दीदार ए यार - दोस्तीच्या चरकातून पिळलेला प्रेमरस

Submitted by माझेमन on 24 June, 2025 - 09:48

झालं असं की रफीचं 'वो ख़ुशी मिली है मुझ को' हे सुन्दर गाणं यूट्यूबवर बघत होते. यूट्यूबला का कुणास ठाऊक वाटलं की मी ते गाणं मी तलवारकट मिशीवाल्या जितेंद्रसाठी बघतेय. होतात गैरसमज कधी कधी. पण मग त्याने मला त क मिशीवाल्या जितेंद्रच्या क्लिप्स दाखवायला सुरुवात केली. त्यात होता हा ‘दीदार ए यार’.

एक त क मिशी पुरेशी नाही म्हणून त्यात त क मिशीवाला ऋषी कपूर आहे आणि गुलाम नबी आज़ाद यांच्यासारखी टोपी घातलेले त क मिशीवाले श्रीराम लागूही आहेत. मिश्या नसलेल्या रेखा आणि टीना मुनीम आहेत. तहज़ीब, खानदान की आबरू वगैरे
असणारं लखनौ पण आहे. ऋषी आणि श्री ला असलेला पिक्चर असून असून किती वाईट असेल हा माझा भाबडा समज. असो.

तर फिरदौस जहाँ चंगेज़ी असं भारदस्त (खानदानी यू सी) नाव असलेल्या टीना मुनीमवर पिक्चरभर जावेदमियां एवढाच उल्लेख असलेल्या ऋषीचं प्रेम असतं. का असतं, ती त्याला कुठे भेटलेली असते हे सगळं दिग्दर्शकाने गुलदस्त्यात ठेवलंय. ते महत्वाचं
नाहीये. हार्पर अँड क्वीन मासिक वाचण्याइतपत हायफाय असली तरी ती चंगेज़ी खानदानाची आबरू असल्याचं गिरमिट श्री ला सतत फिरवत असतो. आता चंगेज़ खानदान इतिहासात आबरूसाठी फेमस नाहीये हे त्याला कुणी सांगावं?

तर कर्मधर्म संयोगाने त्याची देवेन वर्मा उर्फ सिकंदर चंगेज़ीशी (टीनाचा भाऊ) ओळख होते. ऋषीच्या बोटांना जखम
झालेली असते आणि त्याला प्रेमपत्र लिहायचं असतं तर मदत म्हणून दे व ते लिहून देतो. पुढे ते प्रेमपत्र घरी आल्यावर दे व ची
व्यवस्थित कानउघाडणी होते आणि त्याला समजतं की ऋषी आपल्या बहिणीचा आशिक़ आहे. या प्रसंगाचा पुढल्या कथानकाशी सुतराम संबंध नसला तरी पात्र एस्टॅब्लिश व्हायला मदत झालीय असं आपण समजून घेऊया.

आता दुसऱ्या जोडीकडे वळू. भक्क पिवळा सॅटिनचा ड्रेस घातलेली रेखा लगबगीने एका दर्ग्याकडे जात असते. तिथे ती धडपडते आणि गेस कुणावर आपटते? तो आहे नवाब अख्तर नवाज़ म्हणजे ओरिजिनल त क मिशी जितेंद्र. तो तिची माफी मागतो. तर एक उगीचच चोंबडा माणूस येऊन जितूला माहिती पुरवतो की कशाला तिची माफी मागतोस? ती हुस्ना नामक फेमस कोठेवाली आहे. (खरं तर मेरे मेहबूबमध्ये साधनाला हुस्ना म्हटल्यावर ते नाव रिटायर करून टाकलं पाहिजे बॉलिवूडमधून.) खानदानी जितेंद्र त्याला एक लगावून देतो आणि या बेहुदगीबद्दल शर्मिंदगी महसूस करतो. आता आपण एस्टॅब्लिश करून टाकूया की अख्तर नवाज़
सद्गृहस्थ आहे. आणि हुस्ना इम्प्रेस्ड आहे.

कट टू जितेंद्रच्या बहिणीचे घर. तिच्या मुलींचा वाढदिवस आहे. जितू आणि निरुपा रॉय (इटर्नल मदर) तिथे येतात तर तिथे नवरा बायकोत भांडण होत असते. जितेंद्रचा भावोजी त्याच्या बायकोवर हात उचलतो कारण त्याला कोठयावर जायला लेट होत आहे. जितेंद्र खवळतो पण उपयोग काय? भावोजी डिक्लेअर करतो की मी त्या कोठेवालीशी लग्न करणार आहे. तुला हवं तर तू तुझ्या बहिणीला घरी घेऊन जा. आता नसीम आरा पडली आदर्श भारतीय नारी. ती डिक्लेअर करते की मी डोलीमध्ये या घरात आले. आता जनाज्यामधूनच जाणार. म्हणून माणसाने लग्नाची वरात कारमधून आणावी, रेल्वेतून आणावी, बोटीतून आणावी, परवडलं तर चार्टर्ड प्लेन किंवा हेलिकॉप्टरमधून आणावी. नंतर प्रॉब्लेम होत नाही.

पण आपण विषयापासून भरकटतो आहोत. प्रश्न असा आहे की जितेंद्र या परिस्थितीत काय करेल? म्हणजे नॉर्मल बॉलीवूडी
दिवाणसाहब, रायबहादूर वगैरे असते तर ते कोरं चेकबुक घेऊन गेले असते त्या बाईकडे आणि किंमत लिहायला सांगितली असती किंवा राजासाब, जमीनदार असते तर सोन्याच्या मोहरांनी भरलेला बटवा घेऊन गेले असते. पण हे लखनौ के नवाबों की शान के खिलाफ असतं. त्यामुळं जितेंद्र त्या कोठ्यावर जातो. आणि आपण तिचा ख़रीदार असल्याचं डिक्लेअर करतो So much for tehjeeb. तिच्यापुढे प्रस्ताव ठेवतो की इथून पुढे तू माझ्यासाठीच गायचं, नाचायचं. ती ही स्वाभिमानी असल्यामुळे डिक्लेअर करते की 'हुस्ना का दिल चांदी और सोने की झंकार से नहीं भरता'. मग चरितार्थ कसा चालायचा हिचा हा प्रश्न मला उगीच पडला. आता जितेंद्र तोंडावर पडला आहे. पण 'सोय जाणतो तो सोयरा' या नात्याने जितेंद्रचा भावोजी पुढे येतो आणि स्वतःच्या पायावर धोंडा
मारून घेतो. तो सांगतो की हा माझ्या बायकोचा भाऊ. तिचा संसार वाचवायला आला आहे. हिंदी चित्रपटातील तवायफ़ रूल नं १
प्रमाणे रेखा निर्मळ मनाची असते. ती परत इम्प्रेस्ड होते आणि तद्दन क्लबसदृश गाण्यावर डान्स करते. आणि स्वतःची किंमत सांगते की जितेंद्रने नेहमी तिच्या कोठ्यावर यायचं.

