अनवधानातील गमतीजमती . . .

Submitted by हेमंतकुमार on 6 December, 2024 - 02:03

डॉक्टरांच्या रुग्णालयीन कामातील एक महत्त्वाचा कारकुनी भाग म्हणजे रुग्णासंबंधीच्या दैनंदिन नोंदी करणे. प्रत्येक रुग्णाच्या केस पेपरवर सुरुवातीस कनिष्ठ डॉक्टर सविस्तर माहिती लिहितात आणि पुढे त्यामध्ये अनेक वरिष्ठ डॉक्टरांच्या टिपणांची भर पडत जाते. अवाढव्य कारभार असलेल्या रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष रुग्णतपासणीची आणि इतर आनुषंगिक कामे खूप दमवणारी असतात. रुग्णालयाच्या काही विभागांमध्ये तर परिस्थिती सतत तणावपूर्ण असते. हा सर्व बोजा सतत डोक्यावर घेऊनच डॉक्टरांना या जोडीने रुग्णनोंदीचे कामही इमानइतबारे करावे लागते. त्याला कायदेशीर महत्त्व आहे. संगणकपूर्वकाळात अशा सर्व नोंदी हातानेच केल्या जायच्या. अजूनही रुग्णालयानुसार काही प्रमाणात हस्तलिखित नोंदी असतात. रुग्ण बरा झाल्यावर घरी पाठवून दिल्यानंतर असे सर्व केस पेपर्स नोंद विभागात ठेवावे लागतात. त्यामुळे अशा खोल्या कागदांच्या ढीगभर थप्प्यांनी ओसंडून वाहत असतात.

एकदा अशाच एका मोठ्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने एक वेगळाच ‘संकलन प्रकल्प’ हाती घेतला. त्यांनी नोंद विभागावर चक्क धाड घालून अनेक वर्षांपूर्वीच्या काही ठराविक फायली बाजूला काढल्या. त्या निवडक जुन्या नोंदीमधून त्यांना काही गमतीशीर वाक्ये सापडली. काही वाक्यांमध्ये ठराविक शब्द भलत्याच प्रकारचे होते तर काही ठिकाणी वाक्यरचना गंडलेली होती. परिणामी अर्थाचा अनर्थ झाला होता. नोंदीमधील काही चुकांची खाडाखोड केलेली देखील आढळली. तर अन्य काही चुकांच्या भोवती वरिष्ठ डॉक्टरांनी लाल शाईने गोल काढलेले होते. सहसा अशा चुका अनवधानातून होतात. पण काही वेळेस अशा चुकांतून त्या व्यक्तीचे भाषिक अज्ञान उघड होते.

संबंधित चुका ज्यांच्या हातून झाल्या त्या डॉक्टरांची कदाचित वरिष्ठ डॉक्टरांनी कानउघडणी केली असेल किंवा अन्य काही प्रसंगी त्या वाक्यातून निर्माण झालेल्या विनोदाचा आनंद संबंधित डॉक्टरांनी एकत्रित लुटला असावा. तिकडे जे काय झालं असेल ते असो. अशा गमतीजमतींचे जे संकलन त्या संकलक चमूने प्रसिद्ध केलेय त्यात आज आपण थोडीशी डुबकी मारणार आहोत. त्यातून शाब्दिक विनोदाचा आस्वाद घेता येईल. अशा काही निवडक गमतीजमतींचे स्पष्टीकरणासह केलेले हे छोटे संकलन वाचकांना रोचक वाटावे.
. . .

पहिली केस आहे ताप आलेल्या प्रौढ महिलेची. डॉक्टरांनी तापासंबंधी सर्व विचारपूस केली. तापाबरोबर येणाऱ्या अन्य लक्षणांची पण दखल घेतली. पण नोंद करताना ते लिहून गेलेत :

She has no rigors or shaking chills, but her husband states she was
very hot in bed last night.

बाईच्या नवरोबांनी सांगितलं असेल की रात्रभर ती खूप तापली होती; ठीक आहे. पण डॉक्टरांनी नोंद करताना मात्र hot ऐवजी febrile हा शब्द लिहिणे अपेक्षित होते. पण त्यांनी करून टाकले शब्दशः भाषांतर !
. .
हा बघा गुप्तरोगाच्या डॉक्टरांचा प्रताप. रुग्णाने वेश्यागमनाची कबुली दिलेली आणि काय त्रास होतो ते सांगितलेय. आता डॉक्टर त्याच्या जननेंद्रियाची तपासणी करतात. तिथे प्रथमदर्शनी त्यांना काहीतरी महत्त्वाचे दिसले आणि मग ते लिहून गेलेत :
Examination of genitalia reveals that he is circus sized.

रुग्णाने सुंता केल्याची (circumcised) नोंद करताना त्यांनी शब्दस्पेलिंग तर चुकवलेच आणि शब्दही उगाचच तोडला !
. .
कर्करोगाच्या कक्षातली ही घटना. एका रुग्णाबाबत त्या रोगाचा संशय होता आणि आता खात्रीशीर निदान करण्यासाठी त्याच्यावर biopsy ची तपासणी करायची होती. या प्रकारची लघुशस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाची लेखी परवानगी घेणे आवश्यक असते. त्यासाठी रुग्णाला त्या क्रियेतील थोडेफार धोके देखील समजावून सांगितले जातात.

या प्रकरणातला रुग्ण जरा हट्टी होता. डॉक्टरांनी त्याला सगळे समजून सांगितल्यावरही त्याने ती तपासणी करण्यास ठाम नकार दिला. ही महत्त्वाची बाब डॉक्टरांना लिहून ठेवणे आवश्यक होते. पण लिहिता लिहिता biopsyच्या जागी ते लिहून बसले एक साधर्म्य दाखवणारा भलताच शब्द :

The patient refused autopsy.

Autopsyचा अर्थ मरणोत्तर शवविच्छेदन. (कायदेशीर प्रकरणांमध्ये असे विच्छेदन सक्तीचे असते आणि त्याला पोस्टमार्टम म्हटले जाते). मात्र नैसर्गिक मृत्यू झालेल्या अन्य सामान्य प्रकरणांमध्ये एखाद्याच्या मृत्यूचे नक्की कारण जाणून घेण्यासाठी करायचे शवविच्छेदन मृताच्या नातेवाईकांच्या परवानगीनेच केले जाते.
इथे मात्र जिवंत व्यक्तीच्या बाबतीत autopsy अशी नोंद झाली आणि अनर्थ झाला !
. .
आता एक चक्कर अस्थिरोग विभागात.
knee pain.jpg

गुडघेदुखीचा रुग्ण आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत. आता आलेले डॉक्टर त्याची विचारपूस करतात. त्याने आपल्या गुडघ्याबद्दलची प्रगती डॉक्टरांना सांगितली अन त्याची नोंद करताना डॉक्टर लिहून गेले :
On the second day the knee was better, and on the third day it
disappeared.

. .

सर्जन मंडळींना शरीरातील विविध ग्रंथींची (glands) तपासणी करावी लागते. त्यामध्ये प्रामुख्याने थायरॉईड, स्तन आणि प्रोस्टेट यांचा समावेश असतो. एखाद्या खूप गर्दीच्या दिवशी या तिन्ही प्रकारचे अनेक रुग्ण जर हाताळले असतील तर डोक्यात आजारांची अगदी सरमिसळ होऊ शकते.
प्रोस्टेटच्या तपासणीसाठी संबंधित पुरुषाला कुशीवर झोपवून त्याच्या गुदद्वारात डॉक्टरांनी बोट घालून त्या ग्रंथीचा अंदाज घ्यायचा असतो. एक मूलभूत तपासणी म्हणून तिचे महत्त्व आहे. एकदा प्रोस्टेटसाठी म्हणून अशी तपासणी केल्यानंतर एक सर्जन बघा काय लिहून गेलेत :

Rectal examination revealed a normal sized thyroid !!

कुठे प्रॉस्टेट, कुठे ती दूरवरची थायरॉईड, पण गफलत झाली आहे खरी. हे वाचल्यानंतर एकाने आणि त्यावर विनोद केला,
“अरे बापरे ! या डॉक्टरांचे बोट एवढे लांब आहे काय” !!
. . .

रुग्णालयातील तातडीच्या वैद्यकीय सेवेचा विभाग नेहमीच गजबजलेला असतो. तिथे असंख्य प्रकारचे वेदनाग्रस्त रुग्ण येतात. त्यांच्या शारीरिक तपासणीबरोबर काही मूलभूत चाचण्यांची सोय तिथे केलेली असते. अशाच एका महिला रुग्णाला x-ray वगैरे तपासण्या करून काही विशेष न निघाल्याने घरी पाठवून देण्यात आले होते. त्याची डॉक्टरांनी केलेली ही नोंद :

While in the Emergency room, she was examined, x-rated and sent home.

..

बद्धकोष्ठाची समस्या तर अनेकांच्या पाचवीलाच पुजलेली असते. या विकारावर निरनिराळे उपचार करून रुग्ण देखील कंटाळलेले असतात. अशाच एक बाई डॉक्टरांकडे नियमित यायच्या. त्यातून परिचय वाढल्याने डॉक्टरनी त्यांच्याशी व्यक्तिगत स्वरूपाच्या गप्पा देखील मारल्या होत्या. एकदा त्या उपचारासाठी येऊन गेल्यानंतर डॉक्टर अवचितपणे लिहून गेले :

She stated that she had been constipated for most of her life,until
she got a divorce.

. .
depression.jpg

मनोरुग्णांच्या नोंदींमध्ये तर अनेक उलटीपालटी वाक्ये बऱ्याचदा आढळतात. अनेक रुग्णांवर दीर्घकालीन उपचार चालू असतात. एका डॉक्टरांनी नैराश्याच्या रुग्णाबाबत केलेली ही टिपणी :

The patient has been depressed since she began seeing me in 1993.
वाक्यरचना गंडलेली .
….
रुग्णालयातील बहुतेक रुग्णांच्या भरपूर प्रयोगशाळा तपासण्या होतातच. लॅबमधून वॉर्डात रिपोर्ट आले की ज्या त्या रुग्णानुसार त्या रिपोर्टचा गोषवारा मुख्य केसपेपरमध्ये लिहिणे हा एक वेळखाऊ उद्योग असतो. एका रुग्णाच्या यकृताच्या आरोग्यासंबंधीचा टेस्ट रिपोर्ट लिहिताना हे डॉक्टर काय लिहून गेलेत बघा :

The lab test indicated abnormal lover function.

एका महत्त्वाच्या शब्दाच्या एकाच अक्षराने चुकलेल्या स्पेलिंगमुळे छानपैकी विनोद होऊन गेला खरा !
..
आणि आता शेवटी शारीरिक तंदुरुस्ती विभागात एक फेरफटका. अनेक संस्थांमधून विशिष्ट कामासाठी नेमणूक करताना शारीरिक तंदुरुस्तीचा दाखला अधिकृत रुग्णालयाकडून मिळवावा लागतो. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांमध्ये अर्थातच निरोगी लोकांचा भरणा जास्त असतो. त्यांच्या काही तपासण्या करून काही सुप्त दोष निघतोय का ते पाहणे हे डॉक्टरांचे काम. सर्व तपासण्या केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा एकंदरीत आढावा घेणारा गोषवारा शेवटी लिहितात. एका मध्यमवयीन व्यक्तीच्या बाबतीत अशी नोंद केली गेली :

Patient has two teenage children, but no other abnormalities.
..

असं आहे हे गमतीदार संकलन. डॉक्टरांच्या सहकारी असलेल्या नर्सेस आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या टिपणांमध्येही अशी 'वेचक रत्ने' सापडतात - त्यांची जातकुळी थोडीफार वेगळी. कळत नकळत अशा चुका हातून होणे हा मानवी गुणधर्म आहे. इंग्लिशमधील नोंदींच्या बाबतीत वरवर पाहता असं वाटू शकेल की ती मातृभाषा नसलेल्या लोकांकडून अशा चुका होतात. परंतु असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. या चुकांची व्याप्ती पाश्चात्य जगतासह अगदी जागतिक आहे ! जालावर त्याचे असंख्य नमुने वाचायला मिळतात.

संपूर्ण संगणकीकरण झालेल्या रुग्णालयांमध्ये देखील अशा नोंदींची अचूकता दाद द्यावी इतकी नाही. हस्तलेखन असो अथवा संगणक टंकन, या दोन्ही कृती करणारा शेवटी माणूसच असतो. स्पीच टायपिंगच्या वाढत्या वापरानंतर तर काही नव्या प्रकारच्या चुका आढळू लागल्यात ( बोलायला गेलो एक. . .!). जोपर्यंत अशा चुकांनी कुठल्याही निर्णय प्रक्रियेवर परिणाम झालेला नसेल तोपर्यंत काळजीचे कारण नाही. अनवधानातून अकस्मात झालेले मनोरंजन अशा दृष्टीकोनातून त्यांच्याकडे पाहता येईल.

तसंही कामाच्या व्यापतापाने शिणलेल्या मनांना अशा घटकाभर विरंगुळयाची अधूनमधून गरज देखील असते. सातत्याने होणाऱ्या काही भाषिक गफलती आणि विनोदांमधून कधीकधी बोलीभाषेला नवे वाक्प्रचारही मिळून जातात. अनेक अभ्यासक्रमांच्या लेखी व तोंडी परीक्षांदरम्यान कधीकधी भले भले विद्यार्थी सुद्धा एखादी गफलत किंवा घोडचूक करून बसतात आणि त्यानंतर दुसऱ्याच क्षणी सावरून स्वतःच्या कपाळावर हात मारून घेण्याची वेळ त्यांच्यावर येते. तणावपूर्ण वातावरणाचा तो परिणाम असतो.

वैद्यकीय वगळता अन्य कार्यक्षेत्रांमध्ये देखील या प्रकारच्या मौजमजा होत असणार. वाचकांनी त्याबद्दलचे आपापले अनुभव प्रतिसादातून लिहिल्यास लेखातून झालेले मनोरंजन द्विगुणीत होईल.
**********************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाल लेख आणि मजेदार किस्से.

आजकालच्या डिजिटल जगात लिहिताना स्पेल चेक किंवा ग्रामर्ली / ए आय सारख्या रायटिंग असिस्टंस् मुळे चुकांची शक्यता कमी होते तरी देखील कित्येकदा स्वयं सुधारणा (अ‍ॅटो करेक्ट) घोळ घालतोच.

त्या तुलनेत बोलताना अनवधानाने ज्या चुका होतात त्या सुधारण्यास वाव नसतो तेव्हा माफी मागून पुढे जावे लागते.

सर्व प्रतिसाद पण धमाल आहेत !
….
"हिचे दिवस भरलेत आणि तिला >>> एकदम झकास !
या निमित्ताने बँकिंग क्षेत्रातील अनुभव आल्याने आनंद वाटला. अन्य क्षेत्रातील पण यावेत.

ऑनलाइन बँकिंगपूर्व युगात बँकेत जाण्याचे प्रसंग बऱ्यापैकी यायचे तेव्हा बँक कर्मचाऱ्यांकडून “चेक सोडणे” हा वाक्प्रचार अनेकदा ऐकला आहे.
तसंही,
“दिवस कसे गेले ते कळलच नाही. . .”

हे विधान एखाद्या समूहात करताना कायमच त्या विधानातला दडलेला श्लेष जाणून थोडीफार हास्यनिर्मिती होतेच .

1.
स्वयं सुधारणा (अ‍ॅटो करेक्ट) घोळ घालतोच.
>>अगदी अगदी.
बोलून टंकन किंवा काही विशिष्ट कळफलक वापरून काही मराठी शब्द जाम शुद्ध येतच नाहीत. अशा वेळेस मी मायबोलीच्या प्रतिसाद चौकटीचा जरूर वापर करतो. तिथे ऱ्हस्व-दीर्घ, जोडाक्षरे आणि जोडाक्षराना दिलेल्या वेलांटीवरील अनुस्वार या गोष्टी व्यवस्थित जमतात.
. . .
2.
वैद्यकीय लष्कराच्या भाकऱ्या >>>
हा हा ! अपेक्षित प्रतिसाद Happy
येऊ द्या तुमच्याही प्रांतातल्या भाकऱ्या . . .

