
गाववेशीच्या पल्याड असलेल्या दऱ्यात फिकट दुधाळ चांदणं सांडलं होतं. आकाशात काळ्या राखाडी ढगांच्या दाटीवाटीतून डोकावणारी रेखीव चंद्रकोर कुण्या देखण्या सुहासिनीच्या नथजडीत नाकासारखी सुबक दिसत होती. लहरी पाऊस दऱ्यातून नुकताच नाचून गेल्यानं वाऱ्यात बोचरा गारवा पसरला होता. मध्यरात्रीच्या कुशीत काळोखात डोकी मुडपून गुमान निजलेली झाडं आपल्या बेतानं सावकाश निथळत होती. फांद्यांच्या पानांमध्ये साचलेले पावसाचे थेंब भुईवर निखळून पडलेल्या पानांवर एका सुरात पडून टप टप आवाज करत होते. जणू फांदीवरची पानं पावसाच्या उन्मादात निखळून पडलेल्या आपल्या स्वकियांच्या पार्थिवावर खिन्नपणे अश्रू ढाळत असावीत.
“हूं…sss”
कुठुनशा अचानक उठलेल्या त्या स्फोटक हुंकारानं जणू सुस्त पडलेल्या दऱ्याच्या डोळ्यावरची झापडं खाड्कन दूर केली. इतक्या वेळेपासून घुमं असलेलं रान अंगावर सर्रकन काटा उठवा तसं चलबिचल झालं. नीरव शांततेची छाती फोडून उठलेल्या त्या कठोर हुंकारात एक जरब होती, एक त्वेष होता, हुकूमत होती, चिथावणी होती. दऱ्याच्या डाव्या अंगाला लागून असलेल्या काठोबाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या अरुंद मुखाच्या भुयारातून तो कठोर हुंकार उठला होता. भुयाराच्या तोंडाशी मधोमध चेतवलेल्या वन्हीने ते भुयार काहीसं उजळून निघालेलं. तिच्या सभोवार तिच्याचपासून काही अंतर राखून अर्धोन्मिलित डोळ्यांनी बसलेले सात आठ किडकिडीत देहयष्टीचे जटाधारी ओंगळ मांत्रिक आणि त्यांच्या समोर बसलेला त्यांचा तसाच ओंगळ म्होरक्या ताटवरल्या डोळ्यांनी कसलंसं अनुष्ठान करत होते. त्यांचं मंत्र पुटपुटणं सुरूच होतं. मंत्र पुटपुटताना ते मधातच आपल्या शरीरांना बसल्या जागी आचके देत होते आणि हुंकार करत होते. भुयारातल्या त्या वन्हीच्या आजूबाजूला चित्रविचित्र वस्तू मांडल्या होत्या. रक्तात बुडवून ठेवलेला काळपट राखाडी केसांचा पुंजका, टाचण्या टोचून रचनाबद्ध मांडलेल्या विचित्र बाहुल्या, शीर नसलेलं आणि हळदीकुंकवाने माखलेल मेंढ्याचं धूड, पितळी पानावर सुबकपणे कोरलेलं कसलंसं आखीव रेखीव यंत्र, त्या यंत्राच्या मधोमध ठेवलेलं मेंढ्याचं शीर, रक्ताने भरून ठेवलेला दगडी वाडगा,त्यात भिजत ठेवलेली लाल चंदनाची कसलीशी मूर्ती, कुठल्यातरी प्राण्याची कवटी, बोकडाची खुरं, हस्तिदंत या आणि अशाच कित्येक अभद्र विचित्र गोष्टी…
भुयारात गंभीर स्वरातले शब्द गुंजू लागले,
नमः करालवदनाय प्रेताधिपाय च धूमवर्णाय ।
गूढगम्भीरघोषिणे मौनविलीनवाचस्पतये नमः ॥
अघोरवक्त्राय, कालगर्जितनादाय,
विरूपनेत्राय, श्मशानवासिने नमः।
गर्भे तमसो जातमकम्पं यत् भयम् —
तदहं त्वाम् समर्पयामि, आगच्छ! जाग्रहि॥
कळकट अंगाच्या त्या म्होरक्याने पुन्हा जोरदार आचका दिला आणि मघासारखाच एक हुकमी हुंकार त्याच्या उरातून ओठांवाटे बाहेर पडला.
“हूं…sss”
बाकीच्या मांत्रिकांनी सुद्धा तसाच आचका एकाच वेळी देऊन हुंकार फोडला त्यांचा तो हुंकार सबंध भुयारात घुमला. त्यांचे अर्धोन्मिलित डोळे एकदम वटारले त्या हुंकारासोबत भुयाराच्या मध्यातला तो वन्ही क्षणभर उफाळला आणि पुन्हा पूर्ववत संथ झाला. म्होरक्याने आपले घाणेरडे दात करकचत कसलासा मंत्र पुटपुटत त्या वन्हीमध्ये ती वाडग्यातली बाहुली टाकली आणि वाडग्यातल्या रक्तात पुन्हा दुसरी लाल बाहुली भिजत ठेवली. सगळे मांत्रिक पुन्हा अर्धोन्मिलित डोळे करून पूर्ववत मंत्र पुटपुटायला लागले.
नमः करालवदनाय प्रेताधिपाय च धूमवर्णाय ।
गूढगम्भीरघोषिणे मौनविलीनवाचस्पतये नमः ॥
अघोरवक्त्राय, कालगर्जितनादाय,
विरूपनेत्राय, श्मशानवासिने नमः।
गर्भे तमसो जातमकम्पं यत् भयम् —
तदहं त्वाम् समर्पयामि, आगच्छ! जाग्रहि॥
या दुसऱ्या आवर्तनानंतर त्या पितळी यंत्राच्या मध्यावर ठेवलेलं मेंढ्याचं शीर कंपायमान व्हायला लागलं. ते पाहून म्होरक्याच्या चेहऱ्यावर क्षणभर स्मित उमटलं, पण क्षणभरच, त्यानं लगेच चेहऱ्यावर कठोर भाव आणत दोन्ही मुठी आकाशाकडे वळवून करकचून आवळून धरून तिसऱ्या आवर्तनाला सुरुवात केली त्याचे मघाचे अर्धोन्मिलित नेत्र आता रक्ताळल्यागत लाल झाले होते, आवाज गडगडाटी बनला होता. बाकीचे मांत्रिकही पहिल्यापेक्षा मोठ्याने आणि स्पष्ट शब्दात त्याच्यासोबत तिसरं आवर्तन पठण करू लागले. तिसरं आवर्तन संपन्न होताच म्होरक्याने शरीराला एक मोठा हिसडा देऊन जोरात हुंकार भरला.
“हुंsssss…”
त्याच्या हुंकारासोबत यंत्रावरचं शीर फट् आवाज करून फुटलं आणि त्यातून काळं रक्त सावकाश वाहू लागलं.
म्होरक्यानं लागलीच वाडग्यातलं सगळं रक्त त्या शिरावर ओतलं आणि मंत्रध्वनी केला
रुधिरं समर्प्ये भयबीजवले —
प्रकटस्व तू, क्रूरतेजशले।
वडवामुखे स्पन्दमानं हविः —
प्रेतराज आगच्छ, अधिष्ठेहि तव स्थविः॥
म्होरक्याने दोन्ही हात पसरून पुन्हा मंत्र पठण सुरू केलं.
प्रकटस्व भूतगणैः सह तेजसा —
समायान्तु डाकिन्यः, यक्षिण्यः घनस्वना।
याची दोन आवर्तनं झाल्यानंतर वातावरणात हळूहळू तणाव वाढायला लागला. कुबट कुजक्या वासाने भुयार भरून गेलं. कसलीतरी अस्पष्टशी कुजबूज भुयारात घुमू लागली, अस्पष्ट, धूसर, वेड्यावाकड्या, आकारहीन आकृत्या भुयाराच्या अरुंद दारापाशी घुटमळू लागल्या, आपल्या अगम्य भाषेत काहीतरी कुजबुजू लागल्या, भुयाराच्या भिंतींवर झेपाऊ लागल्या, जस जसा मंत्र जप पुढे सरकू लागला तस तसं भुयार त्या गलबल्यासारख्या कुजबुजीने आणि नासक्या सडक्या वासाने गलबलून जाऊ लागलं. मांत्रिक आता घाम्याघूम झाले होते. त्यांचा श्वास गुदमरायला लागला. पण सक्त ताकीद होती -
'अनुष्ठान थांबता कामा नये’.
कारण जर तसं झालं तर नरकयातनांचा अखंड सहवास अनंत काळापर्यंत त्या सर्वांना भोगावा लागणार होता. प्रत्येक मांत्रिक जीवाच्या आकांताने मंत्र घोष करू लागला.
अघोरवक्त्राय, कालगर्जितनादाय,
विरूपनेत्राय, श्मशानवासिने नमः।
नमः करालवदनाय प्रेताधिपाय च धूमवर्णाय ।
गूढगम्भीरघोषिणे मौनविलीनवाचस्पतये नमः ॥
आताशी काहीच आवर्तनं शिल्लक राहिली होती पण सगळ्या मांत्रिकाचे प्राण मात्र पुरते गळ्याशी आले होते. त्यांची सहनशक्ती एका अनामिक छळासमोर आता गुडघे टेकायला लागली, कुणी डोळे वटारून गदागदा मान फिरवत होतं, कुणी छताकडे बघत मोठमोठ्याने श्वास घेत मंत्र जपत होतं, तर कुणी अश्रू असह्य होऊन दात ओठ खात मंत्रघोष करत होतं. मांत्रिकाच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली, उघड्या शरीरावर गडद काळपट लाल वळ उठू लागले. कुणीतरी चाबकाने पाठ फोडून काढल्याप्रमाणे त्यांच्या पाठी सोलटू लागल्या. सगळे जण वेदनांनी व्याकुळ व्हायला लागले, पण आक्रोश करायला उसंत कुणालाच नव्हती. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता.