पुढच्या दृश्यात काही गुंड पिस्तूल घेऊन जितेंद्रवर हल्ला करतात, गोळीही झाडतात. लखनौमधले नवाब शेरवानी, अचकन आणि जुत्ती घालून फिरत असले तरी गुंड मात्र चट्टेरी पट्टेरी टी शर्ट घालूनच फिरतात. जितू वरून पडतो आणि गायब होतो. त्याऐवजी तिथे असतो दारू प्यायल्याचे सोंग करणारा ऋषी. तो चट्टेरी पट्टेरी गुंडांशी हाणामारी करून त्यांना पळवून लावतो आणि जितेंद्रचा जीव वाचवतो. पुढच्या शॉटमध्ये आपल्याला समजतं की ते गुंड जीतूच्या भावोजीने पाठवलेले असतात. पण ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे की जितू आता ऋषीला आपला दोस्त मानतो आणि आपल्या आईलाही सांगतो की हा तुझा दुसरा मुलगा. निरुपा रॉयही एकावर एक फ्री स्कीमला तात्काळ मान्यता देते. दीदार ए यार मधली यारी आता एस्टॅब्लिश झाली आहे. जीतु न मागता ऋषीला वचनही देतो की 'अगर तुम जान भी मांगोगे, तो हम इंकार नहीं करेंगे'. चाणाक्ष वाचक आणि प्रेक्षक इथेच पिक्चरचा शेवट काय आहे हे ओळखतील.

मधल्या काळात ऋषी स्वस्थ बसलेला नसतो. नोकराचं सोंग घेऊन त्याने चंगेज़ी हवेलीत प्रवेश मिळवलेला असतो. पण तिथे फ़िरदौस त्याला ओळखते. त्याला ओळखलं आहे हे दाखवण्यासाठी तिच्या गुलाबी लेसचे पडदे लावलेल्या ख़्वाबगाहमधला
पियानो वाजवत गाणंही म्हणते. हे आणि अजून एक गाणं आणि त्यातला ऋषीचा अभिनय एवढीच या पिक्चरची सेव्हिंग ग्रेस आहे. (भुकेला कोंडा निजेला धोंडा इ. सुविचारांवर वाढलेल्या लोकांसाठी - ख़्वाबगाह म्हणजे बीएचके मधला बी. लेसचे पडदे लावले तर भारतात त्यावर धूळ बसते.) पण त्याच्या दुर्दैवाने दे व ने त्याला ओळखलेले असते. आणि त्याला पळवून लावण्याच्या नादात तो स्वतःच्या बहिणीची फोटो फ्रेम फेकून देतो आणि ऋषी ती कॅच करतो. ती फ्रेम परत मिळवायला फ़िरदौस जावेदच्या घरी येते आणि स्वतःच्या प्रेमाची कबुलीही देते. आत्ताशी कुठे प्रेमाचा लंब तयार झालाय.

आता ईदीनिमित्त कॉलेजमधे ऋषीची आणि रीना रॉयची कव्वाली आहे. घाबरू नका. पिक्चरमध्ये रीना रॉय नाहीये. ऋषी कॉलेजमधला स्टुडंट आहे का याचा थांगपत्ता दिग्दर्शकाने लागू दिलेला नाही. तिथे चंगेज़ी ख़ानदानाचा प्रमुख श्री ला आणि ऋषीची फॉर्मल ओळख होते.

पन्नास मिनीटं झालीत. आता पटकथा लेखकाला जाग आलीय की आपण प्रेमाचा त्रिकोणच तयार केला नाही. त्यामुळे घाई घाईने एक प्रसंग घुसडला आहे. टीना ज्वेलरी शॉपमध्ये आलीय आणि चुकून ती जितेंद्रला ज्वेलर समजते. जीतूही एका नजरेत तिच्यावर फिदा होतो. आपण सर्फ एक्सेल घ्यावं का एरियल हे ठरवायला जो वेळ घेतो त्याहीपेक्षा कमी वेळात ती अर्धा डझन बांगड्या आणि नेकलेससदृश काहीतरी घेते. जितेंद्र मागतो तेवढे पैसे त्याला देते आणि रिसीट न घेता निघून जाते. कुणीही कुणालाही दागिने
दाखवतात, तोंडाला येईल ती किंमत सांगतात, पैसे घेतात आणि ज्वेलरला चिंता काय तर जितेंद्रने तिच्याकडून २२०० रुपये जास्त
घेतले. मग जीतू तिला पैसे परत करायला जातो तेवढ्या वेळात ती निघूनही जाते.

कट टू रेखाचा कोठा. जीतूच्या बहिणीचा नवरा तिथे लोचटासारखा परत आलाय. पण ती नाचगाणे करायला नकार देते. तो तिला विचारतो की जीतू कुठे आलाय तर ती गोल गोल उत्तर देते की त्याला माझ्या डोळ्यांनी बघ. बहुतेक अमूर्त प्रेम म्हणतात ते हेच असावं. इथे एक स्वप्नदृश्यातलं गाणं आहे ज्यात रेखा ओडिसी नृत्याचा वेष आणि भरतनाट्यमची केशभूषा, अप्सरा ड्रेस, पटोला साडी नऊवारी पद्धतीने नेसून आणि जितू शेरवानी आणि साधूचा वेष घालून युनिटी इन डायव्हर्सिटीचा आटोकाट प्रयत्न करतात.

आपण एखाद्या मैत्रिणीला ‘काही नाही गं, चल तू’ म्हणत तिची ओळख नसलेल्या तिसऱ्याच मैत्रिणीकडे घेऊन जावं तसं जीतू ऋषीला कोठ्यावर घेऊन येतो. ऋषी प्रचंड अन्कम्फर्टेबल असल्याचा उत्तम अभिनय करतो. मग जीतू रेखाला आपली कहाणी
सांगायला लावतो. ती पण जीतू किती महान आहे वगैरे पाल्हाळ लावते. शिवाय आपलं त्याच्यावर किती प्रेम आहे हेही सांगते.
शेवटी ऋषीच जीतूला विचारतो की तू हुस्नाशी निकाह करणार का? तवायफ रूल नं. २ प्रमाणे जर तुम्ही पाकीज़ा नसाल तर तुमचं लग्न होत नाही. तुम्हाला फक्त हिरोला वाचवताना स्वतः मरण्याइतपत किंवा हिरोच्या खानदानकी इज्ज़त वाचवण्यासाठी
आत्महत्या करण्याइतपतच फुटेज दिलं जातं. त्यामुळे रेखा 'मैं तो ख़्वाब में भी निकाह सोच नहीं सकती' इत्यादी डायलॉग मारून प्रेमाच्या त्रिकोणाचा चौकोन होऊ देत नाही. तरीही जीतू आपलं म्हणणं पुढे रेटतोच की ‘कभी न कभी में किसी नव्वाबों के खानदान की लड़की से शादी करुंगा और फिर इस कोठे पे कभी नहीं आऊंगा.’ याला खुंट हलवून बळकट करणे म्हणावं का? काहीही असो Jeetu is the most tone deaf person in that conversation.

इकडे जीतूच्या खुनाची सुपारी दिलेले गुंड आता त्याच्या भावोजीला ब्लॅकमेल करताहेत. त्यांनी घरी येऊन जीतूची बहीण व
भाच्यांना बंदी बनवले आहे. हे बघून शेवटी त्याला अक्कल येते. तो बायको मुलांना सोडवण्याचा प्रयत्न करतो. गुंड वरचढ ठरत असतात. तेवढ्यात जीतू येतो आणि दोघे गुंडांना चोप देतात. लखनौचे पोलीसही येतात आणि 'पहले आप' वगैरे न करता गुंडांना पकडून नेतात.

