अस्मिताने थोडासा 'सौतन' बघितला. बरं बघितला तर बघितला, वर तिच्या शैलीत मिनी रिव्ह्यू लिहिला. मग सगळ्यांचेच
कुठले कुठले PTSD उफाळून आले आणि माबो ग्रूप थेरपी सुरु असताना 'मैं तुलसी तेरे आँगन की' ची पण आठवण निघाली. बरं टायटल सॉन्ग लताने जीव ओतून गायलेलं. ते डोक्यात वाजू लागलं. मग ते बघणं भाग, त्यातून यूट्यूबची रेको प्रोसेस. थोडक्यात भोआकफ.
सुरुवातीला 'चंद्रकांत काकोडकरांच्या कथेवर आधारित' असा वैधानिक ईशारा दाखवलाही होता पण विनाशकाले म्हणतात ना... त्यात शोभा गुर्टू ‘सैय्यां रूठ गए, मैं मनाती रही’ गायला लागल्या. म्हटलं बघूया तरी काय होतंय. कुठल्याश्या बदनाम वस्तीत गाँव की गोरी टाईप हाफ घागरा घालून आशा पारेख या गाण्यावर कथ्थक स्टाईल नृत्य करत असते. सोबत सारंगीवाला. तबलजी, मौसी, लालची नजरेने बघणारा सेठजी वगैरे नेहमीचा जामानिमा असतोच. सेठजी मौसीला सांगतो की 'तुलसी का ये पेड़ हमारे दिल में लगा दो लीलाबाई'.
आत्तापर्यंत या नृत्यांगनांना गुलाब, चमेली, चंपाकली, रामकली (हे कुठलं फुल आहे देव जाणे) वगैरे उच्शृंखल नावांनी हाक
मारणारे भरपूर पाहिले, अनारकली म्हणणारे रसिकही पाहिले, पण ‘तुलसी का पेड़’ म्हणणारा सज्जन विरळाच. अर्थात नगद २०००० रुपये देऊन तुलसी का पेड़ लगोलग आपलासा करण्याची त्याची मनीषा आशा पारेखला मंजूर नाही. त्यामुळे प्रसंग
हातघाईवर येतो आणि ड्रेसिंग टेबलवर बशीत ठेवलेली टाल्कम पावडर बोजड सेठच्या डोळ्यांत उधळून आशा पारेख पळ काढते. पावडर बशीत का काढून ठेवली होती विचारू नका. खरं तर आशा पारेख पवित्र असल्याने त्यांना देव्हाऱ्यात ठेवलेले हळद, कुंकू, अष्टगंध गेला बाजार अंगारा किंवा विभूती उधळायचा चान्स होता पण तो त्यांनी गमावला. कदाचित कुंकू चुकून तिच्या भांगात पडलं असतं तर पिक्चर तिथेच संपवावा लागला असता, शिवाय पावडर बशीत ठेवली आणि येताजाता उधळली तर पॉण्डसवाल्यांना आनंदच होईल असा प्रॅक्टिकल विचारही असू शकतो.
पळत पळत ती कुठे जाणार? अर्थात हिरोच्या (विजय आनंदच्या) गाडीसमोर. पण ती गाडीचा धक्का लागून बेशुद्ध पडत नाही तर ठाकूरला 'मुझे कोठे की मौत से बचा लो' अशी विनंती करत त्याच्या अंगावर कोसळते. पुढच्या शॉटमध्ये ठाकूरची आई झेपत
नसताना जिना चढून वर येते. तिला दम लागलाय पण मुलाला जाब तर विचारला पाहिजे. पण ती ठाकुरों के खानदान की, राही
मासूम रज़ा यांनी लिहिलेले संवाद म्हणणारी आई आहे. त्यामुळे ती "कार्ट्या, कुठल्या भटकभवानीला घरात आणून ठेवलंस? अगदी बापाच्या वळणावर गेलास. चांगले पांग फेडलेस हो म्हातारीचे" वगैरे त्रागा नाही करत. ती विचारते “बाळा, तू एवढा मोठा कधी झालास की तुला अमुक बागेतल्या कोठीचा (कन्फ्यूज होऊ नका - आपाचा कोठा, ही कोठी (पंजाबीवाली)) दरवाजा उघडता यायला लागला. तुला माहीत नाही का की त्या कोठीने माझ्या वैवाहिक आयुष्यातल्या कित्येक रात्री गिळून टाकल्यात? तू त्या
मुलीला तिथे का ठेवलंस?” म्हणजे प्रेमाच्या त्रिकोणाचा खानदानी वारसा आहे इथे. पण ठाकूर अजून तरी प्रेमात नाही. तो आईला सांगतो की ती मुलगी (आपा) सध्या लाचार आहे म्हणून मी तिला आसरा दिलाय. काही दिवसांनी ती जाईल इथून. आई समाधानी आहे.
पण लीलामौसी थोडीच गप्प बसणार आहे. २०००० काय झाडाला लागतात का? ती आपाचा माग काढत ठाकूरच्या कोठीवर येते आणि जबरदस्तीने आपाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. तिला आपालाच नव्हे तर तिच्या भावी मुलीलाही कोठ्यावर बसवायची ईच्छा आहे. प्रसंगी एकट्याने सेठला गुंगारा देणारी आपा इथे आजूबाजूला नोकर असूनही सुटकेचा जराही प्रयत्न करत नाही.
सुदैवाने ठाकूर तिथे येतो. मौसीशी पंगा घेतो. मौसीपण त्याच्या वडिलांची ओळख दाखवून आपणही काही कमी नाही वगैरे
दाखवण्याचा प्रयत्न करते. शेवटी ठाकूर तिला हाकलवून देतो. या सीनमध्ये आपल्याला समजतं की आपाचं पिक्चरमधलं नाव
तुलसी आहे त्यामुळे मग मगासच्या क्रिन्ज संवादांचा उगम समजतो. ठाकूर अजूनही डोक्याचा वापर करत असल्याने तो आपाला
विचारतो की तू मौसीला विरोध का केला नाहीस? पण आपा आता सीता और गीतामधली सीता झालेली आहे. ती म्हणते "मैं डर गयी थी". ठाकूर म्हणतो की " कभी नहीं डरना. तुम यहां मेरी मेहमान हो. तुम्हारा किसी से डरना मेरी तौहीन है." निदान इथपर्यंत ठाकूरचे फंडे क्लिअर आहेत. तो प्रेमात नाहीये.
पण आपाची लक्षणं ठीक दिसत नाहीत. ती आपली दिवाणखान्यात बैठकीवर पडून रेडिओवर 'आजा मेरी बरबाद मोहोब्बत के सहारे' ऐकतेय. कमाल आहे या बाईची. मान्य आहे की तो तुला पाहुणी समजतोय पण तुला माहितेय ना तू आश्रित आहेस इथे? मग जरा घरात काहीतरी काम कर. अगदीच काही नाहीतर निवडणं, टिपणं, भाज्या साफ करणं जरा तरी हातभार लाव. आणि ठाकूरची प्रेमळ नोकराणी तिला म्हणते की "दो दिन से गुमसुम बैठी हो. कुछ खाने पिने का ख़याल भी नहीं हैं. ठाकुरसाहब हमें डाटेंगे." मग आपाचं एक्सप्लेनेशन की "कैसी मेहमान हूँ मैं, जिसे जाने के ख़याल से भी डर लगता है".
सिनेमॅटिक योगायोगामुळे ठाकूर हे ऐकतो आणि तिला सांगतो की “मेहमान आते है अपनी ख़ुशी से, लेकिन जाते है घरवालों की मर्ज़ी से”. मला एकदम हॉटेल कॅलिफोर्निया आठवलं. असो. ठाकूर विजय आनंद असल्याने तो हुशार आहे. त्याच्या नजरेतून काही सुटत नाही. त्याने ‘बरबाद मोहोब्बत के’ वगैरे रडारड ऐकलेय. तो म्हणतो ही आयुष्याची एक बाजू आहे. आता दुसरी बाजू ऐक
म्हणून तो एलपीची साईड बदलतो आणि आता वाजू लागतं 'जवाँ है मोहोब्बत, हसीं हैं जमाना'. माझ्या कानात धोक्याच्या घंटा वाजू लागल्यात. तो पुढे असंही म्हणतो की “जिंदगी सिर्फ बीते हुए दिनों की याद नहीं है. जिंदगी यहां है, जिंदगी अभी है, इसे जीना
सीखों, इसकी इज़्ज़त करना सीखों”. एकंदरीत आनंद बंधूंकडून वर्तमानात जगण्याची दीक्षा घ्यायला हरकत नाही या विचारात मी असताना तो पुढे म्हणतो “ये क्या उदास से कपड़े पहने है. जाओ कुछ जीते जागते हुए कपड़े पहनो.” वास्तविक आशा पारेखने डार्क हिरवा आणि डार्क ब्राऊन कॉम्बिनेशन असलेली हॅन्डलूमची साडी नेसली आहे. तो रंग तिच्यावर उठूनही दिसतोय. पण जाऊ दे
म्हटलं, असते एकेकाची पसंत-नापसंत. पण खुशनुमा रंग म्हणून ती झँग ऑरेंज रंगाची पांढरी ओबडधोबड एम्ब्रॉयडरी केलेली
लेहेरीया साडी नेसून येते. डोळ्यात खुपणाऱ्या त्या साडीत तिला पाहून तो इम्प्रेस होतो आणि तिला बागेत घेऊन जातो. का तर म्हणे “मैं फूलों को दिखाना चाहता हूँ खिलना सिर्फ उन्ही को नहीं आता.”
