आसमान से ऊंचा

Submitted by पायस on 13 February, 2025 - 16:22

मुलाखतकार: सुजितजी चित्रपटाचे निर्माते या भूमिकेतून आमच्या वाचकांना काय सांगाल?
सुजित कुमार: एके दिवशी असंच पान खाता खाता गंगाकाठच्या मित्रांसोबत गप्पा छाटत होतो. मग आली लहर आणि केला कहर न्यायाने मी "पान खाए सैंया हमार" या भोजपुरी चित्राची निर्मिती केली. निर्मात्याच्या भूमिकेत शिरताच मला जाणवले की सध्या चित्रपटक्षेत्राची अवस्था फार बिकट आहे. चित्रपटांचा दर्जा खालावत चालला आहे. फिर दिलने कहा की कुछ किया जाए. तरी प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव द्यावा म्हणून 'अनुभव' ची निर्मिती केली. प्रेक्षकांनी तो "अनुभव(!)" चवीचवीने बघितला. प्रेक्षकांना असे हटके सिनेमे आवडत आहेत तर वाटलं आता एक बडे लेव्हलची फिल्म बनवूया. मग एक संवेदनशील, मनस्वी कलाकार म्हणून मला जे मांडायचं आहे त्याची रायटर्स टीमसोबत संहिता तयार केली आणि दिग्दर्शनासाठी मेहुलजींना अ‍ॅप्रोच केलं. त्यांनीही होकार भरला आणि लवकरच एक हटके अशी कलाकृति आम्ही रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरिता घेऊन येत आहोत.
मुलाखतकार: फारच छान! मेहुलजी, आपलं मनोगत?
मेहुलकुमार: देखो, आर्ट फिल्म तो मैं बनाता ही नही.

( https://youtu.be/HDUBZD3DApY?t=299 )

~*~*~*~*~*~

मी एकदा एका फिल्मक्लबमध्ये एक दिग्दर्शक ठरवून फक्त त्याच्याच फिल्म्स लागोपाठ बघण्याचा उपक्रम अटेंड केलेला. आयोजकांची कल्पना अशी की दिग्दर्शकाची शैली कळण्यासाठी याने मदत होईल. उदा. शाहिद, अलिगढ, स्कॅम १९९२ पाहत असाल तर चांगलीच गोष्ट आहे पण त्याच फ्लोमध्ये लागोपाठ ये क्या हो रहा हैं पाहिल्याशिवाय हंसल मेहताची स्टाईल कळत नाही. आता त्यांनी आम्हाला ठेवणीतले गोडार्ड/फेलिनी/घटक छाप लोक दाखवले, ते काय कोणीही बघेल. मेहुलकुमार जनसामान्यांना तिरंगा व क्रांतिवीरचा दिग्दर्शक म्हणून ठाऊक असेल. पण त्याचे सर्व सिनेमे पाहिले की तो निव्वळ दिग्दर्शक नसून ऑटर (पक्षी: Auteur, मासेखाऊ प्राणी नव्हे) आहे हे लक्षात येते. इंटरव्ह्यूजमध्ये जेव्हा तो त्याची भूमिका स्पष्ट करतो तेव्हा तर खात्रीच पटते की देअर इज अ मेथड बिहाईंड द मॅडनेस. उदा. जंगबाज (१९८९) विषयी बोलताना तो म्हणतो की माझा हिरो राजकुमार आहे आणि लोक राजकुमारला बघायला थिएटरमध्ये येणार आहेत. सो भलेही मला त्याला वकील दाखवायचं असलं तरी तो राजकुमारच वाटला पाहिजे, वकील नाही. मग मी त्याची एंट्री टाकली की - राजकुमार काळा कोट घालून हेलिकॉप्टरमध्ये बसतो. स्वत: हेलिकॉप्टर चालवत कोर्टात जातो. कोर्टाबाहेर हेलिकॉप्टर पार्क करतो आणि मग आत जाऊन खटला लढायला सुरु करतो. अशी एंट्री मी क्रांतिवीरमध्ये कधीच दाखवणार नाही कारण तिथे हिरो नाना आहे. अ‍ॅट द सेम टाईम जसे नाना क्रांतिवीरमध्ये एका मुलाला दगड मारायला उद्युक्त करतो तसे मी राजकुमारला करताना कधीही दाखवणार नाही.
तिरंगा किंवा मरते दम तक अधिक पॉलिश्ड मेहुलपट असले तरी राजकुमार असल्यावर मेहुलजींच्या कारागिरीकडे नाही म्हटले तरी थोडे दुर्लक्ष होतेच. तरी राजकुमार नसलेला चित्रपट अस्मादिकांस मेहुलपट रसग्रहणाकरता अधिक योग्य वाटला. अशा ऑटरची ही नॉन-आर्ट फिल्म आसमान से ऊंचा.

~*~*~*~*~*~

१) मनस्वी कलाकाराचे हिरो-व्हिलन-कथानक सर्वकाही हटके (अ‍ॅबनॉर्मल) असते.

१.१) पात्र आसमानसे उंचे असेल तर काहीतरी आयकॉनिक एंट्री टाकावी लागते.

मुंबईतल्या एका सी फेसिंग बंगल्यातून आपल्या कथानकाची सुरुवात होते. एक नोकर एका चाकाच्या टेबलावर ब्रेकफास्टचे सामान घेऊन येतो. काही सेकंद फोकस मारून प्रेक्षकाच्या मनात हिंट्स पेरल्या जातात - अरेच्चा, फळफळावळ टेबलाच्या खालच्या फळीवर आहे आणि वरच्या फळीवर नुसतीच रुमालाने झाकलेली थाळी आहे. जनरली उलटे असते. हिंट्स पेरून होताच, प्रेक्षकाचे शंकासमाधान केले जाते. हा ब्रेकफास्ट जितेंद्रासाठी आणला आहे. याचे सिनेमातले नाव किंग. जॅक गडद गुलाबी रंगाच्या, लांब बाह्यांच्या शर्टावर पांढरा कोट, पांढरा टाय, त्यावर पांढरा स्टोल, पांढरी पँट, पांढरे बूट असा पेहराव करतो. एवढे पांढरे पांढरे बघून डोळे पांढरे होऊ नये म्हणून काळा गॉगल आणि कलप लावलेला विग पॅराशूटची सबंध बाटली ओतून चापून चोपून बसवला आहे. या सर्वाला नजर लागू नये म्हणून बारीक कातरलेली मिशी लावली आहे.
जॅक रुमाल बाजूला करतो. तिथे एक रिव्हॉल्व्हर आहे. जॅक नेम धरतो आणि समोर असलेल्या सदाशिव अमरापूरकरच्या पुतळ्यावर धडाधड पाच गोळ्या झाडतो. मग रिव्हॉल्व्हर ठेऊन देतो. त्याचा एक चिल्लर हस्तक विचारतो की किंगसाहब, तुम्ही रोज त्या पुतळ्यावर पाच गोळ्या वाया घालवता, ती सहावी गोळी मात्र तशीच शिल्लक ठेवता. असे का? जॅक म्हणतो की कारण या सहाव्या गोळीत माझ्या जीवनाचा इतिहास आहे.

अर्थातच सिनेमाचा व्हिलन स.अ. आहे, त्याचे नाव नागराज. सेट डिझाईनरचे लेखकासोबत मतभेद असल्याकारणाने नागराजच्या अड्ड्यावर एकही नाग नाही पण खूप सारे वाघ-बिबटे आहेत. टोकदार मिशा लावलेला स.अ. बटणे उघडी सोडलेला हाफ शर्ट, लाल स्वारे (Soiree) सूट, पांढरी पण किंचित मळकी पँट आणि पांढरे बूट घालून फिरतो. त्याच्याच शब्दांत - साप का डसा बच सकता हैं, लेकिन नागराज का नही.

१.२) हटके ओमनी

आपल्याला असे कळते की किंग आणि नागराज डॉन आहेत. डॉन असल्यामुळे ते कसली तरी स्मगलिंग करतात ज्याला 'माल' असे मोघम नाव दिले आहे. त्यानुसार नागराज आपल्या केके नामक माणसाला माल गोडाऊन नंबर १७ मध्ये डिलीव्हरीसाठी पाठवायला सांगतो. अचानक तीन अँबॅसेडर आणि एक फोक्सवॅगनची बस घेऊन किंगची माणसे येतात आणि केके व कं. ला धमकावून मालाने भरलेली ओमनी घेऊन निघून जातात. जनरली ओमनीत बसलेली माणसे काहीतरी किंवा कोणालातरी पळवतात. इथे चक्क अख्खीच्या अख्खी ओमनीच पळवली आहे. हाच बहुतेक सुजितकुमारचा हटके टच!

कट टू स.अ. चा अड्डा. शिवास रिगलचा आस्वाद घेत स.अ. चे पार्टनर्स त्याला जाब विचारत आहेत इतक्यात स.अ. ला जॅकचा फोन येतो. बिझिनेसमध्ये सर्वकाही खुल्लमखुल्ला चालत असल्याने स.अ. फोन स्पीकरवर टाकतो. जॅक म्हणतो की तुमचा माल मी चोरला. जर परत हवा असेल तर बदल्यात मला स.अ. पाहिजे. स.अ. चे पार्टनर स.अ. ला धोका द्यावा की नाही या विचारात त्यावर स.अ. म्हणतो की ठीक आहे, डील. जॅक म्हणतो ओके, उद्या दुपारी दोन वाजता मढ आयलंडवर ये.

ऑटर टच - अशा फोनवर बोलाचाली व बोलाचाली करताना खालून चेहर्‍यावर फोकस लावलेली फ्रेम मेहुलकुमारपटांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. वानगीदाखल एक उदाहरण - https://youtu.be/meIAG-DlPtI&t=2558

ऑफ कोर्स अजून सिनेमा पुरता सुरुही झालेला नसल्याने प्रेक्षकाला पुरते ठाऊक आहे की यातून काहीही निष्पन्न होणार नाही आहे. पण मेहुलकुमार इज अ‍ॅन ऑटर. त्यामुळे या प्रसंगाचा खरा उद्देश वेगळाच आहे. दुसर्‍या दिवशी ते दोघे मढ आयलंडवर भेटतात. स.अ. ची लोकं पोलिसांच्या वेषात येऊन व्यवधान निर्माण करतात आणि स.अ. माल लंपास करतो. मग फोनवर तो किंगला डिवचतो की बघ तुझ्यादेखत मी माझा माल परत मिळवला. किंग म्हणतो की तू माल नाही माझे जुने चपलाबूट पळवले आहेस. किंगला असे होणार हे आधीच माहित असल्याने त्याने मालच्या बॅगांमध्ये चपलाबूट भरले होते. पण सिनेमा पूर्ण व्हावा या हेतुने तो नागराजला न मारता केवळ त्याची त्याच्याच पार्टनर्ससमोर फजिती करतो. नागराजचे पार्टनर्स तक्रार करताच, स.अ. त्यांना गोळ्या घालून ठार करतो. हा सर्व प्रपंच प्रेक्षकांना आपले हिरो आणि व्हिलन दोघेही नॉर्मल नाहीत हे कळवण्याकरता.

ऑटर टच - व्हिलनला मारणे सहज शक्य असतानाही त्याची फजिती व्हावी म्हणून त्याला जिवंत सोडणे हे मेहुलकुमारपटांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. उदा. तिरंगात ब्रिगेडिअर गेंडास्वामीच्या अड्ड्यावर केवळ हे डिसाईड करायला जातो की 'वो मौत फंदे की मरेगा या हमारे पंजे की' पण सहज शक्य असतानाही त्याला मारत नाही.

२) तरुणाई

२.१) सामान ठेवण्याच्या जागेचे नाव ट्रंक. ती कारच्या मागे असते. पण सगळे तिला प्रेमाने डिक्की म्हणतात.

मेहुलजींना आपल्याला सुरुवातीलाच सांगितले आहे की ही आर्ट फिल्म नाही. तरी एक तरुण रोमँटिक कपल टाकण्याची गरज आहे. त्यानुसार जॅक श्रीनगरला फोन करून एडिटरसाठी ट्रान्झिशन सीन देतो. इथे एंट्री होते टीनेजर सोनमची. ती आपल्या मैत्रिणीसोबत स्कीइंग करते आहे. तिला त्रास द्यायला म्हणून आदिल इराणी स्टॉकर प्रेमी दाखवला आहे. तो प्रेम चोप्रा बनण्याचा प्रयत्न करतो पण जवळच कुठेतरी स्कीइंग करत असलेला गोविंदा येऊन तिला वाचवतो. मग तो तिला व तिच्या मैत्रिणीला टॅक्सीतून लिफ्ट देतो.

तिची मैत्रीण हुशार असल्याने ती पुढाकार घेऊन गोविंदाला नाव गाव विचारते. तो म्हणतो की मी विक्रांत. मी दिल्लीला असतो. सगळे मला प्रेमाने विक्की म्हणतात. ती म्हणते मी सोनम. मी मुंबईत राहते. सगळे मला प्रेमाने पिंकी म्हणतात. मला वाटलं आता मैत्रीण म्हणेल की मी थर्ड व्हील. मी लोणावळ्याला राहते. सगळे मला प्रेमाने चिक्की म्हणतात. पण तसे काही होत नाही. तिची मैत्रीण त्यांचा रूम नंबर सांगून पुढची सोय बघते. गोविंदाही प्रॉम्प्टली तिला रात्री फोन करतो, मेरी जानम मेरी सोनम म्हणून गाणे होते आणि रोमान्स अँगलवर टिकमार्क होते. मुळातच ही जोडी धन्यवाद असल्याने मेहुलने या लोकांवर फुटेज वाया घालवलेले नाही. तरीही तलफ आलीच तर दोघांच्या नाचाची तुलना करावी. आधीच सोनममध्ये अजिबात कोअर स्ट्रेंथ नाही, त्यात ती हेंगाडी डान्सर. त्यात तिच्या समोर उभा केला फुल्ल फॉर्मातला गोविंदा!

२.२) फोर-डी चेस

आपल्याला असे कळवले जाते की सोनमचे आईवडील अपघातात गेल्यानंतर जॅकने तिचा सांभाळ केला. सुट्टी संपल्यामुळे तिला अंकलकडे परत जाणे भाग आहे. इथे आपल्याला मेहुलकुमारच्या हिरोंचे व्यवच्छेदक लक्षण बघायला मिळते. सोनम मुंबई एयरपोर्टवर आहे आणि अंकलची समजून ती एका ओमनीत बसते. इथे ही ओमनी स.अ.ची ओमनी असल्याचे विचक्षण प्रेक्षक लगेच ओळखतो. त्यानुसार स.अ. जॅकला फोन करून डिवचतो की बघ मी तुझ्या पिंकीला किडनॅप केलं. यावर जॅक म्हणतो की हमें मालूम था तुम ऐसीही घटिया हरकत करोगे. त्यामुळे मी तुझ्या मुलाला, आदिल इराणीला, आधीच किडनॅप करून ठेवलंय. आता उद्या गपगुमान अकेले महाकाली कबरस्तानमध्ये येऊन पिंकीला परत दे आणि आदिल इराणीला घेऊन जा.

हा खास मेहुलकुमार टच आहे. त्याच्या सिनेमात असे अनेकदा होते की व्हिलन काहीतरी चाल खेळतो. मग मीच तो मास्टरमाईंड असे व्हिलन हिरोला फोन करून कळवतो. हिरो जराही विचलित न होता, मुझे तुमसे यही उम्मीद थी/गीदडोंसे और उम्मीदही क्या की जा सकती हैं/ऐसी घटिया हरकत तुमही कर सकते हो छाप डायलॉग मारतो आणि आधीच तयार करून ठेवलेला काऊंटर मास्टरप्लॅन व्हिलनला सांगतो. भले त्याला हे ठाऊक आहे की व्हिलन काय करणार आहे तरी सिनेमा पुढे जावा या उदात्त हेतुने तो व्हिलनला त्याचा प्लॅन एक्झिक्यूट करू देतो आणि मग त्याचे आनंदाचे डोही तरंगणारे टायटॅनिक महासागरात भसकन बुडवतो. याचे असंख्य हायपर-स्पेसिफिक व्हेरिएशन्स आपल्याला मेहुलपटांत बघायला मिळतात.

स.अ. अदलाबदली करायला कबरस्तानात येतो. अदलाबदली होते आणि स.अ. ने डिकीत लपवलेले मूठभर लोक बाहेर येतात. उपरोक्त लिहिलेली टिप्पणी आपण वाचली आहेच. जॅकने इशारा करताच कबरस्तानातल्या सगळ्या कबरी फोडून जॅकचे डझनावारी लोक बाहेर येतात. पण किंग सूर्यदेवसिंग-लेव्हलचा हिरो नसल्याने त्याने सोनमच्या पर्समध्ये बॉम्बचा सेन्सर लावलेला नाही. याचा फायदा घेऊन स.अ. पसार होतो. अर्थात जॅक व सोनमला काही होत नाही कारण आत्ताशी अर्धा तासच टाईमपास झाला आहे.

३) कानून की दहकती आग

वर्तमानपत्रांच्या कट्समधून आपल्याला शहरात गँगवॉर भडकल्याचे शुभवर्तमान कळवले जाते. फ्रेंच किंवा बंगाली दिग्दर्शक जसे आपल्यावर सोशल मेसेजेस फेकून मारतात तसे मेहुलजी करत नाहीत कारण ते कलाकार आहेत, समाजसुधारक नाहीत. इथे बॅकग्राऊंडला गुजरातीतून 'पत्रकारितेचे स्वातंत्र्य धोक्यात आहे' अशा अर्थाची बातमी दाखवून त्यांनी अतुलनीय दर्जाची सटल सोशल कमेंटरी मारली आहे.

पोलिस या बातम्यांनी हैराण झाले आहेत. कमिशनर सुजित कुमार म्हणतो की या बातम्यांनी आपलं पी आर खराब झालं आहे. तुम्हा लोकांच्यानी काही होईल असं मला वाटत नाही. तरी आपण दिल्लीहून कानून की दहकती आग इन्स्पेक्टर मलिकला बोलावून घेऊया.
ऑटर टच - मेहुलकुमारपटांत साधारणत: कोणीतरी उच्चाधिकारी आगपाखड करतो आणि मग कानून की दहकती आग, शेरों का शेर, राजाओं का राजा वा तत्सम कोणीतरी इसम अस्तित्वात असल्याचे आपणास समजते. काही व्यवच्छेदक उदाहरणे तिरंगात आलोकनाथला राकुचे अस्तित्व समजते, कोहराममध्ये कबीर बेदीने मागवलेला नाना अवतरतो. इथे सुजितकुमार मलिक असल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे.

इन्स्पेक्टर मलिक म्हणजे राज बब्बर. कोणीतरी गोगा नामक गुंड शांतपणे आपल्या घरी बसून नाश्ता करतो आहे तर मलिक अचानक अवतरतो. बाज रब्बर इन्स्पेक्टर असूनही त्याने युनिफॉर्म सब-इन्स्पेक्टरचा घातला आहे कारण त्याच्या खांद्यावर दोनच तारे आहेत. मलिकची पद्धत असते की तो स्वत: कधीच कोणाला हातकड्या घालत नसतो तर तो गुंडांना इतका घाबरवतो की ते लोक स्वत:च हातकड्या घालून घेतात. त्यानुसार तो गोगाला सांगतो की तू आज रात्री अकरा वाजता पोलिस स्टेशनला येऊन स्वत:च स्वत:ला हातकड्या घालणार आहेस.

गोगाचा इंचार्ज गुंड आहे प्रेमचंद कोचर. ही भूमिका देवकुमारने वठवली आहे. तो म्हणतो की अशा मलिक-फलिकला मी घाबरत नाही. मग त्याला खोडरब्बर आवाज बदलून फोन करतो की मी गोगाचा नोकर बोलतो आहे.
ऑटर टच - मेहुलकुमारपटात हिरोकडे सर्व व्हिलन्सचे फोन नंबर असतात आणि ते त्यांना कधीही रीच आऊट करू शकतात - जब उनका जी चाहे. आठवा ब्रिगेडिअर कितीवेळा प्रलयनाथला फोन लावतो ते.
देवकुमार गोगाला म्हणतो की बोल तिकडच्या डिव्हाईसवरून बोल त्याच्याशी आणि स्वत:चा डिव्हाईस स्पीकरवर टाकतो. ही कल्पना असल्याने मलिक गोगाने आपल्याला देवकुमारच्या मालची खबर दिल्याचे खोटे सांगतो. याने बिथरलेला देवकुमार गोगाला मारायचा प्रयत्न करतो. अकराला तीन मिनिटे कमी असताना गोगा कसा बसा पोलिस स्टेशनला पोहोचतो आणि अर्थातच स्वत:च स्वत:ला हातकडी घालून घेतो; बरोब्बर अकरा वाजता!

लवकरच देवकुमारही स्वत:च स्वत:ला हातकड्या घालतो, त्याचे कार्य इथवरच होते. या कामगिरीवर खुश होऊन जगदीश राज ऑप्टिकल फायबरला डीसीपी बनवून किंगला पकडण्यासाठी मुंबईला पाठवतो. याने अनिता राज, मलिकची बायको नाराज होते. पण मलिकपुत्र ज्याला प्रेमाने सगळे विक्की म्हणतात खुश होतो कारण जिला प्रेमाने सगळे पिंकी म्हणतात मुंबईला राहते. गोविंदा अनिता राजपेक्षा दीडच वर्षाने लहान असल्याने प्रेक्षकांना क्षणभर शंका येऊ शकते की हा तिचा सावत्र मुलगा तर नाही? पण नंतर क्लिअर होते की सावत्र अनिता नसून राज बब्बर आहे. हा बहुतेक सुजितकुमारचा दुसरा हटके टच!

४) दिल्लीकरांची दखनेतील सलामीची पावले

४.१) रोमान्स कोटा

मुंबईत पिंकीचा फोन खणाणतो. गोविंदा तिला फोन करून सरप्राईज करतो की तो अचानक मुंबईला आला आहे. इथे अर्ली ९०जचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे. तिच्या बंगल्याबाहेरच एक पब्लिक टेलिफोन बूथ आहे जिथून गोविंदा तिला फोन करतो. असे रहिवासी बंगल्यांबाहेर पब्लिक टेलिफोन बूथ अर्ली ९०ज च्या सिनेमात बर्‍यापैकी कॉमन आहेत उदा. योद्धा या अजरामर कलाकृतीत तर डॅनीच्या खूफिया अड्ड्याबाहेरही एक पब्लिक टेलिफोन बूथ आहे. काळाची पडती पाऊले ओळखून मेहुलजींनी हा ट्रेंड ९०ज सुरु होण्याच्या आधीच आपल्या सिनेमात टाकून आपण ऑटर असल्याची ग्वाही दिली आहे.

बंगल्यातून टेलिपोर्ट होऊन ते कुलाब्यात ट्रॅफिक जॅम करून रोमान्स करतात. त्यांनी "अरे क्या रोकेगी दुनिया उसे, जिसे प्यार हो गया" असे उत्तर दिल्यावर ट्रॅफिकमध्ये अडकलेला एक्स्ट्राही कपाळावर हात मारून घेतो. जानम सोनम गाण्यात मोहम्मद अझीझ कानांवर आदळल्यानंतर या वेळी शब्बीर कुमारला संधी दिली आहे. आधीच्या सीनमध्ये महद जू अ‍ॅन्ड सन्सचे दुकान दिसल्यामुळे आपण गेटवे ऑफ इंडियापासून दोन चौक अंतरावर आहोत हे प्रेक्षकाला कळवले आहेच तर नाचायला गोविंदा-सोनम दोन चौक पुढे जाऊच शकतात नाही का? आधीच्या गाण्यापेक्षा सोनमला अधिक चांगल्याप्रकारे लपवण्यात आले आहे. अधून मधून दिनेश हिंगू आणि रशियन टूरिस्टकन्यका अशी आकर्षणे मेहुलजी आपल्याला दाखवतात. बाकी गाण्यात विशेष काही बघण्याजोगे नाही. मेहुलजींचा इतर बॉलिवूड ऑटर्सप्रमाणे संगीतातून कथा पुढे नेता येते या संकल्पनेवर फारसा विश्वास नाही. त्यांच्या कलासंवेदनांना पूरक अभिनेता नानाच्या रुपाने मिळेपर्यंत 'पीले पीले ओ मेरे राजा' आणि 'हंड्रेड वन हंड्रेड टू' सारखी विश्लेषणायोग्य गाणी ते बनवू शकले नाहीत हे खेदाने नमूद करावे लागेल.

४.२) मुंबई का किंग कौन?

विक्की-पिंकीची भेट झाल्यानंतर किंग-मलिक भेटही व्हायलाच हवी. इथे पुन्हा एकदा मेहुलजी आपली सिग्नेचर फोर-डी चेस स्टाईल दाखवतात. राज बब्बर मुंबईत आल्यानंतर पहिले काम काय करतो तर आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवतो आणि त्याचे उद्घाटन करायला जॅकला बोलावतो. जॅकला नवल वाटते की ही कानून की दहकती आग पोस्टमॉडर्न आर्टिस्ट आहे? आणि अचानक त्याची नजर एका तैलचित्रावर स्थिरावते. चित्रातील पेट्रोल पंपावरचा तरुण कर्मचारी हुबेहूब बिनमिशीचा किंग दिसतो आहे. राज बब्बर खवचटपणे म्हणतो की कधीकधी माझ्या चित्रांमध्ये लोकांना त्यांचा फ्लॅशबॅक दिसतो. पण जॅकला हे आधीच ठाऊक होतं की राज बब्बर असं काहीतरी करणार आहे. त्यामुळे राज बब्बरने भरवलेल्या प्रदर्शनात, त्याच्याही नकळत जॅकने आधीच एक राजच्याच शैलीत चितारलेले तैलचित्र मांडून ठेवले आहे. हे कोणा दिनेश ठाकूरचे आहे, जो एक इमानदार पोलिस ऑफिसर होता आणि तो मारला गेला. असे तुझ्याही सोबत होऊ शकते अशा अर्थाची धमकी देऊन किंग निघून जातो. इथे कळते की किंग फ्लॅशबॅकमध्ये श्रीनगरमध्ये पेट्रोल पंप चालवणारा किशन नामे सामान्य इसम होता.

सुजितकुमार राजला सांगतो की कोणी जॉन नावाचा स्मगलर भारतात येतो आहे आणि तो किंगचा हस्तक आहे. खोडरबर त्याला परस्पर उचलतो आणि त्याच्या जागी खोट्या दाढी मिशा लाऊन किंगला भेटतो. त्याच्या मनोरंजनासाठी डिस्को शांतीचा डान्स ठेवला आहे. ती पार्वती खानच्या आवाजात ये दिल-ए-नादान गाण्यावर डझनभर बायकांच्या सोबत थिरकते. या गाण्यात अनेक मनोरंजक गोष्टी आहेत. नमुन्यादाखल काही - खंजिरीवर बोटांनी तुरळक आघात करूनही ती कशी वाजवावी याचे प्रात्यक्षिक, सारंगीचा गज जिथे बोटांनी स्वरतारा दाबायच्या त्या जागेवर तिरका फिरवूनही कनून/दुतार सारखा आवाज कसा काढावा, डिस्को शांतीचा आयलायनर मेकअप, ती समोर नाचत असतानाही चेहर्‍यावरची सुरकुतीही न हलवता कसे ढिम्म बसून राहावे इ. इ. शेवटी खोडरब्बर कंटाळून जोरजोरात टाळ्या वाजवतो आणि किंग म्हणतो की चला कथा पुढे नेऊ.

राज बब्बर म्हणतो माझ्याकडे वेळ नाही, माल कुठे आहे. जॅक म्हणतो हा काय आलाच. एक माणूस भली मोठी सूटकेस घेऊन येतो. बब्बर ती उघडतो तर त्यात चंदनाचे साबण, अगरबत्ती, धूप वगैरे वस्तु असतात. तो म्हणतो हा काय नॉनसेन्स आहे? जॅक त्याला शांतपणे म्हणतो की मला आधीच माहिती होते की तू मलिक आहेस, जॉन नाहीस. मलिक म्हणतो की यावेळेस तर तू वाचलास पण फार काळ वाचणार नाहीस. जॅक म्हणतो अशीच अजून दिवास्वप्ने बघण्यासाठी बेस्ट ऑफ लक!

५) वर्तमान आणि भूत यांची पहिली भेट

बहुतांश ऑटर्सच्या सिनेमांमध्ये सिमेट्रीला प्रचंड महत्त्व दिलेले दिसून येते. उदा. वेस अँडरसनच्या जवळपास सर्व फ्रेम्स सिमेट्रिक असतात. मेहुलजींना नॅरेटिव्ह सिमेट्रीमध्ये रस असल्याचे आढळते. जसे सुरुवातीला जितेंद्र नाश्त्याच्या वेळी आपले फ्रस्ट्रेशन हवेत गोळीबार करून काढताना दाखवला आहे तसेच आता राज बब्बरही नाश्ता करायचे सोडून उगाचच बसल्या बसल्या गोळ्या चालवत आहे. अनिता सजग बायकोप्रमाणे त्याला थांबवायला जाते - काचेच्या बाटल्या काय स्वस्त समजलात की काय? यावर राज बब्बर डायलॉग मारून अजून दोन बाटल्या फोडतो. गोविंदा आपणही पोलिस इन्स्पेक्टर बनणार असल्याचे सूतोवाच करून राजला सांगतो की प्लॅनही गलत हैं आपका. हल्लीचे गुन्हेगार काही गलतीच करत नाहीत, सबूतच सोडत नाहीत (एसीपी प्रद्युमन वुड लाईक टू हॅव वर्ड विथ यू). जसे काट्याने काटा काढतात तसे या मक्कार गुंडांना मक्कारी करूनच पकडले पाहिजे. याने माजलेले अवडंबर पिसाळते आणि किंगच्या सगळ्या फॅक्टर्‍या, गोदाम, ऑफिसेसवर रेड मारते.

किंग जाऊन मलिकला जाब विचारतो. मलिक त्याला पुन्हा सुनावतो की मी कोणाला गिरफ्तार नाही करत, गुन्हेगार स्वत:च येऊन गिरफ्तार होतात. किंग म्हणतो की अस्सं, बरं मग बघच मी काय करतो ते. या पॉईंटला आपल्याला स.अ.चे दर्शन देऊन तो अजूनही जिवंत असल्याचे वर्तमान कळवले जाते. स्क्रीनप्ले कन्सिस्टन्सीच्या किरकोळ गोष्टी पूर्ण करून मेहुलजी त्यांच्या शैलीच्या क्राऊन ज्वेलकडे वळतात - लोकांनी टीव्ही/रेकॉर्डिंगमार्फत एकमेकांना पैगाम पाठवणे. हे इतके स्पेसिफिक लक्षण आहे की याची उदाहरणे दिलीच पाहिजेत.
उदाहरण १ (सर्वात फेमस, तिरंगा) - https://youtu.be/Ad90UNdppkk&t=5930
उदाहरण २ (मरते दम तक) - https://youtu.be/meIAG-DlPtI&t=3540
उदाहरण ३ (हा चित्रपट, आसमान से ऊंचा) - https://youtu.be/FyBBAisFHZ4&t=3896

जॅक एका पॉश बारमध्ये खार्‍या काजूंसोबत मदिरापान करत आहे. बारमालक अरसिक असल्याने छान गाणी वाजवायची सोडून टीव्हीवर मलिकचा इंटरव्ह्यू लावतो. मलिक टीव्हीमधून किंगला सांगतो की मला खात्री आहे की तू माझा इंटरव्ह्यू बघतो आहेस. माझा तुला पैगाम आहे की तुझा सभ्यतेचा बुरखा फाडून मी तुला अटक करेनच. जॅक चिडून टीव्हीसेटला गोळी घालतो आणि तडकाफडकी बाहेर पडून गाडीने मलिकच्या घराच्या दिशेने निघतो. त्याला इतका राग आला आहे की तो गाडीत बसताक्षणी हॉटेलचे कोरडे ठणठणीत पोर्च भिजवून टाकेल असा मुसळधार पाऊस कोसळू लागतो. गाडी फायबरच्या बंगल्याबाहेर लावून जॅक हातात रिव्हॉल्व्हर घेऊन आवारात प्रवेश करतो. सुदैवाने फायबरची बेडरूम तळमजल्याला आहे. जॅक खिडकी उघडून त्याच्यावर नेम धरतो. खिडकी उघडल्याने पाऊस आत शिरतो आणि त्याने अनिताची झोपमोड होते. ती डोळे चोळत खिडकीकडे बघते आणि वीज कडाडते. जॅक व अनिता एकमेकांकडे भूत पाहिल्यागत एकटक बघत राहतात. काही काळाने जॅक भानावर येतो आणि 'कशी नशिबाने थट्टा आज मांडली' चेहरा करून निघून जातो. इतका वेळ वीजा कडाडूनही फायबरची न मोडलेली झोप किंगच्या मर्सिडीजच्या आवाजाने मोडते. तो अनिताला विचारतो की काय झालं. मग खिडकीतून बघतो तर किंगची मर्सिडीज त्याला ओळखू येते. अनिता विचारते हा किंग कोण? राज सांगतो की ज्या गुंडाला पकडायला तो मुंबईला आला आहे त्याचे नाव किंग! हे ऐकून अनिताची 'खेळ दैवाचा कुणाला कळला' गाण्यातील आशा काळे होते.

इथे माझा अल्पविराम. किंग व अनिताचा एकमेकांशी काय संबंध आहे? डीसीपी सायबर जॅकला स्वत:च स्वत:ला ऑप्टिक फायबर केबल घालायला लावण्यात यशस्वी होईल का? गोविंदा-सोनम आपल्याला अजून कितीवेळा शब्बीर कुमार/मोहम्मद अझीझचा आवाज ऐकायला लावतील? स.अ.ने असे काय कांड केले की जितेंद्र त्याच्या पुतळ्यावर रोज पाच गोळ्या वाया घालवतो? आणि सर्वात महत्त्वाचे इतर वेळी मराठी अ‍ॅक्सेंटमध्ये बोलणारा स.अ. फक्त 'खोबों मे' बंगाली अ‍ॅक्सेंटमध्ये का बोलतो? अशा इतर प्रश्नांची हटके उत्तरे आणि मेहुलजींच्या शैलीविषयक उर्वरित नोंदी मध्यंतरानंतर!

~*~*~*~*~*~

पोस्ट मध्यंतर

६) कसमें वादे

६.१) वचनबद्ध

आशा काळे मोडमधली अनिता राज सोज्वळ साडी घालून देवीला साकडे घालते. मग तशीच ती जॅकला भेटायला जाते. ती म्हणते की तू ज्या आगीत जळत आहेस त्याहीपेक्षा मोठी अशी एक आग आहे, माझ्या नवर्‍याच्या चितेची आग. जॅकला जेन्युईनली वाईट वाटते. तो म्हणतो हेच ओळखलंस तू मला? मी वचन देतो की तुझ्या-कपाळीचे-कुंकू जब्बरला मारणार नाही. ती समाधानाने परत जाते. इथे कन्फर्म होते की तो पेट्रोलपंप चालक जितेंद्रचा फ्लॅशबॅक आहे आणि अनिता त्याची फ्लॅशबॅकची सेटिंग. मग किंगने मलिकला दाखवलेला दिनेश ठाकूर कोण होता? तर तो होता सुधीर दळवी. दळवी मलिकचे वडील होते (हार घातलेला फोटो ओन्ली अपिअरन्स) आणि त्या चित्रप्रदर्शनात त्यांच्या मृत्युचा विषय छेडून किंगने मलिकला डिवचले होते हे आता समजते. अनिता घरी परतते तर तिला दिसते की गोविंदा इन्स्पेक्टर (युनिफॉर्म मात्र सबइन्स्पेक्टरचा) झाला आहे आणि कुंकू जब्बर अभिमानाने आमच्या खानदानातले सगळे कसे पोलिस होतात हे सांगतो. इमोशनल तारा छेडून झाल्यावर मेहुलजी कॉमेडी व अ‍ॅक्शनकडे वळतात.

६.२) नागाची वळवळ

रात्रीच्या काळोखात अरुणोदय नामक लाँच दाखवून मेहुलजी आपल्या विनोदबुद्धीचे प्रदर्शन करतात. गोविंदा ही बोट अडवून मुख्य तस्कर मिस्टर रॉनीची वाट बघतो आहे. अ‍ॅम्बॅसेडरने रॉनी झालेला मॅकमोहन येतो आणि गोविंदाला बघून कुत्सित हसतो. त्याच्या हातातले वॉरंट घेतो आणि फाडून फेकून देतो. मॅकमोहन आपल्याला कस्पटासमान लेखत असल्याचे गोविंदाला सहन होत नाही आणि तो त्याला गोळी घालून ठार करतो. मेहुलजींच्या नायक 'कानून हात में लेना' बाबतीत कसलाही विधिनिषेध ठेवत नाहीत. त्यामुळे तो इथवर थांबत नाही. रॉनीच्या बॉसपर्यंत, स.अ. पुत्र प्रेमराज अर्थात आदि इराणीपर्यंत ही बातमी जेमतेम पोहोचते आहे तोवर हेल्मेट घातलेला गोविंदाचा स्टंट डबल जीपसकट त्याच्या घरात घुसतो. गोविंदा म्हणतो की माझ्यासोबत पोलिस स्टेशनमध्ये चल नाहीतर तुझीही अवस्था रॉनीसारखी होईल. प्रेमराज असा कसा सरेंडर करेल? हाणामारी सुरु होते. या कालखंडातला गोविंदा कादर खान/डेव्हिड धवन स्कूलचा गोविंदा नसून अ‍ॅक्शन स्टार गोविंदा आहे. त्यामुळे थोड्याच वेळात आदि इराणीची कणीक तिंबून तो त्याला जेलमध्ये टाकतो.

हे ऐकून स.अ. खवळतो. वडील मलिक मला छळतो आहे आणि मुलगा मलिक माझ्या मुलाला? या खानदानाला समज द्यावीच लागेल. तो जाऊन सीएसआय सायबरला भेटतो. सायबर विचारतो तू कोण? स.अ. सांगतो की या शहरातले सगळ्या जुगारांवर माझं नियंत्रण आहे म्हणून मला नागराज म्हणतात. हे लॉजिक इतकं टँजंट आहे की राज बब्बरला धक्का बसलेला चेहरा करण्यासाठी वेगळी अ‍ॅक्टिंग करावी लागत नाही. स.अ. सांगतो की माझ्या मुलाला सोडून दे. त्या बदल्यात पैसे तर नाही पण चेतावनी मी नक्की देऊ शकतो. यानंतरही जर माझं कोणी ऐकलं नाही तर मग मी छोटीशी धमकी देतो. अजून तासाभरात माझ्या मुलाला सोड नाहीतर मी तुझ्या मुलाला डसेन. याने चिडून राज बब्बर इतक्या जोरात स.अ.च्या श्रीमुखात ठेवून देतो की तो भेलकांडत जाऊन फायली ठेवलेल्या शेल्फवर आदळतो. दोघे 'माझं नाव नागराज याद रखना' आणि 'हमारा नाम रंजित मलिक याद रखना' अशी व्हिजिटिंग कार्डांची देवाणघेवाण करतात आणि स.अ. अपमानित होऊन घरी जातो. आरशात स्वत:चा सुजलेला गाल न्याहळत तो स्वत:ला बजावतो की जोवर मलिकला मौत की नींद येत नाही तोवर त्याला चैन की नींद येणार नाही.

नागराज मलिकचीच ट्रिक मलिकवर वापरतो. तो त्याला फोन करून सांगतो की आज रात्री दोन वाजता बलॉर्ड पियरला (Ballard Pier) किंगची ब्राऊन शुगरची कन्साईनमेंट घेऊन एक गाडी येणार आहे. त्यानुसार कोलाबा कॉजवेच्या एरियात राज बब्बर एकटाच रात्रीचा पोलिस जीपमधून स.अ. ने सांगितलेली गाडी शोधत फिरतो. त्या गाडीत स.अ. चे मारेकरी आहेत. भांबावलेल्या मलिकला ते हॉकी स्टिकने तुडव तुडव तुडवतात. त्याला मेलेला समजून एका हातगाडीवर टाकून ते पळतात. तेवढ्यात त्यातला एकाला मलिकचे रिव्हॉल्व्हर दिसते. हा बाय चान्स वाचला तर काय घ्या म्हणून तो कन्फर्मेशनसाठी गोळी चालवतो. तितक्यात मर्सिडीजचा आवाज येतो आणि जॅक मध्ये तडमडून ती गोळी झेलतो. त्याच्या सुदैवाने हलगर्जी खोडरबराने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमध्ये एकच गोळी भरलेली असते. मग किंग त्या गुंडाला गोळी मारतो आणि मलिकचे प्राण वाचवतो. रात्री नागराजला फोन येतो. फोनवर किंग असतो. किंगने मलिकला वाचवले ऐकून त्याला अचंबा वाटतो. त्याचे इतर लोक जे मलिक मेला का नाही हे कन्फर्म न करताच परतले त्यांना तो यमसदनी धाडतो आणि मलिक/किंग मित्र कसे काय झाले याचा छडा लावण्याचा आदेश देतो.

७) मेलोड्रामा

७.१) अर्धवट नवरा

मेहुलजी आता निर्माता सुजितकुमारचा मान ठेवून काहीतरी हटके करायचे म्हणून थोडा मेलोड्रामा एक्स्प्लोअर करतात. बब्बरच्या वाटची गोळी खावी लागल्याने किंगही थोडा वैतागतो. फ्लॅशबॅकची अन्नू असली तरी अनितासाठी याने किती सहन करायचं? मग तो तिला फोन फिरवतो. अन्नू विचारते काय झालं? तो म्हणतो मला तुला भेटायचं आहे. ती म्हणते ते शक्य नाही. तो म्हणतो हॉटेल ब्लू डायमंड, रुम नं ९०९. अशा रीतिने इन्स्टाग्राम अल्गोरिदमच्या टॉक्सिक एक्सप्रमाणे वर्तन केल्यानंतर तो फोन ठेवून देतो. कारण त्याला खात्री आहे की फोनवर कितीही भाव खाल्ला तरी अन्नू येणारच! त्यांच्या दुर्दैवाने बेडरूममध्ये बसलेला राज बब्बरही हे संभाषण ऐकतो. त्याच्या मनात आता शक नामक किडा वळवळू लागला आहे. तो तिचा पाठलाग करतो. तिचा आणि किंगचा काय संबंध आहे?

अनिता जाऊन करवादते. मी आता अन्नू नाही, मिसेस खोडरबर आहे. जॅक म्हणतो की हां मला माहित आहे. तेच खोडरबर झिजून झिजून संपू नये म्हणून मी तुला सावध करायला बोलावले आहे. अनिता म्हणते की सरळ सरळ सांग ना की तू वचनभंग करून खोडरबराला मारणार आहेस. याने भडकून जॅक आपली जखम दाखवतो. इथे आपल्याला कळते की मलिकने त्याच्यावरचा हल्ला मामुली हादसा म्हणून खपवला आहे. हा काय बावळटपणा आहे? खास दिल्लीहून मागवलेल्या कानूनच्या दहकत्या आगीला आधी नागराज धमकी देतो, मग त्याला कुत्र्यागत बडवले जाते, आणि रिपोर्ट काय तर मामुली हादसा?! जॅक म्हणतो तुझा नवरा अर्धवट आहे, दरवेळी मी त्याला वाचवायला वेळेत पोहोचेनच असे नाही. जा, त्याला समजाव.

७.२) फ्लॅशबॅक

ती घरी परतते तर ऑप्टिकल फायबर आपण अर्धवट आहोत हे पूर्ण सिद्ध करतो. तो सीनची सुरुवातच कानफटात मारून करतो. अनिता त्याचं बरंच ऐकून घेते आणि कॅमेर्‍यामागच्या मेहुलजींना इशारा करते. मेहुलजी सुद्धा 'हं, आता फ्लॅशबॅक सुरु करायला चांगला मुहुर्त आहे' असे सांगतात आणि ती तिची कहाणी सुरु करते. बेसिकली ती कश्मीरमध्ये राहत होती आणि तिच्या परिवाराची वाताहत होते. मग ती अत्याचारी लोकांपासून पळत असताना तिला हायवेवर जीपने चाललेला स.अ. भेटतो. वाटेत जितेंद्राचा पेट्रोल पंप आहे. अपेक्षेप्रमाणे जॅक अनिताला स.अ. च्या तावडीतून वाचवतो. अनिताला जॅकच्या डोळ्यात सच्चाई दिसते आणि ती त्याच्या घरी जाते. काही दिवसांतच त्यांचे प्रेम जुळते आणि निर्माता सुजितकुमारला लक्षात येते की च्यामारी अजून जितेंद्रचा एकपण डान्स झाला नाही.

जिया प्यार मांगे जिया म्हणून गाणे सुरु होते. गोविंदा-सोनमच्या तुलनेत जितेंद्र-अनिताच्या नृत्यकौशल्यात कमी फरक आहे आणि जितेंद्रही फॉर्मातला जितेंद्र नाही. त्यामुळे दोघे डोळ्यात खुपत नाहीत. बॅकग्राऊंडला काश्मीरचे निसर्गसौंदर्य आहे. पार्श्वगायकही कुमार सानू आहे. ही क्वालिटी अपग्रेड बघून प्रेक्षक स्तिमित होतो. जितेंद्रच्या क्लासिक डान्सस्टेप्सवर आधी श्रीनगरच्या डोंगरांवर, मग दल लेकच्या शिकार्‍यात, आणि फायनली बेडरूममध्ये ते गलती करतात. आता गलती झाली की अक्काबाईचा फेरा सुरु होणार हे ओघानेच आले. स.अ. रिटर्न्स! तो जॅकच्या बहिणीवर जबरदस्ती करतो. जॅक प्रत्युत्तर म्हणून फायटिंग करतो तर त्याच्यावर फेकलेला चाकू बहिण झेलते आणि मरते. तो स.अ. चा पाठलाग करणार तेवढ्यात स.अ.ने फेकलेल्या मशालीच्या आगीत पेट्रोल पंपाचा स्फोट होतो. याने हबकलेल्या जॅकला पोलिस त्याच्याच बहिणीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करतात. प्रेग्नंट अनिता आत्महत्येचा निर्णय घेते पण सीएसआय सायबर येऊन तिला वाचवतो. ती अनेकदा त्याला गोविंदाचा बाप कोण आहे सांगण्याचा प्रयत्न करते पण खोडरबराला कूल नवरा बनण्याची भारी हौस! तो दर वेळी तिला टाळतो. फायनली सगळं सांगून ती म्हणते की तोच किशन आजचा किंग आहे. झालं समाधान? खोडरब्बर म्हणतो की सॉरी, मी विसरलो की बॅकग्राऊंड चेक फार फार महत्त्वाचा! तुझी काही चूक नाही. जॅक म्हणतो तेच बरोबर आहे, तुझा नवरा अर्धवट आहे.

७.३) राज, हमराज, और हमराज का राज

जॅकला रात्रीचे इतर काही उद्योग नाहीत तरी तो कोणतीतरी ब्लेंडेड स्कॉच मॅक्डोवेल्स सोड्याच्या साथीने ढोसत बसला आहे. अशात त्याला राज बब्बर येऊन टोचतो. जॅक म्हणतो काय हवं बाबा तुला? बब्बर म्हणतो मला काही नको. मी फक्त तुला हे सांगायला आलो आहे की तुझा मुलगा जिवंत आहे. ज्याला सगळे प्रेमाने विक्की म्हणतात ती तुझी गलती आहे. जॅक अर्धवट नसल्याने तो तत्क्षणी रॅशनल निर्णय घेतो. तो म्हणतो की हे सत्य जगासमोर आणण्यात काय हशील आहे? तू आणि अनिता सुखाने जगता आहात, गोविंदा आणि तुझे छान प्रेमळ संबंध आहेत, त्यात मी मिठाचा खडा कशाला पाहिजे? बब्बर म्हणतो मग मी काय करू? जॅक म्हणतो अनिता राज प्रमाणेच माझा हाही राज तुझ्याकडे सुरक्षित असू देत. तेरी भी चुप, मेरी भी चुप! या सीनमध्ये मेहुलजींची मेलोड्रामा स्टाईल दिसते - सिचुएशन्स व्हेअर देअर आर नो गुड आन्सर्स. उदा. क्रांतिवीरमधला नानाचा सीन फेमस आहे पण त्याच्या जस्ट आधी 'अगर हिंदू हो तो मुसलमान समझ के मार दो, और मुसलमान हो तो हिंदू समझ के मार दो' हा डायलॉग आणि त्याचे मेलोड्रामाटिक चित्रणही मेहुलजींचीच क्रिएटिव्हिटी आहे. राज बब्बर मग त्याच अरसिक बारमध्ये जाऊन रम ढोसत बसतो. गोविंदासोबत घालवलेले क्षण त्याच्यासमोर तरळतात. दारूच्या नशेत घरी येऊन राज बब्बर अचानक फारच चांगली अ‍ॅक्टिंग करत गोविंदाच्या फोटोशी इमोशनल संवाद साधतो. अनिता येऊन त्याचे सांत्वन करते आणि राज बब्बर हा राज आपण सुरक्षित ठेवणार असल्याचे तिला कळवतो.

८) आज का बेस्ट आयटम

अर्धातास फारच भावनिक झाल्यानंतर मेहुलजी परत आपल्या नॅचरल शैलीकडे वळतात. गोविंदा सोनमला दाखवायला घरी घेऊन येतो. सोनम त्या सगळ्यांना आपल्या बर्थडे पार्टीला इन्व्हाईट करायला आली आहे. अनिताही आता तुझ्या अंकलशी भेटलंच पाहिजे हे मान्य करून आपली मूक संमती देते. पार्टीच्या सायंकाळी जॅक-अनिता-राज बब्बरला कळते की अरे आपण व्याही-विहीण होणार आहोत. इथे त्यांची अ‍ॅक्टिंग म्हटलं तर हार्ड हिटिंग आहे, खास करून जॅक गोविंदाची गळाभेट घेतो तेव्हा छान इमोशनल झाला आहे. पण मग प्रेक्षकाला सुजितकुमारचा संवेदनशील हटके इंटरव्ह्यू आणि मेहुलजींची 'आर्ट फिल्म तो मैं बनाता ही नही' स्लोगन आठवते आणि तो सावरतो. मेहुलजीही ताबडतोब प्रेक्षकाच्या मनात तयार झालेल्या अपेक्षांची पूर्ती करतात.

सोनम केक कापते आणि 'आज का बेस्ट आयटम' या शब्दांत जॅकच्या गाण्याची भलामण करते. लेट्स रिपीट - आज सोनमचा वाढदिवस आहे. आज त्यांच्या पालकांची भेट झाली म्हणजे अनौपचारिक रित्या तिचे व गोविंदाचे लग्न ठरले आहे. जॅक-अनिता बॅकग्राऊंड कोणाला माहित नसल्याने सगळ्या पाहुण्यांच्या दृष्टीने जॅकच्या आनंदाला आज पारावार राहिलेला नाही. आणि अशा परिस्थितीत 'आज का बेस्ट आयटम' म्हणून जॅक सिंग्ज सॅडेस्ट पॉसिबल साँग! कुमार सानू रडू लागतो 'जिंदगी से जब मिले अजनबी लगी.'
या गाण्यातून जणू मेहुलजींनी 'हटके हटके, अजून किती हटके' असे म्हणत संवेदनशील सुजितकुमार विरोधात बंड पुकारले आहे. गळाबंद कोट घातलेला जितेंद्र आधी चेहरा शक्य तितका आंबवतो आणि सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधतो जेणेकरून ऑकवर्ड अनिताकडे कुणाचे लक्ष जाऊ नये. मग नाथा कामतप्रमाणे त्याच्या गळाच्या शिरा ताणतात आणि डोळे आढ्याला लागतात. गोविंदा सोनमकडे 'तुझ्या काकांना कोण चावलं' चेहर्‍याने बघतो आणि ती वेडगळ हसते. पहिले कडवे सुरु होते आणि एक एक्स्ट्रा 'देणेघेणे राम जाणे' चेहर्‍याने रसना सरबत पिताना आपल्याला दिसतो. जितेंद्रलाही इतका वेळ फक्त राज बब्बरच हसतो आहे दिसून तोही पाहुण्यांच्या समाधानासाठी हसतो. हे बघून राज बब्बरला चेव चढतो. तो अन्वर हुसेनच्या आवाजात तारसप्तकात विव्हळतो. एव्हाना या तिघांमध्ये काहीतरी चाललंय हे लक्षात येऊन एक्स्ट्रा पाहुणे प्रचंड अवघडले आहेत. अनिता म्हणते की सगळे ऑकवर्ड झालेच आहेत तर मी का मागे राहू. ती आपलं रडगाणे सुरु करते आणि या सगळ्याशी काहीही संबंध नसल्याप्रमाणे वेटर एक्स्ट्रा कोकाकोलाचा दुसरा राऊंड फिरवतो. मग अभिजीत गोविंदाच्या कानात कुजबुजतो की नुसतं सोनमकडे टक लावून बघण्यापेक्षा तू पण पाहुण्यांना ऑकवर्ड करण्यात आपला वाटा उचल. गोविंदा म्हणतो की मग तू हो सुरु मी ओठ हलवतो. सोनमही एक ओळ गाऊन घेते.
या पॉईंटला जितेंद्र डिक्लेअर करतो की वी हॅव क्रिएटेड अ मास्टरपीस आणि 'जिंदगी से जब मिले अजनबी लगी' म्हणत कमाल एक्सप्रेशन देतो. (https://youtu.be/FyBBAisFHZ4&t=7138 मोजून पाच सेकंदाचा शॉट आहे. कॅमेरा अनिता राजवर वळण्याच्या जस्ट आधी पॉज करा व स्क्रीनशॉट घ्या. त्याचे अत्यंतिक समाधानाने खिशात हात घालत, कॅमेर्‍यात बघून केलेले हास्य न चुकवण्यासारखे. ऑल युवर डिप्रेशन विल मेल्ट अवे!)