आपल्या मुलीचा नवरा अखेर सुधारला या आनंदात निरुपा रॉय दोन्ही मुलांना घेऊन कुठल्याश्या फेमस दर्ग्याच्या उरुसात मन्नत पुरी करायला येते. तिथे मेलाही असतोच. दोन्ही टोणगे जत्रेत वेगवेगळे फिरत असतात. तो दर्गा आणि मेला यांचा सेट इतका टुकार आहे की आमच्या राजिवड्यावर याच्यापेक्षा मोठा दर्गा असेल. तर हा मेला बघायला आपल्या इराणवरून आलेल्या भाच्यांना घेऊन कोण आलं असेल? चंगेज़ी खानदानचे अध्वर्यु. एखाद्याने ताज महाल, फतेहपूर सीक्री वगैरे दाखवलं असतं. असो. हा पिक्चर
बहुतेक इराणमध्ये रिलीज केला नसेल वितरकांनी. नाहीतर त्या सो कॉल्ड इराणी भाच्यांना पाहून इराणचे व आपले राजनैतिक
संबंध बिघडले असते. मेळ्यामध्ये त्यांना ऋषी भेटतो. टिनाच्या आईचे पाय दुखायला लागल्यामुळे आपल्या भाच्यांकडे लक्ष द्यायची
जबाबदारी ऋषीवर सोपवून श्री ला तिला घेऊन आपल्या डेऱ्यावर जातात. ऋषी टीनाला आता गुफ़्तगू करायची उत्तम संधी
मिळालेली असते. ती ते सत्कारणी लावतात. ऋषी तिला मागणी घालतो त्यावेळी ती वडिलांशी बोलण्याचे सांगते. जेव्हा जेव्हा गुफ़्तगू करून टीना परतते तेव्हा तेव्हा जीतूशी तिची काही ना काही कारणाने भेट होते. जीतू थाळीफेकची प्रॅक्टिस केल्याच्या
थाटात दिलफेकगिरी करत असतो. तिला मागणीही घालतो पण टीना अर्थातच दाद लागू देत नाही. ती स्वतःचे नावही सांगत नाही. इकडे दोघेही आपापल्या प्रेयसीविषयी चर्चा करतात. जीतू कशाच्या आधारावर टीनाला प्रेयसी म्हणतो देव जाणे. वितरकांच्या आग्रहाखातर माझीच मेहबूब कशी सुंदर अशा अर्थाच्या गाण्याची जिलबी पाडून झाली आहे. या सिच्यूएशनवरची सुंदर सुंदर गाणी आठवली की हाही प्रसंग फुकट घालवला आहे हे जाणवून वैषम्य वाटतं.

ऋषी तिची जीतूशी भेट घडवून आणतो. पण पुढे अर्थातच ट्विस्ट आणायचा असल्याने तेव्हाच काय आहे ते क्लिअर न करता ती नक़ाब ओढून ‘गंगाधरही शक्तिमान है’ हे लपवून ठेवते. त्यामुळे आपल्याला अजून १ तास १० मिनिटे चित्रपट झेलावा लागतो.
जीतूही माठ असल्याने त्याला साधारण ठेवण, आवाज सारखे असल्याची जाणीव होत नाही.

जत्रेवरून परत आलेला जीतू मी तिच्याशी लग्न करणार असं आईकडे डिक्लेअर करतो. फिल्मी आई असल्यामुळे ती तातडीने
तयारही होते. पण मुलगी कोण, तिच्या वालिदैनचं नाव काय, ती कुठल्या मोहोल्ल्यात राहते वगैरे प्रश्नांना त्याच्याकडे एकच उत्तर - no, nada, zilch त्यामुळे निरुपा रॉयचाही निरुपाय होतो.

तेवढ्या वेळात चंगेज़ी सिनिअर घरात नसल्याचा आणि इराणी कझिन्स इराणला परतलेल्या आहेत याचा फायदा घेत ऋषी आणि टीना 'सरकती जाए हैं रुख से नक़ाब' हे सुदींग गाणं गाऊन घेतात. चंगेज़ी सिनिअर परततात आणि ‘त’ वरून ताकभात
ओळखतात. अर्थात ते लखनौचे नवाब असल्याने राडा करत नाहीत. लेकीला चहा बनवायला पाठवतात.

इकडे कशात काही नसताना जीतू हुस्नाकडे जाऊन माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्न करणार आहे असं
सांगतो. हुस्नाही त्यागमूर्ती डायलॉग मारून भरपूर फुटेज खाते. शिवाय तुझ्या लग्नात मला नाचायचं आहे अशी इच्छा जाहीर करते. पण अजून मुख्य गोंधळ घालून सोडवायचा बाकी असल्याने दिग्दर्शक तिला 'आज हम अपनी दुआओं का असर देखेंगे' टाइप
फुटेज देत नाही.

आतापर्यंत हुक्का ओढणे, खानदान की आबरूचा जप करणे, भाच्यांना जत्रा दाखवणे असली नवाबी aka निरर्थक कामं करत वेळ काढणारे चंगेज़ी सिनिअर आता गोष्टी आपल्या हातात घेतात. सर्वात प्रथम ते ऋषीच्या घरी जातात आणि नवाबी थाटात सांगतात की ते जरी ऋषीला मानत असले तरी फ़िरदौसशी लग्न करण्याचं स्वप्न त्याने सोडून द्यावं. "आप के खानदान के चाँद में जरासा ग्रहण लगा है." ऋषी वैतागून सांगतो की "कोई ग्रहण नहीं लगा हुआ हमारे खानदान के चाँद में. मेरे दादा मरहूम ने मोहोब्बत जरूर की थी और उस मोहोब्बत में अपने खानदान की मुर्दा रिवायतों को कुर्बान जरूर किया था." दोघांनीही शाळेत सायन्सचा अभ्यास नीट केला नसल्याची लक्षणं आहेत. ऋषीला सांगता आलं असतं की "बाबा रे, ग्रहण तासा दोन तासात सुटतं. तीन पिढ्या ग्रहण चाललं असतं तर परत पृथ्वीवर हिमयुग नसतं का आलं?" पण नाही. चंगेज़ी सिनिअरला वूड बी जावयाच्या रगों में दौड़नेवाला खून ख़ालिस चाहिए.

याबाबतीत फ़िरदौसचं मत विचारण्यासाठी ऋषी मध्यरात्री तिच्या घरात येतो. पण चंगेज़ी सिनिअरच्या अंगात व्हिलन संचारला आहे त्यामुळे तो खानदान की रवायतों के सामने बेटी को कुर्बान करनेकी धमकी देतो. नाईलाजाने ऋषी माघार घेतो आणि लखनौ सोडून जाण्याचा निर्णय घेतो. हे जीतूला समजतं.

आता तुम्ही आम्ही जीतूच्या जागी असतो तर काय केलं असतं? ऋषीला आधार, पॅन, प्रत्येकी दोन फोटो आणि दोन हार घेऊन
बांद्र्याला रजिस्ट्रारकडे जाऊया सांगितलं असतं. आळंदीत एखाद्या हॉलमध्ये जवळची तारीख मिळते का बघितलं असतं. पण जीतू पण 'नवाबों के घराने से' आहे. त्याला एवढे साधे सोपे उपाय मंजूर नाहीत. तो न बघताच सरळ फ़िरदौसला मागणी घालतो. तो भलेही कोठ्यावर जात असेल पण त्याच्या खानदानात काहीच खोट नसल्याने चंगेज़ी सिनिअर या लग्नाला मान्यता देतो. मग जितू आपली आयडिया ऋषीला सांगतो की मी आता तिच्याशी लग्न करतो, तिला तलाक देतो. मग स्वतःच्या खानदानाची इज्जत
वाचवण्यासाठी चंगेज़ी सिनिअर तिचा हात तुझ्या हातात देईल. कशावरून? मुलीने प्रेम केलं तर तिला मारू इच्छिणारा बाप तलाक झाल्यावर कसली वाट बघणार आहे? पण ऋषी प्रेमात वेडा झाला असला तरी जीतूपेक्षा त्याचा iq चांगला आहे. तो म्हणतो की फ़िरदौस तुझ्याबरोबर लग्नाला कधीच होकार देणार नाही. जीतू त्यावरही उपाय काढतो की तू तिला हे सांगितलंस तर ती नक्की तयार होईल.

इकडे फ़िरदौसच्या आईने तिला जीतूचा फोटो दिला आहे तुझा होणार नवरा म्हणून. पण तिला बघायची इच्छाही नाही, साहजिक आहे म्हणा. ऋषी एक चिठ्ठी लिहून तिला आपला प्लॅन कळवतो. फ़िरदौस खुश होते आणि आनंदाच्या भरात तो फोटो फाडून
टाकते. चांगला A4 साईझचा फोटो. १०० ते १५० रुपये घेतात हो एका प्रिण्टला आणि ही फाडून टाकते. निदान आपल्या
प्रेमप्रकरणात मदत करणारा कोण हा मित्र हे तरी बघायचं ना!

यथावकाश लग्न होतं. नवरा बायकोला एकमेकांचा चेहरा आरश्यात दाखवतात. जीतूकडून अपेक्षाच नव्हती पण निदान टीनाने तरी ओळखायला हवं होतं. तिलाही समजत नाही. सुहागरातीला जीतू आपल्या भाभीचा घुंगट (चेहरा बघायच्या सदिच्छेने बरं) उचलतो आणि सदम्यात जातो. टीनाही 'ये तूने अच्छा नहीं किया जावेद' म्हणते. अरे? ऋषी तुमची ओळख करून देत होता तेव्हा तू नक़ाब घेतलास, आईने भावी वराचा फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला तो फाडून टाकलास आणि राग ऋषीवर? त्याने फक्त हा तोच जत्रेत भेटलेला मित्र आहे हे सांगितलं नाही. कारणच नाही ना. त्याला काय माहित जीतू तुझ्यावरच लाईन मारत होता.

कट टू रेखाचा कोठा. जश्न ए निकाह में नाचायचं आमंत्रण नाही मिळालं म्हणून काय झालं? ‘जब तक हैं जां, जानेजहाँ मैं नाचूंगी’ असा विचार करत ती भरपूर जणांना जमवून एका टुकार गाण्यावर नाचून घेते. आणि नाचता नाचता 'पहुंचेंगे पास तेरे, हम जान से गुजर के' म्हणत पोटात चाकू खुपसून घेते. चाणाक्ष लोकांनी हिंट नं २ ओळखलेली असेलच. ती चिवट आहे बरं. मुखड्यात दीदार ए यार येत नाही तोवर प्राण सोडत नाही. पण कोठ्यावरच्या लोकांना किती तो मनःस्ताप? ते हुस्नाचा नाच बघायला आले होते, आता पंचनामा करावा लागतोय - सदर व्यक्ती मयत व्यक्तीपासून ४ फूट ३ इंच अंतरावर ईशान्येकडे तोंड करून बसली होती. देत बसा म्हणावं पोलिसांना उत्तरं.

सकाळ होते. ऋषी जीतूच्या घरी जातो. जीतू विस्कटलेला आहे. पण आता टोन डेफ होण्याची पाळी ऋषीची आहे. तो दीदार ए यार करण्यासाठी उत्सुक आहे. भाभी जान असणे वगैरे क्रिन्ज डायलॉग मारतो आहे. शेवटी जीतू त्याला फ़िरदौसला भेटायला ख़्वाबगाहमध्ये घेऊन जातो. तिथेही जीतूची बहीण असतेच. त्यामुळे आपण नाटक करताना काय राडे घालून ठेवलेत वगैरे संवाद होऊ शकत नाही प्रेमी जीवांचा. ऋषी खाली येतो. जीतू त्याला सांगतो की काल लग्न झाले आणि आज तलाक झाला तर
लखनौमध्ये हंगामा होईल आणि तुझ्या उतावीळपणामुळे घरातल्यांनाही शंका येईल तर तू इथे येऊ नकोस. ऋषी चमकतो पण
मान्य करतो. तो तिथून निघणार तेवढ्यात चंगेज़ी सीनिअर हजर. पण जीतूच्या घरी असल्याने सर्वच तहज़ीब सांभाळून एकमेकांशी
बोलतात. टीना मात्र एकांतात आईवडिलांसमोर आपले दुःख बोलून दाखवते. आता काय उपयोग बाई?
त्याच वेळी काही स्टॅन्ड घेतला असतास तर?

काही काळाने ऋषी परत जीतूकडे येतो. पण जीतूची नियत फिरली आहे. तो आता फ़िरदौसला सोडू इच्छित नाही. त्या बदल्यात तो ऋषीला काहीही द्यायला तयार आहे. ऋषी त्याला यथायोग्य शिव्या घालतो आणि जीतू संतापून त्याला एक ठेवून देतो. हे पाहून फ़िरदौस ऋषीला वाचवायला येते तर जीतू तिलाही ढकलून देतो. आता ऋषी फ़िरदौसला सांभाळतो आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की अख़्तर नवाज़ हाच तुझा वर्तमान आहे. पण सुदैवाने फ़िरदौस फिल्मी आदर्श भारतीय नारी नाही. तिला तिच्या
स्वप्नांची राखरांगोळी करण्याची इच्छा नाही. त्यामुळे ती हे मान्य करत नाही. ऋषी नाईलाजाने तिथून निघून जातो.

पुढच्या शॉटमध्ये जीतू हातात दारूची बाटली घेऊन बोबडं बोलत ऋषीच्या घरी येतो. याच्यावरून त्याने ग़ममध्ये दारू प्यायली आहे व ती त्याला चढली आहे असे आपण समजायचे असते. पण तो सांगतो की त्याने आनंद व्यक्त करण्यासाठी दारू प्यायली आहे. आणि आता तो हुस्नच्या बाजारात काहीतरी खरेदी करायला चालला आहे. हातात नवीन, ऋषीने न फोडलेली दारूची बाटली आहेच. तो हुस्नाच्या कोठ्याजवळ येतो. तिथले काही पंटर त्याला हुस्नाने अपनी जान दे दी वगैरे मोलाची माहिती पुरवतात. पण दारूच्या नशेत 'अगर हुस्ना हम पे जान छिड़कती है, तो हम भी उस पे जान दे देंगे' वगैरे डायलॉग मारत तो कोठ्याकडे जातो. मला या माणसाचं काही कळतंच नाही. तुला हवी ती मुलगी चुकून का होईना बायको झालीय, तुझ्या प्रेमातल्या प्रतिस्पर्ध्याने नशिबापुढे हार मानलीय. बायको भलेही तुला स्वीकारत नसेल पण तिकडे प्रयत्न करशील का नाही? चालला हुस्नाकडे. आणि हुस्नावर तुझं प्रेमच नव्हतं मग आत्ता कुठून निर्माण झालं? ऋषी मात्र सच्चा मित्र आहे. तो जीतूचा पाठलाग करत कोठ्यावर येतो. त्यालाही हुस्नाच्या आत्महत्येची खबर मिळते. शिवाय प्रेक्षकांना आत्महत्या हे पाप असल्याने आत्म्याला शांती मिळत नाही वगैरे मौलिक ज्ञान मिळतं.

पण तिथे तर जोहराबाईसारखे पांढरे कपडे घालून हुस्ना सतार वाजवते आहे. ती त्याला सांगते की 'हुस्नाने नाच गाना तो क्या
दुनिया छोड़ दी.' स्वतःविषयी तृतीय पुरुष एकवचनात का बोलतात हे लोक? पण हा माठ म्हणे की मी तुझी दुनिया परत वसवेन. (हिंट नं ३ बरं का) तेवढ्यात ऋषी वर येतो आणि त्याला सांगतो 'तुझ्या बायकोकडे परत चल.' जीतू सांगतो की 'मी माझ्या
बायकोच्या चाहत्याबरोबर येणार नाही.' आता मॅटर हाताबाहेर चाललं आहे म्हणताना ऋषी जीतूला एक लगावून देतो आणि खांद्यावर उचलून घरी घेऊन येतो. घरातले नोकर चाकर उगीचच इकडे तिकडे पळतात. अरे ऋषीला मदत करा ना. आणि तिकडे हुस्ना हवेत विरून जाते. त्यामुळे आत्म्याला मुक्ती न मिळाल्याची थिअरी पुराव्याने शाबीत होते. ऋषी परत टीनाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण ती साफ उडवून लावते. Way to go, girl.

सकाळ होते. जीतू शुद्धीत येऊन हुस्नाच्या कबरीवर जातो. ऋषी ऑलरेडी तिथे असतो. पण दोघेही एकमेकांशी काही
बोलत नाहीत. निरुपा रॉय परत आलेली आहे आणि चंगेज़ी सिनिअर जीतूच्या घरी आलेले आहेत. त्यांना पाहून निरुपा रॉय
बुचकळ्यात पडते की हे सक्काळ सक्काळी कशाला इथे हजर? तर तिला समजतं की जीतुनेच त्यांना बोलावलंय. टीनाही खाली येते. तेवढ्यात काझी साहेब आणि दोन गवाह पण हाज़िर झालेले आहेत. फारसा वेळ न घालवता जीतू टीनाला तलाक देऊन
टाकतो. चंगेज़ी सिनिअर त्याला जबाब विचारात नाहीत पण निरुपा रॉय मात्र त्याला चांगलीच सुनावते. टीनाला परत घेऊन
चाललेल्या चंगेज़ी सिनिअरपुढे माझा मुलगा मला मेला आणि टीना माझ्या मुलीसारखीच इथे राहील हे डिक्लेअर करून टाकते. चंगेज़ी सिनिअर नाईलाजाने टीनाला तिथेच ठेवून निघून जातात. टीनाही अश्रू ढाळते. बहुतेक एकाच वेळी जीतू आणि चंगेज़ी
सिनिअरपासून सुटका झाल्याचे आनंदाश्रू असावेत.

But lack of communication can lead to serious consequences. या भानगडींचा ऋषीला पत्ता नसतो आणि त्याचा सल्ला टीनाने नाकारल्यामुळे मित्राच्या खुशीसाठी तो आत्महत्या करायचं ठरवतो. आता पटकन विष घेतलं आणि आत्महत्या केली असं दाखवायचा प्रघात हिंदी चित्रपटात नसल्याने रीळं संपायच्या आत जमेल तेव्हढं फुटेज खाऊन घ्यावं म्हणून त्याचा आपुलाची संवाद आपणासी चाललेला असतो. पण कधी नाही ते जीतू डोक्याचा वापर करतो आणि ऋषीला ही खबर द्यायला येतो. ऋषीच्या हातातला विषाचा ग्लास तो उडवून लावतो व त्याला घरी घेऊन येतो. तिथे फ़िरदौसही हातात चाकू घेऊन फिरत असते.

एवढ्यावर पिक्चर संपला असता तरी हरकत नव्हती. निरुपा रॉय थोड्या दिवसांनी शांत झाली असती. पण जीतूला जाणवतं की मी निर्माता असून कॅरॅक्टरची माती केली आणि ऋषीने सगळं फुटेज घेतलं. आता माझं काय? माझी इमेज कशी साल्वेज होणार? त्यामुळे फक्त बायकोचा त्याग पुरेसा नाही. असं काहीतरी केलं पाहिजे की आपल्यालाही भाव मिळेल. अरे संगम मध्ये मिळालेला का राजेंद्र कुमारला भाव? नाही ना? तरी पण 'दोस्ती की ये बाज़ी मैं ही जीतूंगा' वगैरे गमजा मारत तो पिस्तूल काढतो आणि 'खुदा हाफिज़' म्हणतो. On that cue, ऋषी पिस्तूल उडवून लावतो. मग पिस्तूल मिळवण्यासाठी हाणामारी होते.

इथून पुढे काय होईल हे समजण्यासाठी वाचकांना मी हिंदी चित्रपटातले काही नियम आठवून देते.

हिं चि नि १ : कोणत्याही २ व्यक्तींचे लग्न/गांधर्व विवाह झाला असेल/लग्नासदृश काही गोष्टी घडली असेल जसं की मांग में सिन्दूर/कपाळावर रक्त लागणे/गळ्यात माळ पडणे आणि प्रेमाचा त्रिकोण असेल तर तिसऱ्या कोनाचा निभाव लागत नाही. त्याने
आपापल्या वकुबानुसार लंडन/हिमालय ते थेट जगन्नियंत्याकडे जाणे अपेक्षित असते. तिसरा कोन जर स्त्री असेल तर तिने
सर्वसंगपरित्याग करून एखादा आश्रम/आधुनिक काळात एखादा बिझनेस चालवणे किंवा जगन्नियंत्याकडे जाणे हे दोनच ऑप्शन.

या नियमाची एक करोलरी आहे की यासाठी त्या जोडप्यातल्या विवाहित स्त्रीने 'सपनों का दर्पण देखा था, सपनों का दर्पण तोड़ दिया' किंवा 'विवाह की पवित्र अग्नी में मैंने अपने बीते हुए कल को राख कर दिया है अमुक तमुक' असं ओपन डिक्लरेशन करणे गरजेचे आहे. विवाहित पुरुष कल, आज, परसों, नरसों एकत्र घेऊन फिरला तर कुणाची हरकत नसते. जर विवाहित स्त्रीने असं
जाहीर केलेलं नसेल तर तिसऱ्या कोनाचं पारडं तेवढंच जड असतं.

हिं चि नि २ : प्रेम त्रिकोणात unrquited प्रेम करणाऱ्यासाठी सक्षम पर्याय उपलब्ध असेल, जर तो पर्याय खानदान की इज्जत
मिटटी में मिलानेवाला नसेल आणि शेवटपर्यंत जिवंत असेल तर त्रिकोणाएवजी २ समांतर रेषा तयार होतात. अक्षम पर्याय, सोशली
अनऍक्सेप्टबल पर्याय असल्यास एकच रेष उरते.

हिं चि नि ३ : ‘माँ का हाथ’ हा सर्वात महत्वाचा आणि ओव्हररायडींग नियम आहे. ज्याच्यासोबत त्याच्या सख्ख्या/सावत्र
/मानलेल्या/छोटी/बड़ी अश्या कुठल्याही आईचा आशीर्वाद आहे उसे दुनिया की कोई ताकद नहीं हरा सकती. लेकिन
जिसने अपनी माँ को रुसवा किया, उसे भगवान भी नहीं बक्शते.

तर आता हे नियम वापरून चित्रपटाचा निकाल सांगणाऱ्यास चित्रपटाची यूट्यूब लिंक फ्री.. फ्री.. फ्री..

तात्पर्य : रफीची गाणी आवडत असतील तर सारेगम कारवाँ यूट्यूब चॅनेलवर जाऊन ऐका. यूट्यूबला गैरसमज होत नाहीत.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मिश्या नसलेल्या रेखा आणि टीना मुनीम आहेत.
<<<<<< Lol
वाचायला सुरुवात केलीय. खास या वाक्यासाठी हसायला आले. होलसेलमध्ये तलवारकट मिशा आणून बनवला असेल हा सिनेमा.

चार तास असतात एडिटायला म्हणून सेम मेसेज एडिट...

ख़्वाबगाह म्हणजे बीएचके मधला बी<<<<< Proud
पण 'जोधा अकबर'मुळे ख़्वाबगाह चे PSPO होणे टळले आहे.
ये जो पब्लिक है,
ये ख़्वाबगाह जानती है...
असो. कन्टीन्यू!

धमाल लिहीलंय. Lol
पंचेस मस्त जमलेत.
येऊ द्या अजून असेच पिसंकाढू लिखाण Happy

धमाल लिहिलेय… चित्रपट फर्स्ट डे फस्ट शो झोपला असे तेव्हा छापुन आले होते पण त्याचा हा वरिल रिव्यु मात्र ज्युबिलीस्टार होणार हे नक्की. Happy

अगं काय!! Lol
सोय जाणतो तो सोयरा...यावर तर फुटलेच!!
खूप छान लिहिले आहे.
तो जितेंद्र चा भावोजी कोण झालाय??

मिश्या नसलेल्या रेखा आणि टीना मुनीम आहेत
चंगेज़ खानदान इतिहासात आबरूसाठी फेमस नाहीये हे त्याला कुणी सांगावं
मग चरितार्थ कसा चालायचा हिचा
सोय जाणतो तो सोयरा
ख़्वाबगाह म्हणजे बीएचके मधला बी
युनिटी इन डायव्हर्सिटी
थाळीफेकची प्रॅक्टिस
गंगाधरही शक्तिमान है
>>>
Rofl

अफलातून लिहिलं आहेस. तुफान हसलेय वाचून. सगळे पंचेस जबरदस्त.
लवकर लिही पुढे Happy

जि वरच्या एका लेखात शि क नी या चित्रपटाचा उल्लेख केला होता. दिग्दर्शक जि ला म्हणाला जरा तरी अभिनय कर. जि म्हणे अ करायला आपण ऋ क ला घेतलंय ना!

जितेंद्रला फक्त नाच गाणी येते अभिनय नाही असे टोमणे मारले जात, त्याला उत्तर म्हणून त्याने हा सिनेमा बनवला. आपटल्यावर खोटी मिशी फेकून दिली व पुन्हा श्रीदेवी रीना रॉय जयप्रदा वगैरेंबरोबर सिनेमे करू लागला.

Rofl कहर लिहिले आहेस. मला फक्त एक गाणं आठवतं, सगळे जीव द्यायच्या काय मागे लागले आहेत. Lol त क मिशी वरचा सगळाच परिच्छेद, खरंतर सगळा लेखच धमाल आहे. Happy

आपटल्यावर खोटी मिशी फेकून दिली व पुन्हा श्रीदेवी रीना रॉय जयप्रदा वगैरेंबरोबर सिनेमे करू लागला. >>>> Lol
जि वरच्या एका लेखात शि क नी या चित्रपटाचा उल्लेख केला होता. दिग्दर्शक जि ला म्हणाला जरा तरी अभिनय कर. जि म्हणे अ करायला आपण ऋ क ला घेतलंय ना!>>>> Lol

जि म्हणे अ करायला आपण ऋ क ला घेतलंय ना!
आपटल्यावर खोटी मिशी फेकून दिली व पुन्हा श्रीदेवी रीना रॉय जयप्रदा वगैरेंबरोबर सिनेमे करू लागला.
>>>> Lol Lol

पृथ्वीवर हिमयुग >>> Lol

तलाकची परस्पर ठरवलेली आयडीया फारच भारी आहे. निदान जिच्याशी लग्न करतोय तिला सांग की बाबा! आणि मुलगा कोण हे न बघता लग्न करणारी फिरदौस अजूनच भारी Proud

सदर व्यक्ती मयत व्यक्तीपासून ४ फूट ३ इंच अंतरावर ईशान्येकडे तोंड करून बसली होती >>> Rofl याला फुटलेच.

बाकी नंतर जीतूची मती फिरेल असं वाटलंच होतं.

जोहराबाईसारखे पांढरे कपडे घालून हुस्ना सतार वाजवते आहे >>> म्हणजे तिचं भूत दाखवलेलं आहे का? हा अँगल पण आहे पिक्चरात??

एकाच वेळी जीतू आणि चंगेज़ी सिनिअरपासून सुटका झाल्याचे आनंदाश्रू असावेत. >>> Lol

हिं चि नि फारच अफलातून आहेत. पण पिक्चराचा शेवट काय असेल ते ओळखण्यासाठी त्यांची गरज नाही. 'अगर तुम जान भी मांगोगे, तो हम इंकार नहीं करेंगे' या सुरूवातीच्या वाक्यातच पूर्ण सार सामावलेले आहे Lol माझा कयास आहे की जीतू मरत असेल Proud

जबरदस्त झाला आहे रिव्ह्यू, माझेमन. अशीच रत्नं आणत रहा Lol

न राहवुन मी यु ट्युबवर चित्रपट पळवत व शेवट पुर्ण पाहिला.

जितेन्द्रने टाईम ट्रवेल करुन इथे येऊन हिं चि नि नं १ वाचल्यावर त्याला शेवटाचे जास्तीचे शेपुट सुचले असणार. (माझेमन, अभिनंदन). खरेतर तलाक देऊन झाल्यावर चित्रपट तिथेच संपला असे जाहिर करुन सगळ्या कलाकारांनी पडद्यावर येऊन प्रेक्षकांची क्षमा मागुन त्यांना घरी जायला सांगायला हवे होते. ( संगीत नाटकांमध्ये कसे शेवटी सगळेजण पडद्यामागुन बाहेर येऊन अभिवादन करत तसे.)

फक्त एकटा ऋषी कपुर काहितरी अ‍ॅक्टिंगची धडपड करतो. चित्रपट कोसळणार हे बाकी सगळ्यांनी आधीच ओळखल्यामुळे ते मख्खासारखे वावरतात. ऋ क त्यामुळे प्रचंड विसंगत वाटतो आणि त्याच्या मेहनतीवर हजार लिटर पाण्याची टाकी उपडी होते.

टीमु ने तिची पुर्ण कारकिर्द चेहरा मख्ख ठेऊन गाजवली. (बातो बातो मे एक जरासा अपवाद). इथे तर जितेंद्रने ते बघुनच तिला घेतल्याने केसांची एक मोठी बट चेहर्‍यावर ठेऊन फिरण्याखेरिज दुसरे काही तिला करावे लागले नाही.

बाकी नि रॉ, श्री. ला, वगैरे मंडळी पैशांसाठी काय काय करावे लागते बघा हा भाव चेहर्‍यावर घेऊन वावरतात. श्री ला समोर आले की नि रॉ तिची डोक्यावरची झिरझिरीत ओढणी उजव्या कानावरुन दोन इंच पुढे खेचुन त्याच्यासमोर पडदा करते पण बोलताना त्याच्याकडे पुर्ण चेहरा फिरवुन बोलते. टि मुला पहिल्यांदा बघते तेव्हा टी मु नेमकी श्री ला च्या मागेच. त्यामुळे
त्या दोन इण्ची पडद्याला काहीही अर्थ राहात नाही, उगीच धरुन धरुन बिचारीचा हात मात्र अवघडतो. चित्रपट कोसळणार हे दिग्दर्शकालाही माहित असल्याने तोही जाऊदे, मरुदे म्हणुन सोडुन देतो.

श्रीराम लागु मराठी रंगभुमीवर जबरदस्त व्यक्तिमत्व वाटत राहिले. तेच हिंदी चित्रपटात कायम पिचलेला दरिद्री माणुस वाटत राहिले. या चित्रपटात दारिद्राने पिचलेल्या गरीब लागुंना कोण्या नव्वाबाने दया देऊन हवेलीत आणावे व नव्वाबाचे कपडे करुन त्याचे संवाद म्हणत हवेलीत व नातलगांमध्ये फिरायच्या नोकरीवर ठेवावे तसे वाटतात.

देवेन वर्माला त्याचा नेहमीचा जॉन्रर सोडुन सिरियस काम देऊन पार अवघडवुन टाकलेय. प्रेक्षकांना हे माहित नसल्याने तो पडद्यावर आला की हा कधी कॉमेडी करणार याची वाट पाहत ते थकुन जातात. आधीच सगळ्यांचा न-अभिनय बघुन ते थकलेले असतात त्यात ही अजुन एक भर. रिलिफ म्हणुन जो नेहमी येतो तो भरवशाचा बैल इथेच टोणगी निघावा म्हणजे काय ते नशिब.

जितेंद्राने चित्रपट काढला खरा पण पैसे खर्च करताना हात आखडता घेतला. स्वतःचे कपडे जरा बरे शिवले. बाकीच्यांसाठी मगनभाई ड्रेसवाल्याचे वापरुन जुने झालेले आणले. सेट्स पण असेच कुठुन उधारीवर आणलेले. त्यामुळे चित्रपट अगदी कळकट वाटतो. नव्वाब व जितेंद्र दोघेही आता आतुन भिकारी झालेत, त्यामुळे दोघांच्याही घरांना सतेज रंग नाही, फर्निचर जुनाट व आवश्यक तिथे थर्माकोलचे, घरांमधले दिवे ५ वॅटपेक्षा जास्त क्षमतेचे लावायची ऐपत नाही वगैरे उपकथानक जोडुन हा कळकटपणा झाकता आला असता पण काही चांगले सुचवुन घ्यायचेच नाही असे एकदा ठरवल्यावर पुढे काय बोलणार…

ह्या चित्रपटाने एकही आठवडा पाहिला नाही याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही पण जितेंद्रचे आश्चर्य वाटते. आयुष्यात इतके सुपरहिट चित्रपट देऊनही त्याला कुठली कथा हिट होते हे कळले नाही किंवा ही कथा फ्लॉप होणार हे कळले नाही. या चित्रपटाने त्याला भिकेला लावले आणि साउथमध्ये जाऊन श्रीदेवी जयाप्रदासोबत ताथैय्या तथैय्या करुन त्याला पोट भरावे लागले.

तो पुढचा अध्याय त्याच्या नशिबी लिहिलेला नसता तर तो परत वर येऊ शकला नसता. (भल्या भल्या लोकांनी असेच टुकार चित्रपट काढुन पुर्‍या आयुष्याच्या कमाईची माती केलीय हा इंडस्ट्रीचा इतिहास आहे). त्याच्या लेकीला बालाजी टेलिफिल्म
कंपनी काढता आली नसती. तिच्या कंपनीने प्रसुत केलेल्या हजारो टुकार मालिका बघायचे दुर्भाग्य प्रेक्षकांच्या माथी लिहिले गेले नसते. तुश्श्शार कपुरसारखा न-नट प्रेक्षकांवर थोपवला गेला नसता. पण हाय रे दैवा… जितेंद्रचा फिनिक्स झाला.

खरेच आहे . एखादा अभिनेता (वा नेत्री) यशस्वी झाली की मग त्याच्या भोवती खुशमस्करे लोक जमतात व त्याला निर्माता व्हायला भाग पाडतात. भिकेचे डोहाळे. त्यामानाने जितेंद्र भाग्यवानच म्हणायचा, त्याचा फिनिक्स झाला, पण आपल्या नशीबी झी टेलेफिल्म्स व तुशार आले. असो.

टीना मुनिम व प्रिया राजवंश यांच्या जास्त मख्ख कोण हे सांगणे अवघड आहे.

जितेंद्र व ऋषी च्या मिशा इतक्या बारीक आहेत की बजेट कमी असल्याने बुटाची लेस कापून चिकटवली असावी.

निर्विवादपणे टीनाच जास्त मख्ख.

प्रि रा समोरुन कॅमेर्‍याकडे पाहते. संवाद म्हणतेय हे दाखवण्यासाठी जरासे ओठ हलवते तेव्हा हसल्याचा चुकार भास कधीकधी होतो.

टीना वाकडी उभी राहुन कॅमेर्‍यात प्रॉफाइल दिसेल असे पाहते (तरी मनोजकुमारपेक्षा कमीच) आणि चेहर्‍यावरचा हास्य मसल जरा जरी हलला तरी रिटेक म्हणुन ओरडुन परत तो सिन शुट करायला लावते.

जितेंद्र ला पिक्चर आधीच आपटणार आहे हे माहीती असतं तर दिग्दर्शन पण त्यानेच केलं असतं. .
ऋषी कपूर ऐवजी नवीन निश्चल किंवा मराठीतला ऋ. क. रविराज (न. भा. फेम) स्वस्त पडला असता.
तेवढीच बचत!

बुटाची लेस Lol

साधना फुटलेच तुमचा मिनी रिव्ह्यू वाचून. Rofl
ते नि रॉ चा पर्दा है प्रकरण भारीच आहे. आणि टुकार कपडेपटाबद्दल अगदी सहमत. पुरुषांनी शेरवानी घातल्यामुळे आणि त्यात रंगांची फारशी चॉईस नसल्याने जरा तरी ठीक आहे. पण बायकांचे कपडे अगागागा…
मुस्लिम सोशल्समधे जनरली कपडे फार छान सोबर असतात उदा. मेरे मेहबुब. इथे टीनाचे जास्त वाईट करावेत का रेखाचे अशी नुस्ती स्पर्धा आहे. वर आकाशी, नारिंगी असल्या रंगाच्या खड्यांची बटबटीत ज्वेलरी.
सरकती जाए है गाण्यात तर टीना शुटींग संपलं की त्याच कपड्यात दोन शिवसेना, भाजप, स्वदेशी जागरण मंच, विहिंप आणि बजरंग दलाच्या संयुक्त सभेला जाणार आहे की काय असं वाटतं.
ऋषी टीनाच्या सीन्समध्ये मी २-३ दा डोळे चोळले, चष्मा साफ केला की ऋषी क्लिअर आणि टीना धुसर धुसर का दिसतेय. नंतर लक्षात आलं की टीनावर सॉफ्ट फोकस ठेवला आहे तरी टीनामें वो बात नहीं. ती कुठल्याही ॲंगलने अप्रतिम सुंदरी वाटत नाही. काही माणसं सुंदर नसली तरी एक चैतन्य असतं चेहऱ्यावर, त्याने आकर्षून घेतात. खंडाळ्याचा घाट वीस टन वजन घेऊन चढणारे ट्रक हिच्या चेहऱ्यापेक्षा जास्त मोबाईल असतील.
ऋषी आणि राही मासूम रझा यांचे उर्दू संवाद काय काय तारून नेणार?

ते हुस्नाचा नाच बघायला आले होते, आता पंचनामा करावा लागतोय - सदर व्यक्ती मयत व्यक्तीपासून ४ फूट ३ इंच अंतरावर ईशान्येकडे तोंड करून बसली होती. देत बसा म्हणावं पोलिसांना उत्तरं. >>>आश़क्य हसलिये.,मस्त लिहिलय!!

प्रेमाचा लंब, पंचनामा, यू ट्यूबचे रेको व त्याचे कारण, ऋषी व श्रीराम लागू असलेला पिक्चर असून असून किती वाईट असणार हा फोल ठरलेला समज, चंगेज खानदान आबरू साठी फेमस नसणे, टीनाचे आनंदाश्रू - हे वाचून टोटल फुटलो Lol

तरी वरवर वाचला आहे. अजून एकदा नीट वाचतो.

लिहीण्याची स्टाइल फार आवडली.

लेख अगदी मस्त जमलाय हे वे सां नको.
आणखी काही निरिक्षणे : घरातले फर्निचर अगदी जुनाट आहे.
एकेकाळी श्रीमंत असलेल्या पण आता वाईट दिवस आलेल्या एका नबाबी घराण्यात मुलींकडून अगदी निवडक श्रीमंत गिर्‍हाईकांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जास्त असतो, त्यातल्या एका मुलीला बँकेत चागली नोकरी मिळते, पण घरातले कडाडून विरोध करतात कारण नबाब घराण्यातील मुलगी नोकरी करते म्हणजे खान्दान की आबरू वगैरे .. मग ती वैतागून विचारते की तुम्ही आमच्याकडून चक्क वेश्या व्यवसाय करून घेता तेव्हा कुठे जाते आब्रू? तर ते म्हणतात की ते रात्री कुणी पहात नसताना होत असते, तू भर दिवसा बेंकेत कामाला गेली तर सर्वांनाच कळेल. ही करूण कथा कुठेतरी वाचली / पाहिली आहे व आवडली होती. या कथेवर सिनेमा केलाच तर हा सेट वापरता येइल.

इतर सिनेमातले सोन्याचे दागिने खोटेच असतात पण ते निदान खरे वाटावेत असा प्रयत्न असतो, इथे तोही नाही. ब्रेख्तियन थिएटर ते हेच.

बाकी ऋषी कपूर् चा अभिनय व नृत्य पैसा वसूल. कव्वाली पहाताना समोर टीना मुनिम पाहून 'वाळवी' मधला तो डॉयलॉग आठवला 'हिच्यासाठी याने बायकोला मारलं' तसे 'हिच्यासाठी हा कव्वाली म्हणतोय'

एका गाण्यात काही मुली चक्क सारंगी घेऊन नाचत आहेत. सारंगी हे काही नाचत वाजवायचे वाद्य नव्हे, पण एवीतीवी फ्लॉपच होणार आहे मग कशाला चिंता करा असा विचार असावा, ऋषी कपूर ला सरोद घेऊन नाचनाना दाखवले नाही हेही नसे थोडके.

Lol

तेव्हा या सिनेमाची खूप हाइप होती. मी पाहिलेला नाही. आपटला होता हे सुद्धा विसरायला झालं होतं.

टीना मुनीम कायम अल्गोरिदमिक अभिनय करायची. दिग्दर्शक सांगतो - "समोर, बघ, डावीकडे बघ, ओढणी मागे घे, खाली बघ," की ती त्या स्टेप्स करते. डोळ्यांत भाव आण हे दिग्दर्शक सांगत नाही, ती आणत नाही.
कुणालाच, कधीच त्यात काहीच वावगं वाटलं नाही हे प्रेक्षकांचं दुर्दैव!
त्यानंतर असा अल्गो.अभि. होता दिव्या भारतीचा. Uhoh

एका गाण्यात काही मुली चक्क सारंगी घेऊन नाचत आहेत.
ऋषी कपूर ला सरोद घेऊन नाचनाना दाखवले नाही हेही नसे थोडके.
अल्गोरिदमिक अभिनय
>>> Lol Lol

माझेमन - एकदम भन्नाट लिहीले आहे. आता हा चित्रपट तुमचे हे परिक्षण बाजूला ठेऊन पहावे लागणार. फार पुर्वी चॅनल सर्फ करताना हा चित्रपट कुठल्या तरी चॅनलवर चालू होता ते दिसले होते. २-३ मिनिटातच चॅनल बदलले होते.

चित्रपटात मुसलमानी वातावरण असेल तर सगळे अभिनयाचा अतिरेक करतात असे वाटते. त्यातल्यात्यात मुळात मुस्लिम नसलेले अभिनेते तर अगदी जन्मल्यापासून याच वातावरणात राहीलो आहे असा आविर्भाव दाखवतात ते डोक्यात जाते. इथे कुठल्या धर्मावर टिका करायची नसून अभिनय व दिग्दर्शन यांच्यावर टिका करत आहे. एका मराठी चित्रपटात (सावरखेड एक गाव) तर जे मुस्लिम पात्र आहे ते हिंदी बोलताना दाखवले आहे. अरे मुळात मराठी खेडेगावात रहाणारे सगळे मग सगळेच मराठी बोलतील ना? माझे महाराष्ट्रातले मुस्लिम मित्र माझ्याशी शुद्ध मराठीतच बोलतात. ते उगाच उर्दूचा मारा करत नाही. तसेच आंध्र, कर्नाटकातले मुस्लिम कलिग त्यांच्या इतर कलिग बरोबर त्यांच्या त्यांच्या भाषेतच बोलतात. पण मराठी किंवा हिंदी चित्रपटात हे वातावरण असेल तर उर्दू वगैरेचा फार मारा असतो. मुस्लिम लोक नॉर्मल नसतील पण चित्रपटात जास्तच कट्टर दाखवतात. त्यामुळे मुस्लिम वातावरण असलेले चित्रपट शक्यतो टाळतो.

निर्विवादपणे टीनाच जास्त मख्ख.
म्हणूनच तिला आलोकनाथ हिरो असलेल्या चित्रपटात काम करायची वेळ आली होती. (चित्रपटाचे नाव कामाग्नी)