त्याने आधार दिल्याने आपाने त्याच्याकडे आकर्षित होणं समजू शकतं. पण दोन दिवसापूर्वी तिला पाहुणी समजणारा ठाकूर कसा काय प्रेमात पडला? राज खोसला - विजय आनंद द्वयीकडून ही अपेक्षा नव्हती. इथून पुढे प्रेमाचे पाश झपाट्याने गहिरे होत जातात, समाजमान्य मर्यादा ओलांडतात. पण ज़ालिम जमान्याला अजुन आक्षेप घ्यायला वेळ मिळालेला नाही. रात्री एक मुलगी दुसऱ्या घरात आणली तर सकाळी रागावणाऱ्या आईला पत्ता लागला नाही.
ठाकुरों की हवेलीमधले नोकर चाकरही बहुतेक फारच ओपन माईंडेड असावेत. कोणी चुगली तर करतच नाहीत पण आपापसात गॉसिपही करत नाहीत. उलट “दो दिन से मितली आ रही है” म्हटल्यावर मगासचीच प्रेमळ नोकराणी तिचं अभिनंदन करून
ठाकूरसाबकडून सोन्याचे कंगन घेणार असं सांगते. (बाय द वे, मितली शब्द आवडला मला. माय मराठीत या भावनेची ढवळतंय म्हणून संभावना करतात.) लग्न झालं नाहीये ही बारीकशी गोष्ट सगळेच विसरून गेलेत बहुतेक. पण प्रेमस्वरूप आई कसं बरं
विसरेल? तिने लग्न ठरवून टाकलंय आणि ते ३ महिन्यावर आलंय. ठाकूरसाबला आपल्या जीवनातल्या दोन महत्वाच्या गोष्टींचा अजून पत्त्याच नाही.
------ -------------- पुढील भाग -----------------------------------------
ठकूराईनला आता जाणवतं की मुलाला सांगावं की बाबा तुझं लग्न आहे बरं का. तसं लवकर आठवलं म्हणायचं नाहीतर कदाचित त्याच दिवशी सांगितलं असतं की आज संध्याकाळी तुझी बारात न्यायचीय बरं का. पण मग ‘मेरे जीतेजी’ वगैरेचा मेलोड्रामा करता आला नसता. पण ठाकूर ठाम आहे. तो सांगतो तुम्हारी इन धमकियों का मुझ पर कोई असर नहीं होनेवाला माँ'. आता शेवटचा उपाय म्हणून ठकूराईन अस्थम्याचा अटॅक आल्यासारखा अभिनय करते. म्हणजे काय हे समजत नसेल तर अरुण गोविल
वनवासाला निघाल्यावरचा जयश्री गडकर यांचा अभिनय आठवा. तेवढ्यात आपाने ठाकूरला बोलावण्यासाठी पाठवलेला नोकर तिथे येतो. तो परत जाऊन आपाला अपडेट देतो. पण तिथे असताना मालकाच्या मदतीला काय जात नाही. शिवाय आपल्याला हे ही समजतं की तो अस्थमा नसून दिल का दौरा असतो.
