भयानुभुतीचा एक विलक्षण खेळ.. जारण..!
तर आज ' जारण' चित्रपट पाहण्याचा योग जुळून आला. भयकथा हा विषय आवडीचा असल्याने चित्रपट पाहायचा हे ट्रेलर पाहून आधीच ठरवलं होतं.
नवऱ्याला परवा सहज म्हटलं की, एक मराठी चित्रपट पाहायचा आहे .. जायचं का.. तर नेहमीप्रमाणे चित्रपट पाहायचा कंटाळा करणारा नवरा कुठलेही आढेवेढे न घेता पटकन् तयार झाला.. आणि माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. चित्रपट पाहायला तात्काळ होकार कसा काय मिळाला ह्या गुढाचा शोध मी घेतल्याशिवाय राहणार नाही.. हे मात्र नक्की...!
तर करणी, जारण, वशीकरण अश्या बऱ्याच नावाने ( कु) प्रसिद्ध असलेली काळी जादू हा मानवी आकलना पलीकडचा विषय आहे. काळी जादू खरोखर अस्तित्वात आहे का की ज्याच्या मनात तिचं भय ठाण मांडून आहे त्याच्या मनाचे खेळ आहेत हे सगळे .. त्याचा शोध घेणं खरंच कठीण असतं .. आयुष्यात काही अप्रिय घटना घडल्या आणि त्या मागचं कारण शोधताना जर ते एखाद्या अज्ञात शक्तीत दडलेलं आहे .. असं जर एखाद्या व्यक्तीच्या मनात घट्ट रुतलं तर त्या व्यक्तीचा रोजच्या जगण्यातला आणि मनात दडलेल्या भयानुभूतीचा संघर्ष तर वाढतोच पण त्यासोबत त्या व्यक्तीच्या प्रियजनांच्या मनातला गोंधळही वाढत जातो.. भयचक्रात अडकलेल्या आपल्या माणसाला त्यातून कसं बाहेर काढता येईल यासाठी ते वेगवेगळ्या उपाययोजना करतात. विश्वास असो किंवा नसो कधी कधी ते अंधश्रद्धेचा ही आसरा घेतात.. मनातलं भय दूर व्हावं , आपल्या माणसानं पुन्हा माणसात परतावं हा त्यामागचा हेतू असतो.
तर अश्याच वेगळ्या भयानुभूतीचा विलक्षण खेळाचा अनुभव घ्यायचा असेल तर हृषिकेश गुप्ते लिखित - दिग्दर्शित चित्रपट ' जारण' पाहायला हवा..!
दिग्दर्शक स्वतःच लेखक असल्याने कथा आणि त्यातली पात्रे मस्त रंगवली आहेत. कथा लिहिताना जशी लेखकाच्या मनात आणि डोळ्यासमोर रंगत गेली असावी तशीच ती रंगीत पडद्यावर देखील साकार झाली आहे हे चित्रपट पाहताना प्रत्येक प्रसंगात जाणवते.
अभिनेत्री अमृता सुभाष हि ह्या चित्रपटातलं हुकूमाचं पान आहे. राधा ह्या भूमिकेसाठी तिची निवड अगदी योग्य आहे .. तिने भूमिकेत पूर्णपणे जीव ओतलायं.. मनातला ताण, भीती चेहऱ्यावर दाखवताना डोळ्यांचे हावभाव, गळ्याच्या नसा खेचल्या जाण्याच्या हालचाली तिने उत्कृष्ट पद्धतीने साकार केल्यात. चित्रपटाचा नायक आणि नायिका ती एकटीच आहे. पूर्ण चित्रपट तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर पेललायं. तेच अनिता दातेच्या भूमिकेबाबत. गंगुटीच्या भूमिकेसाठी तिची निवड योग्य असल्याचं तिने तिच्या अभिनयातून दाखवून दिलंय. गंगुटीच्या भूमिकेला अजून वाव द्यायला हवा होता असं चित्रपट पाहताना राहून - राहून जाणवते. चित्रपटात तिच्या तोंडी असणाऱ्या अहिराणी भाषेचा लहेजा तिने उत्तम पकडलायं.
राधा हि एक सर्वसामान्य स्त्री.. नोकरी करणारी. साधी सरळ.. वर्तमानात जगताना मध्येच अचानक विचित्र वागते.. त्यामागे तिच्या भूतकाळातली एखादी घटना दडलेली आहे .. हे हळूहळू आपल्याला कळतं जातं.. लेखक- दिग्दर्शक आपल्या पुढ्यात राधेचं आयुष्य आणि तिच्या आयुष्यातल्या घटना हळूहळू उलगडत जातो. राधेच्या कथेत आपण इतके गुंतत जातो की, मध्यंतर केव्हा होतो तेच लक्षात येत नाही.. मध्यंतरानंतर चित्रपट वेगवान झालायं. आता पुढे काय घडेल ह्याची उत्सुकता वाढत जाते. .. आणि चित्रपटाचा शेवट हा आपल्या कल्पने पलीकडचा होतो.. निदान आपण चित्रपट पाहताना जसा अंदाज बांधलेला असतो .. तो अंदाज ह्या चित्रपटाचा शेवट चुकीचा ठरवतो..
चित्रपट भूत-प्रेत, आत्मा, जारण, करणी ह्याची गोष्ट आहे की राधेच्या मनातला हा निव्वळ कल्पनाविलास आहे.. हे ठरवायचं असेल तर ' जारण' हा भयपट नक्की पाहायला हवा. भयानुभूतीचा विलक्षण रंगत जाणारा खेळ म्हणजे हा वेगळ्या धाटणीचा मराठी चित्रपट 'जारण' .. जेव्हा जमेल तेव्हा नक्की पहा.. चित्रपट पाहताना एका वेगळ्या धाटणीच्या भयाची अनुभुती प्रेक्षकांना नक्कीच येईल...
असे चित्रपट मराठीत अजून बनायला हवेत. म्हणजे मराठी चित्रपटांना प्रेक्षक नाहीत अशी ओरड काही प्रमाणात कमी तरी होईल.
( टिप - मला चित्रपटाचं परीक्षण फार उत्तमरित्या मांडता येत नाही.. चित्रपट आवडीने पाहायचा असं मनापासून ठरवलं. चित्रपट , त्यातले अनुभवी कलाकार , त्यांचा सहजसुंदर अभिनय , चित्रपटाचे चित्रीकरण सारं काही आवडलं. चित्रपट पाहायला बऱ्यापैकी प्रेक्षक चित्रपट गृहात होते.. हि एक आनंदाची बाब वाटली. त्यामुळे हा शब्दप्रपंच इथे मांडला..)
धन्यवाद...!
रुपाली विशे - पाटील
.
आम्ही पण मागच्या रविवारीच
आम्ही पण मागच्या रविवारीच पाहिला खूप आवडला. खान्देशी असल्यामुळे जरा जास्तच आपला वाटला.
भयपट आवडत असल्यामुळे हा
भयपट आवडत असल्यामुळे हा चित्रपट नक्की पाहणार.
पण हे खालील गूढ अजून उकलले कि नाही याची उत्कंठा वाढली आहे.
नवऱ्याला परवा सहज म्हटलं की, एक मराठी चित्रपट पाहायचा आहे .. जायचं का.. तर नेहमीप्रमाणे चित्रपट पाहायचा कंटाळा करणारा नवरा कुठलेही आढेवेढे न घेता पटकन् तयार झाला.. आणि माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. चित्रपट पाहायला तात्काळ होकार कसा काय मिळाला ह्या गुढाचा शोध मी घेतल्याशिवाय राहणार नाही.. हे मात्र नक्की...!
सोनाली , हो चित्रपट चांगला
सोनाली , हो चित्रपट चांगला बनवला आहे.
अज्ञान बालक - हा.. हा.. !
गूढ उकलायची माझी खूप इच्छा होती पण जाऊ द्या आता .. नाहीतर 'अति तेथे माती ' व्हायची .. नवरा वैतागेल .. तुझ्यासोबत आलं तरी त्रास नाही आलं तरी त्रास .. पुढच्या वेळी तुच जा एकटी सिनेमाला.. असं म्हणायचा.
भयपट आवडत असल्यामुळे हा चित्रपट नक्की पाहणार>> नक्की बघा..!
छान! रिव्ह्यु वाचुन पाहिन.
छान! रिव्ह्यु वाचुन पाहिन.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
मी सुद्धा पाहिला आहे हा चित्रपट.
वातावरणनिर्मिती पहिल्या सीन पासून भारी आहे.
पण इंटरवल उलटून गेल्यावर असे जाणवू लागले की स्टोरी बराच काळ पुढे सरकली नाहीये. ठोस कथा आहे की नाही समजेनासे झाले होते.
पण शेवटच्या अर्ध्या तासात चित्रपट डोक्यावर फिरवला आहे. पेशंस राखून बघितल्याचे सार्थक झाले.
निलिमा, ऋन्मेष धन्यवाद..!
निलिमा, ऋन्मेष धन्यवाद..!
पण शेवटच्या अर्ध्या तासात चित्रपट डोक्यावर फिरवला आहे>> हो बरोबर.... शेवटचा अर्धा तास अगदी अनपेक्षित असाच आहे.
तर सगळ्यात आवडलेली गोष्ट
तर सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे शेवटची 20 एक मिनिट.
त्यात तो पिक्चर असा काही घुमवलाय की मजा आली बघायला.
सिनेमा भयपट, घाबरणारा वगैरे वगैरे म्हणून मी वाट बघत होते परंतु तसं काही इंटरवल किंवा त्यानंतरही मिळत नव्हतं. एका पॉईंटला असं वाटलं बंद करूया पण शेवटपर्यंत बघितला. शेवट बघितल्यावर पिक्चरमधील आधीच्या गोष्टींच्या बऱ्याच संगती लागत जातात. जस शेवटी कळतं की, पहिल्यापासून तिचं आणि तिच्या मुलीचं, विशेष करून मुलीचं वागणं का खटकत होतं, मुलीच्या चेहऱ्यावरती काही हावभाव नाही, त्यानंतर घरातल्या लोकांना तिच्याविषयी काही प्रेम नाही वगैरे वगैरे.
ओव्हर ऑल कास्टिंग तसं चांगला आहे. सगळ्यांच कामही मला आवडलं इंक्लूडिंग ती छोटी मुलगी. अमृता सुभाष मध्यंतरी बरीच आवडीनाशी झालेली पण या चित्रपटात त्यांनी दिलेलं काम चांगलं केलंय. तिच्या डोळ्यांच्या/ पापण्यांच्या काही हालचाली, स्वर, एकंदरच हावभाव यातूनच तिला काहीतरी मानसिक आजार असल्याचं जाणवत राहतं.
लिखाणही आवडलं, मुख्यतः शेवटामुळे. .
खटकलेल्या गोष्टी
लेखकाने किंवा दिग्दर्शनाने दिग्दर्शकाने सायंटिफिक किंवा मानसशास्त्रीय दृष्टिकोन जरी मांडला आहे तरी त्यावरच पूर्णपणे भर न देता एक बाजूला छोटीशी अंधश्रद्धेची किनार जोडली आहे, आपण किडा सोडला म्हणतो तसं - तिची कौन्सेलर असते ती शेवटी म्हणते की अजूनही एक प्रश्न राहतोच की त्या बाहुलीला कचऱ्याच्या डब्यातून उचलून वर घरी कोणी आणलं किंवा तत्सम काही गोष्टी.
सगळ्यात मूळ म्हणजे अनिता दाते ज्याप्रकारे दिसते तर अशा बाईला त्या वाड्यात कोणी भाडेकरू म्हणून का ठेवून घेईल थोडे दिवसाकरता का होईना, हा मुळात एक प्रश्न राहतोच पण ठीक आहे सिनेमॅटिक लिबर्टी.
जाता जाता अजून एक
त्यातील मुख्य पात्र दृष्ट काढायच्या वेळेला माझा याच्यावर विश्वास नाही विश्वास नाही असं म्हणत राहते आणि नंतर स्वतःच उठून मुलीची दृष्ट काढायला जाते. यावरून आठवलं की, आजकाल बरेच लोक म्हणताना म्हणतात आमची श्रद्धा नाही आम्ही नास्तिक आहोत - मग ते फॅशन म्हणून म्हणतात का प्रोग्रेसिव्हनेस दाखवण्यासाठी म्हणतात ते माहिती नाही - नंतर त्यांचं बोलणं/ कृती दुसरंच काही दर्शवते. ही विसंगती आजकाल फारच जास्त बघायला मिळते. तीच त्यातील पात्रात पण आली तर त्याची गंमत वाटली एवढेच
परीक्षण आवडलं पण चित्रपट
परीक्षण आवडलं पण चित्रपट नव्हता आवडला.