मीनाताई प्रभु: A Wanderlust Spirit

Submitted by रसायन on 6 March, 2025 - 20:52

६वी / ७वीत असताना 'मोठ्यांची' पुस्तकं वाचण्याची मला गोडी लावली ती दोन लेखकांनी. एक म्हणजे व्यंकटेश माडगूळकर आणि दुसऱ्या मीनाताई. 'दक्षिणरंग' पासून सुरुवात तर झाली पण अपूर्वरंग अजून अपुराच आहे. पण लेखक / लेखिका हेही एक वलय असतं. त्या वलयाच्या पल्याड आपल्याला जाऊन पाहता येईल असं नाहीच होत. आणि आलं तरी अशी कुठलीही व्यक्ती आपल्या संकल्पनेत जशी असायला हवी तशीच असते असं नाही आणि तसा हट्टही आपण धरू नये. पण माझं नशीब असं की तब्बल ३ वेळा याची देही याची डोळा मीनाताईंना भेटण्याची संधी मिळाली. 
८वी / ९वीत पुस्तकं वाचल्यावर लेखकांना प्रत्यक्ष लिहावं असं एक खूळ माझ्या डोक्यात असायचं. पाठवलं पत्र मीनाताईंना! पण लंडनमध्ये राहणारी, जगभर फिरणारी 'सेलेब्रिटी' ९वीतल्या मुलाला काय लिहिणार असं ठरवून पत्रावर माझा पत्ता लिहिलाच नाही. काही महिन्यांनी दारावर एक माणूस 'गौरांग भिडे' आहेत का असं विचारत आला. "मला मीनाताई प्रभूंनी पाठवलंय. त्यांच्या यजमानांचं देवळालीत एक काम चाललंय तिथून मी आलोय. नंबर मिळेल का?" चाट पडणं म्हणजे काय ते तेव्हा कळलं. त्या बिचाऱ्याला तरी आपण ९वीतलं एक पोरगं शोधायला आलोय हे कळून काय वाटलं असेल देव जाणे. थोड्या दिवसांनी मीनाताईंचा चक्क फोन! "मी नाशिकला येत्ये, सिबल हॉटेल जवळ. नाश्त्याला भेटूया." त्या वर्षी मी त्यांचाच लेख वाचून Northern Lights वर शाळेत एक प्रोजेक्ट केला होता तो आणि दक्षिणरंगची एक प्रत सही घ्यायला बरोबर घेऊन आईबरोबर मीनाताईंना भेटायला गेलो. आणि अक्षरशः पुस्तकातून त्या जशा वाटतात तश्याच समोर आहेत हे मनोमन कळलं. ती प्रत आता लोकांना वाचायला देऊन देऊन हरवेल अशी भीती वाटून मी गेल्या वेळेला अमेरिकेत घेऊन आलो. 
दुसरी भेट झाली ती ४-५ वर्षांनंतर B. Pharm. ला असताना. बोरिवलीला अत्रे कट्टयावर 'चिनीमाती' वर मीनाताईंचं व्याख्यान होतं. उत्सुकतेने मी अगदी वेळेत पोचलो होतो आणि पाचेक मिनिटात मीनाताई हजर. आयोजिकाबाई होत्या पण त्यांची भलतीच भंबेरी उडाली होती कारण कार्यक्रमाची वेळ झाली तरी त्यांची तयारी सुमारच होती. मी आपलं "४-५ वर्षांपूर्वी नाशिकला भेटलो होतो" वगैरे जुळवाजुळव करून मीनाताईंशी बोलायला गेलो. "हो! असं काय करतोस? आईबरोबर आला होतास! ये आपण बाहेर बसू."  पुढचा एक अर्धा तास मीनाताईंशी मनसोक्त गप्पा झाल्या ह्या मंडळींची कार्यक्रमाची तयारी होईपर्यंत. या सगळ्यात मला एकट्याला एवढा वेळ मीनाताईंबरोबर बघून मला उगाचंच VIP status मिळालं!
तिसरी भेट शिकागोला, महाराष्ट्र मंडळाच्या BMM मध्ये  'वाट तिबेटची' वरच्या व्याख्यानानंतर. ओझरतीच पण त्यांच्या एका चाहत्यांकरताच्या ईमेल ग्रूपद्वारे काहींना काही तरी नवीन पुस्तकं / पुरस्कारांबद्दल त्या स्वतः अधूनमधून ईमेल करत असत. 
पुढे न्यू यॉर्क फिरताना त्यांनी लिहिलेल्या Tours करताना, कोपनहेगन मध्ये बॅगा न आल्यामुळे दक्षिणरंगमध्ये त्यांनी लिहिल्यासारखीच धावपळ करताना, अगदी २०२२ मध्ये हॉस्पिटल मध्ये ७ दिवस अगदी कंटाळा आलेला असताना त्यांचा YouTube वरच्या त्यांच्या मुलाखती बघताना मीनाताईंची आठवण आली आणि सतत असते. त्यामुळे श्रद्धांजलीचे बोथट शब्द लिहावेसे वाटत नाहीत. Harry Potter च्या शेवटच्या सिनेमातल्या Dumbledore सारख्या कुठल्यातरी स्टेशन किंवा विमानतळावर त्या उभ्या आहेत आणि असतील. त्या प्रवासाकरता शुभेच्छा द्यायच्या फक्त. 
-गौरांग भिडे 