दिल का दौरा पडलेली माँ लगेच घरी परतली आहे. तिच्यासोबत कुणी नर्स, आया निदान घरातली एखादी नोकराणीही वगैरे नाही. साईड टेबलवर फळं दिसतात पण औषधं नाही. ठाकूर माँला ‘कैसी हो’ विचारायला जातो तर ती तोंड फिरवून घेते. एखादी बाई
म्हटली असती की माझे चार दिवस उरलेत, कुठे पोराचं मन मोडा. पण ठकूराईन माँना सेन्सिबल वागणं अलाऊड नसावं. मुलाचं आयुष्य बरबाद झालं तरी चालेल, त्याने विबासं ठेवले तरी चालेल, मी मोडेनच पण तुलाही वाकवेन असा बाणा घेऊन ती वावरतेय.
जीवाला काही थंडावा मिळावा म्हणून ठाकूर आपाकडे आला आहे. ती ही आपल्याला काही ठाऊक नाही असं दाखवून त्याला
कुठलासा हलवा खाऊ घालण्याची इच्छा व्यक्त करते. तत्पूर्वी तो हलवा आवडला तर तुम्ही मला काय देणार असं विचारते. तो ही “तुला काय हवं ते” असं सांगतो. त्यावर ती पुन्हा "तुम राजपूत हो. कोई मुश्कील चीज माँगूंगी तो" असं विचारून खुंटा हलवते. वर्षानुवर्षे साधा शिरा, प्रसादाचा शिरा, दुधी आणि गाजराचा हलवा करून कुणी हवी ती साडी घे म्हणत नाही. पण इथे मात्र "छोटी हो या बड़ी, तुम जो चीज माँगोगे वो दे दी". इन द सेम स्पिरिट, तो तिने हातात घेतलेला हात, तो हात ज्या शरीराचा भाग आहे ते शरीर, त्या शरीरातील हृदय आणि हृदयातील आत्मा तिला देऊ इच्छितो. पण आपा हृदय आणि आत्मा स्वीकारते आणि त्याला
सांगते की "मैं ये हाथ उस लड़की को दे रहीं हूँ जिसके आने से माँजी की जान बच सकती हैं" शिवाय तुलसी कशी घराच्या बाहेरच असते, श्रीकृष्णही तिला घरात कसा घेऊन गेला नाही वगैरे धार्मिक ज्ञानही देते. साथ नको पण आस्था चॅनेल आवर म्हणून ठाकूर निघून जातो. अरे पण हलव्याचं काय? तो आवडण्यावर सगळं अवलंबून होतं ना??
मधल्या काळात आपाने अंगणात एक तुळस लावलेली आहे. राजपुतांच्या कोठीत तुळस नसते का ऑलरेडी?
कट टू नेक्स्ट शॉट सुहागरात की सेज पर नूतन बसलेली आहे. विमनस्क मनाने ठाकूर येतो. बायकोकडे नीट पाहतही नाही.
गळ्यातला हार काढून खुर्चीवर बसतो आणि शेवटी काही न सुचून निघून जातो. नया नवेल्या दुल्हनला काय चालू आहे समजत नाही. करूण प्रसंग म्हणून बिदाईच्या वेळी वाजवायची सनई इथे वाजवली आहे. ठाकूर आपाकडे जातो. ती त्याला पाहून चकित व्हायचा अभिनय करते. बाई प्रेम आहे ना त्याचं तुझ्यावर आणि तुझं त्याच्यावर? मग आत्ता त्याची काय मनस्थिती असेल हे तुला समजू नये?
ठाकुर अजूनही त्याच्या भावनांशी प्रामाणिक आहे. तो म्हणतो "मैं अपने आप से झूठ नहीं बोल सका. यह सुहागरात नहीं आवारगी हैं ये, बेहूदगी हैं". इथपर्यंत मी त्याच्याबद्दल सहानुभूती बाळगतेय. पण लगेच तो त्याच्यावर हंडाभर पाणी ओततो "माँ को बहु चाहिए थी वो ला दी. उसके साथ रहने का वादा न तो मैंने माँ से किया था, न तुमसे.” बहू म्हणजे काय घड्याळ आहे? आणलं आणि घरात एका भिंतीला लावून टाकलं. पुढचं तुमचं तुम्ही बघा. अर्थात त्यागमूर्ती आशा पारेख त्याला समजावून परत पाठवते. पण जाताना तो सांगतो की "आज के बाद कोई खुश नहीं रहेगा. न माँ, न वो लड़की, न तुम और न मैं." त्याने या यादीत हा पिक्चर बघणारे प्रेक्षक पण जोडायला हरकत नव्हती. पण असो.
