खरडवहीतील ‘भेळ’ !

Submitted by कुमार१ on 23 March, 2025 - 07:53

शालेय वयापासून हातांना एक खोड लागलेली आहे. शाळेत दररोज जेवढे तास असायचे तेवढ्या वह्या दप्तरात न्यायला लागायच्याच. प्रत्येक तासाला मास्तर काय शिकवत आहेत याकडे निम्मेच लक्ष असायचं आणि वहीत त्यांचे शिकवणे उतरवून घेण्याचा फारच आळस. पण त्याचबरोबर वहीची मागची पाने मात्र उलट्या क्रमाने ‘भरण्याचा’ नाद होता. काही विषयांचे तास कंटाळवाणे असायचे. मग अशावेळी मास्तरांचे आपण ऐकत आहोत असे खोटे खोटे भासवून एकीकडे वहीच्या मागच्या पानांवर पेन अथवा पेन्सिलने अनेक गोष्टी लिहिल्या आणि चितारल्या जात. चित्रकलेच्या बाबतीत अगदी उजेड असल्यामुळे मास्तरांचे चित्र/ व्यंगचित्र काढणे काही कधी जमले नाही. परंतु त्यांचे मुलांनी ठेवलेले टोपणनाव लिहून ते वारंवार गिरवत बसणे हे मात्र आवडीने केले जाई.
बाकी बिंदूचा समूह, रेषा आणि वेगवेगळ्या आकृत्या काढायचा मात्र नाद लागला व तो अजूनही आहे. यामध्ये एकाखाली एक रेघा काढणे, गोलाकार फसलेला गोल, त्रिकोण, चौकोन, चौरस असे काहीही मनाला येईल ते रेखाटायचे आणि गिरवत बसायचे. वहीला पेन टेकवल्यानंतर हात न उचलता आणि कुठलीही रेष दुसऱ्यांदा न गिरवता काही आकृत्या काढायची कोडी त्यावेळी असायची त्यांचाही सराव केला जाई. अशा प्रकारची एक विशिष्ट आकृती (चित्र पहा ) जगात कोणालाही काढता आलेली नाही असे त्या काळी मित्रांनी सांगितले होते. तरी देखील अट्टहास म्हणून तिचा प्रयत्न करत बसायचं. याच्या जोडीला कधी एखादा विनोद लिहिला जाई तर कधी चित्रपटांची नावे.
kharad1.jpg

आतापर्यंतच्या आयुष्यात ही चित्रातली आकृती चाळा म्हणून हजारदा तरी खरडली असावी.

अधूनमधून शाळेत दंगा केल्याबद्दल मास्तरांकडून शिक्षा केली जाई आणि क्वचित मार देखील खावा लागला. मग काय, त्या दिवशीचा तो सगळा राग वहीच्या पानांवर उतरणारच. मास्तरांच्या नावाने सांकेतिक भाषेतील काही अपशब्द, असं ते लेखन असायचं. घरच्या आघाडीवर सटीसामाशी कधीतरी मुलांच्या नकळत त्यांची दप्तरे तपासण्याचे काम पालक मंडळी करायची. त्यातून मग हे मागच्या पानांवरचे प्रताप देखील उघड व्हायचे. मग त्यावरून आपली चंपी होणारच. अर्थात असं काही झालं तरी त्यानंतर फार तर आठ दहा दिवस ‘घरच्या पोलिसांना’ घाबरून वहीच्या मागच्या पानांना आराम दिला जाई. पण मुळातच जी अंगभूत खोड होती ती जाणे कसं शक्य होतं ?

कॉलेजला जायच्या वयात तर ही खरडखोड अंगात चांगलीच मुरलेली होती. त्यामुळे कॉलेजच्या वह्यादेखील याला अपवाद कशा राहणार ? फार तर बारावीचे वर्ष थोडेफार गांभीर्याने घेतल्यामुळे मागच्या पानांचे भरण्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी राहिले. पण पुढे एकदाचे व्यावसायिक शिक्षणाच्या मळ्यात जाऊन पडल्यानंतर मात्र पुन्हा एकदा या सवयीने उचल घेतली. आता प्रौढत्वात प्रवेश केलेला असल्यामुळे खरड पानांच्या गुणात्मकतेत हळूहळू वाढ झाली. शालेय वयात टाईमपास किंवा निरर्थक खरडपणा जास्त असायचा. आता आपल्या वाचनातून आपल्याला आवडलेल्या निवडक गोष्टी, मार्मिक वाक्ये आणि सुविचारांची यात भर पडली. तसेच मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषा तिथे प्रेमळ भगिनीगत एकत्र नांदू लागल्या.

