आपली गोष्ट - रेडवूड वारी

Submitted by sugandhi on 6 May, 2025 - 22:59

प्रस्तावना - https://www.maayboli.com/node/86676

कधी कधी घरामध्ये, ऑफिसमध्ये सगळीकडेच काही ना काही लहान सहान खूपत रहातं. लहानसच, बागेत काम करताना हातात गेलेल्या तुसासारखं - म्हटलं तर काहीच नाही, पण नाही तर ठसठसत राहतं. मग घर मुलं, मांजर, बागकाम कशातच जीव रमत नाही. कोणीतरी आपल्याला बांधून ठेवलंय असं वाटत राहत पण गाठ सुटत नाही..

सुदैवाने माझ्याकडे माझ्या सगळ्या त्रासांवर एक रामबाण उपाय आहे - रेडवूड वारी! अर्धा दिवस मोकळा काढावा आणि रेडवूडच्या जंगलात चालायला जावं.

रेडवूडच्या जंगलात काहीतरी जादू आहे. तिथे चालायला लागलं की बाकी सगळं विसरायला होतं. जसं जसं जंगलात आत जायला लागते, तशी मी सैलावत जाते. एखाद्याला शांत, सुंदर मंदिरात जाऊन वाटेल तसा माझा जीव तिथे सुखावत जातो. ती उंच झाडं, पायाखाली उगवलेले हिरवे कंच नेचे आणि ओली गार हवा मला अगदी आतपर्यंत शांत करते. एखाद्या खळखळणाऱ्या - नाही नाही - झुळझुळणाऱ्या छोट्याशा झऱ्यापाशी आपोआपच पाय मंदावतात. थंड हवेत असलेले तुषार, ओल्या रेडवूडचा सुगंध, उंच झाडांमधून खाली येणारी उन्हाची सोनसळी तिरीप, तिच्यात दिसणारे इवले इवले कण, पाण्याचा संथ आवाज आणि लय... अलगद आपल्याही श्वासाची लय सापडते. आतून ओढणारी गाठ अलवारपणे उघडते. जणू हलकेच कोणीतरी सगळा भार उचलला आहे आणि तो जिवलग मला सांगतो आहे - 'वर्षानुवर्ष उभा आहे ग मी इथे आभाळाला हात लावून! तुझं आकाश कोसळु देणार नाही मी तुझ्यावर!! कसल्या तुझ्या छोट्या छोट्या काळज्या, दे सोडून सगळ्या! वणवा येवो वा वादळ, आपण आपलं उन्हाकडे वर वर जात राहावं..'

या रेडवूडच्या झाडांशी असं खास नातं जुळलं आहे. ही झाडं माझी जणू विठ्ठल रखुमाई आहेत - युगानुयुगं तिथे उभी असलेली! कधीही त्यांच्या पायाशी जाऊन बसावं. भीतीच्या क्षणी माझी भीती किती फोल आहे ते सांगणारी, माझ्या हातात नसलेल्या गोष्टींची चिंता न करायला शिकवणारी आणि आनंदाच्या क्षणी आपल्या विशालतेपुढे मला नम्र व्हायला लावणारी - माझी रेडवूड!!

इतकीच इच्छा आहे की आयुष्यात शेवटपर्यंत हे खास नातं माझ्या सोबत रहावं आणि ते साजरं करण्यासाठी पुन्हा पुन्हा रेडवूड वारीला जाण्या इतका वेळ आणि बळ माझ्या ठायी राहावं!!

तळटीप -
ज्यांना रेडवूडच्या झाडाविषयी माहिती नाही अशा लोकांसाठी - अतिशय उंच आणि भव्य झाड ही रेडवूडची खासियत आहे. त्यांच्या उंचीमुळे, जंगल थंड आणि जमिनीवरही हिरवंगार असतं. या लिंकवर तुम्ही अजून माहिती वाचू शकता https://www.nps.gov/redw/index.htm

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय.
एक निरिक्षण- 'झुळझुळणारं' हे विशेषण शक्यतो झऱ्याला वापरतात.

Thank you अ'निरु'द्ध, झुळझुळणारा - हे खळखळणाऱ्यापेक्षा संथ म्हणून विशेषण वापरलं होतं.
पण तुमचं खरं आहे नदीपेक्षा झरा हा शब्द तिथे चांगला वाटतो. बदल केला आहे.

Thank you सगळ्यांच्या प्रतिसादासाठी! रेडवूड खूप खास आहेत माझ्यासाठी. हा अनुभव लिहिताना खूप वाटत होतं की दरवेळी तिथे गेल्यावर मला काय वाटतं ते मला सगळ्यांपर्यंत पोहोचवता येईल की नाही.. पण तुमचे सगळ्यांचे प्रतिसाद बघून खूप छान वाटलं