तो घरी येऊन सजवलेल्या फुलांच्या काही माळा तोडतो. नूतनला एवढं तर समजतं की He is just not into her.
ठाकूर पुन्हा आपणाकडे येतो तेव्हा त्याला तिच्या हातात अर्धवट विणलेले छोटे मोजे दिसतात. आपल्याला ही बातमी समजली असती तर आपण कुठल्याही परिस्थितीत संजुक्ताशी लग्न केलं नसतं असं तो म्हणतो. पण आता काय उपयोग? पुन्हा आपा त्याची समजूत घालते.
मुलाच्या (आणि सुनेच्या) आयुष्याचा चुथडा करून ठकुराईनचं समाधान झालेलं नाही. ती आता सुनेवर बॉम्बगोळा टाकते की
तुझ्या सवतीची कुस उजवली आहे. मी जिवंत असेपर्यंत तू इथे आणि ती बागेतल्या कोठीत असेल. मी गेल्यावर ती इथे येईल, मग तुझं काय? तू तिची नोकर बनून राहशील. म्हातारे हा विचार मुलाचं त्याच्या मर्जीविरुद्ध लग्न करण्यापूर्वी केला असतास तर? वर शहाजोग सल्लाही देते की “ठकुराईन हो तो ठकुराईन बनके उस कोठी में जाओ और उसे ठोकर मार के निकाल दो. मैं यही तो नहीं कर सकी थी.”
नूतनने तिला खडसावून विचारलं पाहिजे होतं की तुझ्या मुलाचं दुसऱ्या बाईवर प्रेम असताना तू त्याचं लग्न माझ्याशी का करून
दिलंस. पण नाही. ती पण उसूलोंवाली घराण्यातील असल्याने सासूला प्रश्न विचारत नाही. नवऱ्याला कॉलर धरून विचारण्याचा तर सवालच नाही. उलट जाऊन आपावर जाळ काढते. तिला दौलतीचं आमिष दाखवते. केवळ ती नूतन असल्याने स्वतःचं दुःख,
आपाविषयी वाटणारा तिरस्कार वगैरे समर्थपणे दाखवते. नाहीतर तिचे संवाद अतिशय क्रूड आहेत किंवा आयाबायांना डोळ्याला रुमाल लावण्यासाठी इन्स्पायर करणारे आहेत. आपाही तिला बरंच काही सुनावते पण फायनली मी हे घर सोडेन असं वचन देते. या प्रकरणातला मेजर स्टेकहोल्डर ठाकूर. पण तो कुणाच्या खिजगणतीत नाही. प्रेक्षकांची सहनशक्ती संपत आलीय म्हणून
टायटल सॉन्ग येतं.
गाणं चांगलं आहे पण आपा यात एवढं फुटेज खाते की आता हिचा अवतार नक्की समाप्त होणार अशी शंका येऊ लागते. ती शंका सुदैवाने खरी ठरते. आपा विष घेऊन आत्महत्या करते पण ठाकूरकडून संजुक्ताला स्वीकारण्याचं वचन घेऊनच. अजून १ तास ५० मिनिटं पिक्चर बाकी आहे हे पाहून मला घाम फुटला आहे.
नूतनला आता पश्चात्ताप होतो. ती रडते. ठाकूरही तिला सांगतो की तुम्हारी मांग का सिंदूर उसकी देन हैं इत्यादी इत्यादी. विरह आणि पश्चातापात होरपळणारे दोन जीव एकमेकांचा आधार शोधू पाहतात, एकमेकांचा आधार बनतात. नवं नातं मूळ धरू लागतं. संजुक्ता आपाने आणलेली तुळस आपल्या अंगणात लावते. पण आपाच्या मुलाला स्वतःकडे आणायचा तिच्या बेताला ठाकूर नकार देतो. कारण त्याला आपल्या प्रेमाला पापाचे नाव मिळालेले चालणार नसते, भलेही ते कोवळं पोर कॉन्व्हेंटमध्ये सगळ्यांपासून दूर राहिलं तरी चालेल. नूतन मात्र त्याच्यात गुंतत जाते. त्याच्या आयुष्यातील एक महत्वाची व्यक्ती बनते. यथावकाश तिलाही मुलगा होतो. काहीसा सेटबॅक बसला तरी सग्गळे लॉन्ग टर्म गोल्स पूर्ण केल्याच्या आनंदात ठकुराईन सुनेच्या हातात कारभार सोपवून फोटोत जाऊन बसते.