वर्षाच्या सुरुवातीला घेतलेल्या वह्या जेव्हा वर्षाखेरीस पहिल्या जात तेव्हा हे अगदी स्पष्टपणे दिसायचे, की जवळजवळ प्रत्येक वहीची एक पंचमांश पाने तरी मागच्या बाजूने सुरुवात करून खरडीनी भरलेली असायची. वरवर पाहता एखाद्याला वाटेल की ही पाने वाया घालवली आहेत. परंतु त्यातून मला जो काही विरंगुळा होत होता ते पाहता ती माझी एक मानसिक गरजच होऊन बसली होती. सरधोपट आणि चौकटीबंद शिक्षणपद्धती कित्येक विद्यार्थ्यांना आवडत नसते. मग त्याबद्दलची त्यांची व्यक्तिगत नाराजी अशाच काही प्रकारांमधून उमटत असावी.

यथावकाश शिक्षण संपले आणि पोटापाण्याचा कामधंदा चालू झाला तेव्हा क्षणभर असे वाटले होते की आता आपली ही खरड सवय बहुदा संपुष्टात येईल. पण कुठलं काय? साधारण दरवर्षी एखाद दुसरी डायरी घरी येऊन पडायची. तिचा वापर करताना बालपणापासून मुरलेलं तेच धोरण आता देखील चालू राहिलं. डायरीच्या पुढच्या बाजूने ज्या काही दैनंदिन व्यावसायिक/ व्यावहारिक नोंदी असायच्या त्या केल्या जायच्या परंतु फावल्या वेळात डायरीची मागची बाजू वर करून पाने उलटून तिकडे आपली खरड पुन्हा एकदा जोमाने चालू झाली. असेच एकदा कागदावर पेनाची फिरवाफिरवी करताना एक भन्नाट कल्पना सुचली. एरवी आपण कुठलाही मजकूर डावीकडून उजवीकडे शिस्तीत लिहित जातो. तो मजकूर जर आरशासमोर धरला तर त्याची त्यातली प्रतिमा उलटी दिसते. मग गंमत म्हणून वहीवर उजवीकडून डावीकडे आणि सर्व अक्षरे उलटी काढत काही गमतीदार लेखन करत बसायचो. हळूहळू त्यात गती आली आणि एकदा एका मित्राला ते दाखवले. त्यावर तो म्हणाला,

“अरे, छानच की. अशी सवय लिओनार्दो दा विंचीला होती, बरंका”, असे म्हणून त्याने मला आपले थोडेसे खुलवले.

संगणकपूर्व काळात हस्तलेखन ही बऱ्यापैकी गरज होतीच. त्यामुळे उपयुक्त लेखनाच्या जोडीला हे निरर्थक खरडकाम देखील उत्साहाने चालायचे. संगणकयुग अवतरल्यानंतर हस्तलेखनाचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले हे खरे. परंतु गेल्या तीन-चार वर्षात असे जाणवले की गरजेपेक्षा जास्त काळ संगणकात डोके खूपसून बसणेही बरोबर नाही. त्यावर जे काही वाचन झाले त्याचे मनन करता करता त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा मुद्दे पुन्हा एकदा कागदावर लिहायला सुरुवात केली आहे. दैनंदिन जीवनात कुठल्या ना कुठल्या कारणाने अनेक पाठकोरे कागद जमा होत असतात. ते गोळा करून एका पॅडवर लावून ठेवलेत आणि त्याची कोरी बाजू ही अशा खरडीसाठी वापरतोय आणि हळूहळू त्याची आवड पुन्हा एकदा वाढू लागलेली जाणवते आहे.

एकेकाळी आपण केलेल्या अशा खरडी जर जपून ठेवल्या तर कालांतराने सहज ती वही उघडून त्या पाहणे हे मात्र जबरी स्मरणरंजन असते. विशेषतः जर जुन्या खरडी पाच-सात वर्षे उलटून गेल्यानंतर चाळल्या तर कधी आपलेच आपल्याला हसू देखील येते. त्या खरडीमध्ये आपण करून ठेवलेल्या गमतीजमती पाहून आपण अगदी अचंबित होतो.

“काय हो, असे असते तरी काय खरडींमध्ये तुमच्या?”
असे जर तुम्ही विचाराल तर त्याचे प्रथमदर्शनी उत्तर हे असेल, की काय नसते या खरडींमध्ये ते विचारा !

फोनवर कोणाशी बोलता बोलता लिहून घेतलेले अन्य कोणाचे नंबर्स आणि पत्ते, एखाद्या कामाची/घटनेची स्मृतिनोंद, आवडत्या व्यक्तींची अनेकदा गिरवलेली नावे, सुविचार अन सुवचने, बाळबोध स्वरूपाची चित्रकला अन फरकाटे, गाण्यांचे मुखडे, काही अक्षरे जुळवून केलेली मजेदार दीर्घरुपे, सामान्य बेरीज वजाबाक्या अन गुणाकार भागाकार, काही कुजबुज स्वरूपाचा मजकूर . . . आणि कधीतरी डोसकं फिरल्यागत या सगळ्यावर अत्याचार करणाऱ्या संपूर्ण पानभर मारलेल्या मोठाल्या फुल्या, अशा असंख्य गोष्टी इथे एकमेकांमध्ये घुसलेल्या असतात. काही परस्परविरोधी गुणधर्माच्या गोष्टी तर शेजारी शेजारी सुखाने नांदत असतात. एखाद्या रम्य सुभाषिताच्या पोटात काटकोन त्रिकोणाचे टोक शिरलेले असते किंवा एखाद्या झकास विनोदाशेजारीच एखाद्या गाजलेल्या शोकांतिकेचे नाव कोरलेले असते. इथल्या लेखनात शिस्त नावाला सुद्धा नसते. गिचमिड हा खरडीचा स्थायीभाव. आकृत्या आणि शब्द यांची एकमेकात अक्षरशः घुसखोरी झालेली असते. लिहिण्याची पद्धतही अत्यंत मनमानी. सरळ, उभे, आडवे, तिरके असे कुठल्याही कोनातून इथे लिहिले जाते. तसेच पेन, बॉलपेन, पेन्सिल आणि कधीकधी स्केचपेन ही सर्व लेखन साधने वापरुन त्यांचे एकमेकांत छानपैकी जुंपलेले फराटे पण असतात.

लहान मुलाचे हस्ताक्षर खराब असले की त्याला आपण, “काय रे, कुत्र्याचा पाय मांजराला आणि मांजराचा पाय डुकराला”, या प्रकारची उपमा देतो अगदी तसाच हा प्रकार असतो. पण आपण या सगळ्याकडे जर चिकित्सक चष्म्यातून पाहिले तर मग त्यातले आंतरिक सौंदर्य जाणवते. हा सगळा सावळा लेखनगोंधळ कालांतराने पाहणे हे फारच मनोरंजक असते आणि कधीकधी ते चिंतनीय सुद्धा ठरते. नित्य अशी ‘खर्डेघाशी’ करणाऱ्या माणसांच्या दृष्टीने ते त्यांचे ‘खरड-साहित्यच’ म्हणायला हरकत नाही !

शैक्षणिक वयातील अशी खरडपाने आता जवळ नसल्याचे कधीकधी दुःख होते. एक दोन नमुने तरी ठेवायला हरकत नव्हती असे राहून वाटते. पदवी शिक्षणानंतरच्या विवाहपूर्व एकटेपणाच्या काळातील काही खरड-मनोगते तशी हृद्य होती पण ती केव्हाच रद्दीत गेली. असो. तेव्हाच्या आयुष्यात प्रेमप्रकरण वगैरे काहीच न घडल्याने त्या आघाडीवर मात्र खरडवही आसुसलेलीच राहिली. जर का ते घडते तर मात्र या पानांवर प्रेमाचे आलाप अगदी ओसंडून वाहिले असते, हे काय सांगायला पाहिजे? आयुष्याच्या पुढील टप्प्यात केलेल्या काही खरडी मात्र अजूनही जवळ आहेत त्यातला हा एक नमुना :
kharad2.jpg

