( न राहवून प्रयत्न केला आहे. आवडलं तरी कळवा आणि नाही आवडलं तरी पण कळवा नक्की. __/\__ )
नमनाला घडाभर
लोकांना नावं ठेवण्याची सवयच असते.
पूर्णान्नं असलेल्या दूधालाही नावं ठेवतात लोक. देवालाही नाकारतात.
अशाने सकारात्मक दृष्टीकोण नाहीसा होऊन असहिष्णू वृत्ती वाढीला लागते.
या जगात देव आहे हे मान्य केलं कि जे काही वाईट घडतं ते त्याच्या मर्जीने असं समजून राजकारणी लोक कोणताही अपराधबोध मनी न बाळगता जनतेची लूट करू शकतात. अशीच सकारात्मक विचारसरणी ठेवली तर आपल्याला सर्व गोष्टीत चांगलं दिसू लागते.
हा सकारात्मक चष्मा घाला आणि मगच सिकंदर बघा.
काय नाही त्यात ?
तत्त्वज्ञान
सलमान खान आहे. या अॅक्टरवर नकारे लोक आरोप ठेवतात कि त्याला अभिनय करायची आवड नाही. त्याला पुरस्कार मिळत नाहीत. पण पुरस्कारांचं कसं असतं ना, जर ऑस्कर भारतात असता तर डीडीएलजे आणि शिंडलर्स लिस्ट यात डीडीएलजेलाच सर्व ऑस्कर्स मिळाले असते. सलमान खानने कधीही पुरस्कारासाठी काम केले नाही.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि
या श्लोकाला जर फिल्म इंडस्ट्रीत कुणी सिरीयसली घेतलेलं असेल तर ते सलमान खाननेच.
पुरस्काराची अपेक्षा करू नकोस, पिक्चर्स करत रहा हा त्याचा बाणा याची साक्ष आहे.
जर पुरस्काराची अपेक्षा करायचीच नसेल तर मग अभिनय जेव्हढ्यास तेव्हढाच करायला हवा. सलमानचा अभिनय बघा.
हसणे, रडणे, राग, विरह, आनंद या सर्व प्रसंगात चालू शकणारा एकच अभिनय त्याने शोधून काढला आहे. यावरून तो एक क्रिएटिव्ह अभिनेता आहे हे लक्षात येतं. त्याच्यात संशोधक किंवा गेलाबाजार आंत्रप्र्युनर ( सरळ एंटरप्रुनर म्हणूयात का ?) होण्याचे गुण आहेत. एंटरटेनमेंट हा उद्योग आहे आणि त्यातला हा प्रुनर. अभिनयात अशी मेहनत घेणारे अभिनेते विरळाच.
धंद्यात कोहिरंट (कोहियंट) म्हणून स्ट्रॅटर्जी असते. जास्तही नाही आणि कमीही नाही , एकदम अचूक.
उदाहरण घ्यायचं झालं तर भारतात पूर्वी ट्रक बनायचे ते दोन टनाचे सांगितले तर त्यात लोक सहा टन सामान सहज लोड करायचे. कारण ते नऊ टनाला डिझाईन केलेले असायचे. याला ओव्हरडिझाईन म्हणतात. तर दोन टनाच्या जागी १.९ टन डिझाईन केलं तर त्यात किंचित जास्त सामान भरलं तर अपघात होतं. म्हणून खूप ओव्हरही नाही, अंडरही नाही असं अॅप्रोप्रिएट डिझाईन केलेलं प्रॉडक्ट व्बनवणे ही कोहियंट पॉलिसी.
सलमानने तरी काय केलं ? हेच केलं ना ?
उगीचच दु:खाच्या सीनमधे खूप जास्त रडारडी केली तर त्याला मेलोड्रामा म्हणतात. रडलंच नाही तर अभिनयशून्य ठोकळा म्हणतात. आनंदाचा अभिनय जास्त केला तर ओव्हरअॅक्टींगचं दुकान म्हणतात, कमी केला तर अंडरप्ले म्हणतात.
त्यापेक्षा एकच एक चेहरा ठेवून वावरता येत असेल तर का नाही ? हेच तर अमिताभ बच्चन, दिलीपकुमार, नसीरूद्दीन शाह यांना जमलं नाही. सलमानचे सलग चार सिनेमे पाहिले तर जंजीर मधे अमिताभ बच्चन जयावर किती उगाच ओरडतो असं वाटून जाईल. सर्व सिनेमे नव्याने पहावेत ही इच्छा होईल.
गोविंदाने एव्हढे विनोदी सिनेमे केले. केव्हढी मेहनत करावी लागायची.
