लपंडाव

Submitted by अविनाश जोशी on 23 May, 2025 - 06:29

लपंडाव
शेखर, रघु नारायण किंवा रघु आणि अमृत हे तिघे जीवश्च कंठश्च मित्र होते. तिघे जरी बंगलोर मध्ये एकत्र आले असले तरी तिघांची अगदी वेगळी होती. शेखर हा पुण्याहून इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स मध्ये पोस्ट ग्रॅजुएट होऊन एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत नोकरीस होता. त्याचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. अमृत बंगलोर मध्ये बी ई होऊन शेखरच्या कंपनीत नोकरीस होता. शेखर डिजाइन मॅनेजर तर अमृत प्रोडक्शन मॅनेजर होता. त्यामुळे दोघांची दोस्ती जमली. अमृत चे वडील श्री पेरूड हे बंगलोरच्या ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू होते. रघु आणि अमृत एकाच कॉलेज मध्ये शिकल्याने त्यांची दोस्ती होती. थोड्याच काळात त्या तिघांचे त्रिकुट बनले. रघु बंगलोर जवळच्या एका खेड्यातून आला होता. त्याच्या घरची परिस्थिती अगदीच गरिबीची होती. बंगलोरला यशवंतपूर मध्ये एका अतिशय छोट्या खोलीत आई बरोबर राहत असे. त्याला वडील नव्हते पण आईने लोकांच्या घरी काम करून आणि कपडे शिवून रघूला बी.इ केले होते. रघु एका छोट्या अलुमिनियम कंपनीत नोकरी करत होता. नोकरी करता करताच त्याने तेथेच 2BHK फ्लॅट घेतला. आईने लोकांच्या घरी जाऊन काम करणे सोडून दिले. खरंतर तिने जवळच एक टेलरिंगचे दुकान टाकले.
रघु ज्या खेडयामधून आला ते खेडे तुमकूर रोडवरच 40-50 किलोमीटरवर होते. म्हणजे मुख्य रस्त्यापासून 8-10 किलोमीटर आत होते. तेथील गौडाचे लक्ष रघुवर होतेच. कर्नाटक मध्ये पाटील यांना गौडा म्हणतात. हा गौडा पिढीजात श्रीमंत होता. त्याला एकंदर सहा मुलं होती. त्यातील सगळ्यात शेवटी मुलगी होती. सगळ्यात छोटी असल्यामुळे तिला लोकांनी लहानपणापासूनच चिन्नम्मा म्हणायला सुरवात केली. अर्थातच तिच्या मोठ्या बहिणीचे नाव दोडम्मा झाले होते. तर गौडा चिन्नमा साठी स्थळे बघत होते. कोणीतरी त्यांना रघुचे स्थळ सांगितले. गौडांची फारशी तयारी नव्हती कारण राघूच्या कुटुंबजवळ फक्त दीड एक्कर शेती होती. स्वतः गौडांकडे अडीचशे एक्करहून जास्त बागायती होती. परंतु घरच्यांनी आणि लोकांनी त्यांना समजावून सांगितले की आपल्या खेडयातून एवढा शिकलेला माणूस मिळणे कठीण आहे त्यातून चिन्नमा ग्रॅजुएट आहे त्यामुळे तिला 40-50 एक्कर शेती असलेला अंगठे बहाद्दर नवरा देणार का? रघु बी.इ झाला आहे एका मोट्या कंपनीत नोकरीस आहे. त्याचे बंगलोर मध्ये आता घर आहे. आई चे स्वतंत्र दुकान सुरु झाले आहे, शेती घेऊन काय करायचे ? पाटलांनी शेवटी नाखुशीनेच रघूच्या आईला चिन्नमा करिता विचारले. आईला अतिशय आनंद झाला. नाकापेक्षा मोती जड होणार नाही ना अशीही काळजी तिला वाटू लागली. पाटलांनी रघूला लग्नात तुमकूर रोडवर 2BHK फ्लॅट लग्नात गिफ्ट दिला. आईचे दुकानही शेजारीच होते आता तिने दोन असिस्टंट ठेवले होते एकंदरीत सगळे छान चालले होते.
तिघा मित्रांची बैठक बहुदा रघूच्या घरीच भरत असे कारण अमृतचे घर बंगलोर बाहेर वीस किलोमीटरवर होते आणि शेखर तर होस्टेलवरच राहत होता. त्यातून रघूकडे चिन्नमा होती. चिन्नम्मा मोठ्या घरातून आली असली तरी अत्यंत गृहकृत्यदक्ष होती. सहाजिकच तिघांचे गप्पांचे अड्डे रघूकडेच असत. लग्नानंतर सहाच महिन्यात रघूला जिंदाल अल्युमिनियम कंपनीत फॅक्टरी मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली. त्याच्या दर्जात तर वाढ झाली पण त्याचा पगारही चौपट झाला. त्याशिवाय कंपनीच्या बऱ्याच फॅसिलीटी होत्या. त्याच सुमारास चिन्नमा गरोदर राहिली आणि प्रथेप्रमाणे आम्ही तिघेही तिला पाटलांच्या घरी सोडून आलो. तेथे चार भावांच्या पसाऱ्यात तिला फुलाप्रमाणे जपली गेली. इकडे रघूच्या डोक्यात फियाट कार घ्यावी असे आले. त्यावेळेस कार मिळायला 8-10 वर्ष लागत. आणि दहा हजारापर्यंत ऑन दिल्यास गाडी 8-10 दिवसात मिळत असे. अर्थात ते सुद्धा बरेच वशिले लावून. रघूने सासरी जाऊन सासऱ्याला गाडी करिता कर्जाऊ पैसे मागितले. सासऱ्याला पैसे देणे योग्य वाटले नाही. त्यामुळे त्याने नकार दिला. रघूकडे गाडीचे लायसन्स नव्हते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे सासऱ्या जावयाचे भांडण झाले आणि रघु सासऱ्यावर चिडून परत आला. त्यानंतर त्याने कंपनीत कार लोन साठी अर्ज केला. तो अर्थातच रिजेक्ट झाला कारण रघूकडे कंपनीचे कोटेशन नव्हते व रघूला ऑन सकट 100% लोन हवे होते. त्याने डायरेक्टरला समजावले कि त्याचे घर कंपनीपासून वीस किलोमीटर आहे आणि त्याला जाण्या येण्याकरिता कंपनी बस वर अवलंबून राहावे लागते. कंपनी बस चुकल्यास तसेच त्याची बायको पन्नास किलोमीटरवरच्या एका खेड्यातील आहे आणि शेवटचा दहा किलोमीटर प्रवास बैलगाडीने किंवा सायकलने करावा लागतो. जिंदाल सारख्या कंपनीच्या फॅक्टरी मॅनेजरला हे दोन्ही शोभत नाही.
कंपनीने बराच विचार केला आणि नंतर त्याला सांगितले कि ठीक आहे . कंपनी त्याला नवी कोरी फियाट घेऊन देईल आणि त्या बरोबर ड्राइव्हर ही देईल. त्यातील मुख अट म्हणजे ड्रायविंग लायसन्स एक वर्ष जुने झाल्याशिवाय आणि कंपनीच्या ड्रायव्हरने त्याला चांगले ड्रायविंग असल्याबद्दल सर्टिफिकेट दिल्यावर त्याला गाडी चालवता येईल त्याशिवाय त्याने गाडी अजिबात चालवू नये. कंपनी खर्चाने त्याला ड्राइवर मिळेल आणि कार चा सर्व खर्च कंपनी करेल. रघूने ते मान्य केले.
लवकरच कंपनीने त्याला गाडी ड्राइव्हरसकट दिली. दोन तीन दिवसांनी कंपनीतून तो चार वाजताच घरी आला. ड्राइवर निघून गेला. रघूच्या डोक्यात सासऱ्याबद्दल खुन्नस होतीच. त्यामुळे त्याला गाडी दाखवून आपल्या अपमानाचे उट्टे काढावे असे विचार त्याच्या डोक्यात आले. कारने सासऱ्याच्या गावी जायला फारतर एक तास लागला असता. ड्राइवर तर निघून गेला होता. म्हणून तो स्वतःच गाडी घेऊन निघाला. आई नको म्हणत असतानाही त्याने ऐकले नाही संध्याकाळी पाच च्या सुमारास त्याची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडाला धडकली आणि त्या अपघातात रघु जाग्यावरच मरण पावला. गाडीच्या रजिस्ट्रेशनवरून पोलीस कंपनीत पोहचले. कंपनीत अमृत आणि शेखरची नावं आपत्कालीन संपर्कासाठी होती. त्यामुळे त्या दोघांना कंपनीतून बोलावणे गेले. दोघेही कंपनीमध्ये पोहचल्यावर त्यांना हि विचित्र वार्ता कळली. त्यांच्यापुढे दोन प्रश्न उभे राहिले पहिला म्हणजे , ही वार्ता रघूच्या आईला कशी सांगायची आणि दुसरी म्हणजे चिन्नम्माला कशी सांगायची. कंपनीने पोर्स्टमार्टम आणि उत्तरक्रियेची जबाबदारी घेतली. आणि आम्ही कंपनीच्या गावातच उत्तरक्रिया पार पडली. नुसती बातमी कळणे आणि उत्तर क्रियेचे प्रसंग अनुभवने यात फार फरक असतो. हे सर्व त्याच्या आईला सहन झाले नसते त्यामुळे तिच्या कानावर ही बातमी अमृतच्या आईने घातली.