बोलताना अनवधानाने ज्या चुका होतात

>>>>> यावरून आठवलं.

इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असताना एका विषयाला नवीन आलेले शिक्षक स्वतः ची ओळख करून देत होते तेव्हा ते म्हणालेले

I have two daughters, both are girls !

आमच्या इंजिनीरिंग ला असताना एक मॅम स ला श म्हणायच्या. स्टोर ला ष्टोर असं..
एकदा वर्गात दंगा करणाऱ्या मुलाला म्हणाल्या,
"राहुल, शिट ऑन द फर्स्ट बेंच!"

* are girls, doors व शिट ऑन
>>> वा ! अगदी एक से एक आहेत.
* * *

लेखातील “she was very hot in bed last night” या वाक्याच्या निमित्ताने hot शब्दाबद्दल थोडा ऊहापोह :

मराठीत आपण गरम हा शब्द बहुतेकदा तापमानाचे विशेषण, भावनेची तीव्रता किंवा ऊब या अर्थाने (खिसा गरम) या अर्थाने वापरतो.
परंतु इंग्लिशमध्ये त्याला कित्येक छटा आहेत :

  • तापमानाचे विशेषण
  • intense
  • कामुक, उत्तान
  • चवीचे विशेषण
  • लक्षणीय (remarkable)
  • चोरलेले
  • किरणोत्सर्गी आणि
  • जाझ संगीताचे विशेषण.

https://www.etymonline.com/search?q=hot

चुकीच्या इंग्रजीचे बरेच किस्से आहेत (प्लीज मेन्टेन सायलेन्स. आवर प्रिन्सिपॉल जस्ट पासड अवे. इत्यादी) पण ते उसंडू मुरावि दर्जाचे नाहीत. धाग्यातले किस्से अफलातून आहेत.

* meme >> एकदमच भारी !
म्हणजे मराठीत, “ ए, चल उठ/उट ” असं झालं Happy
* * *
* प्रिन्सिपॉल जस्ट पासड अवे >>> +1 अगदी.
pass away व p. out या दोन वाक्प्रचारांवर तर भरपूर घोळ झालेले आहेत.

त्यात एक गंमत म्हणजे, पाश्चात्य जगात p. out हा “चक्कर/ घेरी येणे या त्याच्या खऱ्या अर्थी वापरला जातो. आपल्याकडे,
“ मी अमुक साली कॉलेजातून p. out झालो तेव्हा”, हे अगदी सर्रास बोलतात.

पतंगराव कदम गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भारती विद्यापीठातील एक विद्यार्थी कॉलेजच्या कॉरिडॉर मध्ये समोरून येणाऱ्या एका सरांना नम्रपणे good morning Sir म्हणाला.

त्यावर ते सर म्हणाले:

Mr Patang rao is dead and you find this morning good?

आता खरे तर यात भावना होत्या, ते सरही सोनसळीहूनच आयात केलेले होते.

मात्र, विद्यार्थी बिचकला अन म्हणाला:

Have a bad morning Sir.

सरही चक्रावले की या शुभेच्छा आहेत की शाप आहे. त्यांच्या एकूण वर्तनामुळे त्यांना तो शाप वाटण्याची शक्यता अधिक असल्याने ते म्हणाले:

"My morning is not bad, our morning is bad"

(असिस्टंट लेक्चरर - इलेक्टरीकल इंजिनिअरिंग - टकले)

प्रत्यक्ष 'बघितलेला' किस्सा!

मी विद्युत अभियांत्रिकीला नव्हतो

I unwilling to do work as Iam unhealthy so, please accept my request

ही मला मागल्या आठवड्यात आलेली इमेल. एव्हडीच एक ओळ होती मेलमध्ये. आता हा महाभाग नोकरी सोडून चाललाय असे मला वाटले कारण unwilling to do work असे भारदस्त लिहिले होते. विचारल्यावर समजले की याला १ दिवसाची सिक लीव्ह हवी आहे.

माझा बहुतेक काहीतरी गोंधळ झाला Proud

तेव्हा बहुतेक पतंगरावांचे तीर्थरूप गेले होते व सर त्याबद्दल बोलले होते

*bad morning Sir, unwilling to do work >>>> असो !
* * *
एकेकाळी एका कॉलेजच्या सूचना फलकावर श्रद्धांजलीची सूचना अशी होती :
'May his sole rest in piece !"

त्यादिवशी जिने चढताना ती आमच्या अनेकांसह आमच्या इंग्रजीच्या प्राध्यापकांनाही दिसली. त्यानंतर वर्गात आल्यावर त्यांनी आमच्याकडून soul & peace या दोन्ही शब्दांचे स्पेलिंग घोटून घेतले होते त्याची आठवण झाली.

रजेच्या अर्जावरून . . .
प्राध्यापक द दि पुंडे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेला हा त्यांचा अनुभव :
ते विभाग प्रमुख असताना त्यांच्या हाताखालील एका प्राध्यापकाने रजेच्या अर्जात,
“There is fracture to my right hand leg

असे वाक्य लिहिले होते आणि
तो प्राध्यापक खुद्द इंग्रजीचाच होता !

धागा व प्रतिसाद एकदम धमाल आहेत.

can you come here for a sec ? हे बर्‍याच वेळा sec ऐवजी sex असे चूकून टाईप झाल्याची उदाहरणे पाहिली आहेत. आमचे ऑफीस sez एरीयात आहे. तिथे ही sez ऐवजी sex टायपो झाल्याचे पाहिले आहे. माझ्याकडून एकदा live channels चालत नाहीत हे क्लाईंट्ला लिहीत असताना love channels चालत नाहीत असे लिहीले गेले होते. त्यांनीही मग माझी मजा घेतली होती.

can you come here for a sec ? हे

ग्रामीण भागातला अजून एक किस्सा.
एका ग्रामीण महिलेला पैसे काढायचे होते तिला लवकर पैसे हवे होते उशीर होत होता तेव्हा ती म्हणाली
घाई करा. माझी गाडी ढळल
काहीक्षण मला वाटले तिलासाडीम्हणायचे आहे ,, कारण फक्त पदर ढळतो त्याऐवजी ती साडी म्हणत असेल असे मला वाटले
मी बुचकळ्यात पडलो.

स्थानिक कर्मचार्‍याने सांगितले की गाडी ढळल म्हणजे एसटी सुटेल.

धमाल किस्से...
मी वाचलेला एक...
To,

The Manager,

Dear Sir,

Sub.: leave application for eye coming.

I will not come as my eyes have come. If I come with my coming eyes then your eyes will come & you will not come. But still if you come with your coming eyes all office eyes will come & all will not come. So I will not come and all will come. I will come back when my coming eyes will go & all will come without their eyes coming.

Yours Sincerely

*गाडी ढळ*,
* If I come with my coming eyes then your eyes will come
>>> आई ग ! हहगलो Happy Happy
खल्लास अर्ज आहे. त्या कर्मचाऱ्याला डोळ्याचे मानचिन्ह देऊन त्याचा "सत्कार" करावा !!

I will not come today as my foot slept yesterday night -

माझ्या नवर्‍याकडे आलेला एक दिवसाच्या रजेचा मेसेज. (काल रात्री पाय घसरून पडलो, म्हणून आज येऊ शकत नाही.)

* डोळे येण्याला इंग्रजीत काय >>> +१ Happy

डोळे येणे = conjunctivitis ( = Pink Eye )

रांजणवाडी = stye (hordeolum = सातूच्या दाण्यासारखा दिसणारा फोड )

conjunctivitis हेच म्हणावे जास्त सुट्टी मिळू शकतेeye infection म्हटलं तर चष्मा लावून ये म्हणतील ऑफिस ला

conjunctivitis झालाय म्हटले तर ते काय असतं ते लोकांना परत सांगावं लागतं असा अनुभव आहे.
ज्यांना फार बोलण्याची सवय त्यांच्यासाठी चांगले.

itis' या भारदस्त शब्दाने एकदम जरब बसते !>> Happy

Pages