संजीवकुमारचा आवाज काढायचा, दिलीपकुमार यांची स्टाईल मारायची, अमिताभ स्टाईलची स्टेप डान्स मधे आणायची, आवाजात व्हेरीएशन आणायचे. डोक्याला ताप नुसता.
सलमानने विनोदी सिनेमात चिंपाझीचे आवाज काढायला सुरूवात केली. दिग्दर्शक डेव्हीड धवन असला कि प्रसंग कसाही असो, चिंपाझी टेक्नॉलॉजीने त्याने तो पार पाडला. गोविंदाने काय मिळवलं ? एव्हढी मेहनत केल्यावर बर्न आउट झाला बिचारा. आज कुठे आहे तो ?
स्लो बट स्टेडी विन्स द रेस !
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कथा !
चांगली कथा असली तर कुणीही पिक्चर चालवून दाखवेल ना ?
स्टारपावर तर तेव्हांच सिद्ध होईल ना जेव्हां कथेचा पत्ताच नसेल, लॉजिक गायब असेल, अभिनयाची भरमार नसेल तरीही पिक्चर तुफान गल्ला जमवतोय.
हीच तर सलमानची किमया !
आणि ज्याचा फॅन बेस भारतात सर्वात जास्त आहे त्याला नावं ठेवण्यात काय अर्थ आहे ?
एव्हढ्या लोकांना काहीच समजत नसेल का ?
कि दर वेळी आपलंच घोडं दामटायचं ?
जर सलमानला ५० कोटी रूपये देऊन घ्यायचं असेल आणि हीच पब्लीक डिमांड असेल तर मग कथा, पटकथा, दिग्दर्शन अशा अनावश्यक गोष्टीत गुंतवणूक करण्याची काय गरज ? ती तर सुबोध भावे सुद्धा करतोच ना ? जर त्याचा स्वतःच्या स्टारपावर वर विश्वास असता तर त्याने कट्यार मधे नेमथ्य, सेटस, लोकेशन्स, संगीत अशा सर्व आघाड्यांवर का मेहनत घेतली असती ? आणि एव्हढं करून काय कमाई केली ?
एक पिक्चर चालला तर म्हणे अनेकांचं पोट भरतं.
पण कथा, संगीत, पटकथा, सिनेमॅटोग्राफी हे function at() { [native code] }युच्च दर्जाचं ठेवून फक्त मेरीटवाल्यांचंच पोट भरणार ना ? हॉलीवूडवरून कलाकार आणण्यात काय अर्थ ? त्या पेक्षा ज्याला जसे जमेल तसे काम करू द्यावे हा दृष्टीकोण ठेवलेले सलमानपट हे गरजूंचे पोट भरतात. हे समजून नको का घ्यायला ?
सलमानला म्हणूनच उत्कृष्ट मनोरंजन उद्योजकाचा पुरस्कार मिळू शकतो. उद्योजक पुरस्कार धंद्यासाठीच मिळतो हे दुर्दैव.
आपला सलमान सुद्धा दिवसेंदिवस बोहरी आळीतल्या हार्डवेअरच्या दुकानाच्या गल्ल्यावर बसलेल्या बोहरी सारखाच दिसत चाललाय. एव्हढ्या एका गुणवत्तेवर हा पुरस्कार सुद्धा त्याला देता येईल.
राहता राहिलं नृत्य !
टाकीचे घाव सोसल्यावर दगडात देवपण येतं.
तर दगडी शरीर कमावल्यावर त्या देवाकडून सगळं शरीर हलवून नृत्य करायची अपेक्षाच अघोरी आहे. त्या ऐवजी पँटचा खिसा, गळ्यातला रूमाल एव्हढंच हलवून दाखवलं तरी ते नृत्य म्हणूनच समजलं जायला हवं. झिरो एनर्जी वेस्टेज पॉलिसी !
प्लॉट ( ?)
मनाची एव्हढी तयारी असेल तर मग सिकंदर हा सिनेमा आपण मन लावून पाहू शकतो.
सकारात्मक दृष्टीकोण असेल तर सिकंदर बघितल्यानंतर आपल्याला जगातला कोणताही पिक्चर खटकणार नाही ही खात्री निर्मात्यांनी दिलेली आहे. आख्ख्या सिनेइंडस्ट्रीचं भलं व्हावं म्हणून पिक्चर बनवण्याचा हा दृष्टीकोण सलमानला महापुरूष बनवतो.
तसाच तो सिकंदर मधेही महापुरूषच आहे.
विमानात सहप्रवाशी बाई ही अनैतिक धंद्यात असल्याचा फायदा उचलून तिचा गैरफायदा घेऊ पाहणार्या प्रतिक बब्बरला एक हात येऊन रोखतो. हा हात कुणाचा असेल हे सांगायची गरज आहे का ? तर हा अजस्त्र हातधारी मनुष्य डोळ्यात झिरो वेस्टेज भाव घेऊन त्याच्याकडे पाहतो तेव्हां फॅन्स ओळखतात कि हा राग आहे. कुणी खुन्नस समजतं तर कुणाला ते कौतुक वाटतं.
जयाचे जैसे अंतरंग तैसेचि भाव !
यात सलमानचा दोष काय ?
आणि मग विमानाच्या प्रत्येक भिंतीवर बब्बर दाणदाण आदळत असताना पायलट आणि हवाई सुंदर्या आनंदीत झालेल्या असतात.
प्रतिक बब्बरची हेअरस्टाईल ही सोल्जर मधल्या बॉबी देओलकडून मार खाणार्या गोगा कि तत्सम नावाच्या बिघडलेल्या खलपुत्रासारखी आहे. इथे प्रतिक बब्बर ही एका पाताळयंत्री मंत्र्याचा (कटप्पाचा) मुलगा आहे.
हा मंत्री पिक्चरभर मुलाला मारणार्याचा शोध घेत राहतो. पण त्याला समजतं कि धुलाई करणारा दुसरा तिसरा कुणी नसून कांदा संस्थानचा महाराज सिकंदर आहे. इथे सिकंदर म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट असं सलमान त्याच्या बायकोला रश्मिका मंदानाला सांगतो. यावरून महाराज फावल्या वेळेत मायबोली वाचत असावेत ही शंका येते.
महाराजांना इन्कम काय हे रहस्य असलं तरी ते टॅक्सीवाल्याला टीप म्हणून दहा लाख रूपये देऊ शकतात. संस्थानातल्या रयतेच्या गहाण टाकलेल्या जमिनी सोडवून त्यांना परत करू शकतात. मुंबईत आल्यावर धारावी झोपडपट्टीत घातक कचरा जाळल्याने होणारे श्वसनाचे विकार दूर व्हावेत म्हणून संपूर्ण धारावी विकत घेऊन तो प्लांट बंद करू शकतात. इथे आपल्याला रजनीकांतची आठवण आल्याशिवाय राहवत नाही.
विष्णूनामाची भक्ती करावी आणि महादेव प्रसन्न व्हावेत हीच अनुभूती इथे येते.
नारुंतुदः स्यादार्तोSपि न परद्रोहकर्मधीः।
ययास्योद्विजते वाचा नालोक्यां तामुदीरयेत्॥
महाराजांना मारामारीसाठी भाडोत्रींची गरज लागत नाही. ते स्वतःच मारामारी करतात, टपोरी सारखे जनतेत जाऊन गाणं म्हणतात आणि त्यात महाराणीही डान्स करतात. सन २०२५ मधेही ते संस्थानाचा गाडा हाकतात आणि त्यांना पोलीस अटक करू शकत नाहीत कारण जनता कामधंदे नसल्याने रस्त्यावर येऊन जीप तोडून टाकते.
असा राजा असल्यावर जनतेला काम करायची गरजच काय ?
ठेविले सलमाने, तैसेचि रहावे
या राजाला मारण्यासाठी मंत्र्याने पाठवलेल्या मारेकर्याची गोळी रश्मिकाला लागते पण ती दरबारी स्टाफला तंबी देते कि खबरदार जर ही बातमी सलमानजींना सांगाल तर. ती अनाथ असताना तिला राजवाड्यात आणून लग्न केलेलं असतं.
आधी बालंट दूर होऊ दे मगच बातमी सांगायची. मात्र ती मरते.
जीवितं क्षणविनाशिशाश्वतं किमपि नात्र।
डॉक्टर सांगतात तिने ऑर्गन्स डोनेट केलेत.
हे ऑर्गन्स मुंबईतच तिघांना मिळतात. एका अंध मुलीला डोळे, धारावीतल्या अनाथ मुलाला लिव्हर आणि एका बाईला हार्ट.
ही यादी सलमान शोधून काढतो आणि मृत्यूनंतरही रश्मिका आपल्यातच आहे म्हणून भेटण्याचा निर्णय घेतो. पण ही यादी मंत्र्याच्या पक्षी कटप्पाच्या जाती लागते आणि तो या तिघांना मारून सलमानला अजून दु:ख देणार असतो.
