अथांग

Submitted by नंबर१वाचक on 10 February, 2025 - 01:27

अथांग

मावळतीच्या आकाशात पिवळसर केशरी रंगाचे सूर्यबिंब चमकत होते. त्याच्या किरमिजी प्रकाशाने अथांग सागर जणू ज्वालामुखीतून उसळलेल्या तप्त रसाप्रमाणे भासत होता. त्या शांत संध्याकाळी, विस्तीर्ण पसरलेल्या समुद्र किनाऱ्यावर ते पाच वृद्ध उभे होते. त्यांनी अंगात श्वेतवस्त्रे परिधान केली होती. त्यांचा चंदेरी केशसंभार वाऱ्यामुळे उडत होता. चेहऱ्यावर विलक्षण शांत आणि विरक्त भाव होते. त्यांच्यापुढे एक सुवर्ण, चांदी, पितळ, तांबे आणि लाख अश्या पंचाधातूंनी घडवलेला एक मोठा पेटारा ठेवला होता. त्यावर वरच्या बाजूला चंद्रवंशाचे प्रतिक असलेली, चंद्रकोरीच्या पार्श्वभूमीवर, हरणावर आरूढ असलेली चंद्राची प्रतिमा कोरलेली होती. समोरच्या बाजूला श्रीकृष्णाच्या कौमोदकी गदा, पांचजन्य शंख, सुदर्शन चक्र आणि शारंगधर धनुष्याचे तसेच त्याला प्रिय असलेल्या मोरापंखाचे चित्र कोरले होते. इतर तिन्ही बाजूंना भूदल, अश्वदल, गजदल, रथारूढ अश्या युध्द मग्न सैन्याचे आणि त्यातून घडलेल्या भयंकर विनाशाचे प्रतिक म्हणून तुटलेले हातपाय, धडावेगळी मस्तके, पोट फाडून बाहेर आलेल्या आतड्या, मस्तक फुटून बाहेर आलेला मेंदू, मृत अश्व, गज आणि सैन्याचे विलक्षण बारकावे कोरले होते. त्या भव्य पेटाऱ्याच्या आत एका रेशमी वस्त्रावर अवजड भाले, एक प्रचंड धनुष्य आणि दोन चांदीचे भाते होते. एक अतिप्रचंड आणि वजनदार सोन्याची गदा, तितकेच अवजड परशु अस्त्र, आणि दुधारी खड्ग ठेवले होते.
त्या पाचही वृद्धांनी त्या अस्त्रांना नमन केले. सर्वात जेष्ठ वृद्ध पुढे झाला आणि त्या अवजड पेटाऱ्याचे झाकण बंद केले. आणि त्यांच्यातील त्या बलदंड वृद्धाला संकेत दिला. त्याने तो पेटारा लीलया उचलला आणि चालत समुद्राच्या दिशेने गेला. त्याच्या मागोमाग ते चारहीजण चालू लागले. तिथे एक मोठी नौका उभी होती. त्यात त्यांनी तो पेटारा ठेवला आणि तेही त्यात बसले. नौका हळू हळू सागरात आत जाऊ लागली. बरेच अंतर पार केल्यानंतर एका विशिष्ट ठिकाणी नौका थांबली. दक्षिणेकडे महिकावती, कलसी, वालुकेश्वर, शिवीरस्थल, मत्स्यग्राम, कैन्डिण्य, मूलद्विप या सात बेटांचा एक समूह होता. त्या सात द्विपसमूहांचा तो मध्य होता. त्यांनी तो पेटारा समुद्रात ढकलून दिला आणि तितक्याच निर्विकार मुद्रेने परत निघाले. आता ते त्यांच्या पत्नीसह हिमालयाकडे प्रस्थान करणार होते.
