मेधा इनामदार लिखित "चाणक्य" कादंबरी

Submitted by निमिष_सोनार on 27 July, 2025 - 13:01

मेधा इनामदार लिखित चाणक्य कादंबरी वाचली. इसवीसन पूर्व काळातील ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर कादंबरी लिहिणे सोपे काम नाही. त्यातच जर ती बहुआयामी आणि गूढ अशी चाणक्य सारखी व्यक्तिरेखा असेल तर? सोबतच अलेक्झांडर, चंद्रगुप्त आणि बिंदुसार यासारख्या व्यक्तिमत्त्वांचाही वेध घ्यावा लागतो. मेधा इनामदार यांची नुकतीच जून 2025 मध्ये प्रकाशित झालेली चेतक बुक्स या प्रकाशनाची "चाणक्य" ही तब्बल 366 पानांची, तीन पर्वात विभागली गेलेली ही कादंबरी मी अधाशीपणे चार दिवसात वाचून काढली. चाणक्याच्या लहानपणापासून सुरू होऊन, बिंदुसार हा राजा बनतो तिथपर्यंत आणि पुढे चाणक्य हिमालयात जातात एवढा प्रचंड आवाका या कादंबरीचा आहे!

या कादंबरीत अगदी सोप्या, सरळ आणि स्पष्ट भाषेत हा सगळा कालखंड आणि चाणक्य व्यक्तिरेखा ताकदीने उभी केली आहे. इतर अनेक ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर मी मेधाजी यांच्या कादंबऱ्या वाचल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे इतिहास सोपा, स्पष्ट, सरळ, "क्लिष्ट शब्दांचा वापर न करता" रंजक करून सांगणे. त्यामुळे त्यांनी चाणक्यवर लिहावे असे मला मनापासून वाटायचे आणि मी हे त्यांना काही वर्षांपूर्वी एका भेटीत बोलून दाखवले आणि त्यांनी खरेच माझ्या विनंतीस मान देऊन ती कादंबरी लिहायला घेतली आणि आज ती आकारास आली. याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या मनोगतात केला त्याबद्दल त्यांचे शतशः आभार!

लहानपणापासून अमर चित्रकथा आणि दूरदर्शनची चाणक्य सिरीयल याद्वारे मला चाणक्य या व्यक्तिरेखेबद्दल आणि त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल प्रचंड कुतूहल होते. ते कुतूहल शमवण्यासाठी मी अनेक पुस्तके वाचली, काही मराठीत लिहिली गेलेली तर काही हिंदीतून मराठीत भाषांतर झालेली, जसे ह. अ. भावे यांचे चाणक्य, इंद्रायणी सावकार यांचे असा होता सिकंदर, राजेंद्र भटनागर लिखित मौर्य सम्राट चा मराठीतून अनुवाद, राजेंद्र पांडेय लिखित चाणक्य आणि चंद्रगुप्त चा मराठीतून अनुवाद. चाणक्य नीति वगैरे यावर तर अनेक पुस्तके आहेत परंतु त्यांच्या जीवन प्रवासाविषयी ठळकपणे नीटसे एकसंध साहित्य कुठे दिसत नव्हते.

तसेच मी अनेक खासगी टीव्ही चॅनेलवरील अशा सगळ्या सिरीयल बघितल्या, ज्यात चाणक्य व्यक्तिरेखा आहे. एनडीटीव्ही इमॅजिन चंद्रगुप्त मौर्य, सोनी टिव्ही पोरस, स्टार प्लस चंद्र नंदिनी, कलर्स टीव्ही अशोका. यात अनेक दंतकथासुद्धा जोडल्या गेल्या. अशोका सिरियलमध्ये तर त्यांनी हद्द केली. चाणक्याला सम्राट अशोक मोठा होईपर्यंत संपूर्ण राजकारणात ऍक्टिव्ह दाखवले. अशोकला मार्गदर्शन करताना दाखवले. बिंदुसारची सावत्र आई हेलेना आणि तिचा पुत्र जस्टिन यांना खलनायक करून टाकले. पुढे पुढे कथानक इतके भरकटले की त्यांना प्रेक्षकांचा रोष पत्करावा लागला चाणक्यची भूमिका करणारे मनोज जोशी यांनी मालिकेतून काढता पाय घेतला.

