काही वाचननोंदी - ३

Submitted by संप्रति१ on 18 July, 2025 - 14:33

१ . ‘द गर्ल ऑन द ट्रेन’- पॉला हॉकिन्स (अनु. उल्का राऊत)

ही एक अतिशय नजाकतीने रचलेली सायकॉलॉजिकल थ्रिलर कादंबरी आहे. लेखिकेला थ्रिलर कादंबरीच्या आडून एक उत्तम साहित्यकृती कशी लिहायची हे माहित आहे, असं दिसतं. अतिशय सुपरफास्ट, चित्तवेधक, जागेवरून हलू न देणारं कथन. वास्तववादी, समकालीन, आणि डार्क ह्युमरचा मुक्त वापर. सोप्या सोप्या वाक्यांमध्ये अर्थांचे/ भावनांचे बरेच थर. ही काही वैशिष्टयं.

घटनांची एकच साखळी तीन वेगवेगळ्या स्त्रियांच्या अँगलनं सांगितलेलीय. सगळ्यात लक्षणीय आहे- रॅचेल हे मुख्य स्त्री पात्र. भयाण एकाकी आणि बेफाम मद्यपी रॅचेल. तिची मद्यधुंद अवस्थेतली बडबड, हतबलता, तडफड, वेडेपणा चितारताना लेखिकेनं व्यसनाबद्दल फार गहन सत्यं उजेडात आणली आहेत. जे कुणी अल्कोहोलच्या व्यसनाच्या ससेहोलपटीतून गेलेले असतील, त्यांना हे फारच रिलेटेबल आहे. एखाद्या पात्राबद्दल वाचकाला एकाचवेळी निराशा, दया, तिरस्कार, हसू अशा टोकाच्या विरोधी भावनांची रोलर कोस्टर राईड अनुभवायला देणं, ही अवघड गोष्ट लेखिकेनं साधलेली आहे. थोडीशी अतिशयोक्ती करायची मोहलत घ्यायची म्हटलं तर ही लेखिका म्हणजे 'इंटरेस्टिंग' दोस्तोव्हस्की वाटली. आवडली.

girl on the train.jpgचित्रस्त्रोत: google.com

____________________________******____________________

२. 'ॲन आयलंड' - कॅरन जेनिंग्ज (अनु. संकेत लाड)
ही एक गुंतागुंतीची कादंबरी आहे. एका अज्ञात आफ्रिकन देशात या कादंबरीचं कथानक घडतं. यात सॅम्युअल म्हणून एक मुख्य पात्र आहे. त्याच्या आयुष्यातील चार दिवसांचं हे वर्णन आहे. देशातील हुकूमशहाविरुद्ध बंडखोर चळवळीत भाग घेतल्यामुळे त्याने फार मोठी किंमत मोजलेली आहे. तारुण्याचा प्रदीर्घ काळ छळ, तुरुंगवास भोगलेला आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर आता वृध्दावस्थेत तो एका निर्जन बेटावर दीपगृह रक्षक म्हणून काम करत असतो. एके दिवशी त्या बेटावर एक परदेशी निर्वासित वाहत येतो. त्या हृदयस्पर्शी प्रसंगापासून ही कादंबरी सुरू होते. पण त्यानंतर मात्र हळूहळू एका भयाण तणावपूर्ण मनोदशेत ओढून घेऊन जाते. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त तणाव, म्हणजे अगदी भीती वाटेल असा तणाव निर्माण केलेला आहे लेखिकेनं.

सॅम्युअलच्या भूतकाळाचा आठवणींद्वारे,फ्लॅशबॅकद्वारे हळूहळू उलगडा व्हायला लागतो. राजकीय दडपशाही, तुरुंगवास, भ्याडपणा, हिंसाचार, दुःख, संताप यांच्या दीर्घकाळ झालेल्या आघातामुळे सॅम्युअलच्या मनावर झालेला परिणाम.. आणि त्यामुळे पॅरानॉईड झालेल्या त्याच्या व्यक्तिमत्वाचं विचलित करणारं चित्रण. शिवाय फॅसिझम, वंशवाद, निर्वसन, 'आपण विरुद्ध ते' असा विषारी संघर्ष, यांसारख्या सध्याच्या ज्वलंत समस्या लेखिकेनं अचूकपणे हाताळल्या आहेत.