सगळं चांगलं चाललं तर पिक्चर पुढे कसा सरकेल म्हणून घोडेस्वारी करताना ठाकूरचा मृत्यू होतो. दरम्यानच्या काळात नूतनचा मुलगा घरी वाढत असल्याने आगाऊ तर आपाचा मुलगा सद्गुणी, हुशार इत्यादी असतो. शेवटी एकदाची २० वर्षे पूर्ण होतात आणि अजयकुमार (हँडसम विनोद खन्ना) नूतनकडे येतो. नूतनने त्याला त्यांच्या कंपनीत कामावर ठेवलेले असते. ती प्रताप म्हणजे तिच्या मुलाला (देव मुखर्जी) सांगते की अजयला इतर नोकरांसारखे वागवू नकोस. तो माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे. प्रतापचा
आगाऊपणा आता मुलींना छेडण्याइतपत वाढला आहे. नूतन अजयला फेव्हर करते हे प्रतापला खटकलं आहे.
प्रतापसाठी छेडखानी करून का होईना हिरोईन आणल्यावर अजयसाठी एका स्टड फार्मची मालकीण नैनी हिला आणली आहे. तिला इम्प्रेस कारण्यासाठी तो एका नाठाळ घोड्यावर जीन घालतो, पोलो मॅचही आणि घोड्यावर बसून होळीचे गाणेही म्हणतो. राज खोसलाने रफीसारख्या दिग्गजाला ‘ये खिड़की जो बंद रहती है’ सारखं टुकार गाणं द्यावं?
प्रताप आपल्या आईला विचारतो की तू अजयला एवढे अधिकार का दिलेस? पण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हा एकंदरीत ठाकूर खानदानाच्या आवाक्यातील विषय नसल्याने ती ही गोलगोल उत्तर देते. दिगर्शकाला इथे प्रतापला ठार काळ्या रंगात रंगवायचे असल्याने तो त्याला कोठ्यावर पाठवतो. आणि अर्थातच तो कोठा लीलाबाईचा असतो. केसाला थोडासा पांढरा रंग
फासण्यापलीकडे तिच्यात काही बदल नाही. पण प्रतापकडे फारसे पैसे नसल्याने तिथूनही तो हात हलवत परततो. तो गैरमार्गाला लागू नये म्हणून अजय लीलाबाईकडे जाऊन महिना ५००० रुपये देण्याची तयारी दर्शवतो. प्रताप लीलाबाईच्या कोठ्यावरील
चंपाकली नामक नृत्यांगनेला पळवतो आणि प्रतापला पोलिसांपासून वाचवण्यासाठी ५०००० रुपये लीलाबाईला देऊन स्वतःवर
चोरीचा आळ घेतो. नूतन अर्थातच निराश होते. पण तिला अजून दुःख होऊ नये म्हणून अजय सत्य सांगत नाही.
इकडे भांगेचा पेढा खाल्ल्याने गीता नशेत प्रतापासोबत जवळीक साधते. प्रतापही संधी सोडत नाही. गीताचा नशेतला आणि नॉर्मल वेडसर व्यवहार यात काही फरक जाणवला नाही. इथे 'छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइके' हे लता आशाचे चांगले ड्युएट तिच्यावर फुकट घालवले आहे.
प्रतापला अजयच्या खानदानीपणाबद्दल शंका आली आहे. गावातही अजयबद्दल चर्चा सुरु झाली आहे. या गोष्टींनी चिंताग्रस्त होऊन अजय त्याच्या कॉन्व्हेंटमध्ये दिलेल्या पत्त्यावर जातो. पण तिथे त्याला समजतं की त्याच्या वडिलांच्या नावाचा कुठलाही
माणूस इथे नव्हता. हिं चि नि ४ प्रमाणे आपली वैयक्तिक धुणी चव्हाट्यावर धुवायची असतात. त्यानुसार दोन्ही मुलांना एकत्र घेऊन शांतपणे अजयचा या खानदानाशी संबंध सांगण्याऐवजी नूतन ठाकूरच्या श्राद्धाच्या दिवशी जाहीर करते की वडिलांचे श्राद्ध
प्रतापऐवजी अजय करेल. कारण तो माझ्या स्वर्गीय पतीचा मोठा मुलगा आहे. एवढंच नव्हे तर माझ्यानंतर त्याच्या वडिलांच्या
संपत्तीचा अर्धा हिस्साही त्याला मिळेल. आत्तापर्यंत स्वतःला या खानदानाचा आणि कंपनीचा इकलौता वारिस समजणाऱ्या प्रतापला आपला हक्क मारल्यासारखं वाटतं आणि तो अजय हा तुलसी नामक नृत्यांगनेचा मुलगा होता हे जाहीर करतो. अजयची आई अशी
असतानाही त्याला श्राद्ध करण्याचा हक्क दिल्याने घरी जमलेला खानदानी समाज हवेलीवर बहिष्कार घालतो. कॅन्सल
कल्चरवाल्यांचे हे आद्यपुरुष असावेत.
प्रतापही निघून जात असतो. पण त्याचे कंपनीतले साथीदार त्याची समजूत घालतात. कानामागून येऊन कंपनीत वरचढ झाल्याने हे साथीदार अजयवर नाराज असतात. ते प्रतापला मार्ग सुचवतात की अजयने तुला पाठीशी घालण्यासाठी कंपनीतले तुझे
गैरव्यवहार आपल्या अंगावर घेतले आहेत. तू ते अजयच्या नावाने खपव. आम्ही साक्ष देऊ. प्रताप संधी साधून नूतनच्या मनात
अजयविषयी किल्मिष भरवतो. हिं चि नि ५ प्रमाणे एखाद्या माणसाचा एखाद्या गोष्टीशी संबंध असण्याची शक्यता असेल तर
त्याच्याशी सरळ बोलून प्रश्न सोडवायचा नाही. त्यामुळे नूतन अजयला जाब विचारण्यापेक्षा तुळशी वृदांवनापुढे "मैं हार गयी. अब तुम ही सम्भालो अपने बेटे को" वगैरे रडारड करते. पण ठाकूरसाबनंतर आपाचा या मर्त्य जगातला इंटरेस्ट संपल्यामुळे तिचा आत्माही नूतनला भाव देत नाही.
इकडे गीताच्या नशेतील पराक्रमांना फळ येऊ घातले आहे. त्यामुळे गीता घाबरली आहे. पण प्रताप तिला सांगतो मी तुझ्या
वडिलांशी बोलून सर्व ठीक करेन. तो गीताच्या वडिलांना सांगतो की अजय तुमच्यासारख्या मामुली घरात माझं लग्न होऊ देणार नाही. त्याऐवजी हा आळ तुम्ही अजयवर घाला. मग आई अजयला घालवून देईल. त्यावेळी मी आईला सांगेन की गीताची काय चूक. मी तिला स्वीकारतो. यापुढे आईही काही बोलू शकणार नाही. अडला हरी म्हणताना गीताचे वडील या तद्दन बिनडोक प्लॅनला होकार देतात. आणि नूतनच्या कानावर ही बातमी घालतात.
अजय घरी येतो तेव्हा नूतन निर्भत्सना करून त्याला हाकलवून देते. प्रताप आणि त्याचे साथीदार नूतनकडून अजयला संपत्तीतून
बेदखल करण्याचा प्रयत्न करतात. पण ते मात्र नूतन नाकारते. इकडे अजय घरातून बाहेर पडल्याची बातमी ऐकून गीताचे वडील
प्रतापकडे लग्नाविषयी बोलण्यासाठी येतात. पण प्रताप त्यांना उडवून लावतो. त्याला गीताशी लग्न करण्याची इच्छा नसते. त्यामुळे संतप्त होऊन गीताचे वडील प्रतापला पोलो मॅचदरम्यान मारण्याचा प्लॅन बनवतात. अरे पण त्यामुळे गीताचा प्रॉब्लेम कसा
सुटणार? तिकडे कुणाचं लक्षच नाही. गीता तो प्लॅन ऐकते. आणि प्रतापला वाचवण्यासाठी (का?) अजयकडे येते. अजय तिला आणि नैनीला नूतनकडे पाठवतो आणि प्रतापला वाचवण्यासाठी पोलो ग्राऊंडकडे जातो.
