अंधारयात्रा

Submitted by anudon on 1 May, 2025 - 19:28

खुप वर्षांपूर्वी मी Palomar observatory माऊंटनला गेले होते. ही observatory Palomar State Park आहे, म्हणजे पर्वतावरच्या जंगलातच! observations मुळे रात्रीचं जेवण ५ वाजताच करुन आशिषबरोबर observatory ला गेले. थोड्या वेळानं मी monastery ला परतायचं ठरवलं. Observatory ते monastery अगदीच अर्धा किलोमीटर अंतर. मी बाहेर पडले, मागे भल्यामोठ्या telescope च्या dome चा दरवाजा बंद झाला आणि मी फक्त ओरडण्याची बाकी राहीले होते. इतका मिट्ट काळोख. काळोख ह्या शब्दाचा अर्थ जाणवला, त्या क्षणाला. अगदी आपलं अवघं अस्तित्व त्या काळोखात विरघळून जाईल असा तो काळाकभीन्न अंधार. काही सेकंद मला भानावर यायला लागली, आणि वर पाहिलं, आणि आकाशाच्या सौंदर्यानं माझं भान हरपलं. क्षणभरांपूर्वीचा विरघळून टाकणारा अंधार, मला त्या चांदण्यांच्या झुंबरांच्या राजमहाली घेऊन आला होता.

देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा.
तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा (आरती प्रभू)

घरं भरलेलं असतं, नातेवाईकांनी, पाहुण्यांनी. गेले काही दिवस सतत कशाची तरी घाई/गडबड सुरू असते. नेहमीच्या हक्काचे निवांत क्षणही गेले काही दिवस जवळपास फिरकले नसतात. असाच एक दिवस संपायला आला असतो. रात्रीची जेवणं गप्पाबरोबर आटोपतात, अंथरूण/पांघरूण यांची व्यवस्था होते. दिवे मालवले जातात. तेवढ्यात गच्चीवरच्या टाकी चेक करण्यासाठी, अंथरूणाची उब सोडून उठावं लागतं. गच्चीवर जाणं होतं. परतांना पावलं रेंगाळतात. अंधारातसुद्धा परसातील उंच झाडं ओळखीचं हसतात. आजूबाजूच्या घरांघरांमधून मंद प्रकाश पसरलेला असतो. आणि अगदी अचानक निवांतपणाचे क्षण भेटीस येतात. भेट ओझरतीच असते.

मध्यरात्रीच्या निवांत प्रहरी,
सौंधावरती उभे राहावे
झुळझुळता अंधार भोवती,
पुन्हा नवेपण मनास यावे (इंदिरा)

नाटकाची दुसरी घंटा होते. नाटकाची property पुन्हा पुन्हा तपासली जाते. माईक्स ON आहेत ना, याची खात्री केल्या जाते. जसजशी पडदा उघडण्याची वेळ जवळ येते, विंगेमधला अंधार वाढतो, हालचाली थांबतात, पात्रे आपल्या entry च्या जागा पकडतात. त्या अंधाराच्या गर्भात काही मिनिटांनंतर सादर होणाऱ्या नाटकाची बीजे अंकुरत असतात. रंगमंचावर पडणाऱ्या प्रकाशाची, उच्चारल्या जाणाऱ्या शब्दांची, पात्रांच्या संवादफेकीची …

नांदीनंतर पडदा उघडला
तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो: हजारो रंगीबेरंगी शब्दांनी
शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आवीर्भावांनी,
भीतीनी, आशांनी, अपेक्षांनी (कुसुमाग्रज)

आपण प्रकाशाच्या उल्हासित जगात रममाण असतो. सूर्यास्त कधी झाला हे आपल्याला समजत देखील नाही. काही वेळातच सूर्यप्रकाश मंदावतो, आणि अंधार हळूच, चाहूल न लागू देता, चोरपावलाने येतो. पूर्ण काळोख झाला नसतो, प्रकाशाची पावलं मात्र दूर गेली असतात. दिवसाची उर्जाही नाही आणि अंधाराची ऊबही नाही. काहीएक कारण नसतांना, वर्तमानात तसं काही घडलं नसतांना, मनात अनामिक हूरहूर दाटून येते, काहीतरी हातातून सुटल्यासारखं वाटतं. हीच ती कातरवेळ.

धामणस्कर आठवतात.

…. नेहमीच कशी अचानक दिवेलागण झालेली असते
आणि अंधार आपल्यामध्ये आत आत उतरलेला ?

वडील गेल्याचं कळलं, आणि दुसऱ्या दिवशीचं विमान पकडून, मी घरी जायला निघाले. पूर्ण प्रवास मन थाऱ्यावर नव्हतं. नुसता गोंधळ उडाला होता. मधूनच काहीवेळ झोप लागायची, जाग आल्यावर दुसऱ्या क्षणालाच वर्तमानाची जाणीव व्हायची आणि मन अगदी सैरभैर व्हायचं. इतर प्रवासी/जेवण/TV नेहमीच्या गोष्टी आजूबाजूला असूनही मला जाणवतच नव्हत्या. किती किती अणि काय काय विचार येत होते. कसाबसा प्रवास संपला, मी घरी पोहोचले तेव्हा सकाळचे तीन वाजत असतील/नसतील. आई भेटली, भावंडं भेटली. बाहेर आणि आत अंधाराचंच साम्राज्य होतं.

अंधार असा घनभारी
चन्द्रातुन चन्द्र बुडले
स्मरणाचा उत्सव जागुन
जणु दुःख घराला आले (ग्रेस)

कधीतरी अचानक रात्री जाग येते, नेहमीच्या आजूबाजूच्या गोष्टींनी अंधारात वेगळंच रूप धारण केलं असतं. खोलीतलं सामान, इकडे तिकडे पडलेली पुस्तकं, कपडे ह्यांचे आकार निराळेच भासू लागतात. बाहेरून येणाऱ्या मंद प्रकाशाच्या छायालहरी, खोलीच्या जमिनीवर, भिंतीवर आणि छतावरही हेलकावत असतात. दार खिडक्यांचे पडदे कसल्यातरी अटळ घटीताच्या चाहूलीने हलत असतात. Lamp shades, book shelves, खुर्च्या ह्यांच्या भिंतीवर पडणाऱ्या सावल्या, आरशात पडणारी अंधुकशी प्रतिबिंबे … जणू काही समुद्रात पाण्याखालचं जग असावं, तसं सगळा सभोवार अंधाराच्या आवरणाखाली बुडून जातो.

अजून आहे रात्र थोडिशी,
असेल अधिकहि…कुणि सांगावें?
अर्धी जाग नि अर्धी निद्रा
इथेंच अल्गद असें तरावें! (पाडगावकर)

ट्रेन मधल्या रात्रीच्या प्रवासात जो अंधार भेटतो, तो अगदी शहाण्या, तत्वचिंतक मित्रासारखा. आधीच प्रवास म्हणजे, दोन स्थिर बिंदूंमधली स्थिती. त्यामुळे तो सुरू झाल्यावरच एक विरक्तीची/ let it go ची भावना उमटते मनात आणि तो प्रवास जर का जमिनीवरच्या वाहनातला असेल, बाहेरच्या क्षणागणिक बदलणाऱ्या चित्राकडे पाहतांना, living in the moment हे आयुष्याचं तत्वज्ञानही आपण गिरवत असतो.

आतां तूं जेथें असशील तोच मुक्काम आहे
आतां तूं जें जें करशील तेंच काम आहे (मुक्तीबोध)

रात्र झाली असते, बहुतेक प्रवासी पेंगुळलेले असतात. त्या डब्यात कितीतरी मनोविश्वे एका लयीत गुंफल्या गेली असतात. मी एकटी आहे, पण तसे सगळेजणंच एकटे आहेत, ही जाणिव हलकेच अंधाराबरोबर मनावर तरंगत असते. सहप्रवाशांमुळे आणि ट्रेनच्या गतीमुळे आयुष्याकडे वस्तुनिष्ठेनं बघण्याचं सहज साहस अंगी येतं.

