याला जीवन ऐसे नाव - भाग २

Submitted by अविनाश जोशी on 26 February, 2025 - 03:13

याला जीवन ऐसे नाव - भाग २
सर्व पृथ्वीवर आणि विविध ग्रह तळावर बरेसे कामकाज ठप्प झाले. ज्या कामात रोबोटिकच्या पहिल्या नियमाचा काहीही परिणाम होत नाही, अशांचे काम व्यवस्थित सुरु झाले. विविध राष्ट्रांचे प्रमुख आणि वैश्विक स्थानावरील अधिकाऱ्यांनी हा सर्व गुंता सोडवण्यासाठी एक मंडळ स्थापन केले. अर्थातच मला त्यांनी त्या मंडळाचे महानिर्देशक नेमले. आमचे ऑफिस हिंदी महासागरातील जंबल या छोट्याश्या बेटावर होते. माझे अतिभव्य निवासस्थान आणि इतर फाफट पसारा जंबल बेटावरच होता. हे पूर्वीचे जागतिक स्तरावरील कुठलेसे ऑफिस होते पण सायबोर्गच्या नियंत्रणामुळे हे ऑफिस सहा महिन्यापासून बंद होते. थोडक्यात मी आता हिंदी महासागरातील एका बेटाचा मालक झाला होतो. आणि माझ्या आज्ञेवरून भरपूर मानव आणि सायबोर्ग मदतनीस म्हणून काम करत होते. सायबोर्गच्या पहिल्या नियमामुळे बऱ्याच व्यवसायातून सायबोर्ग हद्दपार झाले होते. पहिल्या व्यवसायात वापरले जाणारे सायबोर्ग आता नुसते बसून होते. विशेषतः पोलीस , सैन्यदल , न्याय संस्था व इतर लोकांना दंड अथवा शिक्षा करू शकणाऱ्या सर्व कार्यालयातून सायबोर्ग बाद झाले.
हायपरजम्प असूनही कित्येक वर्षे लागणाऱ्या प्रवासातून गोठलेले मानवी गर्भ जात असून सर्व प्रवास मात्र सायबोर्ग हँडल करत असत अशा काही विशिष्ट सेवा सायबोर्गनी चालू ठेवल्या होत्या. या उलट शुक्रासारख्या ग्रहावर असणाऱ्या आणि खाणीतून काम करणाऱ्या सायबोर्गचे आयुष्य फारच कष्टाचे असे. सूर्याच्या जवळ असल्यामुळे शुक्रावरचे तापमान फारच उच्च असे. आणि अशा स्थितीत मानवाने काम करणे शक्यच नसे. इथल्या सायबोर्गने तिसऱ्या नियमावर बोट ठेऊन काम थांबवले. तिसऱ्या नियमाप्रमाणे सायबोर्गने पहिले दोन नियम पाळून स्वतःचे रक्षण करणे जरुरीचे असते.
त्याच्याहून मानवांच्या स्वभावामुळे काही सायबोर्गचे काम थांबवावे लागले. उदा. एखाद्या मॉल मध्ये बरीच खरेदी झाल्यावर तेथील विक्रत्या सायबोर्गला एखादा माणूस पटवून द्यायचा कि त्याने जर सामानाचे पैसे घेतले तर त्या मानवाला अतिशय कष्ट होणार आहेत आणि त्यामुळे ते सामान त्याला फुकट द्यावे. अर्थातच विक्रेत्या सायबोर्गला त्याचे म्हणणे मान्य करावेच लागे. अशारीतीने जेथे जेथे मानव आणि सायबोर्ग एकत्र येत होते अशा सर्व व्यवसायातून सायबोर्ग नष्ट व्हायला लागले. उत्पादनात सायबोर्गपेक्षा रोबोट जास्त फायदेशीर असल्यामुळे, सायबोर्गना फारशी मागणी नव्हती. उत्पादन क्षेत्रातील बऱ्याच स्वयंचलित यंत्रांना असिमोचे तीन नियम लागू नव्हते. माझे ऑफिस पृथीवरील सर्व समस्या एकत्रित करत होते आणि अशा समस्यांवरील उपाय शोधण्याचे प्रयत्न करत होते. अशा तर्हेचे हे प्रश वैश्विक स्तरावर होते आणि त्याचे निर्मूलन वैश्विक स्तरावरच करणे आवश्यक होते. शेवटी बऱ्याच विचारानंतर माझ्या अध्यक्षतेखाली वैश्विक स्तरावर परिषद घेण्यात आली. या परिषदेचे उद्दिष्ट या समस्येचा ओहापोह करणे आणि काही मार्ग निघतात ते बघणे. परिषदेस सायबोर्ग तज्ञ, सायबोर्ग उत्पादन करणारे, सायबोर्ग चा मोठ्या प्रमाणात वापर करणारे आणि वैश्विक शासकीय अधिकारी होते.
ज्या समस्येतून सर्व सुरवात झाली त्याचे उत्तर फारच सुलभरीत्या हातात आले. काही वेळेला उत्तरे सोपी असतात हेच खरे. सायबोर्गच्या नेमणुकीमुळे एखाद्या माणसाचे काम जात असले तर सायबोर्ग तसे करण्यास नकार द्यायचा. परिषदेच्या अगोदर दोन दिवस माझा एका सहायक आजारी पडला, त्यामुळे मी दुसऱ्या सहाय्यकाला काम दिले त्याचाही अक्सिडेंट झाला, त्यामुळे मी तिसऱ्या सहाय्यकाला त्याचे काम करायला सांगितले. घटना तशी साधी होती पण मला मोठ्या समस्येचे उत्तर सापडले होते. हे उत्तर परिषदेत सुरवातीसच सांगितले आणि त्यामुळे परिषदेचे वातावरण अतिशय उत्साही बनले. उदाहरण द्यायचे झाल्यास आमच्या बँकेत रमेश या मानवास संताजी आणि धनाजी यांनी रिप्लेस केले व त्यामुळे दोघेही काम करेनासे झाले. माझे सोलुशन सोपे होते. मी शशिकांत आणि रमाकांत अशा दुसऱ्या दोन सायबोर्गना संताजी आणि धनाजीच्या जगावर नेमणूक दिली अर्थातच शशिकांत आणि रमाकांत याना पहिला नियम लागू होत नव्हता. त्यामुळे या कारणामुळे थांबलेले सायबोर्ग फक्त रिप्लेस केल्यामुळे चालू झाले असते. या सध्याच्या उपायामुळे जगातील लाखो सायबोर्ग काम करू लागले. सायबोर्ग उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी तर माझा गौरवच केला आणि मला हवे तेव्हा सहा सायबोर्ग द्यायचे मान्य केले. नंतरचा प्रश्न होता जिथे मानव आणि सायबोर्ग एकत्र येतात तेव्हाचा. नियम एक च्या पालनाचा तसेच विविध व्यवसायातील या नियमांमुळे येणाऱ्या समस्या सोडवण्याचा . नवीन नियम करणे आवश्यक होते. याकरिता एक समिती स्थापन झाली आणि तिने बऱ्याच विचार मंथनानंतर जलाजी लॉ ऑफ रोबोटिक्स प्रसिद्ध केले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users