भाग - १! - https://www.maayboli.com/node/85814
दुतर्फा वाहनांच्या गर्दीला चिरत ती गाडी दिमाखाने रस्त्यावर धावत होती.
लांबलचक, उंच आणि दिमाखदार...
"...ही विक्रमादित्यची गाडी ना? जुनी वेगळी होती."
"हिला सेकंड सेंच्युरी म्हणतात. टोयोटा सेंच्युरीला दोनशे वर्ष पूर्ण झालीत, तेव्हा ही लॉन्च झाली."
"जगात रोल्स रोईस पेक्षा सेंच्युरी जास्त रेयर आहेत असं म्हणतात."
"हो. तसही बाबांच्या गॅरेजमध्ये आठ रोल्स आहेत. सेंच्युरी मात्र दोनच..."
"एक ती V12 वाली ना?"
"आय एम सरप्राईजड..." मानसी उत्साहाने उद्गारली. "तुम्हाला माहितीये ती कार?"
"तुझे आजोबा आणि मी तिच्यात बसून एकदा पूर्ण नाशिक फिरलो होतो. गुड ओल्ड डेज. आजकाल कार्स जमिनीपेक्षा आकाशात जास्त उडतायेत."
"त्याला माझी आजीच जास्त कारणीभूत आहे." मानसी हसली.
"येस..." अज्ञातवासी हसला आणि कुठेतरी भूतकाळात रमला.
गाडी वेगात पुढे सरकत होती. त्यांच्यासाठी रस्ता मोकळा होत होता. व्हीव्हीआयपी मुवमेंट काय असते, याचा अंदाज त्यांच्या प्रवासावरून येत होता.
"तुझी मराठी छान आहे मानसी. या काळात तरी अशी मराठी ऐकू येत नाही."
"वेल, मला मराठी, कन्नड, हिंदी, इंग्लिश, रशियन आणि जॅपनीज इतक्याच भाषा येतात.
बाकी भाषांसाठी एआय वापरावा लागतो."
"माझ्या काळात जन्मली असतीस तर इतक्याच ऐवजी इतक्या म्हणावं लागलं असतं." अज्ञातवासी म्हणाला.
"गुड ओल्ड डेज." ती म्हणाली. "आपण पोहोचलो..."
गाडी फक्त थोड्या वेळासाठी थांबली, पण त्यातही अज्ञातवासीने समोरच दृश्य डोळ्यात साठवून घेतलं.
...नाशिकला आल्यावर तो नेहमी त्या इमारतीकडे बघायचा, मात्र त्याला ती इमारत वेगळीच भासायची.
'लोक ताजमहाल बघणार नाहीत, पण ही इमारत बघायला येतील...'
...तिची दर्पोक्ती तिने खरी करून दाखवली होती.
जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्य त्या इमारतीत होतं.
...आणि 'त्या' ची समाधी देखील.
साम्राज्य असावं तर असं, जमिनीत घट्ट पाय रोवून आकाशाला टेकलेलं...
...राजा विक्रमादित्यचं साम्राज्य.
"शून्यात हरवलात?"
"नाही. हीच्या भव्यतेत हरवलो." त्याने इमारतीकडे बोट दाखवलं.
"वेल." पुढे काहीही बोलता तिने स्मितहास्य केलं.
"राजा विक्रमादित्य असेल ना आज?"
"तुमची वाट बघतायेत..."
"कधीकधी विनाकारण माझा उर अभिमानाने भरून येतो. माहितीये का तुला?" तो हसला.
"तुम्ही येत आहात हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला."
गाडी तशीच समोर घुसली. आणि हळूहळू एका अजस्त्र लिफ्ट कडे जाऊ लागली.
लिफ्टमध्ये पोहोचल्यावर गाडी थांबली.
ड्रायवर उतरला, व लिफ्टच्या बाहेर गेला.
तिने हातातल्या घड्याळात टच केलं.
लिफ्ट वर निघाली.
वर पोहोचल्यावर ती उतरली. तिने पुन्हा गाडी सुरू केली, व सावकाश पुढे नेऊ लागली.
एका कोपऱ्यात गाडी थांबली...
..ती उतरली. तोदेखील उतरला.
ते आता एकशे एकविसाव्या मजल्यावर होते...
...जगातल्या एका मानवनिर्मित आश्चर्याच्या परमोच्च बिंदूवर...
राजा विक्रमादित्यच्या महालात...
'या जगात जे काही सर्वोत्तम आहे, ते इथे असेल.'
तिची अजून एक दर्पोक्ती त्याला आठवली.
आणि तिने ते साध्य केलं होतं.
"कसे आहात अंकल." मागून आवाज आला.
एक घाऱ्या डोळ्यांची स्त्री तिथे उभी होती. जवळजवळ पन्नाशीला पोहोचलेली, मात्र वयाच्या खुणा अजिबात न दिसणारी...
"सुप्रिया बेटा, मी मजेत. तू कशी आहेस?"
"कशी दिसतेय?" ती हसली.
"जशी आधी बघितली होतीस तशीच."
"हिने जास्त त्रास नाही दिला ना?" तिने मानसीकडे बघितले.
"त्रास नाही, धमकी मात्र दिली." तो हसला.
"सॉरी. नाश्ता करून घेऊयात. चला."
"अग माझा नाश्ता काय असणार?"
"जे तुम्ही दररोज घेतात ते. चला." सुप्रिया हसली.
"अचानक सगळं घडलं, मला वेळही दिला नाही विचार करण्याचा." तो चालता चालता म्हणाला.
"आपल्या घरी येण्यासाठी काय वेळ बघायचा अंकल?"
तो एका खुर्चीवर बसला, आणि एका कपात दूधही आलं.
"सुप्रिया. मीच का? म्हणजे अजूनही लोक आहेत हा इतिहास माहिती असणारे."
"पण त्यांनी स्वतः सांगितलेले तुम्हीच आहात."
"...पण तिला मिहिरची कथा ऐकायचीय आधी."
"मग मिहिर पाटीलही फॅमिली मेंबर होते ना?" "त्यांची स्टोरी म्हणजे फॅमिलीचीच स्टोरी ना?"
"तूसुद्धा हट्टी आहेस तुझ्या मुलीसारखी..."
"...ती तिच्या आजीसारखी हट्टी आहे."
"मग तर प्रश्नच मिटला." तो हसला.
"विक्रम येतोय थोड्या वेळात." ती म्हणाली.
"राजा विक्रमादित्यला विक्रम म्हणणारी तू आता एकमेव असशील."
"त्याला आवडत ते."
"गुड गुड. पण माझ्या कथेला वेळ लागेल सुप्रिया."
"हे घरच तुमचं आहे अंकल."
"ठीक आहे सुप्रिया. आय एम रेडी फॉर वन लास्ट राईड. चंदेरी तेजाच्या न्याऱ्या दूनियेपासून ते रक्तसमुद्रापर्यंत..."
"...लेट्स गो सर..." मागून मानसीचा आवाज आला...
...त्याने सुरुवात केली.
क्रमशः
छान! पण कृष्ण विवर कुठे आहे?
छान! पण कृष्ण विवर कुठे आहे?