हिरवं सपान

Submitted by दत्तात्रय साळुंके on 26 May, 2025 - 00:40

तापल्या उन्हात
नांगरल्या रानात
पाऊस गाणं राहिलं गुंजून

तळ्यात मळ्यात
टप टप पानांत
छेडली सुरेल मल्हार धून

मृदगंध सारा
उधळितो वारा
कोण कस्तुरी गेले सांडून ?

डोंगर माथ्याला
दुधाळ धार
घागर गवळण गेली लवंडून

नदी नाल्यात
शेता शेतात
गढूळ उधान आलं उचंबळून

काळ्या दरडीआड
उंच आभाळात
बुजरी वीज गेली डोकावून

कुंजवनात
रास रंगात
सरीवर सर गेली बरसून

दिशा दिशातून
भरली बेहोशी
अमृत धार प्राशून, प्राशून

सुखावलं रान
हिरवं सपान
पाहिलं म्या डोळा भरून

© दत्तात्रय साळुंके
२६-५-२५

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

हिरवं सपान.
सुंदर.
शब्दच मस्त.
त्या "काळया मातीत मातीत...." मधे पण आहेत हे शब्द.