साक्षात्कार

Submitted by दत्तात्रय साळुंके on 28 May, 2025 - 08:28

प्रेरणा :- कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचा मोरू कविता संग्रह त्यांचा मोरू आमचा केरू उर्फ केरबा .

केरूची आज सुट्टी होती
सकाळचा नाष्टा झाला. एक कप चहा झाला
आता काही वेळानं
पुन्हा चहाची तल्लफ आली
तल्लफ आली की
तो वेडा होतो
ऑफिसात रोज चार, सहा वेळा चहा पितो
केरू कॅन्टीनलाच जास्त दिसतो
तो म्हणतो
कशाचीही तल्लफ खूप वाईट ती भागेसतो
काही पण सुचत नाही
नशेडी पोरं चोरी पण करतात
आपल्याच घरात पैसे चोरतात
हे त्यानं नशेखोरीचे सामाजिक दुष्परिणाम
या पुस्तकात वाचलेलं
आता शेजारी चहा ऊकळतोय का ते बघायला
केरूनं खिडकीतून डोकावून पाहिलं
तसा बायकोचा दमदार आवाज आला
काय हुंगताय, गप रवा की
केरू गप्प दुस-या खोलीत गेला
तरी चुळबुळ चालू
वास येतोय का?
केरूनं नाक जोरानं आत ओढलं
आणि बायकोला भीतच म्हणाला
जरा अर्धा कप चहा हवा होता
गप बसा जरा टेकले की हे दे, ते दे नेहमीचच
हापिसात जाता तेच बरं असतं
केरूला असलं ऐकणं अंगवळणी पडलेलं
त्यानं कुठेतरी वाचलेलं शब्दानं शब्द वाढतो
चंद्र कलेकलेने वाढताना त्यानं पाहिला
पण भिडस्तपणाचा दुष्परिणाम म्हणजे
त्याला शब्दांनं शब्द वाढतो
हे त्यानं कधी अनुभवलं नव्हतं .

तो गप्प राहिला
इतक्यात कामवाली आली
केरूच्या बायकोनं तिला चहा करून दिला
केरू काही बोलणार एवढ्यात
एक कप चहा त्याच्या पुढ्यात आला
केरूला आश्चर्य वाटलं
या घरात त्याच्यापेक्षा कामवालीची वट
हे पटलं
केरूला साक्षात्कार झाला
जन हे सुखाचे
दिल्या घेतल्याचे
बायकोला माहित आहे
आज्ञाधारक नवरा कुठं जातोय
कामवाली सुटली तर मुष्किलीनं मिळतेय

© दत्तात्रय साळुंके
२८-५-२५

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.. वेगळीच कविता..!
चहा एवढे लोकप्रिय आणि बहुतेकांचे आवडते पेय
असताना मला का नाही आवडत , चहाची मला का तल्लफ येत नाही ह्याचा मला नेहमी विचार पडतो.

रूपालीताई धन्यवाद
चहाची तल्लफ आल्यावर मी उकळत्या चहापेक्षा जास्त गरम होतो. गरम चहा नरड्यात उतरायचा अवकाश, मी गार होतो.
सामो खूप आभार