इकडे पोलो मॅचमध्ये प्रतापला खाली पाडून त्याच्यावर सरळ सरळ अटॅक होतो आहे, त्याचा पाय रिकिबीत अडकवून त्याला
फरफटवत नेताहेत, बॉलला मारण्याऐवजी त्याला पोलो स्टीकने मारताहेत पण पंचांना आणि प्रेक्षकांनाही एवढ्या लांबचं दिसत नसावं (मग ते नेमकं काय बघायला आलेत?) कारण मॅच थांबलेली नाही. मॅचमध्ये अजय घुसला आहे आणि तो प्रतापला
वाचवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. नूतन कडेला पोचून हा प्रकार बघते आहे. पण आता हा खेळ उरला नसून सूडाचा प्रवास झाला आहे
तेव्हा मॅच थांबवा हे सांगायचं कुणाला सुचत नाही. प्रताप अजयला सांगतो की ये लोग मुझे मार डालेंगे पण टैमप्लीज घ्यावा असं काय त्याला वाटत नाही. शेवटी अजयला एका ठिकाणी अडवून प्रतापला लगाम किंवा चाबकाच्या फासात अडकवून
लाथाबुक्क्यांनी मारायला लागल्यावर नूतन "रोको, कोई तो रोको" म्हणते. इकडे अजय आणि प्रतापचं एक होऊन ते मारेकऱ्यांना झोडायला लागल्यावर पोलिसांची जीप येते. प्रतापला फायनली अक्कल येते आणि तो अजयची माफी मागतो. दोघे भाऊ मिळून नूतनचा आशीर्वाद घेतात.
पण काही प्रश्न अनुत्तरीतच राहतात -
१. गीताचं पुढे काय झालं?
२. तुलसी महात्म्य पहिल्या ५० मिनिटात संपते. पुढे काय चाललंय त्याचा टायटल सॉन्ग, पिक्चरचं नाव याच्याशी, खरं तर मूळ कथेशी फारसा संबंधच नाहीये. मग टायटल सॉन्ग सतत का वाजवतात?
३. CID, मेरा साया, बम्बई का बाबू वगैरे चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या राज खोसलाने एवढा ढिसाळ चित्रपट का करावा? आणि काय म्हणून या चित्रपटाला फिल्म फेअर मिळालं असेल?
मलाही आपाने गोंधळात टाकले
मलाही आपाने गोंधळात टाकले काही काळ. पण हिंदी चित्रपट चाहता असल्याचा पन्नास वर्षांहुन जास्त असा घसघशीत अनुभव गाठीला असल्यामुळे या विषयावर घोडे अडलेच तरी फार काळ अडत नाही
खुसखुशीत :D.
खुसखुशीत
मला फार आठवतंच नाहीये, फार लहान होते.
धमाल लिहिलेय, आरामात वाचेन
धमाल लिहिलेय, आरामात वाचेन म्हणुन जरा वेळाने वाचले. फुलटू मज्जा
बशीत पावडर 
श्रद्धा तू काहीही बघ, पण लिहायचा काही मनावर घेऊ नकोस
संजुक्ता आपाने आणलेली तुळस आपल्या अंगणात लावते. >>> संजुक्ता कोण आणि? नुतन चे चित्रपटातलं नाव का?
फारेंडा, तुझी कॉमेंट पण जबरदस्त आहे.
विकू, बाभुळ नेहमी प्रमाणे षटकार मारायला येतात.
संजुक्ता कोण आणि? नुतन चे
संजुक्ता कोण आणि? नुतन चे चित्रपटातलं नाव का? >>>> हो
मधे नैनी व चंपाकलीचा उल्लेख आहे. पण मग "गीता" कोठून आली? >>>>
प्रताप जिला येताजाता छेडत असतो ती गीता आणि जिच्या मुलाच्या पितृत्वाचा आळ अजयवर ढकलू पाहतो ती. हिं चि च्या बिनडोक लॉजिकनुसार ही त्याची जोडीदार होऊ शकते.
चंपाकली ही लीलाबाईच्या कोठ्यावरची नृत्यांगना. प्रताप जिच्याकडे जाऊ नये म्हणून अजय लीलाबाईला पैसे देतो ती. प्रताप कित्ती कित्ती वाईट आहे हे दाखवण्यासाठी योजलेलं कॅरॅक्टर एवढीच तिची ओळख.
Pages