तळघर

Submitted by निमिष_सोनार on 25 November, 2024 - 08:12

चिखलपूर नावाच्या छोट्या गावात पूर्वजांच्या "प्रवाह" नावाच्या वाड्यात माधव रहात होता. माधवचे आई वडील अपघातात वारल्यानंतर राघव नावाच्या त्याच्या आजोबांनी आणि आजीने त्याचे पालनपोषण केले. कालांतराने आजी वारली. बी कॉम करून जवळच्या शहरात त्याने एका खासगी कंपनीत नोकरी मिळवली. आजोबांनी त्याला याबद्दल निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते. त्याच्या आजोबांचा गावातला व्यवसाय बंद पडल्यानंतर त्याच्या वडिलांनी जवळच्या एका शहरात रोज जा-ये करून नोकरी केली होती.

शहरात नोकरी करून माधवला अधून मधून गावात येऊन आजोबाकडे लक्ष ठेवता येत होते. शहरात तो छोट्याशा भाड्याच्या रूमवर राहायचा. पगार काही फार नव्हता. ऑफिसमध्ये मधुरा नावाच्या एका सहकारी तरुणीवर त्याचे प्रेम जडले. कालांतराने ती कंपनी बंद पडली. माधवने इतर ठिकाणी प्रयत्न केले परंतु त्याला नोकरी मिळाली नाही. शेवटी त्याने ठरवले की, आता गावाकडे परत जायचे, तिथेच काहीतरी व्यवसाय करायचा आणि आजोबांची सेवा करायची. माधवने हा निर्णय मधुराला सांगितला पण तिला हा निर्णय आवडला नाही. त्याने शहरातच राहावे अशी तिची इच्छा होती. शेवटी तिने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. तीचे मन वळवण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. काही आठवडे तिच्या आठवणीत काढून शेवटी त्याने तिला विसरायचे ठरवले आणि तो बालपणीच्या आपल्या मातीत गावी परत आला.

त्याने साठवून ठेवलेल्या आणि आजोबांनी त्याच्या नावे ठेवलेल्या काही पैशांच्या आधारे त्याने किराणा, भाजीपाला आणि स्टेशनरी असे एकत्रित दुकान सुरू केले कारण जवळच शाळा होती. त्याचे दुकान बरे चालू लागले. अधून मधून मधुराची आठवण यायची पण तो दुर्लक्ष करायचा. मग एक वाईट घटना घडली. सहा महिन्यांत त्याचे आजोबा वारले. त्यांचे जास्त कुणी नातेवाईक नव्हते याचे कारण म्हणजे बहुतेक सर्व नातेवाईक हे अपघाताने किंवा एखादा रोग होऊन वारले होते. जे थोडेफार दूरचे नातेवाईक होते, तेही शहरांत दूरवर विखुरलेले होते. त्यापैकी काही अंत्यविधीला येऊन गेले. आता माधव एकटा पडला.

माधव रहात असलेला तो पूर्वजांचा वाडा गावातील सर्वात जुना होता. कित्येक पिढ्या या वाड्यात राहिलेल्या होत्या, आणि अनेक वर्षांपासून त्याचं जतनही योग्य प्रकारे केलं जात होते. वर्षांनुवर्ष सूर्यभान काका हे त्या वाड्याची देखभाल करायचे. माधव शहरात असताना आजोबांची सुद्धा शक्य तेवढी काळजी घ्यायचे. त्यांनी व त्यांच्या अनेक पिढ्यांनी लहानपणापासून नियमित व्यायाम आणि कुस्तीचे प्रशिक्षण घेतलेले असल्यामुळे त्यांचे शरीर काटक आणि बलवान होते.

एकदा दुकानात बसलेला असताना माधवला आठवले की, वाड्यात ज्या चार खोल्या होत्या त्यापैकी चौथी खोली नेहेमी कुलूप बंद असायची कारण त्या खोलीत तळघराकडे जाणारा एक जिना होता. माधव लहानाचा मोठा झाला परंतु ते तळघर आजोबांपासून नंतर कुणीही कधीही उघडले नाही. घरात सर्व प्रकारच्या चर्चा व्हायच्या पण एका गोष्टीचा नेहमीच उल्लेख टाळला जायचा – तळघर! चौथी खोली अधून मधून साफ करायला उघडली जायची परंतु जमिनीला असलेल्या तळघराच्या दरवाजाला मात्र कडी आणि कुलूप नव्हते. पण दरवाजा खूपच भक्कम आणि जड होता. कालांतराने चौथी खोलीसुद्धा कायमची कुलूप लावून बंद करण्यात आली.

नंतर त्या खोलीत जायला कोणाला परवानगी देण्यात आली नाही! याचे कारण जवळच्या एका गावात राहणाऱ्या एका दूरच्या नातेवाइकने म्हणजे शंभूकाकांनी माधवला सांगितले पण त्यांचे नाव त्याच्या आजोबांना न सांगण्याच्या अटीवर! ते कारण असे होते की, रोज रात्री त्या तळघरातून अस्पष्ट आणि दबलेले ओरडण्याचे आवाज येत. मध्येच एखादा लाकडी खोका जोरात धडपडल्यासारखा आवाज यायचा जणू काही एखादे अभद्र हिंस्त्र जनावर त्या खोक्यात बंद करून ठेवले आहे आणि खोक्यातून ते बाहेर येण्याचा प्रयत्न करते आहे. कधी कधी तर म्हणे जोरजोरात एक पाऊल आपटण्याचा आवाज ऐकू येई जणू काही मोठा व्यक्ती लहान मुलासारखा एखाद्या वस्तूसाठी आपल्या आईवडिलांकडे हट्ट करतो आहे आणि पाय आपटतो आहे. काही वेळेस तर जोराजोरात ताट, वाट्या आणि चमचे फेकण्याचा आवाज येत असे.

सूर्यभान काकांना तळघरातील हालचाली अधून मधून जाणवत होत्या पण ते दुर्लक्ष करत आणि माधवला सांगत नसत. एक दोन वेळा रात्री वाड्यातून आपल्या घरी जाण्याच्या आधी त्यांना चौथ्या खोलीच्या दरवाजावर आतमधून कुणीतरी जोरजोरात ठोकत आहे असे जाणवले. त्या दिवसापासून त्यांनी त्या रुमच्या दरवाज्याच्या बाजूला जाऊन कपडे वाळत टाकणे सोडून दिले.

कालांतराने माधवचा व्यवसाय खूप चालू लागला आणि खूप नफा होऊ लागला. दरम्यान इकडे मात्र वाड्यातील तळघरात वेगाने हालचाली होऊ लागल्या होत्या. त्या बंद असलेल्या तळघरात दबक्या आवाजात एकमेकांशी अभद्र चर्चा होऊ लागली आणि अस्वस्थता वाढत गेली.

* * *

एकदा त्याची शेजारच्या छोट्या गावातील बालपणीची मैत्रीण मोनिका शहरात शिक्षण संपवून चिखलपूर गावातल्या त्याच शाळेत शिक्षिका म्हणून लागली, ज्यात लहानपणी दोघे एकत्र शिकले होते. त्याला हे माहीत नव्हते मात्र तिने त्याला एकदा दुकानात पाहिले होते. एकदा मुद्दाम त्याचे लक्ष नसतांना ती त्याच्या दुकानावर एक वही आणि पेन विकत घ्यायला आली. पैसे असलेल्या त्या हाताकडे आणि मग हळूहळू चेहऱ्याकडे त्याने जेव्हा नजर फिरवली तेव्हा तिला ओळखले आणि त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. काही वेळ दोघांपैकी कोणीही काही बोलले नाही. मग ती दुकानात येऊन बसली आणि नंतर दोघेही खूप हसले आणि गप्पा सुरू झाल्या. जुनी मैत्री उफाळून आली आणि ते रोज भेटू लागले. दोघांची फॅमिली एकमेकांना ओळखत होतीच. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. साधेपणाने लग्न पार पडले आणि मोनिकाचा "प्रवाह" वाड्यात मध्ये प्रवेश झाला. नवीन जोडप्याचे काही महिने आनंदात गेले.

मोनिका आता प्रेग्नंट खाली होती. काही दिवसानंतर ती बाळंतपणासाठी माहेरी जाणार होती. ते तळघर आता कधी नव्हे एवढे अस्वस्थ झाले होते. तिथे अनेक शक्ती जोमाने कार्यरत झाल्या. येरझारा घालू लागल्या.

