अंतरात सतत... धुंद वातावरण!

Submitted by मनोज मोहिते on 8 April, 2025 - 14:52

मनोज मोहिते

एक हा असा पेंटिंगचा...

तो बिहारमधल्या मुझफ्फरपूरनजीकच्या एका गावचा. चैनपूरचा. ‘शहर से सटा हुआ है यह गांव. शहरी परिवेश और ग्रामीण परिवेश दोनो दिखता है यहां...’ तो सांगत होता. या गावात फर्दो नदी आहे. तिचे नाव नारायणीही आहे. ओळखली जाते, फर्दो म्हणूनच. तो ज्या शाळेत शिकला, त्या शाळेत डॉ. राजेंद्र प्रसाद, राष्ट्रकवी दिनकर शिकले आहेत. गुरुजींमुळे तो चित्रकलेशी जुळला. जवळचा झाला. मधुबनी चित्रशैली शिकला. चित्रे करता करता एक दिवस अचानक घर सोडले. गावातून निघायचेच होते त्याला. जिद्द! आणि तो नागपूरला आला.

हरिशंकर परसाई, मुक्तिबोधांमुळे त्याला नागपूर ठाऊक होते. हा इतका शोध लावण्यालाही जाण लागते. ती आहे त्याच्यात. तो गावी साहित्य वाचायचा. साहित्याच्या संपर्कात असायचा. तो अजूनही वाचतो. कविता लिहिण्याचा प्रयत्न करायचा. अजूनही करतो. आज तो नागपुरात शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. पेंटिंगला आहे. या कॉलेजविषयी त्याला, त्याच्यात चित्रकलेची आवड निर्माण करणाऱ्या शिक्षकाने सांगितले होते.

मधुबनी चित्रे काढता काढता त्याला चित्रांचे ‘बिहेव्हिअर’, त्यातले ‘एथिक्स’ जरा कळू लागले होते. या विषयाचा आवाका मोठा आहे, याची त्याला जाणीव आहे. ही जाणीव वेळच्या वेळी असणे गरजेचे असते. अन्यथा कधी तोल जाईल हे सांगता येत नाही. रंगांशी खेळता खेळता कितीतरी रंगांत बुडून गेले आहेत. हे निरर्थक बुडणे. वाताहत! पॅलेटमध्ये रंग सांभाळणे अंगवळणी पडते, तसे स्वत:चा तोल सांभाळणेही जमायला हवे. किमान हे भान वेळीच यायला हवे. हे भान राखायला हवे. हे असे भान हवे, हे त्याला थोडे तरी ठाऊक आहे. हे भान जागे ठेवण्याची जबाबदारी त्याचे आताचे शिक्षक जाणून आहेत. त्याच्याशी बोलत राहतात. ‘लोककलेला मुख्य प्रवाहातल्या कलेशी जुळविण्याचे कसब याने साधले पाहिजे’, असे शिक्षक त्याला सांगतात. त्याला सांभाळतात. असे सांभाळणारे त्याच्या भोवती आहेत काही. त्याची काळजी वाहतात. दोस्त बने है, दोस्तों ने संभाला है!

याचे विद्यार्थी म्हणून नुसते शिकणे सुरू नाही. तगण्याचेही प्रयत्न सुरूच आहेत. अनोळखी शहरात तगणे. न ठाऊक असलेल्या शहरात आलेल्या माणसाला आधी शहराचा भूगोल जाणून घ्यावा लागतो. तो जाणून घेता घेता शहराचा स्वभाव लक्षात येऊ लागतो. हा स्वभाव लक्षात आला की, टिकण्याची स्वत:ची क्षमता पडताळून पाहता येते. ती तो पडताळून पाहत आहे. दिवस-रात्र त्याची तडतड सुरू आहे. त्याचे मित्रही सांगतात. महाविद्यालयाच्या वार्षिक कला प्रदर्शनात ड्रॉइंगचा डिस्प्ले होता. त्यात नेमक्या तीन ड्रॉइंगनी लक्ष वेधून घेतले. ते याचेच होते. अभिषेकचे. यंदा त्याच्या ‘वर्क’ला पुरस्कारही मिळाला. स्वीकारायला गेला तेव्हा खूश होता. मित्र त्याहून खूश होते.

आज अभिषेक नागपुरात आहे. उद्या कुठेतरी असणार. कधी तरी गावीही जाणार. तो म्हणतो, ‘झाडापानांच्या सहवासात वाढलो.’ ती झाडेपाने त्याच्या अंतरात सतत हिरवी राहू देत!

आणि हा असा एक अप्लाइडचा...