***
श्या!! धनुष्याला जोडलेला बाण पुन्हा निसटला आणि तो वैतागला. आपल्याला सहज जमेल हा आत्मविश्वास किती पोकळ होता हे त्याला आता जाणवायला लागले होते. तब्बल दोन महिने थेराबँन्डची प्रँक्टिस केल्यानंतर त्याच्या सरांनी त्याला हा इंडियन बॉ हातात दिला होता. त्यावर एक महिना पुलिंग प्रँक्टिस झाल्यानंतर फक्त तीन बाणांचे तीन राउंड मारायचे इथवरच त्याची मजल गेली होती. तसा तो लहानच होता. फक्त नऊ वर्षांचा. पण वयाच्या मानाने समज जरा जास्तच होती त्याला. अभिमन्यू तर सोळाव्या वर्षी अतिरथी होता आणि त्याला वीरमरण आले होते. म्हणजे त्याने किती लहान वयात धनुष्यावर नैपुण्य मिळवले होते. लवकुश किती लहान असताना त्यांनी अश्वमेध यज्ञाचा घोडा अडवलेला. या आणि अश्या अनेक गोष्टी लहानपणापासून पाहिल्यामुळे त्याला धनुष्याची आवड अगदी लहानपणीपासून लागली होती. आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनायचे स्वप्न तो पहात होता. पण त्याला वाटले तितके ते सोपे नव्हते. आणि त्यामुळे तो अस्वस्थ होत अजून जोमाने सराव करायचा. ते धनुष्यदेखील त्याच्या वय आणि उंचीच्या मानाने जरा मोठेच होते. एका पायाचा आधार देऊन धनुष्याची दुसरी बाजू वाकवून त्याला प्रत्यंचा जोडणे काही त्याला एकट्याला जमायचे नाही. त्या थोराड धनुष्याची पकड त्याच्या लहानश्या मुठीत मावायची नाही. बाणाला आधार देण्यासाठी उंचावायचे पहिले बोट जेमतेम बाणापर्यंत पोहोचायचे. विशिष्ट कोनात ताठ उभा राहिल्यामुळे पाठ भरून यायची. आणि रात्री श्रीराम, अर्जुन एकलव्य अभिमन्यू यांच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकतानाच तो झोपी जायचा.
किती कष्टाचे काम ना अधिरथी होणे. एकाचवेळी अनेक लक्ष्य साधायची तेही धावत्या रथात आरूढ होऊन. शिवाय अष्टावधानी असायचे. येणारे हल्ले परतवायचे आणि प्रतिहल्ले करायचे. इथे प्रत्यंचा खेचताना पुढचा हात हलतो आणि एम चुकतो. श्या!! एकाग्रता वाढवण्यासाठी अजून रामनामाचा जप करायला हवा. स्नायू बळकट होण्यासाठी अजून काहीतरी व्यायाम करायला हवा. एक ना दोन अनेक विचार त्या चिमुकल्या डोक्यात यायचे.
त्याचवेळी एक बातमी कानांवर आली.शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा समुद्रात उभारण्याचे काम सुरु असताना एक भव्य पेटारा समुद्राच्या उत्खननात सापडला होता. वेगवेगळ्या न्यूज चँनेलवर त्याचे अस्पष्ट फोटो दाखवत होते. भरपूर शेवाळे जमलेला अवाढव्य पेटारा. सुमारे दहा फुट उंच, दहा फुट लांब आणि पाच-सहा फुट रुंद होता. पुरातत्व विभागाने कडेकोट बंदोबस्तात तो पेटारा प्रयोग शाळेत हलवला होता. त्यामुळे पुढच्या बातम्या अंदाजाने मीठ मसाला लावून पुरवल्या जात होत्या. त्याला कुठेही कुलूप किंवा खटका नव्हता. तो कसा उघडायचा हे रहस्य असल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. त्यात प्राचीन खजिना किंवा दस्तावेज असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत होता.
त्याचे बाबा पुरातत्व विभागात संशोधक होते. बाबा घरी आल्यावर त्याने त्या पेटाऱ्याबद्दल त्यांना विचारले. ‘रहस्यमय आहे खरा तो पेटारा! त्याला खरच कुलूप किंवा खटका नाही. त्यावर जमलेले प्रवाळ हे हजारो वर्ष जुने आहेत. समुद्रात अति खोल भागात आढळणारे शैवाल त्यावर आढळले आहेत. तो इतका अवजड पेटारा असा आपोआप वर येणे हे अतर्क्य वाटते. आता शेवाळे साफ केले की अजून माहिती मिळेल. भरपूर काम असणार आहे उद्यापासून.’ असे म्हणून बाबा झोपायला निघून गेले.
इकडे याच्या मनात मात्र विचारांचे थैमान सुरु झाले. नक्की काय असेल त्यात. खरच बाबा म्हणतात तसे इतका अवजड पेटारा आपोआप वर येणे यात काही दैवी संकेत नसेल ना. असेच काहीतरी अचाट विचार करत तो झोपी गेला.
***
जसा जसा तो पेटारा साफ होत होता तसे त्यावरील कोरीव काम आणि त्याची लकाकी आश्चर्य चकित करणारी होती. पण तो कसा उघडायचा हे रहस्य मात्र अजूनही उलगडले नव्हते. काही आधुनिक तंत्रज्ञान आणि रसायने वापरून तो उघडण्याचा प्रयत्न करण्यासाठी भारत सरकारने तो अमेरिकेला पाठवण्याची व्यवस्था केली. एका मोठ्या जहाजातून तो अमेरिकेला नेला जाणार होता. त्यासोबत भारतीय वैज्ञानिकांची आणि पुरातत्व संशोधकांची एक टीम तिकडे जाणार होती. त्याचे बाबादेखील त्या टीमचा एक भाग होते. या कामाला दोन-तीन वर्षे जातील या अंदाजाने त्यांनी सहकुटुंब तिकडे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. त्याच नौकेतून अजूनही एक-दोन फँमिली तिकडे जाणार होत्या.
तो पेटारा जहाजावर चढवताना तो अनिमिष नेत्रांनी त्याच्याकडे बघत होता. त्याचा आणि आपला काहीतरी जुना ऋणानुबंध असावा अशी काहीशी दाट भावना त्याच्या मनात घोळत होती. ते सगळे जहाजावर चढले. प्रवास सुरु झाला. आता तसा काही धोका नसल्यामुळे कुटुंब सदस्यांना तो पेटारा जवळून बघण्याची परवानगी मिळाली होती. तो त्याच्या आई-बाबांबरोबर त्या अजस्त्र पेटाऱ्यासमोर उभा होता. कोणतेसे युद्धाचे चित्र त्याच्या तिन्ही बाजूंना कोरलेले होते. समोर काही अस्त्रांची चित्रे होती. आणि वर, झाकणावर कोणतातरी देव असावा. पण खरोखर त्याला कुलूप-किल्ली, खटका काहीच नव्हते.
पुढे जाऊन त्या लखलखत्या चक्राला स्पर्श केला की तो उघडेल, किंवा ती गदा सरकवली तर, किंवा त्या धनुष्यावर बाण चढवला तर नक्कीच त्याची गुप्त कळ सापडेल. याचे विचार पुन्हा बेबंद सुटले. ‘तो साधारण पाच हजार वर्षे जुना असावा. पंचा धातूंचे योग्य प्रमाण आणि कोणत्याश्या रासायनिक प्रक्रियेने तो इतका मजबूत आणि घट्ट बंद केला आहे की इतक्या वर्षांनंतरही त्याची चकाकी किंवा मजबुती कमी झाली नाही. तो वितळवण्याचे प्रयत्न तसे फोल ठरले. शिवाय आतील ऐवज खराब होऊ नये म्हणून अति कठोरपणे प्रयत्न करता येत नाहीयेत. विशेष म्हणजे एक्स-रे मधेदेखील आत काय असेल हे समजत नाहीये. फार विलक्षण प्रक्रिया केली असावी. अतिशय प्रगत तंत्रज्ञान असावे.’ बाबा माहिती देत होते.
असेचे अनेक विचार घेऊन तो आणि इतर सर्व जहाजावर झोपी जाण्याचा प्रयत्न करत होते. समुद्राच्या लाटांच्या गर्जना कानी पडत होत्या. अचानक वाऱ्याचा जोर वाढला. लाटांनी रौद्र रूप धारण केले. जहाज जोरजोरात हेलकावे खाऊ लागले. आणि एका अवचित क्षणी नको तेच घडले. एका प्रचंड मोठ्या लाटेच्या आवेगाने जहाज उलटले. जहाजात पाणी शिरले. जीव वाचवण्यासाठी लाईफ सेव्हिंग बोटींचा वापर करून लहान मुले आणि स्त्रियांना समुद्रात सोडण्यात आले. शक्य तितके लोक बोटींवर चढवले जात होते. पण काही संशोधकांना त्या पेटाऱ्याची चिंता वाटत होती. तो सुरक्षित राहावा यासाठी ते जीवाचे रान करत होते.