सारे मांत्रिक डोळ्यात रक्त आणून ते अनुष्ठान करत होते, पण थांबत कुणीच नव्हतं.
भुयारतलं वातावरण अक्षरशः घुसळायला लागलं, कुठल्यातरी वेगळ्याच मितीत ते भुयार पहोचलं. चारी दिशा कोलमडायला लागल्या, चित्रविचित्र आवाज किंकाळ्या उठायला लागल्या, चित्रविचित्र दृश्ये त्यात कुणी विष खाऊन मरतयं, कुणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जोरात किंचाळ्या फोडतंय, कुणी रस्त्यावरच्या अपघातात छिन्नविच्छिन्न मांसाचा लगदा होऊन पडतंय, कुणी विहिरीत पडून “वाचवा… वाचवा! मेलो हो मेलो! धावा!!” म्हणून ओरडतंय, कुणी भेसूर रडतंय, कुणी उगीच हसतंय सारंच अगम्य, अनाकलनीय, भीषण, अमानवी, सारं काही मती कुंठित करणारं.
शेवटची दोन आवर्तनं राहिली असताना तो गलबला, तो आवाज आणि तो दुर्गंधही हळूहळू कमी व्हायला लागला. घामाने ओथंबलेले मांत्रिक आताशा मोकळे श्वास घेऊ लागले. घामाने भिजलेल्या त्यांच्या छाती भात्याप्रमाणे हलू लागल्या. एकदाचं शेवटचं आवर्तन पूर्ण झालं आणि सगळे मांत्रिक धपाधप भुईवर कोसळले .सगळा गलबला शांत झाला.
आता भुयारात केवळ मांत्रिकाच्या कन्हण्याचा आवाज घुमू लागला. म्होरक्याही आता सावध झाला. पूर्ण शक्ती लाऊन तो कसाबसा उठला. त्याचं वर आलेलं कुबड वन्हीच्या प्रकाशात दिसायला लागलं. जवळची काठी सावरत तो उभा राहिला आणि वन्हीवर वडग्यातलं उरलं सुरलं रक्त टाकून त्याला विझवलं. भुयार पुन्हा अंधारात बुडून गेलं. म्होरक्यानं कंदील पेटवला आणि अजूनही धूमसणाऱ्या वन्हीतलं गरम भस्म मुठीत घेऊन ते जमिनीवर लोळणाऱ्या प्रत्येक मांत्रिकाच्या चेहऱ्याला फासलं. तेवढंसं काम करतानाही त्याची पुरती दमछाक झाली.
शेवटी उरलेलं भस्म त्यानं भुयारात फुंकलं आणि संपूर्ण भुयारभर समाधानाची नजर टाकून आजचं अनुष्ठान पूर्ण झाल्याच्या जाणीवेने तो सुखावला. हातातली काठी सावकाश सोडून मग त्यानेही भुई धपकन जवळ केली.
निद्रेच्या नीरव गर्भात शांत पहुडलेल्या बाहेरच्या जगाला मात्र त्या काठोबाच्या पायथ्याला चाललेल्या या अमानवी कर्माचा काहीच थांगपत्ता नव्हता. त्यांच्यासाठी ती रात्र इतर अनेक सामान्य रात्रींसारखीच एक सामान्य रात्र होती. मात्र जगाला अजिबात काही सोयरसुतक नसताना मध्यरात्रीच्या गडद अंधारानं काळवंडलेल्या त्या निबीड वनात काहीतरी चाललं होतं.
कसलीतरी खटपट, कसलीतरी लगबग, कसलीशी कुजबुज, कसलीशी प्रतीक्षा…
काहीतरी घडत होतं, काहीतरी शिजत होतं, काहीतरी दळभद्री आकारास येत होतं, काहीतरी किळसवाणं बाळसं धरत होतं.
काहीतरी वेगळंच, काहीतरी अघोरी, काहीतरी अभद्र…
पण…
पण नक्की काय..?
कशाची नांदी होत होती? कशाची मंत्रणा चालली होती? कुठल्या भयाण कथाकांडाचं उपोद्घत लिहिलं जात होतं त्या गावकुसाबाहेरच्या रानात? काय होऊ घातलं जात होतं त्या मंद वन्हीच्या धगीत? अंधकाराच्या डोहात सुस्त पडलेलं त्या विरान अरण्यात त्या राती कुठलं आक्रित प्रसवत होतं?
या आणि अशा कित्येक अनुत्तरीत प्रश्नांना कनवठीला बांधून ती काळरात्र सावकाश पुढे सरकत होती काळाच्या प्रवाहात स्वतःला झोकून देऊन ती आपल्या चालीनं संथपणे मार्ग क्रमत होती.
क्रमशः
क्रमशः आहे ना? छान सुरुवात!
क्रमशः आहे ना?
छान सुरुवात!
आबा +१
आबा +१
आबा +2
आबा +2
होय
होय.
छान आहे सुरुवात.
छान आहे सुरुवात.