एका ओळीत सांगायचं तर ही कादंबरी म्हणजे दुःख आहे. प्युअर दुःख. अविरत झरणारं दुःख. आनंद, प्रेम नावालाही नाही. ही शोकांतिका आहे, जिचा शेवट अगदीच धक्कादायक आहे. कुणी अजिबातच कल्पना करणार नाही, असा शेवट आहे. इतकं पॉवरफुल लिखाण आणि इतका परिणामकारक शेवट. हे असं क्वचितच सापडतं.

an iland.jpg

_______________________________________******______________________________

३. 'मीडिया कंट्रोल'- नोआम चॉम्स्की

नोआम चॉम्स्की हे मोठे भाषाशास्त्रज्ञ, पब्लिक इंटलेक्चुअल आहेत. त्यांचं हे पुस्तक 'जनमत नियंत्रण' (Consent Manufacturing) कसे केले जाते याबद्दल आहे. माध्यमांच्या वापराद्वारे संपूर्ण लोकसंख्येला हाताळणं किती सोपं (आणि भयानक) आहे, माध्यमांवर नियंत्रण ठेवणारे काही मूठभर लोक जनमत कसे सहजपणे हाताळतात आणि खऱ्या खोट्यातला भेद मिटवून टाकतात, सत्तातंत्र आणि कार्पोरेशन्स यांची घातक युती सामान्य लोकांच्या मनांवर नियंत्रण करून त्यांना उन्मादी झुंडीत कसे रुपांतरीत करू शकते, तसेच बेसिक मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष हटवण्याची तंत्रं कशी काम करतात, याचं स्पष्टीकरण उदाहरणं देऊन केलेलं आहे. चॉम्स्की पेशानं प्राध्यापक आहेत, आणि चांगले प्राध्यापक आहेत. कारण ते ज्ञानाचा गाभा सामान्य वाचकाला समजेल अशा सोप्या सरळ भाषेत मांडतात, त्यांच्याकडे ती हातोटी आहे. शिवाय उपरोधिक शैलीमुळे, तीक्ष्ण विनोदबुद्धीमुळे त्यांचं लिखाण आणखी परिणामकारक होतं.

'चॉम्स्की' जेवढा वाचावा तेवढा कमीच आहे, आणि चॉम्स्कीची खूप पुस्तकं आहेत. सुरुवात या पुस्तकापासून झाली होती. हे छोटंसं पुस्तक वाचत असताना डोक्यात फटाके फुटले. हा एक वेगळाच अफलातून खेळ आहे, याबद्दल आजवर आपण अगदीच वेडझवे होतो, याची झलक या पुस्तकानं दाखवली. आपल्यापर्यंत पोचणारी माहिती, मेन स्ट्रीम माध्यमातलं कव्हरेज, वर्तमानपत्रातले लेख/ वार्तांकनं, अजेंडा-सेटर्स, इन्फ्लुएन्सर्स, राजकारण्यांची वक्तव्यं, या सगळ्याकडे चॉम्स्कीच्या या नव्या उजेडात बघताना मजा येते.
_______________________________________******______________________________

४. 'सोनेरी स्वप्न' - विस्डम मास्टर म्याटिसिंटीन (अनु-राजेन्द्र कुलकर्णी)

तिबेटमध्ये बाराव्या शतकात मिलारेपा म्हणून एक अलौकिक व्यक्तिमत्व होऊन गेले. हे पुस्तक म्हणजे त्यांचा अध्यात्मिक जीवनप्रवास आहे. मिलारेपा आणि त्यांचे गुरू मारपा, यांच्यातील हृद्य नात्याची ही कहाणी आहे. गुरू-शिष्याची जोडी एकदम परफेक्ट आहे. ही कहाणी मिलारेपा यांनी स्वतः सांगितलेली आहे. स्वतःबद्दल, स्वतःच्या गुरूबद्दल एवढं खरंखरं बोलणं, हे इतरत्र कुठं आढळणार नाही कदाचित. क्वचितच एखाद्या शिष्याला असा गुरू लाभला असेल, आणि क्वचितच एखाद्या गुरूला असा शिष्य भेटला असेल, असं वाटतं.

सूडाच्या भावनेतून काही अपकृत्यं करून बसलेला तरुण साधक मिलारेपा, पश्चातापदग्ध होऊन मारपा यांच्याकडे येतो. तो तसा येईपर्यंत मारपा शांतपणे वाट बघत राहतात आणि एकदा तो पट्टीत आल्यानंतर मग त्याला त्यांच्या खास स्टाईलनं, आडमार्गानं मार्ग दाखवत राहतात. वरकरणी त्यांची स्टाईल सुनेला छळणाऱ्या खाष्ट सासूसारखी भासली तरी आतून हा माणूस बुद्धपुरुष असल्याचे जाणवत राहते. साधी सोपी ह्रदयाला स्पर्श करणारी भाषा, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. माणसाच्या मनाबद्दल, मनातल्या विचारांबद्दल एक खोल अंतर्दृष्टी देणारं हे पुस्तक आहे. याचं केवळ वाचन हासुद्धा मन शांत करणारा अनुभव असू शकतो.

golden dream.jpgचित्रस्त्रोत: google.com

______________________________________******______________________________

५. 'महातीर्थाचा अखेरचा यात्रिक' - बिमल डे (अनु. विजय शिंदे, 'महातीर्थ के अंतिम यात्री')

१९५०च्या दशकात चीनने तिबेटचा कब्जा घेतला. भारतातून दरवर्षी अनेक यात्रेकरू तिबेटमार्गे कैलास-मानसला पायी पायी जायचे. हा पारंपरिक मार्ग चीनने परदेशी नागरिकांसाठी बंद केला. ठिकठिकाणी चिनी सैनिकांचे कडक चौकी पहारे बसले. त्या काळात, चिनी सैनिकांपासून बचाव करत लेखकाने सदर मार्गावरून प्रवास केला. त्याअर्थाने लेखक त्या मार्गावरचे 'अखेरचा प्रवासी' आहेत.