मग यांना वाचवण्यासाठी धुमश्चक्री. त्यातच सलमानवर खोटे आरोप ठेवून अरिरेकी घोषित करण्यात येतं.
पोस्टर्स लावले जातात. पण सलमान सर्वांचा नि:पात करतो आणि शेवटी करप्ट पोलीस अधिकारी अटक करायला येतो तेव्हां त्याला समजतं कि महाराजांनी थेट राष्ट्रपती भवनला फोन लावल्याने ते आता बरी झाले आहेत.
राष्ट्रपती आणि राजे महाराजे हे पावरफुल असतात हे शिक्षण सिकंदर मधून आपल्याला मिळतं.
आणि इथे कहानी सुफळ आणि संपूर्ण होते ( सो सो धंदा केल्याने नाहीतर दुसरा भाग येऊ शकत होता)
सकारात्मक दृष्टीकोण देणारा हा पिक्चर नक्की बघा आणि चिकवाचे बदललेले स्वरूप दहा दिवसात अनुभवा !
सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया:।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दु:ख भाग्भवेत्।।
.. एंटरटेनमेंट हा उद्योग आहे
.. एंटरटेनमेंट हा उद्योग आहे आणि त्यातला हा प्रुनर…
You pruned the entire story in just eight words !! 😂 Too good
माझा बेस्ट SPT साधारण ५०.३ seconds आहे.
(SPT = Salman Patience Threshold)
छान लिहिलंय. हे लिहिण्याकरिता
छान लिहिलंय. हे लिहिण्याकरिता सलमान सिनेमा सहन केला ह्या बद्दल विशेष कौतुक.
लेख नाही वाचला, पिक्चर सुद्धा
सलमानच्या चित्रपटावर म्हणून लेख नाही वाचला, पिक्चर सुद्धा नाही पाहिला, त्याचा ट्रेलर सुद्धा नाही पाहिला, किंबहुना अश्या नावाचा पिक्चर आहे हे सुद्धा त्या दिवशी कुठेतरी वाचले तेव्हाच कळले, पण सलमान व्यतिरीक्त त्यात कोण आहे, तो कशावर आहे, त्यातले एखादे गाणे आयटम साँग आयटम हिरोईन वगैरे काहीच माहीत नाही.
पण काही वर्षापूर्वी जेव्हा सलमान बॉक्स ऑफिसवर करोडोचे चित्रपट देत होता आणि त्या जीवावर तो शाहरुखपेक्षा भारी आहे असे काही लोकं मला चिडवायला येत होते (मायबोलीच असे नाही तर सगळीकडचे ओळखीचे लोक यात होते ज्यांना माझे शाहरुख प्रेम माहीत आहे) तेव्हा सुलतान, बजरंगी भाईजान असे अपवाद वगळता इतर चित्रपटांचा पोत ओळखून मी म्हटले होते की सलमानचा हा एक काळ आहे जो काही वर्षांनी संपून जाणार, त्यासोबत सलमान संपून जाणार, पण शाहरुख कालातीत आहे, शाहरुख अमर आहे.. (यावर खोलात आणि भरभरून लिहायचे इथे टाळतो)
पण आज जेव्हा माझे हे शब्द खरे ठरत आहेत तेव्हा ती लोकं आणि त्या लोकांचे शब्द हुडकून बघा मीच बरोबर होतो हे कौतुकाने सांगायची सुद्धा इच्छा नाही कारण हे असेच होणार याचा अंदाज बांधणे इतके सोपे होते.
यापुढेही सलमानला कायम पास राहील. कारण यापुढे चांगली स्क्रिप्ट सुद्धा सलमानला वाचवू शकत नाही कारण त्याला पडद्यावर बघणे हाच हल्ली एक अत्याचार वाटतो.
असे काही लोकं मला चिडवायला
असे काही लोकं मला चिडवायला येत होते >> मी असं केल्याचं आठवत नाही.
शक्यतो शाखाबद्दलच्या अनावश्यक, आगाऊ कमेंट्स स्किप करणं हेच धोरण ठेवलं आहे.
असे काही लोकं मला चिडवायला
असे काही लोकं मला चिडवायला येत होते >> मी असं केल्याचं आठवत नाही.
>>>
अहो तुम्ही नव्हताच त्यात, उलट लेखाच्या शीर्षकावरून तुम्ही सलमान चित्रपटांना नावे ठेवलेली दिसत आहेत. ती लोकं शाहरुखला कमी लेखायला सलमान चित्रपटांचे कौतुक करायची.
आणि त्यात कोण होते कोण नाही हे मलाही आठवत नाहीत. काय म्हटले ते लक्षात ठेवावे, कोणी म्हटले ते विसरून जावे
काय म्हटले ते लक्षात ठेवावे,
काय म्हटले ते लक्षात ठेवावे, कोणी म्हटले ते विसरून जावे >> हे खूप छान झालं, लक्षात आलं, पटलंही.
धमाल लिहिले आहे. पिक्चर
धमाल लिहिले आहे.
पिक्चर पाहिला नाही पण साधारण असेच अपेक्षित होते.
विषय कोणताही असो, शहरुख ला
विषय कोणताही असो, शहरुख ला आणलाच पाहिजे !
भाजी करताना हळद फोडणीत घालावी की शेवटी ?
शेवटीच घालावी, तेलात घातली तर हळद करपते व मजा येत नाही, शाहरुख च्या सिनेमात पहिल्या दहा मिनिटातच तो मेला तर कसे होईल ?
शाहरुख तर आलाच पाहिजे, शिवाय
शाहरुख तर आलाच पाहिजे, शिवाय जे लोक आता यशस्वी आहेत , क्रिकेट, चित्रपट , राजकारण कुठेही ते लहान असतानाच ऋन्मेऽऽष यांनी सांगितले असते की पुढे जाऊन ही यशस्वी होणार आहेत म्हणून.... कंटाळा आला आहे
जोपर्यत फक्त भाईचा पिक्चर
जोपर्यत फक्त भाईचा पिक्चर आलाय म्हणून फर्स्ट डे फर्स्ट शो बघणारी महान लोक आहेत तोपर्यंत सलमानच्या कारकिर्दीला शेवट नाही.
असली चक्रम माणसे मायबोलीवरच बघितली आहेत
माझ्या उपमा अलंकार अनुभव
माझ्या उपमा अलंकार अनुभव किस्से यामध्ये शाहरुख येणे स्वाभाविक आहे. कारण तो मला आवडतो आणि त्याने माझ्या आयुष्याचा एक भलामोठा भाग व्यापला आहे. मला राजकारणात काडीचा रस नाही अन्यथा मोदी गांधी नेहरू आणले असते. मला देव धर्मात जातीपातीत काडीचा रस नाही अन्यथा जिथे तिथे ते आणले असते. माझे जगच छोटे आहे त्याला मी काय करू... त्यामुळे प्लीज विषय वाढवून शाहरुखच्या माझा एका पोस्टीचे दहा पोस्ट करू नका. उगाच सगळे बिल माझ्यावर फाटते.
सलमानचा अभिनय बघा.
सलमानचा अभिनय बघा.
इथे टोटल फुटलो...
हसणे, रडणे, राग, विरह, आनंद या सर्व प्रसंगात चालू शकणारा एकच अभिनय त्याने शोधून काढला आहे >>>>
... आणि पुढची अनेक वर्णने वाचून फुटतच गेलो
इतर अभिनेत्यांचे वाया गेलेले अनावश्यक प्रयत्न - विशेषतः अमिताभचे ओरडणे व गोविंदाची मेहनत - धमाल आहे.
पँटचा खिसा, गळ्यातला रूमाल एव्हढंच हलवून दाखवलं तरी ते नृत्य म्हणूनच समजलं जायला हवं. झिरो एनर्जी वेस्टेज पॉलिसी ! >>>
हो खरे आहे. पूर्वी "सूचक दृष्ये" असत आपटणार्या फुलांची, तसे हे नृत्याबद्दलचे सूचक दृष्य आहे. रूमाल हलवला म्हणजे त्याने इथे डान्स केला असे पब्लिकने समजून घ्यायचे.
तर हा अजस्त्र हातधारी मनुष्य डोळ्यात झिरो वेस्टेज भाव घेऊन त्याच्याकडे पाहतो तेव्हां फॅन्स ओळखतात कि हा राग आहे. कुणी खुन्नस समजतं तर कुणाला ते कौतुक वाटतं. >>>
दगडी सलमान, झिरो वेस्टेज
दगडी सलमान, झिरो वेस्टेज पॉलिसी, चिंपाझी टेक्नॉलॉजी

ज्याला जसे जमेल तसे काम करू द्यावे
>>>
वाचतोय, तत्वज्ञान पर्यँत
वाचतोय, तत्वज्ञान पर्यँत वाचले, मस्त पंचेस मारले आहेत
बाकी नंतर वाचेन.
ऑस्कर भारतात असता तर डीडीएलजे
ऑस्कर भारतात असता तर डीडीएलजे आणि शिंडलर्स लिस्ट यात डीडीएलजेलाच सर्व ऑस्कर्स मिळाले असते >>.
