नदी तिच्या पूर्ण क्षमतेने वाहत होती. आम्ही पार्सल घेतलेले पराठे ,जाम ,अंडी चेपली. आतापर्यंत पावसाचे सावट कमी झाले होते. जरासे उन पडल्यामुळे अंगातील थंडी हळूहळू कमी होत होती. किलाँग पासून बदलापूरपर्यंत पावसामुळे रस्ता थोडा निसरडा झाला होता पण रायडर पूर्ण तयारीत असल्याने बुंगाट सुटले होते. घशाला सारखी कोरड मात्र पडत होती.एकंदरीत.सर्वांना शरीरातील पाणी कमी झाल्याची लक्षणे जाणवत होती. आज जेवणाचा ब्रेक सच पासच्या मार्गावर होता.त्याला बराच वेळ असल्याने जम्मू फाट्यावर थांबून नितीनने कोल्ड ड्रिंक आणले.सर्वांचे कोरडे घसे काही काळासाठी तृप्त झाले.पुढे चार पाच किमीवर सच पाससाठी फाटा होता. अतिशय तीव्र वळणे ,पंचेचाळीस डिग्री पर्यंत चढ व उतार, निसरडे दगड गोटे असणारे रस्ते त्यात पावसाची शक्यता हे सर्व आम्हाला समोर दिसत होते. सुरवातीला चार पाच किमी अशाच रस्त्यावरून उतरण्याचे दिव्य करत मंडळी सच पास चा घाट चढू लागली. नशिबाने पावसाने उघडीप दिल्याने मातीमध्ये गाडीचा डान्स होत नव्हता. रस्ता दोन वर्षापूवी थोडा रुंद केला गेला होता त्यामुळे सांगला पेक्षा अवघड वाटत नव्हता.पण थोड्याच वेळात काही गाड्यांची घसरगुंडी सुरू झाली. कधी दगडामुळे तर कधी चिखलामुळे टीममधील चार पाच गाड्या घसरून पुन्हा उभ्या राहिल्या.गाड्यांचे किरकोळ नुकसान सोडले तर दुखापत काही नसल्याने मंडळी पुन्हा स्वार झाली. सुदैवाने मी आणि चिंतामनी अजून तरी स्थितप्रज्ञ होऊन आरामात गाडी चालवत असल्याने कुठेही धडपडलो नव्हतो. बाकी काही प्रो रायडर बिनधास्त दरीच्या टोकावरून बुंग करून गाडी पुढे नेत होते.रस्त्यात एक ठिकाणी बर्फाने गुहा तयार केलेली दिसली तशी मंडळी थांबली.मनसोक्त फोटोग्राफी केली.पोटात कावळे ओरडत होते त्यामुळे निम्या रस्त्यावर असलेल्या एकमेव धाब्यावर जत्रा थांबली. राजमा राईस कडी ऑमलेट वगैरे चेपायला सुरावत झाली. नीतीनने स्वतः ऑमलेट बनवले होते. थोडे अन्न पोटात ढकलून चहा पाणी करून मंडळी पुन्हा गाड्यांवर स्वार झाली अजूनही सच पास शिखर दहा बारा किमी होते. पुन्हा तीच पडापड होत थोडे थोडे अंतर कव्हर होत होते. मध्ये मध्ये धुक्याची छान चादर पसरत वातावरण अतिशय सुंदर होत होते.एकंदरीय वातावरणातील बदल लक्षात घेऊन नितीन सर्वांना पुढे पुढे हाकलत होता. म्हणता म्हणतात मावळ्यांनी सच पासचे टोक गाठले. तिथे भन्नाट जल्लोष केला कारण हे या बाईक राईडमधील सर्वात मोठे आव्हान होते. आता अजून एक दिव्य म्हणजे घाट उतरणे .. सच पासचे पलीकडे बैरागड कडे तीव्र उतारावरून बाईक पहिल्या आणि दुसऱ्या गिअरवर उतरू लागल्या कारण उतार भयानक तीव्र होता. वेळीच वळले नाही तर समोर चार पाचशे फूट खोल दरी होती. हळूहळू मावळे उतरत गेले.बैरागडच्या अलीकडे अठरा किमी वर पुन्हा चहापाणी झाले. गेली दोन दिवस ऑफ रोड मुळे अंगाची वाट लागली होती. त्यात थंड वातावरणामुळे दोन दिवस आंघोळ करता आली नव्हती त्यामुळे आज बैरागडला आल्या आल्या सगळ्यांनी गरम पाणी अंगावर ओतले. जरा बरे वाटले. सध्याकाळी गाण्याची मैफिल रंगली. किल्ला सर केल्याच्या समाधानासह मावळे गाढ झोपेत गेले.
स्पिती डायरी ( दिवस १०)
बैरागड नंतर पुढचा मुक्काम डलहौसी येथे होता जे 123 किमीवर होते शिवाय रस्ताही चांगला होता. सच पासचा थकवा अजूनही रायडर घालवू शकले नव्हते त्यामुळे आज निवांत नाष्टा करून साडे दहा वाजता रायडर हलले.
नितीन काही लोकांना घेऊन पुढे गेला तो थेट डलहौसी पासून पंधरा किलोमीटर अलीकडे असलेल्या खाज्जियार गावात जेवायला थांबला. मागचे रायडर आपल्या गतीने पुढे सरकत होते. काहींनी स्वतःहून दुसरीकडे जेवण्याची सोय केली. मी आणि चिंतामणीने मॅप लावून गाडी चालवली खरी पण गुगल बाईने माती खाल्ली आणि आम्हाला वेगळ्याच रत्यावर दहा किमीपर्यंत पळवले. आमच्या लक्षात आले तेव्हा आम्हीपण दुसऱ्याच एका टपरीवजा हॉटेलवर थाळी खाऊन चहा पिला आणि पुन्हा माघारी वळलो खाज्जियार फाट्यापर्यंत माझे गाडीतले पेट्रोल संपले होते त्यामुळे बाटलीने सुटे पेट्रोल गाडीत भरले आणि पुढे निघालो. खज्जियार गावातील मिनी स्वीझर्लँड नावाची बाग बघून "हे तर गरीबांचे महाबळेश्बर आहे आणि या जत्रेत आमची मंडळी का थांबली असावीत असा गहन प्रश्न मला आणि चिंत्याला पडला होता.त्यानंतर आम्ही थेट सत्यम इंटरनॅशनल हॉटेल डलहौसी कडे वळालो. आज दिवसभरात ऊन वारा पाऊस सगळे बघितले होते. माझी तब्बेत जरा बिघडत चालली होती गेली आठवडाभर वेगवेगळ्या उंचीवर भटकून शरीर एका ठिकाणी स्थिर व्हायला वेळ लागत होता. हॉटेलवर येऊन गरम पाणी अंगावर ओतले आणि जरा पडी मारली.रात्री फक्त भात खाऊन झोपेच्या अधिन झालो.
स्पिती डायरी ( दिवस ११)
आज डलहौसी वरून पठाणकोट मार्गे चंदीगड गाठायचे होते. आज रायडिंगचा शेवटचा दिवस होता. सकाळी चहापाण्याविना मंडळी रस्त्याला लागली. पठाणकोट चाळीस किमी वर असताना भूक लागली आणि आमची अर्धी टीम नाश्त्यासाठी थांबली. अर्धी टीम पहाटे पाच वाजताच निघाली होती कारण संध्याकाळी त्या लोकांची परतीची फ्लाईट होती.आम्ही मात्र आरामात साडे सहा वाजता राईड चालू केली होती. वैष्णो धाब्यावर पराठे चहा वगैरे खाऊन मंडळी पुढे निघाली.
डलहौसी घाट उतरून आम्ही मुख्य हायवेला लागलो तेव्हा बाईकचा वेग वाढला आणि आम्ही साठ ते ऐंशी दरम्यान स्पीड मारला. मध्ये मध्ये अंगात खुमखुमी आल्याने मी शंभर ते एकशे वीस मारत होतो मात्र अनेक ठिकाणी स्पीड कॅमेरे आल्याचे लक्षात आल्याने मीही माझी गाडी साठ सत्तर वेगावर आवरली होती. घाटातून खाली उतरल्यानंतर जबरदस्त गरमी जाणवत होती. आमची पुढे गेलेली पहिली टीम साधारण दीड वाजता चंदीगड मध्ये पोहचली होती आम्हाला तिथे पोहचायला अजूनही दीड तास लागणार होता. अचानक आकाशात ढगांची गर्दी झाली आणि तुरळक पाऊस सुरू झाला. आम्हाला कधी एकदा चंदीगड गाठून बाईक त्यांच्या मालकांच्या ताब्यात देतोय असे झाले होते त्यामुळे उगाच रेनकोट वगैरे घालण्याचा भानगडीत आम्ही पडलो नाही. गुगल बाईने चांगला तीन वेळा रस्ता चुकविला तरी आम्ही साधारण चार वाजता आमच्या निश्चित केलेल्या ठिकाणी पोहचलो. . ॲलन आणि जूची आमच्या जस्ट आधी तिथे पोहचले होते त्यामुळे मी चिंतामणी ॲलन आणि जुवी असे चार लोक कॅबने एकत्रच आलो होतो. एकंदरीत राईड पूर्ण झाल्याचा आनंद चेहऱ्यावरून ओसांडून वाहत होता. संध्याकाळी सिंगापूरच्या मित्रांना आणि त्यानंतर ज्यांची फ्लाईट लगेच आहे त्यांना निरोप देऊन आम्ही जोरदार पार्टी केली आणि पुन्हा निपचित बेडवर पडलो.
स्पिती डायरी ( दिवस १२)
आज परतीचा प्रवास करताना बरेच चुकचुकल्यासारखे वाटत होते. एक भन्नाट राईड संपन्न झाली होती . खरे तर परिवर्तनाची नांदी झाली आहे म्हणायला हरकत नव्हती. ठरल्याप्रमाणे प्रथम दिल्ली गाठली . तिथे पोहचलो तेव्हा कडक ऊन आणि निघालो तेव्हा भरपूर पाऊस आहे मिश्र वातावरण होते ,पण गेल्या दहा दिवसात पाहिलेले वातावरणातील बदल पाहता हे अगदीच किरकोळ वाटत होते.आता दिल्लीहून पुण्याच्या विमानात बसताना डायरी आवरावी आणि पुन्हा गेल्या दाहा बारा दिवसाच्या आठवणीत शिरावे असे वाटले.
भारी ! माझ्या एका मैत्रीणीचा
भारी ! माझ्या एका मैत्रीणीचा नवरा जुन मधे गेला होता
छान लिहिले आहे
छान लिहिले आहे
भरपूर प्रश्न विचारायचे आहेत
मी पण स्पीती bike ride डिसेंबर २०२१ मध्ये केली होती
पुन्हा जायची इचछा आहे
तुम्ही कोणत्या आयोजक कंपनी कडून गेले होते
पैसे किती घेतले
Overall सोय व्यवस्था कशी होती
मस्त वर्णन आणि फोटो!
मस्त वर्णन आणि फोटो!
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
मस्त ट्रीप आणि फोटो
मस्त ट्रीप आणि फोटो
खूप सुंदर views आहेत
धन्यवाद मित्रांनो ...
धन्यवाद मित्रांनो ...
@ चँडलर बिंग
टायरमार्क कडून गेलो होतो , खूप छान अनुभव , या राईडबद्द्ल अधिक माहिती हवी असल्यास मला संपर्क करु शकता. (+९१- ९०११०२०६२६)
टायरमार्क हिमाचल लेह लडाख अरुणाचल आणि बाहेरच्या देशातही राईड आयोजन करत असते अधिक माहितीसाठी नितिन जोशी ( +९१-९८२३१ ७९१९१ ) यांना संपर्क करु शकता.
धन्यवाद ...../\.....