रंग पानांचा उतरला

Submitted by द्वैत on 23 June, 2025 - 11:42

रंग पानांचा उतरला
खोल पाण्याच्या तळाशी
गंधगर्भातून माती
दरवळे ओल्या नभाशी

सळसळे रानांत पिवळे
ऊन वाऱ्याच्या गतीने
झाड घाली शीळ कोणा
पाखरांच्या सोबतीने

आर्तता दाही दिशांची
दाटता डोळ्यांत हिरव्या
पावसाचे गीत येते
दाबल्या ओठांत हळव्या

कोसळे पाऊस आता
चिंब झाले रान सारे
बांधुनी पायांत पैंजण
निर्झरी देते पुकारे

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर....