पश्चिमेकडे सरकत्या सूर्यासोबत शुक्रवारदेखील पुढे सरकत होता.
निशाच्या टेबलावर दिवसभर खेळणारं ऊन आता उतरतीकडे झुकलेलं होतं. तिने आठवड्याच्या सुरुवातीला कॉम्प्युटरवर करून ठेवलेल्या टास्कलिस्टवर नजर फिरवली. बहुतांश कामं अजूनही पूर्ण झाली नव्हती, याउलट त्यात नव्या कामांची भर पडली होती. ई-मेल्स, मिटिंग्स, कॉल्स यामध्ये दिवस कधी सुरू व्हायचा आणि कधी संपायचा, हे तिलाही कळायचं थांबलं होतं.
Need this ASAP
Can you update the status of this project?
Client waiting for feedback
एकाच वेळी वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स बद्दल दिवसभर क्वेरीज येत राहायच्या.
काही महिन्यांपूर्वी कंपनीत मोठं restructuring झालं होतं. ‘कॉस्टकटींग’ मुळे तिच्याकडचे प्रोजेक्ट्स जास्त आणि रिसोर्सेस कमी झाले होते. अशा प्रकारच्या कामाचा व्याप निशाला रोजचाच झाला होता. त्यातही ती अधिकतर घरातून काम करत असल्यामुळे ‘घर’ आणि ‘ऑफिस’ यातली सीमारेषा पुसट होऊन, घर वेळकाळ नसलेलं ‘ऑफिस’ बनलं होतं.
सकाळी उठून मुलांचं आवरून त्यांना शाळेच्या बसला सोडायचं, नवऱ्याला डबा द्यायचा, आणि चहाचा कप घेऊन कॉम्प्युटरवर कामाला सुरुवात करायची. सततच्या मिटिंग्स, कॉल्स मध्ये तिच्या कपातला चहा कधी गार होऊन जाई, हे तिलादेखील कळत नसे. कामवाल्या मावशीने बेल वाजवली की लक्षात यायचं की ती सकाळपासून खुर्चीतून उठली देखील नाही. जेवणही बहुतेक वेळा जागेवरच, काहीतरी पटकन खाऊन उरकले जाई.
गेल्या काही आठवड्यांपासून तिला सतत थकवा जाणवू लागला होता. शारीरिक कुरबुरींसोबत सततचा थकवा, चिडचिड आणि रात्री झोपायला गेल्यावर दुसऱ्या दिवशीच्या कामांची यादी हे सोबतीला वावरू लागले. काही दिवसांपूर्वी तिच्या मैत्रिणीच्या, सीमाच्या स्टेटसवर एक पोस्टर दिसले.
Webinar: "How to Manage Stress- Practical Tips".
शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता वेबिनारसाठी तिने दोन आठवडे आधी नोंदणी केली होती. सकळपासूनच्या कामाच्या व्यापातदेखील ती वेबिनारची वाट बघत होती.
वेबिनारसाठी नोंदणी केल्यानंतर नेहमीच्याच धावपळीत दोन आठवडे कसे गेले हे निशालाही कळले नाही. त्यात मुलांच्या वार्षिक परीक्षांची भर पडली होती, त्यामुळे घरात, तिच्या रुटीनमध्ये गडबड अजूनच वाढली होती.
अखेर शुक्रवार उजाडला. मुलांच्या परीक्षांचा शेवटचा दिवस. तिचा नवरा, विजय मुलांना शाळेतून घेऊन आपल्या आईकडे राहायला जाणार होता. निशावरच्या कामाच्या ताणाची त्याला जाणीव होती. त्यामुळे ‘तुझं काम लवकर आटोपलं तर तू देखील ये, नाहीतर आराम कर’ असं सांगून तो सकाळी बाहेर पडला.
संध्याकाळ थोडी निवांत मिळेल या आशेने निशा नेहमीप्रमाणे चहाचा कप घेऊन आपल्या टेबलापाशी आली आणि कामाला लागली. पण काही वेळातच प्रॉडक्शनमध्ये एक मेजर इश्यू आला, त्यानंतर तिचा पूर्ण दिवस कॉल्स, मीटिंग्स यानेच व्यापून घेतला. घड्याळाकडे लक्ष गेलं तेव्हा चार वाजत आले होते. तिने पटकन उठून जेवण उरकून घेतलं. अजून दोन महत्वाचे रिपोर्ट्स पाठवायचे होते. ते सहाच्या आत पाठवले तर शांत मनाने वेबिनार ऐकता येईल म्हणून ती पुन्हा काम संपवण्यात गुंतली. रिपोर्ट्स पूर्ण करून ते पुन्हा एकदा तपासले आणि सेंड बटनावर तिने क्लिक केले.