कोविडपर्वात मायबोलीवर विविध शब्दखेळ सादर केले होते. त्यातील काही प्रकारांची व्यक्तिगत तयारी करताना पुन्हा एकदा भरपूर खरडी झाल्या होत्या त्यातली ही एक आठवण :

khara3.jpg

कोविड ऐन भरात असताना 2020मध्ये ऑनलाईन ‘Wordle’ या इंग्लिश शब्दखेळाचा आंतरराष्ट्रीय प्रसार खूप जोरात झाला आणि मी देखील त्याचा आयुष्यभरासाठी व्यसनी झालो. पुढच्या पाच वर्षांमध्ये वर्डलचे अनेक सुधारित अवतार आले आणि हळूहळू त्यांच्याही प्रेमात पडलो. गेल्या वर्षभरात ‘Clue Hurdle व Phrazle’ या दोन्ही प्रकारात मुरलोय. फ्रेजलमध्ये जे नवनवे अनौपचारिक (अमेरिकी) वाक्प्रचार सापडतात ते लाजवाब असतात. मग आपले कोडे सुटल्यानंतर जो वाक्प्रचार सापडतो तो हाताने कागदावर स्टायलीत लिहून ठेवण्यातली मजा काही औरच असते. असं काही गवसलेलं आणि आवडलेलं लिहीत गेलं की लिहिता लिहिताच ते ‘आपलं’ होऊन जातं असाही स्वानुभव ! अशा खरडीनी भरलेल्या सुट्या कागदांवरही इतके प्रेम बसते की ते लवकर रद्दीत टाकवतही नाहीत. मग त्यांची छानशी चळत पॅडवर साठत जाते.

khara4.jpg

२० वर्षांपूर्वी एका मासिकात एका पत्रकारांचा लेख वाचला होता. त्यात त्यांनी दैनिकातल्या दोन स्पर्धक पत्रकारांची एक छोटीशी गोष्ट सांगितली होती. त्या दोघांपैकी एक होता दुपारपाळीचा तर दुसरा रात्रपाळीचा. एकाची कामाची पाळी संपली की त्याच टेबल खुर्चीवर दुसरा येत असे. टेबलाच्या खाली एक प्लास्टिकची कचराटोपली होती ज्यात ही मंडळी काही खरडून टराटरा फाडलेले कागद टाकून देत. तर या दोघांची एक गंमत होती. आपण कामावर आलो की जरा वेळाने आधीच्या माणसाने जे काही लिहून फाडून कचऱ्यात टाकलेले कागद असायचे ते मुद्दामून काढून बघायचे. हेतू असा, की हा प्राणी जो मजकूर फाडून टाकतोय तो नक्की काय स्वरूपाचा असतो?
या उद्योगातून ते दोघे एकमेकांचे व्यक्तिमत्व जोखत असत असे त्या लेखकांनी म्हटले होते.

या गोष्टीवर जरा मंथन केल्यानंतर माझ्याही मनात एक विचार आला. ज्यांना लेखनाची सवय आणि आवड आहे अशांच्या बाबतीत त्यांनी खाजगीत केलेल्या अर्थपूर्ण हस्तलेखन आणि निरर्थक खरडलेखन या दोन्ही गोष्टी शक्य झाल्यास पाहायला हव्यात. अर्थपूर्ण लेखन हे मुद्द्याला धरूनच असणार, पण खरं सांगायचं तर ते त्या व्यक्तीचे बाह्यरुप झाले. त्यात वेळप्रसंगी विविध आभासही जाणवणार आणि सार्वजनिक लेखनाच्या बाबतीत कधीकधी वाचकशरणता देखील. परंतु त्या माणसाचे सुप्त अंतरंग समजून घ्यायचे असेल तर त्याच्या निरर्थक खरडी बघण्याला पर्याय नाही. कदाचित अशा माणसाचे खरे व्यक्तिमत्व त्या खरडकामातूनच समजू शकते का, असा एक प्रश्न मनात येतो. विचारपूर्वक स्वतःसाठी खरडलेलं जे काही असतं ते खऱ्या अर्थाने स्वांतसुखाय व प्रामाणिक असतं. अलीकडच्या काळात विद्यार्थीवर्ग वगळता हस्तलेखन हा प्रकार बऱ्यापैकी संपत चाललेला आहे. तरीपण जर एकेकाळी कोणी केलेल्या अशा खरडी जर योगायोगाने नजरेस पडल्या तर त्या बघायला नक्कीच मजा येईल आणि त्यावर थोडाफार विचारही करता येईल.

आपल्या वाचकांपैकी कुणाला अशी सवय होती किंवा आहे का? असल्यास आपल्या खरडीचे (आणि सार्वजनिक करायला हरकत नसलेले) काही नमुना फोटो इथे जरूर दाखवा. ते पाहणे रोचक असेल.

मित्रहो,
अशी आहे ही कागदावरील खरडाखरडीची गंमतजंमत अर्थात, फावल्या वेळात तिथे बनवलेली एक लेखन-भेळ. ही भेळ तुमच्यासमोर सचित्र सादर केली. आता ती चवीला कशी वाटली, हे मात्र तुम्हीच सांगायचे आहे !
***********************************************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माबो वरील काही लिंक्स किंवा माहिती तात्पुरती ज्या त्या वेळी मी स्वतःलाच विपु करुन साठवून ठेवतो. यथावकाश माझ्या नोट्स ॲप मधे कॉपी करुन विपु डिलीट करतो.

बाकी टिपणवही नाही घातली कधी. घालायला हवी असं वाटतं खरं...

* नोट्स ॲप मधे कॉपी करुन >> चांगली सवय.
मला टिपणे लिहायची सवय होतीच. सुमारे चार वर्षांपूर्वी मी या संदर्भात मॉम यांचे विचार वाचले आणि त्यातून या सवयीला बळकटीच मिळाली.
. .
मॉम नवलेखकांना असे म्हणतात,
“मी रोजच्या रोज मला सुचणाऱ्या कल्पनांची, घटनांची टाचणे काढून ठेवत आलो आहे - वयाच्या 18 व्या वर्षापासून ते थेट 70 व्या वर्षापर्यंत. मला कधी काही लिहायचं असेल की ही टाचणवही चाळतो, कारण जसजसं वय वाढत जातं तसंतसं नवीन नवीन सुचायचं मंदावत जातं. तुम्ही सुद्धा ही सवय लावून घ्या” .

* A Moveable feast.. >>
अच्छा, चांगली माहिती. ते पुस्तक हेमिंगवे यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं दिसतंय


A Writer’s Notebook

हे पुस्तक चाळतोय. मोठे परिच्छेद वाचले नाहीत परंतु अनुभवातून आलेली काही मार्गदर्शक वाक्ये आवडली आणि मनापासून वाचली.
त्यांची ही झलक :
* The writer must be playful and serious at the same time.

* There is no need for the writer to eat a whole sheep to be able to tell you what mutton tastes like. It is enough if he eats a cutlet, but he should do that.

* Fundamentally man is not a rational animal. It is this that makes fiction so difficult to write, for the reader or the spectator demands, at all events to-day that he should behave as if he were.

* Truth is not only stranger than fiction, it is more telling. To know that a thing actually happened gives it a poignancy.

* There are books that are at once excellent and boring.

ह्या धाग्याचा खरडवही ते टिप्पण वही हा प्रवास त्याचे मुल्य/ उपयुक्तता ही विरंगुळा/ मनोरंजन ते मार्गदर्शक ह्या वाटेवर (आम्हा वाचकांना) घेऊन जात आहे.. Happy
त्यासाठी धन्यवाद कुमार१!

A Writer’s Notebook : अजून काही चिंतनीय :
१. A good rule for writers : do not explain overmuch.
( overmuch हा शब्द खूप आवडला).

२. The novelist is dead in the man who has become aware of the triviality of human affairs.

३. In perfection there is always the malaise of the degeneration which will succeed it.

४. Women's friendships everywhere are unstable.

५. It looks as though the existence of class distinctions is inseparable from life in the social state, and instead of denying its existence it would be more honest to admit it.
(कटू सत्य).

Pages