हा अजस्त्र हातधारी मनुष्य डोळ्यात झिरो वेस्टेज भाव घेऊन त्याच्याकडे पाहतो तेव्हां फॅन्स ओळखतात कि हा राग आहे. कुणी खुन्नस समजतं तर कुणाला ते कौतुक वाटतं.>>
मस्त लिहिलेय
.तत्वज्ञान तर भारीच लिहिलेय.
कहर!
आता तर अजिबातच नाही पाहणार हा पिक्चर.
भारी लिहिलंय...!
भारी लिहिलंय...!
👍
३० मार्चच्या रविवारी प्रदर्शित झालेला सल्लूभाईचा हा 'ईद स्पेशल' चित्रपट आम्ही ३१ मार्चला लगेच दुसऱ्या दिवशीच पहिला होता आणि त्याचे विच्छेदन करणारा एक धागा इथे काढावा ह्या विचाराने काही परिच्छेद खरडलेही होते, पण नंतर तो पूर्ण करायचे राहूनच गेले...
आता तुमच्या धाग्यावर प्रतिसादात त्यातला सुरुवातीचा थोडा मजकूर पेस्टवतो आणि त्यातल्या मुख्य पात्रांविषयीची काही निरीक्षणे नोंदवून घेतो 😀
भारतीय रिझर्व्ह बँक "'मैं धारक को 'फलाना ढिमकाना' रुपये अदा करने का वचन देता हूं'" असे वाक्य गव्हर्नरच्या सहीनिशी चलनी नोटांवर छापून त्यांच्या मूल्याची 'लिखित' खात्री देत त्या नोटा बाळगणाऱ्यांच्या मनात एक विश्वास निर्माण करते, ह्या धर्तीवर "मैं दर्शकको को 'मनोरंजन' अदा करने का वचन देता हूं'" अशी 'अलिखित' खात्री 'सलमान खान' ह्या अभिनेत्याने एकेकाळी असंख्य चित्रपट रसिकांना दिली होती आणि त्यातून "सलमानचा चित्रपट म्हणजे 'एंटरटेनमेंट गॅरेंटीड" असा दृढ विश्वास माझ्यासारख्या त्याच्या चित्रपटांचे निस्सीम चाहते असणाऱ्या कित्येक प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता.
१९८९ साली शालेय विद्यार्थीदशेत असताना पाहिलेल्या 'मैने प्यार किया" ह्या त्याचा पहिल्या चित्रपटापासून ते २०१६ साली प्रदर्शित झालेल्या 'सुलतान' पर्यंत, म्हणजे जवळपास तब्बल अडीच दशकांहून थोडा अधिक काळ (अधे मध्ये आलेले त्याचे काही कंडम चित्रपट झेलुनही) हा विश्वास टिकून राहिला होता हे विशेष!. परंतु २०१७ साली आलेला त्याच्या 'ट्यूबलाईट' ह्या चित्रपटापासून मात्र सातत्याने अपेक्षाभंग/निराशाच पदरी पडू लागल्यावर माझे हे 'फॅनडम' संपुष्टात आले आणि केवळ सवयीचा भाग म्हणून त्याचे चित्रपट अद्याप बघत आलोय.
सलमान हा आता "भरवशाच्या म्हशीला टोणगा" ठरू लागला असला तरी 'सिकंदर'चे दिग्दर्शक असलेल्या एआर मुरुगादास ह्यांचे 'गजनी' आणि 'हॉलिडे' हे त्यांच्याच मूळच्या तामिळ चित्रपटांचे, त्यांनीच केलेले हिंदी रिमेक्स आणि 'स्पायडर' ह्या तेलगू सिनेमाची हिंदी डब्ड आवृत्ती असे त्यांचे तीन चित्रपट आधी पाहिले आणि आवडलेही होते. बाकीच्या प्रमुख कलाकारांपैकी एक रश्मीका मंदाना सोडली तर सत्यराज (कटप्पा), काजल अगरवाल, किशोर सारखी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारी आवडती कलाकार मंडळी अशा जमेच्या बाजू असल्याने रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी प्रदर्शित झालेला 'सिकंदर' हा नवा चित्रपट पहिल्याच दिवशी पाहावा असा आम्हा उभयतांचा विचार होता, परंतु गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या गोडाधोडाच्या जेवणानंतर आलेल्या सुस्तीमुळे हा विचार बारगळल्याने दुसऱ्या दिवशी तो अंमलात आणला होता.
...