(आपल्याकडचे धर्मानंद कोसंबी आणि महापंडित राहुल सांकृत्यायन तिबेटला गेले होते, पण ते फार आधी.! सांकृत्यायन यांच्या 'मेरी तिब्बत यात्रा', कोसंबी यांच्या 'निवेदन' या पुस्तकांतून तात्कालीन तिबेटसंबंधी सुंदर वर्णन आहे. या दोघांनी मोठ्या कष्टानं तिबेटमधून बौद्ध धर्माशी संबंधित प्राचीन ग्रंथसंपदा, दुर्मिळ हस्तलिखितं मिळवून भारतात आणली आणि नंतर ते भांडार जगासाठी खुलं झालं. असो.)

तर या प्रवासादरम्यान लेखक बिमल डे यांनी लिहिलेली डायरी म्हणजे हे पुस्तक. लेखक मूळचे कलकत्त्याचे. शाळकरी वयात घरातून पळून गेले. काही काळ अशीच मनातील उमाळ्यांवर बेतलेली भटकंती करत राहिले. मग एके ठिकाणी त्यांना एक 'गुरुजी' भेटले. पुस्तकात वर्णन केल्यावरून हे गुरुजी म्हणजे एक पितृतुल्य, परिपक्व, आदरणीय माणूस असावेत, असं वाटतं. तर हा पोरसवदा लेखक त्या गुरुजींसोबत एका नेपाळी यात्रेकरूंच्या जथ्थ्यांत सामील झाला आणि तिबेटला गेला. जवळ कसलेही रिसोर्स नसताना निव्वळ भगवान-भरोसे केलेला हा प्रवास आहे. लेखकानं आपल्या या पुस्तकाचं वर्णन 'एका भिकाऱ्याची डायरी' असं केलेलं आहे. परंतु ते तसं अजिबातच नाही आहे. एक वेगळ्याच प्रकारची श्रीमंती, आंतरिक समृद्धी या संबंध पुस्तकात ठायी ठायी अनुभवास येते. तिबेटच्या अगदी अंतर्भागातील लोकजीवन, त्यांचं आदरातिथ्य, मानवी स्वभावांचे नमुने, त्या प्रदेशाचं अत्यंत उत्कट असं निसर्गवर्णन, प्रवासात भेटलेल्या बौद्ध लामांचे अनोखे अनुभव वाचायला मिळतात. 'असंच उठून सगळं सोडून तिबेटला जावं' असं वाटायला लावण्याजोगं एक सुंदर प्रवासवर्णन/ जीवनवर्णन झालेलं आहे हे.

tibet.jpgचित्रस्त्रोत: google.com

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The girl on the train मूळ पुस्तक वाचलेल.. आवडलेल.
महातीर्थाचा अखेरचा यात्रिक'
मीडिया कंट्रोल
यांची नोंद केली आहे

Happy लेख आवडला. योगायोगाने यातलं बहुतेक सगळे वाचलेले आहे किंवा पूर्णपणे परिचयाचे आहे. असं तुमच्या वाचन- नोंदी वरील लेखाबाबत कधीही होत नाही. "महातीर्थाचा अखेरचा यात्रिक" तितकं आवडलं नव्हतं पण आता पुन्हा एकदा वाचून पाहेन. नोम चॉम्स्की बाबत अनुमोदन, मी काही दिवसांपूर्वी वाहत्या धाग्यावर (टिपापावर) Consent manufacturing चा व्हिडिओ दिला होता. आपले विचार, आपली मतं आणि आपल्या भावना आपल्या नसून त्या तशा पेरलेल्या आहेत हे बघून एकदम intellectually निराधार वाटायला लागतं.

मिडीया कंट्रोल - नोटेड

गर्ल ऑन द ट्रेन मूळ पुस्तक वाचलंय. मस्तच आहे ते.

'असंच उठून सगळं सोडून तिबेटला जावं' असं वाटायला लावण्याजोगं एक सुंदर प्रवासवर्णन/ जीवनवर्णन झालेलं आहे हे. >>>
एम्पायर्स ऑफ द इंडस वाचताना मला असं एका पॉइंटला उत्तर पाकिस्तानबद्दल वाटलं होतं!