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे.
मलाही त्यांचे लेखन आवडते.
अपूर्वरंग संच माझाही अजून वाचायचा बाकीच आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.

छान लिहिलंयस - हृद्य!
मी सगळी प्रवासवर्णनं वाचलेली नाहीत त्यांची, पण जी वाचलीत ती तुझ्यामुळेच.
परवा त्या गेल्याचं वाचल्यावर आधी तुझीच आठवण आली!

अरेरे!
फार प्रसन्न व्यक्तिमत्व होतं त्यांचं! अगदी घरातल्याच मावशी- काकू असतात तसं वाटायचं त्यांना ऐकताना.
प्रवासवर्णने फार आवडत नसूनही त्यांची शैली फार भावते!
त्यांनी एक किस्सा सांगितलेला आठवतो- कालनिर्णयच्या साळगावकरांना त्यांनी एक लेख दिला होता, त्याची लांबी मर्यादेपेक्षा जास्त झाली असे साळगावकरांनी सांगितले तेव्हा मीनाताई चटकन म्हणाल्या, ‘ठिक आहे, आटवून आणते’. हे आटवणं त्यांच्या लिखाणाची खासियत.

आदरांजली!

खूप सुंदर आणि प्रसन्न आठवणी सोडून गेली आहे .मीना . चिनी माती पुस्तकामुळे आमची पहिली भेट झाली आणि इतकी मैत्री जुळली की मी पुण्यात किंवा लंडन ला गेले की तिच्याच कडे राहणार आणि ती चायनात आली की माझ्याच कडे उतरणार हा अलिखित नियमच बनून गेलेला. तिच्या सहवासात ती कधीच सेलिब्रिटी सारखी वागलेली आठवत नाही. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व होतं तिचं.

फार सुंदर लिहिले आहे. माझ्याही खूप आवडत्या लेखिका. मी त्यांना इमेल केली होती एकदा, तर त्यांचा फोन आला चक्क...आणि अर्धा पाऊण तास बोलत होत्या..अगदी जुनी ओळख असल्यासारख्या. मी त्यांची अगदी सगळीच पुस्तकं वाचली आहेत. पुन्हा पुन्हा वाचते.

इराण, इजिप्त, चीन, पेट्रा... अशा ठिकाणी आपण कधी अन कशा जाणार? ..तर ही सगळी ठिकाणं मीनाताईंच्याच नजरेने अगदी पुरेपूर बघता आली...
त्यांनी खूप अभ्यास करून, छान प्लॅनिंग ने देश विदेश पाहिले, त्यावर अगदी बारकाव्याने , सुरेख लिहिलं. आपल्या डोळ्यांसमोर शब्दचित्र उभे केले.