दरम्यान माधवला एक कल्पना सुचली. जुना वाडा पाडून त्याचे नूतनीकरण करायचे आणि व्यवसायाच्या जागेचे भाडे भरण्यापेक्षा चौथी खोली पाडून त्या जागी दुकान सुरू करायचे आणि कालांतराने आणखी एखादा नवा जोड व्यवसाय सुरू करायचा. चौथ्या खोलीच्या एरवी बंद असलेल्या खिडकीच्या ऐवजी दुकानाचा दर्शनी भाग येणार आणि समोर दाट वस्ती आहे आणि तिथून थोडी पुढे शाळा असल्याने दुकान आणखी जास्त चांगले चालणार होते.

राहता राहिले तळघर! ते दुकानातील माल ठेवण्यासाठी वापरायचे अशी नामी कल्पना त्याला सुचली. सूर्यभान काकांनी त्याला विरोध केला, तेव्हा पहिल्यांदा मोनिकाला तळघर प्रकरणाबद्दल माहिती झाले.

आता आजोबा जिवंत नसल्याने दूरच्या शंभुकाकांनी सांगितलेली माहिती सुद्धा सूर्यभान काका आणि मोनिका या दोघांना माधवने सांगितली. सूर्यभान काकांनी ते कपडे वाळत टाकत असताना त्यांना चौथ्या खोलीतून येत असलेल्या आवाजाबद्दल पण सांगितले. मोनिकानेही माधवला सांगितले की तळघरात असा काही प्रकार असेल तर तिथे आपण न छेडलेले बरे. चौथ्या खोलीत व्यवसाय करण्याचा प्लॅन रद्द करावा असे दोघांनीही माधवला समजावले.

तरीही माधव त्याच्या म्हणण्यावर ठाम होता. घरी मोक्याची जागा असताना दुकानाच्या भाड्याचे पैसे कशाला खर्च करायचे असा त्याचा हट्ट होता. शेवटी सूर्यभान काका आणि मोनिका दोघांनी त्याच्यापुढे हार मानली. गवंडी आले, काम चालू झाले. खोली क्रमांक एक म्हणजे ज्यात बैठक, स्वयंपाकघर आणि एक छोटी बेडरूम होते ती वगळता इतर सर्व खोल्या पाडायला सुरुवात झाली.

आता चौथ्या खोलीची अवस्था म्हणजे विटा, चुना, सिमेंटचे आणि इतर बांधकाम साहित्याचे पोते, अर्धवट पडलेल्या भिंती, आजूबाजूला पडलेले साहित्य तसेच पाच कामगार बाजूलाच ओट्यावर झोपलेले अशी झालेली होती. सकाळी सर्वजण उठले तेव्हा चारच कामगार होते. पाचवा कामगार गणादू कुठे गेला हे कुणालाच समजले नाही. रात्री कसलातरी जोराचा आवाज मात्र त्यांना आला होता तेव्हा पाचवा कामगार तिथे नव्हता पण तो बाथरूमला गेला असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले आणि दिवसभर थकलेले असल्याने पुन्हा ते सर्व लगेच झोपी गेले. माधवने गावात चौकशी केली पण काहीही सुगावा लागला नाही. गणादूचे कुटुंब येऊन माधवला जाब विचारू लागले. त्याने त्यांना समजावून परत पाठवले.

या सर्व गोंधळात मोनिकाला माधवने तिच्या गावात माहेरी पाठवून दिले. या सर्व गोष्टींचा तळघराशी संबंध असावा असे सूर्यभान काकांनी सांगितल्याने एकदाचा या तळघर प्रकरणाचा छडा लावायचा म्हणून माधवने एक दिवशी सर्व कामगारांना घरी पाठवले आणि सूर्यभान काकांसोबत तळघरात जायचा निर्णय घेतला.

* * *

त्या रात्री त्यांनी बांधकामाच्या मशीनच्या मदतीने गंजलेला भक्कम दरवाजा मशीनने उचलून उघडला. हातात टॉर्च घेऊन माधव आणि त्याच्या मागून कंदील घेऊन सूर्यभान काका धुळीने भरलेल्या पायऱ्या उतरू लागले.

समोर अंधार होता आणि धुरकट दिसत होते. वाटेत जागोजागी जळमटे होती, ती हाताने दूर करत ते दोघे सावधतेने पण मनातून घाबरत पायऱ्या उतरून खाली आले. वर दाणकन काहीतरी आपटल्याचा आवाज आला म्हणून त्यांनी वर पाहिले तर दिसले की, भक्कम दरवाजा पुन्हा आपोआप बंद झाला होता. पण आता त्यांना तळघराच्या छडा लावायचा होता त्यामुळे ते पुढे जात राहीले.

आता त्यांना वेगवेगळे दबक्या स्वरूपाचे आवाज ऐकू यायला लागले. जणू काही एकमेकांच्या कानात दोन जण तिसऱ्याबद्दल बोलत आहेत.

सूर्यभान काकांच्या मागच्या बाजूला असलेल्या भिंतीवर वरच्या बाजूंनी दोन मानवी गडद काळया सावल्या उमटल्या आणि त्या हळूहळू उलट्या खाली सरकल्या. हातातील कंदीलाच्या प्रकाशामुळे काकांची पाठमोरी सावली भिंतीवर पडली होती, तिला त्या दोन सावल्यांनी दोन्ही हातांनी पकडली. भिंतीपासून दूर असतानाही भिंतीवरच्या सावलीला पकडल्यामुळे सूर्यभान काका जखडले गेले आणि ओरडायला लागले. त्यामुळे माधवचे लक्ष तिकडे गेले आणि त्यालाही हा प्रकार बघून त्याला प्रचंड भीती वाटायला लागली. आता काय करावे ते समजत नव्हते.

तेवढ्यात त्याला कल्पना सुचली. त्याने हातातील टॉर्चचां प्रकाश त्या दोन सावल्यांवर मारला तेव्हा त्या अंधुक व्हायला लागल्या आणि तो प्रकाश टाळण्यासाठी त्या पुढे पुढे सरकत सूर्यभान काकांना सुद्धा ओढत नेऊ लागल्या. कंदीलामुळे पडत असलेली काकांची सावली नष्ट करायची तर कंदील विझवायला हवा. म्हणून त्याने काकांना वाचवायला हातातली टॉर्च त्याने वेगाने कांदिलावर मारून फेकली. कंदील हातातून खाली पडून फुटला. टॉर्च पण खाली पडली आणि घरंगळत कुठेतरी गेली आणि बटण सरकल्याने विझली.

काकांची सावल्यांचा हातातून सुटका झाली खरी पण आता सगळीकडे अंधार पसरला. हा नेहमीच्या अंधारासारखा वाटत नव्हता. सगळ्या जगभरातला काळा रंग एकत्र करून या खोलीत दाबून भरून ठेवलेला आहे, अशा प्रकारचा तो जीवघेणा अंधार वाटत होता.

पण हे बरे झाले असे दोघांना वाटले कारण आता प्रकाश नाही म्हणून सावल्या नाहीत आणि त्यामुळे इतर कोणत्या सावल्यांनी पकडण्याची भीती नाही.

पण तो आनंद जास्त काळ टिकला नाही.

आजूबाजूच्या काळया आणि गडद अंधारात माधवची मान मागून कुणीतरी पकडली. माधव भितीने ओरडला. समोर जमिनीवर पडलेले सूर्यभान काका या ओरडण्याने उठून उभे राहिले पण अंधारात कोण कुठे आहे हे काहीच दिसत नव्हते. त्यांनी अंदाजाने पावले टाकायला सुरुवात केली. अंधारात चाचपडत आवाजाच्या दिशेने चालत गेले. त्यांना माधवचा गुदमरून ओरडण्याचा आवाज येत होता, "कोण आहे? सोड मला?"

सूर्यभान काकांना अंधारात झटापटीचा आवाज येत होता. हात पाय एकमेकांवर घासले जाऊन पोटात बुक्के मारणे, गालावर चापटा मारणे, पोटात दुखल्यामुळे ओरडणे, अतीव वेदनांनी कळवळणे, श्वास कोंडला जाऊन घशातून विचित्र आवाज निघणे, मधूनच जमिनीवर धपकन पडणे असे काळजी वाढवणारे भीतीदायक आवाज ऐकायला आले. पण दिसत काहीच नव्हते.

त्यांना एक क्षण असे वाटले की, आंधळे लोक रोजच्या जीवनात किती समस्यांचा सामना करत असतील? कुणीतरी नक्की माधव वर हल्ला केला आहे पण त्याला वाचवायचे तर प्रकाश हवा आणि कंदील तर फुटला आहे.

