डिग्री!

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 8 July, 2025 - 13:57

माझी डिग्री अर्धवट राहिलीय
मी तळमळतोय,
नेहमी, रोज.
कधी होईल पूर्ण?
का होत नाहीये?
का राहताहेत विषय?

मी रोज झोपतोय आणि तळमळत जागा होतोय.
डिप्लोमा झाल्यावर मी डिग्रीला अ‍ॅडमिशन घेतलं.
जॉब करत डिग्री करायची म्हटली, पण डिग्री सोपी नव्हती.
माझे विषय राहिले, ते मी काढतच गेलो.
इकडे पगार वाढला, "डिग्री करायची गरज नाही" असे सल्ले मिळू लागले.

पण मी डिग्री पूर्ण करतच राहिलो,
पण ती पूर्ण होत नाहीये.
कधी मी पेपरला वेळेत पोहोचत नाहीये,
तर कधी पोहोचूनही मला काही लिहिता येत नाहीये.
लिहूनही पास होत नाहीये.
तर कधी भलतंच काहीतरी आचरट घडतंय —
सगळं जग जणू माझी डिग्री होऊ नये म्हणून तुटून पडलंय.
डिग्री पूर्ण होत नाहीये.

हे असं बऱ्याच वर्षांपासून चाललं आहे.
मी झोपतोय नीट, पण अपूर्ण डिग्रीच्या भयंकर स्वप्नाने उठतोय.

उठल्यावर कळतं —
जग खूप पुढे गेलंय, आपणही खूप पुढे आलोय.
बाजूला बायको आणि मुलगा झोपलेत.
खऱ्या आयुष्यात माझी डिग्री होऊन अनेक वर्षे झाली आहेत.

पण माझ्या त्या स्वप्नांच्या जगात
काहीतरी अपूर्ण राहिलंय
माझी डिग्री!

डिग्री मला मिळेल की
झोपेतच सोबत नेईल...?

Group content visibility: 
Public - accessible to all site users