सव्वा सहा वाजले होते.
निशाच्या समोर खरंतर अजून कामाच्या ईमेल्सचा ढीग होता. पण एकीकडे वेबिनार ऐकत दुसरीकडे काम करता येईल असा विचार करत ती वेबिनारला जॉईन झाली. अतिशय मृदु आणि समजूतदार आवाजात वेबिनारच्या स्पीकर बोलत होत्या. तणाव म्हणजे काय? तो टाळायला वेळेचं व्यवस्थापन, विश्रांतीसाठी पुरेसा वेळ, भरपूर पाणी, संतुलित आहार या बद्दल बोललेलं तिच्या कानावर पडत होतं.
“Stress always starts in your mind.”
हे वाक्य कानी पडताच एकीकडे ईमेल्सचा गुंता सोडवत असलेली निशा क्षणभर थांबली. खरंच सगळं डोक्यातून सुरू होतं? स्पीकरने तणाव दूर करण्यासाठी काही एक्सरसाईज सांगायला सुरुवात केली.
“दिवसातला थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा, थोडा पॉज घेऊन चांगल्या गोष्टींसाठी स्वतः स्वतःचं कौतुक करायला विसरू नका, तुमच्याकडे खूप काम असेल तर नाही म्हणायला शिका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 'तातडीचं' आणि 'महत्त्वाचं' यात फरक करायला शिका.”
Urgent vs Important किती मोलाचं आहे हे वाक्य अशी निशाने मेंटल नोट केली. तिच्या डोळ्यांपुढे दिवसाची धावपळ पुन्हा उभी राहिली. सतत 'तातडीचं' म्हणून धावत राहणं, आणि त्यामुळे खरोखर 'महत्त्वाची' कामं सतत बाजूला राहणं. ती हे ऐकत असतानाच तिच्या मॅनेजरचा कॉल आला. दिवसभरातील इश्यूजवर त्याला बोलायचे असेल हे जाणवून ती वेबिनारमधून बाहेर पडून तिने कॉल घेतला. “तू फार चांगलं हँडल केलंस आज,” एवढं बोलून तिला पुढच्या कामांची यादी दिली.
कॉल संपवून ती वेबिनारमध्ये परतली. पुन्हा स्पीकरच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करू लागली. पण पुन्हा तातडीने उत्तर द्यायच्या ईमेल्स, मेसेजेसमुळे ती वेबिनारकडे लक्ष देऊ शकली नाही. सकाळपासून काम करून आता ती थकली होती.
Urgent vs Important हा मुद्दा तिच्याभोवती फेर धरून होताच.
तिने लॅपटॉपवरच्या कामाच्या यादीकडे नजर टाकली. महत्वाच्या कामांची नोंद करून पुढच्या आठवड्याच्या टास्क लिस्ट वर टाकली. वेबिनार अजूनही सुरूच होता. तिने लॅपटॉप बंद केला. नवऱ्याला संध्याकाळी येत नसल्याचा मेसेज केला. तिच्या बेडसाईड टेबलवर कित्येक दिवस पडलेलं पुस्तक उचललं, घराला कुलूप लावलं आणि खाली उन्हाळ्यात बहरलेल्या गुलमोहराखाली असलेल्या बेंचच्या दिशेने निघाली.
स्पीकरने सुचवलेल्या एक्सरसाईज ऐवजी तिने 'अनलिस्टेड एक्सरसाईज' निवडली होती. गुलमोहराखाली पोहचून तिने दीर्घ श्वास घेतला.. आणि तातडीच्या कामांना तात्पुरता विराम लावून ' स्वत:ला वेळ देण्याच्या' महत्त्वाच्या कामाची निवड करत तिने पुस्तक वाचायला सुरुवात केली.
@ शिल्पा गडमडे
छान कथा.
छान कथा.
'तातडीचं' आणि 'महत्त्वाचं' यात फरक करायला शिका. >> खरं आहे अगदी