पण टॉर्च खाली कुठेतरी असेल ती शोधावी लागेल, असा विचार करून हातांनी अंदाज घेत सूर्यभान काका जमिनीवर टॉर्च शोधू लागले पण मधूनच पायऱ्यांनी अडखळून पडले, परत उभे राहिले. शेवटी त्यांना जमिनीवर काहीतरी गोल सापडले, त्यांनी ते उचलले पण ती एक जाड काठी होती. ती उपयोगी पडेल म्हणून त्यांनी ती उचलली आणि दुसऱ्या हाताने ते टॉर्च शोधू लागले. त्यांना एके ठिकाणी टॉर्च सापडली, ती उचलून गोल गोल फिरवत टॉर्चचे बटन सापडले त्यांनी बटन ऑन केले आणि मागे वळून प्रकाश फेकला...

समोरचे दृश्य बघून ते जागच्या जागी थिजले...

* * *

चेहऱ्यात भीतीकारक बदल झालेला आणि झपाटलेला गणादू, जमिनीवर आडव्या पाडलेल्या माधवच्या छातीवर बसला होता आणि समोरच्या भिंतीवर अनेक मानवी आकाराच्या सावल्या हा प्रकार बघत हसत होत्या. म्हणजे अंधारातही या सावल्या अस्तित्वात होत्या पण त्या उजेड असल्याशिवाय आणि कुणा मानवाची सावली पडल्याशिवाय त्याला त्रास देऊ शकत नव्हत्या.

टॉर्चचा प्रकाश चेहऱ्यावर पडताच गणादू सूर्यभान काकांकडे पाहून म्हणाला, "मी माधवला आणि नंतर त्याच्या होणाऱ्या बाळाला सोडणार नाही. बाळाला मारण्यासाठी आताच एक सावली मोनिकाच्या घराकडे रवाना झाली आहे. माधवाच्या पूर्वजांनी त्रास दिलेले, दुखावलेले आत्मे सावल्यांच्या आणि आवाजाच्या स्वरूपात वर्षानुवर्षे या तळघरात बंदिस्त झाले आहेत. हे तळघर म्हणजे या वाड्याचे हृदय आहे. जसे माणसाच्या हृदयात सर्व भाव भावना साठून राहतात तसेच! आम्ही वर्षानुवर्षे हाका मारीत होतो पण कुणी आमचे ऐकायला आले नाही म्हणून आम्ही तुमच्या अनेक पिढ्यातील लोकांना अपघाताने आणि रोगाने मारले. आम्हाला जाणवत होते की वंशजापैकी माधव, त्याचे वडील आणि आजोबा तसेच सूर्यभान काका तुम्ही इतर पूर्वजापेक्षा सरळमार्गी आहेत, कुणाला त्रास देण्याची पापी वृत्ती तुमची नाही. वंशजांपैकी आता माधवद्वारेच आमची येथून मुक्तता होईल. जेव्हा त्याने तळघर असलेली खोली पाडली, आणि रात्री कामगार झोपले तेव्हा आम्ही तळघरात खूप हालचाली आणि आवाज सुरू केल्या. बाहेर झोपलेला गणादू अर्धवट जागा होता. त्याने कुतुहलाने म्हणून आत चौथ्या खोलीत येऊन मशीनच्या मदतीने दरवाजा उघडला आणि टॉर्च घेऊन तो आत तळघरात उतरला. आम्हाला हेच हवे होते. आमचे म्हणणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही गणादूला त्याची सावली पकडून आमच्यात ओढून घेतले आणि त्याच्यात प्रवेश केला!"

सूर्यभान काका म्हणाले, "थांबा. तुमचे जे काही म्हणणे असेल ते पूर्ण सांगा. माधवला सोडा. आणि तुमच्या काय मागण्या असतील ते आम्ही मान्य करतो. कृपया माधवला मारू नका! त्याच्या बाळाकडे पाठवलेल्या सावल्या परत बोलवा."

हे ऐकून गणादू माधवच्या छातीवरून उठला. माधव उठून उभा राहिला. आता गणादू पूर्वीच्या मानवी रूपात आला.

आता भिंतीवरच्या सावल्यांमध्ये अस्वस्थता पसरली आणि त्यांचा खेळ सुरू झाला.

साध्या, स्थिर प्रकाशातही त्या सावल्यांनी एक अनोखे भयाण रूप धारण केलं. सावल्यांचे आकार एकमेकांत मिसळलेले होते.

काही बुटक्या तर काही लांबट, काही टोकदार तर काही गोलसर. पण त्या सर्वांचा एक त्रासदायक गुणधर्म होता, त्या अगदी अमानवी हालचाल करत होत्या. कधी त्या गडद होत तर कधी इतक्या फिकट की दिसेनाशा होईनात.

एका कोपऱ्यात तर एक अभद्र पालीच्या आकारासारखी आकृती पायांच्या आणि शेपटीच्या लांब सावल्यांसह भिंतीवर फिरत असल्यासारखी भासू लागली.

तळघराच्या मुख्य भिंतीवर एक अजूनही वेगळी सावली होती, जी एका मोठ्या जमावासारखी दिसत होती. तिच्या आकारात लहान मोठ्या आकृत्या सामावल्या होत्या. काही मानवी आकारासारख्या, काही वेड्यावाकड्या अमानवी! त्या जमावातील प्रत्येक सावली जणू काही तळघराच्या भिंतीवरून दूर होऊ इच्छित होती, पण त्यांचे पाय भिंतीत जखडले आहेत असे दिसत होते. सावल्यांचे अस्तित्व अधिक भीतीदायक होत चालले होते. त्या तळघरात एक प्रकारचा अनाकलनीय थंडावा पसरला होता.

आता तळघरात विविध लोक एकत्र बोलत आहेत असा आवाज छताकडून घुमायला लागला पण त्या आवाजात स्पष्टपणा होता...

"आम्ही या तळघरातून कायमचे निघून जाऊ. पण आम्हाला माधव किंवा त्याचे बाळ यापैकी कुणा एकाचा बळी हवा आहे. बोला कुणाचा देणार? पूर्वजांनी केलेल्या कर्माची फळे वंशजांना फेडावीच लागतील. "

माधव आणि सूर्यभान काका यांनी एकमेकांकडे पाहिले.

सूर्यभान काका म्हणाले...

"तुमच्यापैकी कुणालाही जो काही त्रास झाला असेल त्याची भरपाई माधव करेल. तुमच्या कुणा अनाथ झालेल्या नातेवाईकाला मदत, पालनपोषण किंवा अजून काही? शक्य असेल ते सर्व माधव करेल. पण बळी? नको! आणि तसेच असेल तर माझा बळी घ्या, परंतु या दोघांना सोडा!"

तो आवाज म्हणाला, "यांच्या पूर्वजांनी केलेली पापं तू कशाला फेडतोस? ते नाही चालणार! आम्हाला या दोघांपैकी कुणा एकाचा बळी हवा. मग आम्ही एकत्रितपणे येथून निघून जाऊ. लवकर ठरवा. अन्यथा आमची एक सावली बाळाच्या आईपर्यंत पोहोचतेच आहे! ती आईच्या पोटात शिरली की संपलं!"

आता काय करावे याचा पेच पडला होता.

सूर्यभान काका म्हणाले, " पण आधीच तुम्ही अनेकांना अकाली मारले आहे आणि तुमचा बदला घेत आला आहात. मग आता आणखी तुम्हाला बळी कशाला हवेत?"

* * *

तेव्हा अचानक तळघराचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि दोन जण पायऱ्या उतरू लागले...

मोनिकाने शंभूकाकांना कॉल करून परिस्थितीची कल्पना दिली होती, ते एका सदगुरूंना सोबत घेऊन आले होते. त्यांचेकडे एक दिव्य काठी होती ज्याला उडणाऱ्या हनुमानाचे चित्र असलेला एक झेंडा जोडलेला होता आणि टोकाला एक त्रिकोणी दिव्य मणी होता आणि त्यातून लालसर प्रकाश पडत होता.

ते पटकन पायऱ्या उतरून खाली आले आणि माधव व सूर्यभान काका यांना त्यांनी बाजूला होण्याची विनंती केली. ते बाजूला झाले. शंभू काकांना पाहून दोघांना हायसे वाटले.

मग सदगुरू सावल्यांसमोर येऊन उभे राहिले आणि हनुमानाचा एक अद्भुत मंत्र म्हणत, त्यांनी दिव्य प्रकाश सोडत असलेली ती काठी एकेका सावलीजवळ नेली आणि तिला गोल गोल फिरवू लागले. त्यामुळे त्या सावल्यांना प्रचंड पीडा होऊ लागली. वेदनेने त्यांच्या हृदयातून भीतीदायक हुंकार निघू लागले. एकेक सावली अक्राळ विक्राळ रूप धारण करत शेवटी निस्तेज होऊन गायब व्हायला लागली. नष्ट होतांना त्या सावल्यांना प्रचंड वेदना होत होत्या. त्या सर्व वेदना जणू काही संपूर्ण तळघरात दुःखाचा भूकंप आणत होत्या. तळघर हादरत होते. सावल्या कधी एकमेकात मिसळू लागल्या तर कधी एकमेकांपासून दूर पळू लागल्या. सावल्यांमध्ये गोंधळ माजला. दिव्य शक्तीमुळे आपले अस्तित्व लवकरच संपणार आहे याची जाणीव झाल्याने त्या अस्वस्थ होऊन अभद्र आरोळी ठोकू लागल्या. जसे एखाद्या गर्दीच्या ठिकाणी माणसांची चेंगरा चेंगरी होते त्याप्रमाणे भिंतींवर सावल्यांची चेंगरा चेंगरी माजली.

हळूहळू एकेक करत सर्व सावल्या नष्ट झाल्या...

वाड्याचे हृदय असलेले तळघर आता त्रासातून मुक्त झाले होते. हृदय सुरळीत चालू असले की माणूस निरोगी राहतो तसे आता वाड्याच्या हृदयावरचा म्हणजे तळघराचा ताण आता हलका झाला होता आणि वाडा निरोगी झाला होता.

शंभू काका म्हणाले, "मोनिकाचे आभार मान. तिने वेळेवर आम्हाला बोलावले, अन्यथा तुझे हे वेडे साहस जिवावर बेतले असते! आणि हे सदगुरू हमुमानाचे उपासक आहेत. माझे मित्र आहेत. त्यांच्यामुळेच आज आपण वाचलो'!"

माधव, सूर्यभान काका आणि गणादू यांनी त्यांचे आभार मानले आणि पाचही जण दिव्य प्रकाश असलेल्या काठीसहित पायऱ्या चढू लागले. ते निघून गेले, तळघरचा दरवाजा बंद केला आणि पुन्हा तिथे काळोख पसरला. मिट्ट काळा अंधार!

तिकडे मोनिका काळजीने रात्री बेडवरून छताकडे बघत लोळली होती आणि एक सावली बाजूच्या खिडकीतून उडी मारून तिच्या पोटात शिरण्याच्या बेतात होती पण हवेतच नष्ट झाली. मोनिकाला त्या सावलीबद्दल काहीच कल्पना नव्हती!

(ही कथा द्विदल या दिवाळी अंकात (2024) छापून आलेली आहे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले कथाबीज होते नि तळघरातला प्रसंग पण नीट जमत होता. एकदम घाई घाईत गुंडाळली आहे असे वाटते. मधेच शंभू काका कुठून आले तेही कळले नाही.

कथा, कल्पना छान आहे. वाचायला आवडली.

चांगले कथाबीज होते नि तळघरातला प्रसंग पण नीट जमत होता. एकदम घाई घाईत गुंडाळली आहे असे वाटते >>> +१ . शेवट थोडा अजून खुलवला असता तर अजून जास्त मजा आली असती असे वाटते.

. एकदम घाई घाईत गुंडाळली आहे असे वाटते .... >>हो ना

कदाचित त्याचं कारण --
ही कथा द्विदल या दिवाळी अंकात (2024) छापून आलेली आहे) -- ती आहे तशी इकडे प्रकाशित करण्याने असावे.

दिवाळी अंकात शब्द मर्यादा आखून दिली असेल पण मायबोली वर पुनर्प्रकाशित करताना अशी काही मर्यादा नसताना इथे कथानक फुलवत काही भागात प्रकाशित केले असते तर अधिक रोचक ठरले असते.

pahilya 3 paragraph madhlya mahitiacha goshtit pudhe kahich sambandh nahiye.
for all practical purposes , aajoba warale ani shanbhu ekata padala ithpasun gosht chalu zali tari kahi farak padanar nahi.

असामी +११
सिम्बा तुमच्या कळफलकाला काय झाले?

एक प्रश्न आहे. त्या सद्गुरूंचे नाव 'बोकलत' होते का हो? त्यांची फार कमांड आहे अशी प्रकरणे सोडवण्यात, असे ऐकून आहे.

सॉरी उपाशी बोका.
मला बोकलत या शब्दाचा अर्थ माहिती नाही.