पण इतके सगळे वाचले आणि पाहिले होते, तरी माझ्यासारख्या जिज्ञासू मनाचे समाधान होत नव्हते आणि अनेक गोष्टी अजूनही मनात अनुत्तरित राहत होत्या जसे की, चाणक्यांनी कूटनीती किंवा अर्थशास्त्र प्रत्यक्ष कसे अमलात आणले? ते नेमके किंगमेकर कसे बनले? त्यांची गुप्तचर यंत्रणा कशी होती? त्यांच्या त्या विषकन्या?अलेक्झांडरला त्यांनी नेमके कसे त्याच्या देशात परत जाण्यास भाग पाडले? पोरस आणि चाणक्याचे संबंध कसे होते? अलेक्झांडर पोरस यांच्या युद्धात नेमके काय झाले? का झाले? कसे झाले? चाणक्याच्या लहानपणी नेमके काय घडले? मगध राजा धनानंदच्या तुरुंगात आपल्या पित्याचा मृत्यू झाला तरी कालांतराने मगधचे धनाध्यक्ष पद नेमके चाणक्याने का स्वीकारले? चंद्रगुप्त कुणाचा मुलगा होता? तो खरंच अलेक्झांडरच्या सेनेत सामील झाला होता का? अमात्य राक्षसचा स्वभाव नेमका कसा होता? चाणक्य आणि अमात्य राक्षस यांच्यात नंतर दुश्मनी झाली होती का? राजदरबारात विविध पदे कोणकोणती असतात? त्यांचे कार्य काय असते? त्या काळात राजकारणातील विविध डावपेच नेमके कसे खेळले गेले, भारताचा भूगोल कसा होता, विविध देश आणि राज्य कोण होते? त्यांच्यातील परस्पर संबंध कसे होते? अनेकीमिनिस कोण होता? पोरस, पर्वतेश्वर, पुरु तिघे एकच की वेगवेगळे?

या सगळ्या प्रश्नांची आपल्याला व्यवस्थित उत्तरे एकसंधपणे या कादंबरीत मिळतात. या कादंबरीत लेखिकेने इतिहासाची भिंत विविध आकाराच्या विटा (पात्रे, ठिकाणे) वापरून नीटपणे सिमेंट (घटनाक्रम, नीति, वेद, ऋचा) लावून भक्कमपणे आपल्यासमोर उभी केली आहे.

पुस्तक वाचतांना तक्षशिलामध्ये चाणक्य यांचे शिक्षण झाले तेव्हा आयोजित करण्यात येत असलेल्या समूह चर्चेद्वारे आपल्याला खूप माहिती मिळते. हिंदू धर्माची महती, तसेच त्या काळात अस्तित्वात असलेले इतर धर्म याचाही उहापोह या कादंबरीत केलेला आहे.

रामायण आणि महाभारतातील विविध व्यक्तिरेखांची या कादंबरीतील विविध पात्रांशी लेखिकेने केलेली तुलना आपल्याला घटनाक्रम आणि पात्रांची वागणूक समजून घेण्यास मदत करते. कादंबरीत कुठेही कोणत्याही पात्राबद्दल किंवा प्रसंगाबद्दल आणि घटनाक्रमाबद्दल संदिग्धता नाही. सारे काही पाण्याप्रमाणे नितळ आणि स्वच्छपणे मांडलेले आहे! दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वात कादंबरीचा वेग वाढतो आणि आपण पाने भराभर पलटत जातो.

चंद्रगुप्त हा जगदीश लोहार आणि जीविश कुंभार यांचा, तसेच अंजनी आणि सुरभी गायीचा पेच प्रसंग कसा सोडवतो, तसेच चाणक्याच्या पायात लहानपणी काटा जाण्याच्या प्रसंग, बिंदुसार चाणक्यावर आरोप करतो तो प्रसंग, विषकन्येचा केलेला पहिला प्रयोग आणि वापर, चाणक्य आपल्या केलेल्या प्रतिज्ञेनुसार शेंडीला गाठ बांधतो तेव्हाचा प्रसंग, यासारखे अनेक प्रसंग विशेष लक्षात राहतात.

चाणक्य नीट समजून घ्यायचा तर ही कादंबरी नक्की वाचावी असेच आहे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users