पण या समुद्राच्या तांडवात ते शक्य नाही असे दिसताच काहींनी त्यासोबत मरणे पसंत केले. इकडे त्या लहानश्या बोटीवर तो, त्याच्या आई बाबांना बिलगून बसला होता. सगळेच घाबरले होते. या प्रचंड वादळात जिथे मोठे जहाज बुडाले तिथे ही नौका कशी टिकणार, ही भीती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. रात्रीच्या अंधारात पुन्हा अशीच भयंकर लाट उसळली आणि त्यांच्यासह अनेक नौका आणि ते पेटारा असलेले जहाज पाण्याखाली गेले.
याच्या नाकातोंडात खारट पाणी भरले होते. आई बाबांचा हात हातातून सुटला होता. जीव गुदमरला, डोळ्यांपुढे अंधारी आली आणि त्याने डोळे डोळे घट्ट बंद केले. क्षणात सगळा कोलाहल निमाला. त्याने डोळे उघडून पाहिले, तो पाण्यावर तरंगत होता. आणि समुद्राचा तळ त्याला स्पष्ट दिसत होता. आणि समोर तो पेटारा होता. तो पोहत त्याच्याजवळ गेला. पाण्याच्या इतका आत असूनही त्याला श्वास घ्यायला काही त्रास होत नव्हता. जवळ जाऊन त्याने झाकणाच्या चारही कोपऱ्यांमधे असलेली नक्षी फिरवली. पुढे असलेली शंख, चक्र, गदा, पद्म त्याच क्रमाने गोलाकार फिरवली आणि त्या पेटीचे झाकण उघडले. आतली प्रचंड मोठी दिव्य अस्त्र त्याच्या दृष्टीस पडली.
हे असेच करायचे हे आपल्याला कसे समजले. आपल्याला पाण्याखाली श्वास कसा घेता येतोय. याचे विचार पुन्हा धावू लागले. तेव्हा त्याच्या मनात त्याची उत्तरे प्रकट झाली.
तू अष्टवसुंपैकी एकाचा अंश आहेस. तुझे काही उर्वरित भोग भोगण्यासाठी तुझा जन्म झाला आहे. ही पांडवांची दिव्य अस्त्रे आहेत. ज्यांनी एक महासंहार घडवला एका युगाचा अस्त झाला. धर्माची स्थापना झाली. हे कलियुग आहे. पुन्हा पापाचरण वाढेल. अधर्म बळावेल तेव्हा मी पुन्हा अवतार घेईन आणि धर्माची स्थापना करेन. पण ही अस्त्रे वर काढण्याची ही योग्य वेळ नाही. आता तू ही दिव्य अनुभूती विसरशील. योग्य वेळी तुला पुन्हा त्याचे स्मरण होईल. तोवर तुझे सामान्य आयुष्य जगून घे. तथास्तु!!
****
त्याने डोळे उघडले. तो त्याच्या आईच्या मांडीवर होता. इतक्या मोठ्या वादळात जीवितहानी अजिबात झाली नव्हती हे एक आश्चर्यच होते. सर्वच्या सर्व लोक सुखरूप किनाऱ्याला लागले होते. मालमत्तेचे नुकसान झाले होते पण त्याचे कोणाला फारसे वाईट वाटत नव्हते. तो विलक्षण पेटारा मात्र पुन्हा समुद्राच्या अथांग खोलीत लुप्त झाला होता. काहीतरी हरवल्यासारखा तो समुद्राकडे एकटक पहात होता. अस्त म्हणजे जणू एक नवीन सुरुवात असते असे सांगत सूर्य उगवत होता आणि त्याच्या किरमिजी रंगाने समुद्र केशरी रंगात उजळून निघाला होता.
समाप्त
*****

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लय भारी कल्पना!
पण समाप्त? का अजून योग्य वेळ यायची आहे?

Abuva, नानबा धन्यवाद! एका मासिकासाठी लिहिली होती.. दुर्दैवाने प्रकाशित झाली नाही. शब्द मर्यादा होती म्हणून कथा केली.
आता नक्की विस्तार करते

Abuva, नानबा धन्यवाद! एका मासिकासाठी लिहिली होती.. दुर्दैवाने प्रकाशित झाली नाही. शब्द मर्यादा होती म्हणून कथा केली.
आता नक्की विस्तार करते