अजून एक कोवळा तुरा उभा मनामधे

Submitted by हर्षल वैद्य on 21 July, 2025 - 13:44

अजून एक कोवळा
तुरा उभा मनामधे
अजून एक पालवी
निळाइची खुणावते

अजून वाट वाकडी
हळूच साद घालते
प्रवास एकटा मुका
जमेल, भूल घालते

अबोध सांजवेळही
करीत गुप्त खल्बते
निळावल्या निशेसही
छुप्या कटात ओढते

पहाटस्वप्न होउनी
मनातली निळी परी
जुन्या उजाड भूवरी
नवीन बीज पेरते

असेन मी कसा जुना
उरात ओल आजही
जमेलही रुजायला
नवीन अंकुरासही

ऋतूमती निळी धरा
अबोल वाट पाहते
अकथ्यबीजगर्भिणी
निमूट भार साहते

मनांतरातली दिठी
अखेर मुक्ति साधते
कळा निळ्या प्रसूतिच्या
समग्र सृष्टि भोगते

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे कविता. 'अकथ्यबीजगर्भिणी' शब्द आवडला.
जवळपास प्रत्येक कडव्यात निळाई झळकते आहे. Happy
तरंगिणी वृत्त ना हे?

मनांतरातली दिठी अखेर मुक्ति साधते
ही ओळ कळली नाही मला, तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ सांगाल का?

छान!

व्वा, खूपच सुंदर! काही ठिकाणी माझे आकलन कमी पडले, पण तरीही कविता खूप आवडली

स्वाती आंबोळे - हे कलिंदनंदिनी ना? (अर्थात प्रत्येक दोन ओळी मिळून म्हणतोय. की अर्धी ओळ घेतली की तुम्ही म्हणता ते वृत्त होते?)

>>>>असेन मी कसा जुना
उरात ओल आजही
जमेलही रुजायला
नवीन अंकुरासही

सुंदर. सकारात्मक.

इथे अवांतराचा धोका पत्करून :

बेफी, मला वाटतं वृत निश्चित करताना नुसती लगावलीच नव्हे, तर आवर्तनही विचारात घ्यायला हवं.
उदा. हिरण्यकेशीच्या 'लगालगागा'ची कितीही आवर्तनं एका ओळीत होवू शकतात, पण ती पूर्ण व्हायला हवीत. उदा. शेवटचा शब्द एक गुरू वगळून 'लगालगा' असा संपला तर माझ्या मते वृत्त बदलतं.
'सदैव सैनिका पुढेच जायचे' हे कलिंदनंदिनी होईल, पण सदर कवितेत दोन ओळी जोडल्या तरी ' अजूनएकको वळातुराउभा मनामधे(लगा?)' असं शेवटचं आवर्तन अपूर्ण राहील ना?
अर्थात, हे माझं आकलन आहे. ते कदाचित चुकीचं असू शकेल, तसं असेल तर जरूर सांगा. निराळा धागाही काढायला हरकत नाही, किंवा टीपापात कळवा. Happy

(ताई? Proud ) Happy

मनांतरातली दिठी अखेर मुक्ति साधते
ही ओळ कळली नाही मला, तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ सांगाल का?

कवितेमध्ये सतत अव्यक्त आणि मुळात स्वतःलाही नेमक्या न उमगलेल्या भावनेचे वर्णन आहे. ती जी एक भविष्याबद्दलची अस्पष्टशी दृष्टी कविताभर मनात आहे तिला तिची अभिव्यक्ती शेवटी सापडते.

======

तुमच्या वृत्ताविषयीच्या चर्चा लक्षात आल्या नाहीत कारण मी फक्त एक लगावली मनात धरून लिहितो. त्याचे वृत्त नेमके कोणते हे माहित नाही. सर्व चर्चा इथे पुन्हा चिकटवल्या तर सर्वांच्याच ज्ञानात भरच पडेल.

>>> अस्पष्टशी दृष्टी कविताभर मनात आहे तिला तिची अभिव्यक्ती शेवटी सापडते
वा! धन्यवाद! Happy

>>> सर्व चर्चा इथे पुन्हा चिकटवल्या तर
वाहत्या पानावरून इथे चिकटवते आहे:

बाई,

तुमचे तेथील मत अचूक नाही

लगालगा X ४ = कलिंदनंदिनी

ते त्यांनी पाळले आहे अचूकपणे

(मला तरंगिणी वृत्त माहीत नाही, ते कलिंदनंदिनी च्या अर्धे असते का? तसे असले तर मग तुम्ही म्हणत आहात ते योग्य ठरेल)

आवर्तने - अक्षरगणवृत्तात लगावली सोबत आवर्तने ठरलेलीच असतात. हिरण्यकेशी मध्ये चार वेळा लगालगागा आणि सती जलौघवेगा मध्ये तीन वेळा हे ठरलेलेच असते

त्यांनी कलिंदनंदिनी पाळले आहे, पण मध्ये तोडले आहे

ते अर्ध्यावर तोडल्यावर त्याचे तरंगिणी होते की काय हे मला माहित नाही

पण प्रत्येक सलग दोन ओळी एकत्र वाचल्या तर कलिंदनंदिनी अचूक होत आहे

Submitted by बेफ़िकीर on 22 July, 2025 - 10:48
>>> अक्षरगणवृत्तात लगावलीसोबत आवर्तने ठरलेलीच असतात.
>>> लगालगा X ४ = कलिंदनंदिनी

ओके, आलं लक्षात, धन्यवाद. Happy
मला वाटायचं वृत्तांची नावंही (हिरण्यकेशी, वियद्गंगा इ.) त्या त्या वृत्तातच असतात. पण तसं नसावं असं दिसतंय.
घ्या! मीच आनंदकंदाचं उदाहरण द्यायला गेले, पण त्याची लगावली 'आनंदकंद + गागा' अशी होते की! Happy

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 July, 2025 - 11:02
संपादन (3 hours left)

हा निराळा विषय काढत आहात

चामर सोडून बहुतेक वृत्तांची शीर्षके त्याच लगावलीत असल्याचे मला आजवर आढळले

आनंदकंद या ववृत्ताबाबत (म्हणजे लगावलीबाबत) माझे आधीपासूनच जरा अडाणीपण आहे

त्या पटवर्धनांच्या ग्रंथात आनंदकंद हे नुसतेच गागालगाल असे आहे असे आठवत आहे

पुढचा गागा जोडल्यावर नाव बदलायला हवे, तसे त्यांनी केलेले मला तरी आठवत नाही किंवा माझे काहीतरी चुकत असेल

Submitted by बेफ़िकीर on 22 July, 2025 - 11:07

निराळा नाही, 'कलिंदनं(दिनी)'मुळेच मी कन्फ्यूज झाले ना! Happy

>>> बहुतेक वृत्तांची शीर्षके त्याच लगावलीत
हो, आणि ती गुंफलेल्या ओळीही (लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून) असायच्या की व्याकरणाच्या पुस्तकात.
'शोभे सभोवार मंदारमाला मुदे वाहते मंद मंदाकिनी', 'होई वसंततिलका तभजाजगागा', 'भुजंगप्रयाती यती(?) चार येती' अशा काही ओळी अंधुक आठवतात.

पटवर्धनांचा म्हणजे कुठला ग्रंथ?

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 July, 2025 - 11:34
संपादन (3 hours left)

छंदोरचना ना?

Submitted by बेफ़िकीर on 22 July, 2025 - 11:21

ओह ओके. नाही, मी नाही वाचलेला.

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 July, 2025 - 11:29
संपादन (3 hours left)
>>> कलिंदनं(दिनी)'मुळेच मी कन्फ्यूज झाले ना

म्हणजे काय?

Submitted by बेफ़िकीर on 22 July, 2025 - 11:30
म्हणजे मला वाटायचं की वृत्ताचं नाव त्याच्या लगावलीच्या एका आवर्तनाइतकं असतं. पण अर्थातच तसं नाहीये.

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 July, 2025 - 11:33
संपादन (3 hours left)

Necessarily वृत्तांची शीर्षके पूर्ण लगावली दर्शवत नाहीत असे तुमचे म्हणणे आहे ना / का?

हो, तसे होते खरे, पण बऱ्याचदा दर्शवतातही!

पण कलिंदनंदिनी ची लगावली सर्वज्ञात आहे व त्या धाग्यावर त्या कवींनी ती पाळली आहे

तुम्ही काही प्रतिसाद लिहीत / लिहिला असलात तर तो वाचण्याआधी माझा हा प्रतिसाद मी लिहिला आहे

Submitted by बेफ़िकीर on 22 July, 2025 - 11:35
संपादन (3 hours left)
>>>
असे तुमचे म्हणणे आहे ना / का?
हो, तसे होते खरे, पण बऱ्याचदा दर्शवतातही!
<<<
Yes, We’re on the same page (now)! Happy

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 July, 2025 - 11:37
संपादन (3 hours left)

>>> ताई

त्या आमच्या एका ग्रुपवर 82 वर्षाच्या स्वाती आहेत

त्यांना सगळे ताई म्हणतात

त्यामुळे स्वाती या नावापुढे ताई लावण्याची सवय झाली

तुम्ही वयाने खूपच कमी आहात त्यांच्यापेक्षा, पण प्रमाद घडला

यापुढे स्वाती म्हणेन

=====

हर्षल वैद्य,

अवांतर झाले - क्षमस्व

=====

छंद आणि वृत्तांच्या सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

अवांतरे चालायचीच. तुम्हाला कविता मुळात आवडली म्हणून तर इथे येऊन अवांतरे करत आहात.

>>> अवांतरे करत आहात.

अख्खे संकेतस्थळ या बाबीवर चालू आहे. सवांतरे केली तर तक्रारी केल्या जातात इथे.