९) क्लायमॅक्स

या पॉईंटला मेहुलजी सुजितजींना म्हणाले असतील की बजेट वाढतंय तरी आता मॅक्स वीस मिनिटांत सिनेमा उरकूयात. सुजितजींच्या सगळ्या संवेदना अ‍ॅड्रेस झाल्यामुळे तेही हिरवा कंदील दाखवतात. नागराजचा मुलगा आदि इराणी शिक्षा भोगून बाहेर येतो आणि नागराजला कळते की किंग आणि मलिक व्याही होणार आहेत. नागराज म्हणतो की व्हेरी गुड. या रिश्त्यावर पोलिस डिपार्टमेंटला काही ऑब्जेक्शन नाही तर मला काय ऑब्जेक्शन असणार आहे. उलट आता मी या लोकांना असा डसेन की ते जन्मभर लक्षात ठेवतील.
एव्हाना आपल्याला कळले आहेच की सुपर अ‍ॅक्युरेट भूगोलानुसार सर्व वर्तमानातले सीन्स कुलाबा कॉजवेच्या आजूबाजूच्या भागात शूट झाले आहेत. त्यानुसार कुलाबा पोस्ट ऑफिसवरून राज बब्बर रात्रीचा चालला आहे (रस्त्याच्या कडेला 'धी इंडियन पोष्ट' असा ट्रक). यावेळेस काही शंकाच नको म्हणून स्वत: स.अ. बारा अँबेसेडर भरून माणसे घेऊन आला आहे. नागराज त्याला सांगतो की उद्या तुला पंधरा ऑगस्ट म्हणून शौर्यपदक देणार आहेत. पण त्या आधी मी तुला मृत्युपदक देणार आहे.
ऑटर टचेस
- मेहुलजींच्या सिनेमात मेन व्हिलन एकातरी पोलिस/सैनिकी अधिकार्‍याला अतिशय बेकाररित्या मारतो. त्या काळापर्यंत मेन व्हिलन्स स्त्रीलंपट असत किंवा कमकुवत घटक (लहान मुले, म्हातारे कोतारे, नि:शस्त्र नागरिक) यांना मारत. क्वचितच शानच्या शाकालप्रमाणे एखादा व्हिलन सुनील दत्तसारख्या टेरर अधिकार्‍यास जातीने ठार करे. पण इथे मेन व्हिलन धडधाकट, सक्षम अधिकार्‍यांना मारताना दाखवून मेहुल आपला व्हिलन अधिक टेरर असल्याचे प्रतिपादन करतो. अ‍ॅन इनोव्हेशन फॉर दॅट टाईम. उदा. गेंडास्वामी तिरंगात 'नामुमकिन को मुमकिन करने का दुसरा नाम' ला मारतो. कोहराममध्ये डॅनी जॅकी श्रॉफला हालहाल करून ठार करतो. इथे स.अ. कानून की दहकती आग विझवणार आहे.
- बहुतेक मेहुलपटांत पंधरा ऑगस्ट/सव्वीस जानेवारी तारखांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, ते केवळ तिरंगापुरते मर्यादित नाही.
इथे एक इंप्रेसिव्ह चेज सिक्वेन्स आहे. बराच वेळ पाठलाग झाल्यानंतर अखेर स.अ. राज बब्बरला गाठतो आणि निर्दयतेने गोळ्यांचा वर्षाव करतो. इथे पोएटिक जस्टिस म्हणावा तसा राज बब्बर मरता मरता ध्वजारोहण करतो आणि तिरंगी झेंडा अलगदपणे त्याच्या शवावर चादरीसारखा पसरतो. स.अ. मग आपली विषारी चाल खेळतो आणि राजच्या रक्ताने 'किंग' असे लिहून ठेवतो. ऑफकोर्स ते बघून गोविंदाचा गैरसमज होतो. स.अ ची चाल परफेक्ट आहे पण त्याच्या दुर्दैवाने मेहुलजींना सिनेमा उरकण्याची परवानगी आधीच मिळाली आहे.

गोविंदा जॅकला मारायला त्याच्या घरी जातो पण अनिता वेळेत पोहोचून अनर्थ घडू देत नाही. ती त्याला सत्य सांगते. गोविंदा इज डंबफाऊंडेड! तो विचारतो की मग मलिकने किंगचे नाव का घेतले? लपून ऐकणारा स.अ. क्यू घेऊन बाहेर येतो. आता अपेक्षेप्रमाणे बाप खून बेटा करत नसल्याने तो आपले पत्ते ओपन करतो आणि गोळीबार सुरु करतो. किंगच्या माणसांना यायला थोडासाच उशीर होतो आणि जॅकला गोविंदाला वाचवण्यासाठी गोळी झेलावी लागते. राज बब्बरला वाचवायला उजव्या छातीवर गोळी खावी लागली होती, गोविंदाला वाचवायला डाव्या छातीवर. परफेक्ट सिमेट्री!

सगळी माणसे ठार झाल्यामुळे स.अ. काढता पाय घेतो. गोविंदा स.अ. च्या अड्ड्यावर जाऊन आपला सगळा राग काढतो. इथे मेहुलजी आपल्याला सिमेट्रीप्रमाणे अँटी-सिमेट्रीचीही जाण असल्याचे प्रदर्शन करतात. स.अ. बेटेकरवी बाप का खून करायला निघाला होता. इथे गोविंदा स.अ.च्या गोळीपासून वाचण्यासाठी आदि इराणीची ढाल करतो आणि बापकडून बेटेका खून होतो. स.अ. हताश होऊन गाडीने पळ काढतो. जीवाच्या आकांताने गाडी हाकणारा स.अ. नेमका जिथे राज बब्बर मेला तिथेच येऊन तडमडतो. अ‍ॅक्सिडेंटमुळे स.अ. ला गाडीतून बाहेर यावेच लागते आणि गोविंदा त्याच्या नडगी गोळी मारतो.

या पॉईंटला सुजितकुमार कमिशनर बनून अवतरतो. त्याने बहुतेक मेहुलजींना 'एक लास्ट हटके टच' अशी विनंती केली असावी. मेहुलजी म्हणतात आता तीनच मिनिटे राहिली आहेत आय डोन्ट केअर. तो म्हणतो की तू कानूनला हातात घेऊ नकोस. स.अ. पण हुशारीने गिरफ्तार होऊ बघतो. तेवढ्यात मृत्युशय्येवरचा जॅक येतो आणि म्हणतो की याला सोडणे चुकीचे ठरेल. विक्की याला मारू शकत नाही पण इतकी वर्षे रोज ब्रेकफास्टला पाच गोळ्या वाया घालवून सहावी गोळी शिल्लक ठेवणारा किंग मारू शकतो. असे म्हणून एकदाची तो ती सहावी गोळी स.अ. ला घालतो आणि स.अ. मरतो. जॅकही थोडे भावनिक उमाळे मारून मरतो.

अजूनही संवेदनशील निर्माता सुजितकुमारचे समाधान झालेले नाही. शहरातल्या गुंडांना आणि किंगला हैराण राज बब्बरने करूनही केवळ मॅकमोहनचा एनकाऊंटर केला म्हणून गोविंदा मेन हिरो असल्याचे सुजित कुमार जाहीर करतो. पुरस्कार वितरण सोहळ्याला सोनम कुठे बसली आहे कुणास ठाऊक पण गोविंदा अनिता राजला खेटून बसला आहे. तो म्हणतो की मी पुरस्कार अनिताच्या हातूनच स्वीकारेन. जाता जाताही हटके टच दिल्याने सुजितकुमार प्रसन्नपणे हसतो आणि गोविंदाला अनिता राज पुरस्कार देते. मग गोविंदा आणि सोनमच्या डान्स सीक्वेन्सवर सिनेमा संपतो.

~*~*~*~*~*~

जाता जाता आमचे प्रेरणास्थान धरमपाजींचा मान राखून संदेश
ऑटर सध्या खूप रेअर झाले आहेत पण तुमचा आवडता दिग्दर्शक घेऊन त्याचे सिनेमा एका पाठोपाठ पाहणे ही जेन्युईनली इंटरेस्टिंग फिल्म-वॉचिंग अ‍ॅक्टिव्हिटी आहे. तुमची कंफर्ट लेव्हल/चॉईस बघता विविध श्रेणींचे दिग्दर्शक सुचवता येतील. तरी काही नावे

कॅटेगरी १ - जेरी लुईस, अल्फोन्सो क्वारोन, सातोशी कॉन
कॅटेगरी २ - अर्जुन हिंगोरानी, शिबु मित्रा, अनिल शर्मा

यातली कोणती कॅटेगरी निवडायची हे तुमच्यावर आहे.

(समाप्त)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मी थर्ड व्हील. मी लोणावळ्याला राहते. सगळे मला प्रेमाने चिक्की म्हणतात.>>> ह्याला मी लय जोरात हसलो Proud
बाकी राज बब्बर, खोडरब्बर, ऑप्टीकल फायबर, सायबर, माजलेले अवडंबर :ख्याख्या:
फुल्ल ऑन एंटरटेंमेंट ... मस्त चिरफाड!

कॅटेगरी १ - जेरी लुईस, अल्फोन्सो क्वारोन, सातोशी कॉन
कॅटेगरी २ - अर्जुन हिंगोरानी, शिबु मित्रा, अनिल शर्मा

यातली कोणती कॅटेगरी निवडायची हे तुमच्यावर आहे.
<<<<<<< हा काय प्रश्न झाला? अर्थातच कॅटेगरी २. 'सातोशी कॉन'पेक्षाही 'तीसरा कौन?' हा विषय मला जास्त रंजक वाटतो. Proud

बाकी वाचतेय हळूहळू... राज बब्बर सहस्रनामावली वाचून पाठ करीन म्हणते. Proud
सदाशिव अमरापूरकरची इच्छाधारी व्हिलन फेज होती का तेव्हा? काला नाग, नागराज....

साक्षात प्रेमअगन बघितलेली माणसं आहेत इथे. रिस्पेक्टच… >> Happy

थँक्स हर्षल Happy

हा काय प्रश्न झाला? अर्थातच कॅटेगरी २. 'सातोशी कॉन'पेक्षाही 'तीसरा कौन?' हा विषय मला जास्त रंजक वाटतो. >> ज्जे ब्बात!

राज बब्बर सहस्रनामावली वाचून पाठ करीन म्हणते >> Lol
श्र तुझ्याही अ‍ॅडिशन्स येऊ देत. Happy

सदाशिव अमरापूरकरची इच्छाधारी व्हिलन फेज >> या यादीत आणखी शेषनाग (तकदीर का तमाशा), नागेश्वर (इन्स्पेक्टर धनुष). माझ्यामते स.अ. चे सिनेमातले नाव त्या सिनेमाला चटकन जोखण्याचे ह्युरिस्टिक आहे. त्याची इतर काही नावे - बाबुराव भेजा, फिरंगी पैसेवाला, हिटलर हटेला.

मी जसा हा पिक्चर पुढे पाहतोय तसा त्या वेळचा इथला मजकूरही वाचतोय Happy

ऑप्टिकल फायबरला >>> Lol

तिच्या बंगल्याबाहेरच एक पब्लिक टेलिफोन बूथ आहे जिथून गोविंदा तिला फोन करतो. >>> Happy हो आणि ती वरच्या मजल्यावर असली तरी तिला "आँख उठाके देख" म्हणतो, खाली पाहायला. हे म्हणजे जय-वीरू खाली व कालिया स्वतः टाकीवर असताना ठाकूरने "जरा नजरे उठाकर देख" म्हंटल्यासारखे झाले.

आपण गेटवे ऑफ इंडियापासून दोन चौक अंतरावर आहोत हे प्रेक्षकाला कळवले आहेच >>> मी विचारणारच होतो की हे शूटिंग कोठे चालले आहे. मला आधी मरीन लाइन्सचा भाग वाटला. इथे शब्बीर गातोय त्यामुळे त्यापेक्षा मी मुंबई बघत बसलो. या गाण्यात प्रेमी जीवांना दुनिया अलग करू शकत नाही सेंट्रल (किंवा मरीन लाइन्स असेल तर वेस्टर्न) थीम आहे व त्याकरता विविध उपमा वापरलेल्या आहेत. त्यात एक अशीही आहे "आँधीमे हिंमत है कहाँ, बादल से बिजली जुदा करे". Isn't this exactly what a storm does?

या गाण्यात सोनमच्या पॅण्टपेक्षाही गोविंदाची पॅण्ट तोकडी आहे.
मेहुलकुमार: तुम्हाला हे कपडे घालावे लागतील.
सोनमः नाही मी इतके तोकडे कपडे घालणार नाही.
मेहुलकुमारः कहानी की माँग....
(तेवढ्यात गोविंदा सेटवर येतो. सोनम त्याचे कपडे पाहते)
सोनमः umm... never mind

जॅकला नवल वाटते की ही कानून की दहकती आग पोस्टमॉडर्न आर्टिस्ट आहे? >>> Lol

खंजिरीवर बोटांनी तुरळक आघात करूनही ती कशी वाजवावी याचे प्रात्यक्षिक >>> Lol

इतका वेळ वीजा कडाडूनही फायबरची न मोडलेली झोप किंगच्या मर्सिडीजच्या आवाजाने मोडते. तो अनिताला विचारतो की काय झालं >>> Lol आणि ती ही फक्त गाडी जाताना. आधी तो येताना त्याच आवाजाने मोडलेली नसते.

चित्रप्रदर्शन ते अनिता राज-जीतूभाई ओल्ड कनेक्शन.

जॅक म्हणतो अशीच अजून दिवास्वप्ने बघण्यासाठी बेस्ट ऑफ लक! >>> इथे किंग त्याला म्हणतो "जमीनने अबतक ऐसा फौलाद पैदा नही किया जिससे मेरे हाथोंकी हथकडी बन सके". इथे खरे म्हणजे राज बब्बरने किमान इतके सांगायला हवे होते की पोलाद हे जमिनीत उगवत नाही. पण एकूण किंगपुढे बिनतोड डॉयलॉग मारून कोणी जाऊ शकत नाही. तो डीएसपी असला तरी किंग त्याला प्रत्युत्तर ऐकवल्याशिवाय जाउ देत नाही.

त्याआधी त्या मूळ मि. जॉनला पोलिस पकडतात. तेथे तो एकदम देशी अ‍ॅक्सेण्ट मधे व्हाट इज धिस म्हणतो. भारतातील कस्टमर सपोर्ट वाल्याने लाइन सुरू आहे हे विसरून त्या कमावलेल्या अमेरिकन उच्चारात न बोलता मूळ स्थानिक उच्चारात बोलावे तसे होते. मला वाटले पोलिस त्याला गिरफ्तार करताना म्हणतील "you are being arrested for bad foreign accent"

ही अदलाबदल अ‍ॅपरण्टली राज बब्बरवर कुरघोडी आहे. तेथून राज बब्बर निघून जातो. वास्तविक जीतूने तेथे त्याच्या गुन्ह्याचा ढळढळीत पुरावा दिलेला असतो. मूळ जॉनचा फोटो त्याला दाखवून. पण अर्धा पिक्चर अजून बाकी असल्याने राज बब्बर त्याला किमान चौकशीसाठी सुद्धा पकडत नाही. नाहीतर त्याच्याच पोलिसांनी ज्याला पकडला आहे तोच माणूस याला भेटणार असल्याची कबुली जीतूने त्याच्या फोटोसकट दिली आहे.

डीएसपी असशील तर घरचा बाहेरचा.
नुकच्याच सिव्हिल इंजिनियर झालेल्या माझ्या एका मित्रावर त्याच्या घरच्यांनी साधे त्यांच्या अंगणाचे कुंपण दुरूस्त करण्याइतकाही भरवसा ठेवला नव्हता ते हा सीन पाहून आठवले. डीएसपी लोक दारांना कड्या बिड्या न लावता झोपत असल्याने किंग तेथे पोहोचल्यावर सहज आत शिरतो व खिडकीतून त्याच्यावर गोळी झाडणार इतक्यात त्याची व अनिता राजची नजरानजर होते. इथे काहीतरी जुने कनेक्शन आहे हे आपल्याला कळते. पण जीतूकरता नवर्‍याकडे रदबदली करण्याऐवजी ती जितूकडेच त्याने राज बब्बरला मारू नये याचे आर्जव करायला येते. नवरा डीएसपी असला तरी एक पोलिस म्हणून त्याच्या क्षमतेवर त्याच्या बायकोचाही भरवसा नाही.

हा डीएसपी एरव्ही स्वतःच्याच अंगणात टार्गेट प्रॅक्टिस करत असतो. पोलिस अधिकार्‍यांकरता अशी काही सोय नसावी. नाहीतर हा बाटल्यांवर कशाला गोळ्या मारेल? ते ही दारूने भरलेल्या?

यातले पत्रकारही अफाट आहेत. "किंग साहब, आपके बारेमे जो गलत अफवाह छप रही है, क्या वो सही है?" असा प्रश्न लिटरली विचारला आहे एकाने.

दोन्ही पोस्ट धमाल आहेत फा Happy

Isn't this exactly what a storm does? >> पोलाद हे जमिनीत उगवत नाही >> सिव्हिल इंजिनियर झालेल्या माझ्या एका मित्रावर त्याच्या घरच्यांनी साधे त्यांच्या अंगणाचे कुंपण दुरूस्त करण्याइतकाही भरवसा ठेवला नव्हता >> you are being arrested for bad foreign accent >> नवरा डीएसपी असला तरी एक पोलिस म्हणून त्याच्या क्षमतेवर त्याच्या बायकोचाही भरवसा नाही >> Rofl

आपके बारेमे जो गलत अफवाह छप रही है >> मी पाहताना या पॉईंटला माझा सेगफॉल्ट झालेला. जर ऑलरेडी माहित आहे की अफवाह गलत आहे तो रहने दो फिर

सोनम-गोविंदाचे कपडे >> Lol मेहुलकुमार म्हणतो गोविंदा शूटिंगला खूप त्रास द्यायचा. हे बहुतेक त्याने राजकुमारला सांगितले. राजकुमार मेहुलचा खास दोस्त (मैं अकेला ऐसा डायरेक्टर हूं जिसके साथ राजजीने तीन फिल्म्स की). लगेच राजकुमारने गोविंदाचा शर्ट मागून घेऊन, त्याचा रुमाल बनवून, गोविंदाच्या समोर त्याच रुमालाने स्वत:चे नाक शिंकरले. तेव्हापासून मला नाही वाटत कोणी मेहुलच्या क्रिएटिव्ह चॉईसेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल.

फारएंड Rofl
जबरदस्त additions आहेत

पायस Proud

Pages