खूप ओघवती, हाय कॉन्टेक्स्ट शैली, प्रसन्न , सकारात्मक दृष्टी, लोकांवर केलेले भरभरून प्रेम..... यांनी त्या आपल्या मनात अगदी घर करून राहतात. गाथा इराणी मध्ये त्यांना इतक्यांदा कबाब खावे लागले...आणि त्यांना त्याचा इतका कंटाळा आला होता...की शेवटी त्यांनी ..जेवणात तेच समोर आले पुन्हा जन्मसवित्री....*** !! असे मजेने लिहिले आहे. Happy

त्यांना भेटायची खूप इच्छा होती पण जमलं नाही.

छान लिहिलं आहे. त्यांची सुरुवातीची काही पुस्तकं वाचली आहेत आणि ती आवडली होती. त्या गेल्याची बातमी काळच पेपरमध्ये वाचली. वाईट वाटलं.

छानच लिहिलं आहे ‌. माझ्या आवडत्या लेखिका.
घरबसल्या world tour घडवून आणणार्या..
'माझं लंडन' पासून सुरू केलेलं त्यांचं वाचन जवळजवळ सगळच आवडलय.
मला 'ग्रीकांजली' थोडं बोअर झालं.

हृदय लिहिलं आहेस.
त्यांची फार पुस्तकं वाचली नाहीत. वाचेन आता.
एखाद्याला निरोप देताना पांढऱ्या शुभ्र फलाटावर किंवा विमानतळावर तो ही एकांतात ही कल्पनाच फार भावली. ती अशी पोर्टेबल आहे इतके दिवस लक्षात कसं आलं नाही! Happy

Screenshot_20250307_074711_Gallery.jpg

हा त्यांचा माझ्याकडे असलेला संच. याबरोबर एक फोटोंची सीडी सुद्धा मिळाली होती.
अपूर्वरंग संच अजून घ्यायचा आहे.

छान लिहिलंय! त्यांची बरीचशी पुस्तकं वाचली आहेत. सगळी आवडली असे नाही, पण वरच्या लेखातून आणि काही प्रतिसादांमधून उलगडलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व , स्वभाव छान वाटले. श्रद्धांजली!

सगळ्यांना मनापासून धन्यवाद!

@ ऋतुराज- डिट्टो! मीही गेल्याच वर्षी भारतातून येताना सगळी नवीन पुस्तकं घेऊन आलो.
@ भरत- अरे वा! कुठली शाळा?
@ वर्षा- अपूर्वरंग ४ पुस्तकांचा आशियाई देशांवरचा संच आहे. बहुदा सगळ्यात अलीकडचा. त्यांना अफ्रिकेवरचं 'कृष्णखंड' ही लिहायचं होतं Sad

माझ्याकडे काही पुस्तकं आहेत मीना प्रभूंची. त्यांच्या पुस्तकातला त्या त्या देशावरचा इत्यंभूत इतिहास मला वाचायला कंटाळवाणा झाल्याचं आठवतं आहे.

https://youtu.be/5rV1X_e6cdo?si=aXGhtiQyLEsPAbOB

डॉ मीना प्रभू यांनी, डॉ शेखर कुलकर्णी या त्यांच्या भाच्याकडे एक बंद पाकीट देऊन ठेवले होते व आपल्या नंतर ते उघडावे असे लिहून ठेवले होते. त्या पाकिटात लिहून ठेवलेली कविता.

छान लेख आहे!

एक दोनच पुस्तके वाचली आहेत त्यांची पण वाचनीय होती इतके लक्षात आहे.

खूपच हृद्य कविता.
अगदी मनाला चटका लावून गेली.
पण त्याच बरोबर त्यांनी इतक्या शांतपणे मृत्यूला स्वीकारलेले पाहून फार विस्मय वाटला!
किती कठीण आहे हे!

ही बातमी पेपरमध्ये वाचली तेंव्हा जवळचे कुणितरी हरवल्यासारखे वाटले. 'हरवल्यासारखे' ह्यसाठी कि त्या नेहमीच कुठल्याशा प्रवासात असत. तसंच त्या आताही दिगंताच्या प्रवासला गेल्या आहेत असेच वाटते! त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचे योग नाही आले....
त्यांची जवळपास सर्व प्रवासवर्णने वाचलीत.....आवडलीत.
विशेषतः भावला तो त्यांचा उत्साह...!प्रत्येक ठिकाणचे बारकावे....सहज लेखन...
त्यांच्या साहित्यरुपाने त्या चिरंतन राहतीलच.