आनंदाचे झाड

Submitted by शिवानी बलकुंदी on 21 May, 2025 - 05:53

आनंदाचे डोही आनंद तरंग.. तुकोबांच्या या अभंगातून आनंद ओसंडून वाहताना जाणवतो. आनंदाचे उधाण, आनंदाचा झरा, अशा शब्दांमधून अगणित आनंद व्यक्त होताना दिसतो. नुसता आनंद हा शब्द जरी ऐकला तरीही कुठेतरी त्याच्या लहरी क्षणभर का होईना मनात उमटतातच.
कल्पवृक्ष ज्या प्रमाणे कल्पिलेली वस्तू आपल्याला मिळवून देतो त्याच प्रमाणे एखादे आनंदाचे झाड जर सापडले तर ते प्रत्येकाला आनंद देत राहील असेच वाटून गेले.
आनंद म्हणजेच सुख असा आपला समज असतो. पण आनंद आणि सुख हे दोन्हीही वेगवेगळे आहेत. कुणाला सुखाचा शोध घेतानाच आनंद सापडतो तर कधी कधी माणूस सुखाच्या शोधात रोजच्या जगण्यातला आनंद गमावून बसतो, त्यामुळे ते सुख हाती लागे पर्यन्त तो आनंदी होणे विसरून च जातो.
मग जगण्याच्या या रहाट गाड्या मध्ये कुठे बरं असतो हा आनंद, असे काही आनंदाचे झाड खरंच असते का? असा विचार केल्यावर वेगवेगळी उत्तरे सापडली. जसे की ..
कुणाला गाणी ऐकण्याचा तर कुणाला म्हणण्याचा.
कुणाला चित्रपट बघण्याचा तर कुणाला मालिका बघण्याचा
कुणाला वाचण्याचा तर कुणाला चित्र काढण्याचा
कुणाला प्रवासाचा तर कुणाला भटकंतीचा
कुणाला खाण्याचा तर कुणाला खाऊ घालण्याचा
कुणाला वस्तु खरेदी करण्याचा तर कुणाला वस्तु दुसऱ्यांना देण्याचा
अशी यादी केली तर एक ना अनेक उत्तरे सापडतील. यातील सगळ्या जरी नाही तर खूप साऱ्या गोष्टी मधून जो तो आपापला आनंद शोधीत असतो.
पण जेव्हा आपण तीच ती कृती सारखी सारखी करतो त्यावेळी त्या कृती मधून आपल्याला आनंद मिळतो हेच आपण विसरून जातो. आणि मग ती आनंद देणारी गोष्ट सोडून इतर गोष्टी ज्या दिवसभरात आपल्या अवती भवती घडत असतात, जसे की
न आवडणारे संवाद, विसंवाद, अप्रिय घटना, काहीतरी मनाविरुद्ध घडलेले प्रसंग अशा असंख्य गोष्टींमुळे मग आपण आपल्या जीवनातील लहान लहान गोष्टी ज्या आपल्याला कायम आनंद देत असतात हेच विसरून जातो, आणि इतर अप्रिय प्रसंगांचाच विचार करीत असतो.
अनेक वेळेस आपण ठरविलेले घडत नाही. किंवा ठरलेल्या वेळेत होतेच असे नाही आणि सगळे मनाविरुद्ध च घडत जाते. मग आपले मन देखील दुखा: ने व्यापून जाते.
आणि मग ती रोजच्या जगण्यातून आनंद देणारी गोष्ट पण आपण दुखी: होऊनच यांत्रिक पणे करीत असतो.
मग अचानक येणारा मैत्रिणीचा फोन, किंवा अचानक लागलेले एखादे आवडीचे गाणे, किंवा खरेदीला गेलो असताना आपल्याला हवी असलेली वस्तु मिळणे आणि त्यामुळे आपल्या ओठावर हलकेच उमटलेले हसू तोच एक क्षण आपल्याला आनंद देऊन जातो.
मग अशा आनंद देणाऱ्या लहान लहान क्षणांना, कृतींना, गोष्टींना आणि प्रसंगांना एकत्र करून आपण त्याचे झाड आपल्या अंगणात लावले तर..
तर मग आपल्याला कधीही हवे तेव्हा आनंद मिळविता येईल.
आणि सुखाच्या शोधत निघालेल्या वाटसरू ला देखील रस्त्यात असे आनंदाचे झाड सापडले तर तो त्याच्या गर्द छायेत जरा वेळ विसावा घेऊंन आनंद ची अनुभूति घेऊ शकेल.

#सुरपाखरू #प्रयोग२०२५
शिवानी बलकुंदी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आनंद = मोद हे संपूर्ण गणपतीचे कारकत्व. त्याची कृपादृष्टी. जरी ज्याची त्याची भक्ती म्हटले तरी. माझ्या वाचनानुसार गणपतीही आनंद देणारी देवता आहे.

@ सामो भक्ति मधला आनंद हा प्रत्येकाच्या भावानुसार, त्याच्या आवडत्या दैवतानुसार वेगवेगळा असू शकतो. गणपती बाप्पा तर आनंदाचेच् प्रतीक आहेत.