त्यानंतर मोठे दिव्य होते चिन्नम्माच्या घरी जाणे. पण जाणे तर भागच होते. शेवटी मनाचा धीर करून शेखर आणि अमृत चिन्नमच्या घरी गेले . तिच्या वडिलांना बाजूला घेऊन आम्ही त्यांना सर्व हकीकत सांगितली. ते जवळ जवळ रडायलाच लागले नंतर ते आम्हाला म्हणाले चिन्नमाची प्रकृती फारच नाजूक आहे तिला डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितली आहे. कुठलाही मानसिक धक्का तिला सहन होणार नाही. अशा स्थितीत तिला मिसकॅरेज होऊ शकते डिलिव्हरी पर्यंत तिला हि बातमी सांगू नका. तत्पूर्वी तुम्हाला दोघांना येथे तीन चार वेळा यावेच लागेल आणि चिन्नमा बरोबर बोलावे लागेल. त्या दोघांनाही नाही म्हणता येत नव्हते त्यांची गडबड ऐकून चिन्नमा जागी झाली होती आणि तिने आम्हा दोघांना तिच्या खोलीत बोलावले होते. शेखर आणि अमृत दोघेही खोटे हसत हसत तिच्या खोलीत गेले. त्या दोघांना हसत असलेले पाहून छिन्नमाने विचारले तो तुमचा तिसरा भिडू कुठे आहे आणि तुम्ही इतके हसत का आहात ? आम्ही तिला म्हंटले आनंदाची बातमी आहे रघूची अमेरिकेला जाण्याकरिता निवड झाली आहे आणि तो दोन दिवसापूर्वी गेलाही आहे.
चिन्नमा आनंदली आणि म्हणाली 'मग त्याला बायकोला भेटायला वेळ नाही का?'
'तस नव्हे, पण त्याला कंपनीतल्या इमरजेंसीमुळे कालच्या रात्रीच्या प्लाईटने अमेरिकेला जावे लागले त्यामुळे त्याला इकडे यायला वेळच नव्हता'
'मग त्याने माझ्याकरिता काही चिठ्ठी लिहली असेल कुठे आहे ती ?'
'नाही ग असती तर नक्की दिली असती. त्याची आणि आमची भेट सुद्धा झाली नाही कारण आम्ही तुमच्या घरी जाई पर्यंत तो निघून गेला होता.'
त्यानंतर तिची डिलिव्हरी होईपर्यंत आम्ही चार पाच वेळेला चिन्नमाला भेटलो दर वेळेला आम्ही तिला अमेरिकेतील वेगवेगळ्या हकीकती सांगून थापा मारायचो.
पण तिचं एकाच पालुपद होतं कि तो तिला पत्र का लिहत नाही आणि या प्रश्नाला आमच्याकडे उत्तर नव्हतं. अशातच रघूच्या मुलाचा जन्म झाला. बारशाच्या वेळी सुद्धा तिला काही सांगावयास पाटलांनी बंदी घातली. जन्मानंतर दोन आठवडयांनी वडिलांनी तिला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर जन्मभरात ती वडिलांशी, शेखर आणि अमृत सोबत बोलली नाही.
डिलिव्हरीनंतर तीन महिन्यांनी चिन्नम्मा सासरी आली. सासूला ती उद्योगात मदत करू लागली. एवढंच नव्हे तर तिने फॅशन डिजाइन चा कोर्स करून सासूला मदत केली. बंगलोर मधील ते प्रख्यात दुकान ठरले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users