हातातून भुळुभुळु गळणारी आयुष्याची माती
कुठल्या अज्ञात ठिकाणी जमा होत असेल आता?
कुठला अगम्य आकार धारण करीत असेल?
लांबलचक नीज संपवून लख्ख प्रकाशात
डोळे उघडावेत आणि
सर्व काही स्पष्ट दिसू लागावे.
तसे होईल ….? (गुरूनाथ धुरी)

Group content visibility: 
Use group defaults

अंधारातली ऊब, अंधाराच्या छटा किती सुंदर दाखवल्या आहेत. मस्त.
तुमच्या लेखामुळे परिणितामधलं 'रात हमारी तो' आठवलं.

फार हृद्य आठवणी आणि मस्त लिहिलंय.

नायगारा फॉल्सच्या इथे, बोटीतून अगदी धबधब्याच्या ( ऑलमोस्ट ) थेट खाली घेउन जातात. अगदी धबधब्यापाशी जाऊन बोट जेंव्हा थांबते तेंव्हा इतके तुषार आनि बाष्प असतं की धबधबा तर दिसत नाहीच, सहप्रवासी सुद्धा नीट दिसत नाहीत Happy . मला तो अनुभव कायम पांढरा अंधार वाटतो. कितीदा गेले तरी प्रत्येकदा नव्याने जाणवतो

सुंदर!
बरेच काही उलगडलेत.. आणि प्रत्येक चित्र आधीपेक्षा वेगळे ..

व्वाह!!! कितीतरी दिवसांनी आतून आतून आलेलं, कनेक्ट झालं…
अंधारयात्रा, एकट्याच्या अंधारातल्या प्रवासातली… चालूच आहे! छान लिहिलंय!!!

खूप सुंदर!

अंधार पडल्यावरचा समुद्र वेगळाच भासतो. "झालं की नाही समाधान? की अजून काही हवंय तुला?" असं तो विचारतोय असं मला वाटतं नेहमी. टिपिकल बीच-चौपाटी नाही हं, समुद्र! उधाण येणारा असतो ना, तो. किनार्‍यावरच्या पावसाळी रात्री गूढ आणि अद्भुत असतात. रहावत नाही म्हणून एक अनुभव लिहू?

गेल्याच वर्षी मी आईकडे रत्नागिरीला गेले होते. मे महिन्यात. आणि एका संध्याकाळी जरा पावसाळी हवा झाली. आणि रात्री बेफाम पाऊस कोसळला. बेफाम म्हणजे इतका, की आईच म्हणाली की ४०-४५ वर्षांत असा तासाभरात धिंगाणा घालणारा पाऊस झाला नव्हता. सेफर साईड म्हणून इलेक्ट्रिसिटी कनेक्शन्स मेन लाईनचीच बंद होती. सगळा परिसर अंधारात बुडालेला. रात्रीचे ११:३० झाले होते. प्रचंड गडगडाट आणि त्या अंधाराला चिरून काढणार्‍या विजा! बाल्कनीच्या दारातून नुसती चक्कन चमकलं आणि सुरीचं पातं लखलखावं तसा तो अंधार क्षणभर उजळून गेला होता.... खरं तर मी शब्दांत सांगू नाही शकत असा तो अनुभव होता. भिती नाही वाटली, पण डोळे विस्फारले गेले.
या अशा अंधारात जाणवतं की आपण किती हुशारीच्या, प्रखर बुद्धिमत्तेच्या डिंग्या मारल्या तरी उजेडाची सोडा, अंधाराचीसुद्धा बरोबरी करू शकत नाही इतका तो विशाल आहे!

छान लिहिलंय...
अंधाराचे विविध प्रकार! आजकाल भारतातल्या शहरांमध्ये असा अंधार नावालाही नसतो.
लहानपणी आपण असा अंधार पाहू शकलो याबद्दल स्वत:ला नशीबवान समजावं असं वाटतं.

तीच गत शांततेची!