पात्र मीमांसा:
सलमान खान - राजकोट संस्थानाचे शेवटचे राजे 'संजय राजकोट' उर्फ सिकंदर, उर्फ राजासाब. 'संजय' नावाचा नायक ह्या दिग्दर्शकासाठी लकी ठरत असावा बहुतेक. गजनीत 'संजय सिंघानिया' होता, इथे 'संजय' राजकोट आहे.
रश्मीका मंदाना - संजय राजकोट ह्यांच्या पत्नी महाराणी 'साईश्री'. पुष्पा १ - २ मधून 'श्रीवल्ली' अशी ओळख निर्माण झाल्यापासून हि साकारत असलेल्या पात्राच्या नावात काहीही करून 'श्री' घुसवलंच पाहिजे असा पायंडाच पडला पडला आहे! बघाना... छावा मध्ये ऐतिहासिक नाव 'येसूबाई' असलं तरी विकी कौशलच्या तोंडून सतत 'श्री'सखी... 'श्री'सखी असेच वदवले गेले, तर इथे साई'श्री'. पण ते असो... चित्रपट सुरु झाल्यावर उण्यापुऱ्या पाऊण तासात ह्या महाराणींना स्वर्गवासी करून कथा/पटकथा लेखकांनी प्रेक्षकांवर अनंत उपकार केले आहेत. पुढे अधून-मधून काही क्षणांसाठी फ्लॅशबॅक दृश्यांमध्ये त्या दिसतात, पण तिचा तेवढा वावर सहणेबल आहे.
सत्यराज - 'राकेश प्रधान' हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत पण संजय राजकोटला धडा शिकवण्यासाठी हरयाणाच्या एका 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' पोलीस इन्स्पेक्टरची पाठवणी थेट गुजरातमधल्या राजकोट येथे करू शकण्या एवढे 'पॉवरफुल' आहेत.
किशोर - 'इन्स्पेक्टर प्रकाश'. हेच ते हरयाणाचे 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' पोलीस इन्स्पेक्टर, जे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याच्या आदेशावरून संजय राजकोटला धडा शिकवण्यासाठी आधी गुजरातमधल्या राजकोट येथे आणि नंतर फॅमिली सहित मुंबईत आपले 'कर्तव्य' बजावत असतात.
शर्मन जोशी - 'अमर'. संजय राजकोट उर्फ राजासाबची जी हुजुरी करणारे एक निरस पात्र. पाच-सहा बॉडीगार्ड्सच्या संगतीने सतत राजासाब बरोबर दिसणारा हा अमर राजासाबचा उजवा हात आहे, प्रधानजी किंवा पीए आहे की जवळचा मित्र आहे, कि बाकीच्या अंगरक्षकांचा टीम लीडर आहे ह्याचा शेवटपर्यंत काही थांगपत्ता लागत नाही. अतिशय गिळगिळीत संवाद बोलणारी अमरची ही अत्यंत मिळमिळीत भूमिका शर्मन जोशी सारख्या कलाकाराने कशाला स्वीकारली असावी हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.
काजल अगरवाल - 'वैदेही रंगाचारी'. हिला 'साईश्री' चे डोळे मिळाले असतात. (लग्न झाल्यानंतर काही काळ रुपेरी पडद्यावरून गायब झालेल्या 'काजू'ला पुन्हा बघून छान वाटले.)
आयन खान - 'कमर'. (कमरुद्दीन 'कमर' नावाच्या धारावीतल्या लावारीस मुलाची भूमिका साकारणाऱ्या आठ-दहा वर्षांच्या ह्या बाल कलाकाराच्या वाट्याला त्याच्या वयाला आणि परिस्थितीला न शोभणारे 'कमर'तोड संवाद आल्यामुळे हे कार्टं जाम डोक्यात जाते.) ह्याच्या वाट्याला 'साईश्री'ची फुप्पुसे आलेली असतात.
अंजीनी धवन - 'निशा'. (कमर प्रमाणेच डोक्यात जाणारे आणखीन एक टीनएजर पात्र.) हिच्या वाट्याला 'साईश्री'चे हृदय आलेले असते.
प्रतीक बब्बर - 'अर्जुन प्रधान' (महाराष्ट्राचे पॉवरफुल गृहमंत्री राकेश प्रधान ह्यांचा (कु)पुत्र. संजय राजकोट आणि राकेश प्रधान ह्यांच्यात वैमनस्य निर्माण करण्याचे आपले आद्य कर्तव्य पार पाडून रश्मीका मंदाना प्रमाणेच हा सुद्धा पटकन जगाचा निरोप घेतो.) स्मिता पाटील आणि राज बब्बर ह्यांचे अपत्य असलेल्या ह्या कलाकारामध्ये नायकाची भूमिका साकारण्याएवढी क्षमता/गुणवत्ता नसली तरी सहाय्यक अभिनेता म्हणून हा नावारूपाला येऊ शकेल असे 'जाने तू या जाने ना' ह्या चित्रपटातली त्याने साकारलेली जेनेलियाच्या भावाची भूमिका बघितल्यावर वाटले होते, पण पुढे तसे काही झाले नाही.
असो... सिकंदरच्या बाबतीत उलटी गंगा वाहिली आहे. आधी ढिसाळ स्वरूपात हिंदीत आलाय, आता मुरुगादास योग्य ते बदल करून तो तामिळ किंवा तेलुगूत कधी आणतात ह्याची प्रतिक्षा आहे!
हाहाहा ... धमाल !!!
हाहाहा ... धमाल !!!
चित्रपट पूर्ण बघूनसुद्धा अजून "आहात" त्याबद्दल आणि लेख लिहू शकलात याबद्दल कौतुक करावे तेवढे कमी आहे.
बाय द वे ... आधी "भूल" देऊन मग चित्रपट बघितलात का?
मस्त लिहिले आहे ! पंचेस ही
मस्त लिहिले आहे ! पंचेस ही भारी !!
मला सिनेमा (फॉरवर्ड करत करत)
मला सिनेमा (फॉरवर्ड करत करत) पाहूनही जितका समजला नव्हता तितका हा रिव्ह्यू वाचून समजला आहे आणि स्वतःच्या फॉरवर्ड करत सिनेमा पाहण्याच्या निर्णयाचा अभिमान वाटला आहे.
You pruned the entire story
You pruned the entire story in just eight words !! Too good >> अनिंद्य
कहर आहे कमेंट
लिहिण्याकरिता सलमान सिनेमा सहन केला ह्या बद्दल विशेष कौतुक >> पुढच्यास ठेच
असली चक्रम माणसे मायबोलीवरच बघितली आहेत >> माबोच्या बाहेर पाहिलीत अशी माणसं.
पूर्वी "सूचक दृष्ये" असत
पूर्वी "सूचक दृष्ये" असत आपटणार्या फुलांची, तसे हे नृत्याबद्दलचे सूचक दृष्य आहे. >>>
फुलं आणि सूचक नृत्य 
मी घाई केली जरा.
हा किंवा जाट यावर फारेण्डची पोस्ट यावी ही खूप इच्छा होती.
संजय भावे >>> भारी लिहीलंय. तुमची स्वतंत्र पोस्ट वाचायला आवडेल. येऊ द्या पोस्टमार्टेम
चित्रपट पूर्ण बघूनसुद्धा अजून "आहात" त्याबद्दल आणि लेख लिहू शकलात याबद्दल कौतुक करावे तेवढे कमी आहे. >>> माबोकरांचे आशिर्वाद
दुसरं काय 
भाजी करताना हळद फोडणीत घालावी
भाजी करताना हळद फोडणीत घालावी की शेवटी ?
शेवटीच घालावी, तेलात घातली तर हळद करपते व मजा येत नाही, शाहरुख च्या सिनेमात पहिल्या दहा मिनिटातच तो मेला तर कसे होईल ? >>> विकु
उलट लेखाच्या शीर्षकावरून
उलट लेखाच्या शीर्षकावरून तुम्ही सलमान चित्रपटांना नावे ठेवलेली दिसत आहेत. >> काहींच्या लेखाचे शीर्षक पुरेसं असतं. इथे तुम्ही फसलात सर.
हा लेख सलमानचा सिनेमा पाहण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोण ठेवावा म्हणून लिहीला आहे. आता तुम्हाला आवर्जून लेख वाचला नाही हे सांगायचीच इच्छा होती तर काय करणार. वय झाल्यावर होतं असंं 
अस्मिता, साधा माणुस, मानव सर तुमच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
rmd - हा मूवी बघावा म्हणून हा खटाटोप केलाय. उलटा परिणाम होतोय का?
माझे मन, सिमरन, किल्लेदार,
माझे मन, सिमरन, किल्लेदार, अश्विनी ११
आभारी आहे.
फेफ

पण तरीही मी आवर्जून बघाच म्हणेन
रानभुली , मस्त लिहिले आहेस!
रानभुली , मस्त लिहिले आहेस!
मस्त लिहिलं आहे एकदम!
मस्त लिहिलं आहे एकदम!