“काय गं? दिसला का आज तुला कृष्ण?”
आपल्या सुडौल कंबरेवर आणि डोईवरच्या चुंबळीवर गोड्या दह्याने तुडूंब भरलेली दोन मडकी विसावून आपल्याच धुंदीत, किनऱ्या कंठातून कसलंसं पद गुणगुणत चाललेल्या एका गवळणीला दुसरी एक जण मधात छेडत म्हणाली.
“अं?”
या एकाक्षरी प्रश्नाच्या मागोमाग, कृष्णाचं नाव ऐकून ओठांवर अलगद तरळलेलं हसू अगदी एका क्षणाच्या अंतराने तिच्या ओठांतून बाहेर पडलं. आपल्या तंद्रीतून बाहेर येत ती म्हणाली,
“हो तर! दिसला ना. आताच पाहून आले.”
“काय करत होता गं?”
पहिली गवळण काहीशी उतावीळ होत म्हणाली.
“बाई गं काय सांगू तुला? नुकताच झोपून उठलेला. अंगणात दाणे टिपायला आलेल्या चिमण्यांच्या मागे दुडूदुडू धावत होता. त्याने हात उंचावल्यावर एखाद-दोन चिमण्या भूर्रर्रकन उडाल्यावर खट्याळपणे एकटाच खुदुखुदु हसत होता, तर कधी कधी त्याच्या हाताने चिमण्यांचा अख्खा थवाच उडून गेल्यावर जोराने किलकारी मारत त्यांच्या मागे धावत होता. मग काही क्षण आपल्या टपोऱ्या चंचल डोळ्यांनी दूर जाणाऱ्या थव्याकडे कुतुहलाने पाहत होता.
कधी कधी चिमणीच्या मागे दोन्ही हात वर करून लटपटत धावता-धावता मधातच कमरेवरून अर्धवट निसटलेल्या पितांबरात पाय अडकून धप्पकन पडायचा. कधी तसाच धरणीवर काहीकाळ पालथा पडून टक लाऊन राहायचा,
मग हळूच उठून स्वतःशीच हसायचा डोळ्यांवर आलेल्या कुरळ्या केसांच्या बटा डाव्या हाताने मागे सारायचा आणि उठून पुन्हा चिमण्यांमागे धावायला लागायचा. धावता धावता स्वतःच्याच नकळत पायातल्या पैंजणाशी किणकिणता छुम-छुम ताल धरायचा.
बाई गं… इतकं लोभसवाणं रूप की नुसतं पाहतच रहावं. असं मोहक हसू की त्यात आपलं अस्तित्व विरघळून जावं. सखे खरच गं अजूनही ते राजस रूपडं माझ्या डोळ्यांसमोरून जात नाहीये अजूनही बाळकृष्णाची देखणी छबी माझ्या मनाला आनंदाचं भरतं आणतिये. सखे, ब्रह्मानंद की काय म्हणतात तो हाच का गं?”
काहीकाळ दोघीही कुठेशा दंग झाल्या. किती काळ लोटला कोणास ठाऊक, मग भानावर येत पाहिली म्हणाली,
“येते मी आता. तू बाजारी चाललीस ना? तू हो पुढे मी ही आलेच.”
“हो.”
कंबरेवरचं मडकं नीट करत ती पुढे चालती झाली तेच मघाचं पद आपल्या किनऱ्या कंठातून गात,
बाई नंदाचा कान्हा,
वेड लावितो जीवाला
छूमछूम पैंजणा निनादे,
हा हर्षवी मनाला
बाई नंदाचा कान्हा…
सुंदर
सुंदर
अनुभवण्याची गोष्ट आहे फक्त.