नटराज आर्ट अॅण्ड कल्चर सेंटरच्या अप्लाइड थर्डच्या वर्गखोलीत शिरलो. एकेक कॅम्पेन पाहू लागलो. अप्लाइडच्या पहिल्या वर्षापासून तिसऱ्या-चौथ्या वर्षाला येईपर्यंत कॅम्पेनची ओळख होऊ लागते विद्यार्थ्यांना. असाइन्मेंट पूर्ण करणे आणि असाइन्मेंट जीव लावून पूर्ण करणे यातला फरक काहीच विद्यार्थ्यांना कळतो. ज्यांना कळतो, त्यांचे हे कळणे कामात दिसते. काही बॅचमध्ये अशी मुले असतात. काहींमध्ये जास्त असतात, काहींमध्ये कमी, असा प्राध्यापकांचा अनुभव असतो. मध्ये सृष्टीशी अप्लाइडवर बोलत होतो. आताच्या विद्यार्थ्यांच्या मनात काय आहे आणि जे आहे ते कामात नेमके उतरते का, असा काहीसा या चर्चेचा विषय.

तर, एकेक कॅम्पेन बघत होतो. समजून घेत होतो. आणि एका कॅम्पेनपाशी थांबलो. या कॅम्पेनचा विषय बघून मनापासून हसलो. हसण्याला मनातल्या हसण्याची जोड मिळाली की हसण्यातला आनंद देहभर पसरतो. तसेच काहीसे झाले. ते कॅम्पेन होते, इंडियन कॉफी हाउसचे. शाखा, सदर, शहर नागपूर.

शहरात तेव्हा तीन इंडियन कॉफी हाउस होते. गोकुळपेठेतल्या आता बंद पडलेल्या इंडियन कॉफी हाउसमध्ये अनेकदा गेलो आहे. बसलो आहे. इंडियन कॉफी हाउसमध्ये नुसते जाऊन चालत नाही. बसावे लागते. थोड्या वेळाची का होईना, एक बैठक लागते. हे बसणे आपले केवळ बसणे नसते. हे आपल्यातल्या वेगाला थांबवून जरासा सावकाशपणा अनुभवणे असते. ते अनुभवता येण्याची ही हक्काची जागा आहे. हा हक्क या जागेने येणाऱ्याला प्रत्येकाला आपणहून दिला आहे. हक्काने दिला आहे. आपण या हक्काचा सन्मान करायला हवा. जरा तरी वेळ येथे निवांत बसायला हवे. हवी तर कॉफी घ्यावी, हवा तर चहा घ्यावा.

हे सारे आठवले. आपल्या आवडीच्या गोष्टीला कुणीतरी वेगळा विषय म्हणून मांडतो, तेव्हा होणारा हा आनंद आहे. याच आनंदातून उत्कर्षला म्हणालो, ‘यार, माझ्या आवडीच्या ठिकाणावर तू कॅम्पेन केले.’ थर्ड इयरच्या उत्कर्षचे हे कॅम्पेन. विषय त्याने स्वत:च निवडला. म्हटले, ‘कॉफी हाउस कसे काय?’ तर म्हणाला, ‘फिरता फिरता एकदा सदरच्या या कॉफी हाउसमध्ये गेलो होतो.’ हा पठ्ठा राहतो जयताळ्यात आणि फिरता फिरता गेला सदरमध्ये. गेला तर गेला, तिथल्या कॉफी हाउसमध्ये गेला. तिथे त्याला ‘सब्जेक्ट’ जाणवला. तो त्याने करायला घेतला आणि केलाही. त्याच्या या कॅम्पेनमध्ये छायचित्रांचा वापर आहे. साजेशी ‘कॉपी’ आहे. कन्सेप्ट लेव्हलवरही त्याने विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी बऱ्यापैकी पूर्वतयारी केली.

तो तिथे येणाऱ्या माणसांशी बोलला. तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोलला. येथे माणसांचे माणसांना भेटणे, येथे एकट्याने येणे आणि स्वत:ला भेटणे त्याने समजून घेण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे तिथल्या वातावरणाशी बोलत राहिला. ‘इंडियन कॉफी हाउस’ ही संस्कृती आहे. ती आपल्या परीने समजून घेत राहिला. हे समजून घेणे त्याने कॅम्पेनमध्ये उतरवले. तो सांगत होता, मेन्यू कार्डला रेट्रो फील यावा म्हणून टाइपरायटिंगचा फॉण्ट घेतला. त्याच्या एका पोस्टरवर लिहिले होते, ‘Where every table has a story, every sip holds a memory’.

मन्नादांचे इंडियन कॉफी हाउसवर खास एक बंगाली गाणे आहे. या गाण्यात अनेक आठवणी आहेत. कॉफीची स्वत:ची धुंदी आहे. इथल्या वातावरणात ही धुंदी आहे. ही धुंदी उत्कर्षच्या कायम सोबत राहू देत...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults