चूक

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 19 January, 2025 - 14:21

तिची ती संतापी नजर मला सतत विचारत असते, “माझी काय चूक होती? माझ्या येण्याने तिच्या आयुष्यात एवढा मोठा बदल होईल, याचा मला कधीच अंदाज नव्हता.
आम्ही दोघे एकाच कॉलेजात होतो. कॉलेजातील ती रग माझ्या अंगातही होती. ती आणि मी एकाच वर्गात होतो. साधी काळीसावळी, पण नीटनेटकी ती. रोज सायकलवरून कॉलेजला यायची, एक दिवसही गैरहजर राहायची नाही. कँटीनचा नाश्ता परवडणार नाही, म्हणून तिच्यासारख्याच चार मुलींसोबत घरून आणलेला डबा खायची.
जेव्हा वर्गात विचारलं गेलं, “ग्रॅज्युएट होऊन काय करायचंय?” तेव्हा तिने आत्मविश्वासाने सांगितलं, “मला बँकेत नोकरी करायची आहे.” तिची घरची गरीबी माहीत असल्यानेच मी हे धाडस केलं होत. तिला दोन दणकट भाऊ असते, तर मी तिची छेड काढली असती का?
हलकी वडांग (शेताचे काटेरी कुंपण) पाहूनच जनावरे आत शिरतात. मीसुद्धा ती कमजोर होती म्हणून तिची छेड काढली. ती एक लहान बहीण आणि बेवडा बाप असलेली गरीब मुलगी, माझं करून करून जाय वाकडं करणार होती? सुरुवातीला दोन वेळा तिने दुर्लक्ष केलं, पण तिसऱ्यांदा तिने आपल्या बापाला सांगितलं. तिचा भाबडा विश्वास होता की तिचा बाप माझा बंदोबस्त करेल. पण तिच्या बेवड्या बापाला हाच चान्स वाटला. त्याने तिचं कॉलेज बंद केलं आणि शहरातल्याच एका मुलाशी २ महिन्यात लग्न लावून दिलं.
आता तिचा नवरा गॅरेजमध्ये १२ तास काम करून पिऊन तर्र होऊन येतो. तिला मारण्यासाठी त्याने लोखंडी पाइप घरी आणून ठेवलाय. आई-बाबांना आणि लहान बहिणीला भेटायला तिला बंदी आहे. पत्र्याच्या अतिक्रमणात असलेल्या त्या झोपडीत ती आणि तिची गोंडस लहान मुलगी दारात बसलेले असतात.
तो माझा रोजचा रस्ता आहे. आमची नजरानजर होते. माझी दागिने मिरवनारी बायको ती पाहते. तिची ती संतापलेली नजर मला सतत विचारत राहते, “माझी काय चूक होती? माझी काय चूक होती?”

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults