वक्त हमारा है - चिकारा, क्रिप्टन आणि रामगोपाल वर्मा! ( संपूर्ण )

Submitted by rmd on 2 October, 2024 - 21:04

पिक्चर सुरू होताच खोकला झालेला कावळा ओरडावा तसला आवाज येतो. दोन गणवेषधारी आणि त्यांच्यासोबत डोक्याला बंडाना आणि डोळ्यांना गॉगल (रात्री!) असा एक माणूस (महेश आनंद) गेटवे ऑफ इंडियाच्या पुढ्यात उभे असतात. आता हे गणवेष नेमके बँडवाल्यांचे, मिलिटरीचे की अजून काही हे मला माहिती नाही. पण तशातच तसलाच गणवेष घालून समोरून रामी रेड्डी उर्फ चिकारा येतो. चिकाराचा चेहरा पाहून त्याला हमदर्द का सिंकारा द्यावं असा विचार डोक्यात येऊन गेला. कावळ्याचा खोकला वाढत जातो. यांच्यासोबत आता अजून एक माणूस वेटरचे कपडे घालून गळ्यात लाल स्कार्फ घालून येतो आणि म्हणतो 'वेल्कम टू लिस्या, कर्नल चिकारा का स्वागत है'. ( लिस्या?? रशियामधे पण गेटवे बांधला की काय? ) कर्नल म्हणतो इथल्या हवेत फार शांतता आहे तर आता मी त्यात विष कालवणार. लाल स्कार्फ ( राज मधल्या दिनो मोरयाच्या थाटात ) म्हणतो बाकी बर्‍याच देशांना केलंस तसं या देशाला पण बरबाद कर. सगळं तयार आहे - खुफिया पॅलेस ( आख्खा पॅलेस खुफिया??? ), लॅब, बारूद वगैरे. या तत्परतेचं बक्षीस म्हणून चिकारा लालस्कार्फला मारून टाकतो. वर म्हणे तू स्वतःच्या देशाचा नाही झालास तर माझा काय होणार! आणि एकदम कॅरिकॅचर्स असलेली टायटलं सुरू होतात. त्यात मधे मधे मासिकांमधून कापलेल्या रँडम बायकांचे फोटो वगैरे पण आहेत.

टायटलं संपवून पिक्चर गियर बदलून एकदम 'दिनानाथ सबकुछवाला' अशी पाटी दाखवतो. हा नाटकसिनेमावाल्यांना कपडे भाड्याने देत असतो आणि कुठल्याही वस्तू गिरवी ठेवून घेत असतो. अर्थातच इथे आपल्याला 'दिल' मधलाच अनुपम खेर थोड्या वेगळ्या फॉर्मॅट मधे दिसतो. हा भयंकर कंजूस असतो. इतका की त्या भाड्याने द्यायच्या कपड्यांमधलेच कपडे वापरत असतो. म्हणजे अगदी पार त्या कॉश्च्युमबरोबर असलेल्या टोप्/हॅट वगैरे सकट. कधी गब्बर, कधी शिंगांच्या टोपीसकटचा यमराज, कधी एअर इंडियाचा महाराजा तर कधी सुपरमॅन अश्या विविध कॉश्च्युममधे तो आपल्याला पिक्चरभर दिसतो. अक्षय कुमार उर्फ विकास याचा मुलगा असतो आणि पुरता उधळ्या आणि गुणउधळ्या असतो. गेली पाच वर्षं तो एकाच वर्गात असतो म्हणे. एकदम विकासची एंट्री! ती पण बॉक्सिंगच्या रिंगणात कोण्या सँबोला हरवत. आता गुण दाखवायचे म्हणजे इतकं हवंच. त्याच्यासोबत त्याची हिरोईन म्हणून आयेशा झुलका देखील आहे. थोडक्यात यांच्या लव्हस्टोरी मधे पिक्चरवाले वेळ घालवणार नाही आहेत. तर या विकासला पास व्हायचं नाहीये कारण त्यानंतर त्याचे बाबा त्याला त्यांच्या कबाडी बिझनेसमधे त्याला ओढतील अशी त्याला भीती आहे. पण पास नाही झालं तर बाबा हाणतील ही भीती पण आहे. म्हणून तो एका खोट्या पेपरात तो युनिव्हर्सिटी मधे पहिला आल्याची बातमी छापून घेतो आणि हा पेपर घरी टाकवून घेतो. पास झाल्याचं नाटक करून वडिलांकडून पार्टीसाठी १०,००० रूपये पण उकळतो. १०,०००? १९९३ मधला हा पिक्चर. ही मुलं नक्की कुठे कसली पार्टी करणार आहेत याची मला उत्सुकता लागली. पण ही पार्टी कधीही होत नाही. पता लगाओ दया उन १०,००० रूपयोंका क्या हुआ?

इकडे आयेशा आणि ममता (कुलकर्णी ) साळसूदपणे चुडीदार घालून 'मिडी.स्कर्ट पहनने दो' असले बोर्ड घेऊन तसल्याच घोषणा देत असतात. ममता तिची बहिण असते म्हणे. याआधीच्या सीन मधे आयेशाने स्कर्ट घातला आहे खरंतर. विसरली वाटतं ती. ही नारेबाजी त्या स्वतःच्या घरासमोर आईवडिलांविरूद्ध करत असतात. पात्रपरिचय असा आहे. यांचा बाबा टिकू तलसानिया आहे जो 'ते.रा. विद्रोही' नावाचा नेता असतो. याला सगळे जुहूचा नेता म्हणून ओळखत असतात. शुभा आणि विजू ही खोटे भावंडं इथेही भावंडं आहेत. अर्थात टिकूची बायको शुभा आहे. विजू पोलिस आहे. तर एकूण या सीनला काही अर्थ नाही. पालक नाईलाजाने त्यांच्या मागण्या माफ करतात आणि यानंतर पिक्चरभर या पोरी मिडीच्या नावाखाली मिन्या घालून बागडतात.

विकासने एकच पेपर चुकीचा छापून घेतला होता म्हणजे खरं तर एकाच पेपरात ही बातमी आलेली असायला हवी ना? पण समहाऊ अनुपम खेरकडे बरेच पेपर असतात आणि त्यांच्यात याचा फोटो आलेला असतो. यालाच फोटोसिंथेसिस म्हणतात का? पण कोणीतरी खरा पेपर आणून दाखवतं आणि त्यात फक्त मुजरिम चिकाराचा फोटो असतो ( मला वाटलं विसरले की काय पिक्चरवाले त्याला. पण नाही! ). विकास निवांत आयेशाबरोबर गाणी म्हणत उधळलेला असतो ( या गाण्याच्या शेवटी पण गाईगुरं आहेत. मला एकदम यारा दिलदारा आठवला. रम्य तो ९०ज चा काळ! ). गाणं संपवून तो घरी येतो, मग खेरबाबाचं रागावणं, विकासचं आत्महत्येचं नाटक वगैरे वगैरे. सारांश हा की विकास मार खाण्यापासून वाचतो. खेरबाबाचा मुन्शी ( याला हा कंजूस खेरबाबा पगार तरी देत असतो का? ) त्याला म्हणतो की माझ्या हरियाणातून आलेल्या भाच्याला कॉलेजमधे अ‍ॅडमिशन हवी आहे तर प्लीज त्याच्यासाठी शब्द टाकता का?

एंटर आपला दुसरा हिरो सुनील उर्फ सुनील शेट्टी! हा स्वप्नात पण मारामारी करत असतो. या गरम डोक्यापायी त्याची हरियाणातल्या सगळ्या कॉलेजेसमधून हकालपट्टी झालेली असते. सुनीलचा ताऊ त्याला शपथ घालतो की इथे मुंबईत ( लिस्या मधे मुंबई पण आहे?? ) मारामारी करायची नाही. शिवाय सुनील बावळट दिसावा ( अजून? ) म्हणून त्याचे केस तेल लावून चप्प बसवून, त्याला तीट लावून, चष्मा लावून, सायकलवर बसवून ताऊ कॉलेजला पाठवतो. सुनील फक्त एक फाईल घेऊन कॉलेजला जातो. असं फाईल घेऊन कॉलेजात कोण जातं? जाताजाता सुनीलला दिसते ममता आणि तिची बंद पडलेली गाडी. मग जॅक नसणे, सुनीलने हातानेच गाडी उचलून धरणे आणि तिने टायर बदलणे वगैरे यथासांग पार पडतं. अर्थात सुनील विकासच्याच कॉलेजला जातो. मग रॅगिंग. बाकी फुटकळ पारंपारिक रॅगिंग करून झाल्यावर नेहमीचा फायनल राऊंड म्हणून ते त्याला ममताची फिगर विचारायला पाठवतात. हेतू हा की ती याला कुटेल. ती यांच्या ग्रूपमधे असल्याचा अजून तरी काही पुरावा मिळाला नाहीये. पण आपण ते गृहीत धरायचं. पण पोरगी असते या मानवी जॅकवर इंप्रेस्ड! त्यामुळे ती त्याच्या हातावर फिगर लिहीते ( पण मी इथे ते आकडे लिहीत नाही. उगाच गोष्टी भलत्याच वळणाला जायच्या! ). नंतरही कँटीनमधे विकास आणि गँगचे रॅगिंगचे प्रयत्न ममता हाणून पाडते. मग गाणं हवंच. पुन्हा एकदा 'बिन तेरे सनम' ची आठवण अपरिहार्य होती. गाण्यात गवत, तंबू, कॅम्पफायर असे सगळे आयटम आहेत. वर पुन्हा स्वप्नरंजन - त्यात मजनूच्या रोल मधे असल्याने मळके, फाटके कपडे घातलेला सुनील. मागे चक्क वाळवंटाचं चित्र आहे. स्वप्नं पण गॅदरिंगटाइप पाहतात हे!

रॅगिंग चालूच राहतं. पण ताऊच्या शपथेमुळे सुनील मारामारी करत नसतो. ममता वैतागते आणि सुनीलला बांगड्या देते. सुनीलच्या हातात बांगड्या चांगल्या दिसणार नाहीत म्हणून तो ताऊकडून एका फाईट पुरती परवानगी घेतो - ते ही समोरच्याने आधी उचकवलं तरच. सुनील एकदम टकाटक गॉगल बिगल घालून ( फाईल न घेताच ) कॉलेजला जातो. विकासला उचकवतो. पण विकास काही केल्या त्याचं रॅगिंग करत नाही. असं दोन-चारदा होतं. फायनली स्टोरी पुढे जात नाहीये असं बघून विकास सुनीलची सायकल मोडतो आणि दोघंही अत्यानंदाने आरोळी मारून मारामारीला सुरूवात करतात. विकासच्या आयुष्यात टोपीचं काहीतरी अनन्यसाधारण महत्त्व असावं. तो स्वतः टोपी घालून मारामारी करतोच, पण फेअर फाईट असावी म्हणून बहुधा सुनीलला पण एक टोपी देतो. खूप ठिकाणी जाऊन मारामारी केल्यावर एका पॉईंटला अर्धवट बांधलेल्या बिल्डींगवर मारामारी करतात, विकास पडतो, सुनील त्याला वाचवतो. लगेच दोस्ती! आता डबल्स वालं गाणं पण हवंच! त्यात मग प्रत्येक कडव्यात पोरींचे एकमेकींना आणि पोरांचे एकमेकांना मॅचिंग कपडे असायलाच हवेत. एकदम टिपिकल ९०ज च्या फॅशन्स. क्रेपच्या झिरमिळ्यांची उधळण. मागे उगाच नाचणार्‍या पोरापोरींचा जथ्था ( त्यातल्या एका मुलीचा ड्रेस आधीच्या गाण्यातल्या ममताच्या ड्रेसमधल्या उरलेल्या कापडाचा बनवला आहे असा मला संशय आहे ). अरे त्या चिकाराला विसरले की काय सगळे खरंच? हा नाच चालू असताना मुलींचा बाप बघतो. आता तो गाडीतून उतरून पोरींना दोन-दोन रट्टे मारून गाडीत घालून घरी घेऊन जाईल असं माझ्या ममव मनाला वाटलं. पण तसं होत नाही. तो एकटाच घरी जातो.

मनकवडे असल्यागत पिक्चरवाले आता चिकाराचा अड्डा दाखवतात. चिकाराची माणसं एका माणसाच्या तोंडाला काळं कापड बांधून आणतात. कापडाखालून सँबो निघतो. त्याचे बाबा म्हणे कुठल्याश्या रिसर्च सेंटर मधे कामाला असतात आणि त्याला रिसर्च सेंटरचा चप्पा चप्पा माहिती असतो. का? लहानपणापासून खेळायला जात होता का तिथे? खोकला झालेला कावळा रिटर्न्स. चिकारावर फोकस. चिक्या त्याला सांगतो की मी साम्राज्य नसलेला सम्राट आहे. पण नेताजी रामगोपाल वर्मा मेल्यावर मी या देशावर राज्य करेन! का का का? देश या एकट्या नेत्याच्या जीवावर चालतोय असं सांगितलंय का त्याला कोणी? बहुतेक चिकाराला नुसताच रामगोपाल वर्मा अपेक्षित असावा. पुढे जाऊन त्याने 'रामगोपाल वर्मा की आग' काढू नये म्हणून सारा खटाटोप! पण हे साम्राज्य मिळवायला त्याला क्रिप्टन बाँब पहिजे. आणि हे क्रिप्टन आणि बाँब बनवण्याचा फॉर्म्युला दोन्ही त्या रिसर्च सेंटर मधे असतं म्हणे. रिसर्च सेंटर आहे की डिपार्टमेंटल स्टोर? सँबो म्हणतो मी नकाशा देतो पण तिथे खूप कडक सिक्युरिटी असते. चिकारा रात्री रिसर्च सेंटरला खरेदीला जाणं नक्की करतो.

इकडे टिकू दोन्ही मुलींना उजवायच्या विचाराने पहिल्यांदा खेरबाबाला भेटायला जातो. आयेशाचं लग्न विकासशी लावून देण्यासाठी प्रपोजल मांडतो. खेरबाबा त्याच्या हातात एक फाईल देतो ( या पिक्चरमधे कोणालातरी फाईल्स खूप आवडत असल्या पाहिजेत ) त्यात त्याने आत्तापर्यंत विकासवर जो खर्च केला आहे त्याची बैजवार यादी असते. तेवढा द्या आणि विकास तुमचा असं त्याचं मत. झालं! रिश्ता पक्का होतो. आता टिकू ममताला सुनीलचा पत्ता विचारतो. ती म्हणते तुम्ही कष्ट घेउ नका, मी त्याला इकडेच बोलावलं आहे. सुनील त्याची वर्ल्डफेमस फाईल घेऊन येतो. आधी टिकूला वाटतं त्याने पण यादी आणली आहे. पण तसं नसतं ( अर्थात! फाईल रिकामीच असणार!! ). पण मग त्याला कळतं की तो मुन्शीचा भाचा आहे वगैरे. मग त्याला आठवतं की आपला खडूस बापाचा रोल वठवायचं राहिलं आहे. तो सुनीलला अट घालतो की सहा महिन्यांच्या आत स्वतःच्या कमाईतून एक घर घेऊन दाखव, मग देईन लग्नाला परवानगी. हे असं बरोबर नाही, एकाला एक नियम दुसर्‍याला वेगळा! सुनील म्हणतो 'चॅलेंज अ‍ॅक्सेप्टेड!'

---------------------------------------------------------------------

रात्री चिकारा चिक्कार माणसं ट्रकमधे भरून रिसर्च सेंटरला जातो. सेंटरला जबरदस्त सिक्युरिटी म्हणून ४ मिलिटरी सदृश दिसणारी माणसं बंद गेटबाहेर गस्त घालत असतात. खोकरा कावळा पुन्हा एकदा ओरडायला लागतो. चिकारा काय त्याला टोपीखाली बाळगत असतो की काय? चिकारा लांबूनच चौघांना आरामात गोळ्या घालतो. आत्तापर्यंत बंद वाटणारं गेट उघडंच असतं असं आपल्या लक्षात येतं. चिकारा आणि कं. गोळ्यांचा वर्षाव करत निवांत आत घुसते. आत ४-५ शास्त्रज्ञ लगबगीने जमा होतात. चिकारा त्यांना आपली मागणी सांगतो. अर्थात ते नकार देतात. मग चिकारा टपाटप एकेका शास्त्रद्याला गोळी मारतो आणि गोळी लागायच्या आधीच वेडीवाकडी तोंडं करत ते टपकतात. राहिलेला शास्त्रज्ञ क्रिप्टन आणि फॉर्म्युला द्यायला तयार होतो. मग तो एका दाराशी जातो. दाराबाहेर चक्क एक कॅल्क्युलेटर लावलेला असतो (फंडिंग कमी पडलं असावं). आपल्याला पॅनलवर रूट, एम+ वगैरे सारख्या गोष्टी नीट दिसतात. शास्त्रज्ञ त्यात आपलं कार्ड घालतो, नंबर टाकतो आणि दार उघडतं. मग खोलीतला मेटलचा गोळा आपोआप उघडतो आणि आतून बाहेर येते क्रिप्टनची फ्लोरोसंट बाटली! Lol अरे तो क्रिप्टन इनर्ट गॅस आहे! तो वॉटरबॅगमधे भरून त्यापासून बाँब कसा बनवणार असतात? त्यापासून फारतर काही ट्यूब्ज वगैरे बनू शकतील. पण चिकारा या सगळ्याच्या पलिकडे आहे. हा सो कॉल्ड रेडिओअ‍ॅक्टिव क्रिप्टन एका बॅगपॅक मधे ठेवला जातो ( मग इतका वेळ या लोकांनी त्याला त्या मेटलच्या गोळ्यात कशाला ठेवला होता? ) शास्त्रज्ञ त्याला फॉर्म्युला लिहीलेला बटर पेपर पण देतो. त्याच्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाल्याने चिकारा त्यालाही मारून टाकतो आणि सगळ्यांना वेगवेगळे निघून हेडक्वार्टरला भेटायला सांगतो.

सगळीकडे पोलिसांचे चेकनाके लागतात. ज्या क्रिप्टनसाठी इतकी यातायात केली तो चिकाराने कॅज्युअली सँबो आणि अजून एका आपल्या माणसाकडे दिलेला असतो. आता या माणसाचा युनिफॉर्म पाहून वास्तविक पोलिसांना एरवीच संशय येईल. पण त्याचं चिकाराला काय? सँबोच्या गाडीच्या पुढेच विकास आणि सुनील ओपन जीपमधून चाललेत. विकास त्याला सांगत असतो की तू मला किडनॅप करून माझ्या बापाकडून पैसे घे म्हणजे तुझा प्रॉब्लेम सुटेल. यांच्या या गप्पा सँबोला अगदी नीट ऐकू येत असतात. चेकपोस्टला असतो नेमका विजू खोटे. तो विकास-सुनीलला ओळखतो हे पाहून सँबो क्रिप्टनची बॅग ( ही खरंच लहान मुलांची TMNT ची बॅग आहे! ) यांच्या जीपमधे टाकतो. ही विकासला सापडली तर वगैरे असले विचार कोणाच्याही डोक्यात येत नाहीत. विकास घरी पोचल्यावर त्याचा नोकर जीपमधल्या सग्गळ्या गोष्टी घरात नेताना धडपडतो आणि क्रिप्टन अलगद बॅगमधून बाहेर येऊन बहुधा खुर्चीखाली वगैरे जातो. अरे तुटक्या चेनची बॅग होती का काय? कोणाला जबाबदारीची कसली जाणीव म्हणून नाहीच! सँबोबरोबर जो माणूस असतो तो म्हणे कमांडो असतो. या रँक कशा ठरवल्यात ते पहायला हवं. तो क्रिप्टन विकासच्या घरी गेल्याची खुशखबर चिकाराला देतो. चिडलेल्या चिक्याला सँबो सांगतो की मालक, तो आपल्या वळखीचा मानूस हाय. वेळवखत पाहून आन्तो की क्रिप्टन त्याच्या जीपमधून. जसा काही लपवलाच होता याने क्रिप्टन जीपमधे!

इतका सिरीअस प्लॉट आपल्याला झेपणार नाही या विचाराने बहुधा पिक्चरवाल्यांनी मधेच विकासचे मित्र खेरबाबाला फसवून १०,००० रूपये कसे उकळतात असा एक सिक्वेन्स घातला आहे. अरे यार, १०,००० च्या खाली कोणी बोलतच नाही या पिक्चरमधे! मग पार्टी म्हणून कुठल्याश्या वस्तीत ढोल ताशे वाजवत, कसलीशी पांढरी भुकटी उधळत आणि कसलासा पांढरा द्रवपदार्थ गटकत गाणं सुरू होतं. बरं, तो पांढरा द्रव घशात कमी आणि बाहेरच जास्त सांडतो. मला संशय आहे की भांग म्हणून यांना ती पांढरी भुकटीच अश्वत्थामा स्टाईल पाण्यात मिसळून दिली असणार. ही मधेच रंगपंचमी आली की शिवरात्र हे काही मला समजलं नाही.

गाणं झाल्यावर हिरो, हिरवीणी आणि फ्रेंड्स विकासच्या किडनॅपिंगचा प्लॅन पक्का करत असतात. दुसर्‍या दिवशी आयेशाच्या वाढदिवसाची पार्टी असते तर त्या पार्टीतूनच त्यांच्या मित्रांनी विकासला पळवावं असं ठरतं. इथे पुन्हा रेस्टॉरंटबाहेर गाडी उभी करून सँबो यांचं सगळं सगळं बोलणं ऐकत असतो. सँबो आहे की डेडली आत्या ?

आयेशाच्या पार्टीसाठी सगळे गेलेत हा चान्स साधून सँबो विकासच्या घरात क्रिप्टन शोधायला घुसतो ( हा जीपमधे शोधणार होता ना? ). अर्थातच त्याला रिकामी बॅग मिळते. इकडे विकासचं किडनॅपिंग होतं. आपल्यासोबत विकास आयेशाला पण घेऊन जातो. नेहमीप्रमाणेच यांना मित्रांनी नव्हे तर सँबो आणि कमांडोने किडनॅप केलेलं असतं.

सगळी पालक मंडळी काळजीत असताना इकडे हा ९०ज चा पिक्चर आहे याचं भान ठेवून सॅंबो उघड्या विकासचे हात बांधून त्याला लटकवतो आणि फटकवतो आणि विचारतो की क्रिप्टन कुठाय? अर्थात त्याला माहिती नसतं त्यामुळे आता विकासला अजून मारावं की आयेशाला या संभ्रमात सँबो पडतो. मग तिथे एका हाताला सोनेरी मोजा घातलेला एक गणवेषधारी येतो आणि म्हणतो की या दोघांना कर्नलसाबकी दरबार में पेश करायचंय. सँबो त्याला म्हणतो थांब, मी सुनीलला पण घेऊन येतो. कशाला? पार्टी करायची आहे का? विकास-आयेशाला चिक्याच्या खुफिया पॅलेसमधे नेतात. इतका मार खाऊनही विकास टवटवीत दिसत असतो. या असल्या माणसाच्या जीपमधे क्रिप्टन टाकल्याबद्दल चिकारा त्या कमांडो नामक माणसाला देहदंड सुनावतो. तो सोनेरी मोजेवाला पुढे येतो आणि मोज्याच्या हाताने कमांडोचं डोकं दाबतो. आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. तो मेटलचा हात आहे असं दाखवायचं आहे यांना! अरे त्या मोज्याला सुरकुत्या पडताहेत त्यांचं तरी भान ठेवायचं!! सोनेरी मोज्याच्या मसाजमुळे कमांडो मरून जातो.

जीवावर उदार सँबो सुनीलला घेऊन यायला जातो. जाऊन त्याला विचारतो की क्रिप्टन कुठाय? वर पुन्हा त्याला हेही सांगतो की विकास-आयेशा उनके कब्जेमें आहेत. मग दोघं फायटिंग फायटिंग खेळतात. खेळून झाल्यावर सुनील सँबोला म्हणतो मी क्रिप्टन शोधून आणतो, पण या दोघांना काही नाही झालं पाहिजे. सँबो त्याला दुसर्‍या दिवशी ५ वाजता पुणे हायवेवर क्रिप्टनसह भेटायला सांगतो. सुनील विकासच्या घरी जाऊन शोधाशोध करतो. खेरबाबाकडच्या कबाडमुळे त्यांना आधी काही सापडत नाही. मग सुनीलच्या डोक्यातला क्रिप्टन पेटतो आणि तो सांगतो लाईट बंद करा म्हणजे क्रिप्टन सापडेल. पहा! वाटलं होतं का सुनील इतका हुशार असतो असं? अंधार झाल्यावर क्रिप्टन दिसतो. सगळ्यांच्या चेहर्‍यावरचं कौतुकही क्रमाक्रमाने दिसतं. आता पोलिसांपासून वाचवून क्रिप्टन न्यायचा कसा?

खेरबाबा कुत्रे पकडणारी गाडी (कुत्र्यांसकट) घेऊन सुनील-ममता सह क्रिप्टन पोचवायला निघतो. बरं हे दोघे निदान दिसतात तरी कुत्रे पकडणारे, ममताचं काय? पण पोलिस त्यांच्याहून येडे असल्याने त्यांनी वेडपटासारखी दिलेली उत्तरं ऐकून माना डोलावतात आणि गाडी सोडतात. आता एक चेकपोस्ट झाली म्हणजे पोलिसांचा धोका टळला, हो किनई? तेवढ्यात सुनीलला कोणाची तरी मोटरसायकल दिसते. तो खेरबाबाला म्हणतो आम्ही ही मोसा घेऊन जातो, तू टिकूला घेऊन तिकडेच ये! तिकडे म्हणजे कुठे? चिक्याच्या अड्ड्याचा पत्ता यांनाही माहिती नाही! आणि अशी कोणाचीही मोसा चोरून का न्यायची? पण हे प्रश्न खेरला पण पडत नाहीत. मग हे दोघे मुंबईहून व्हाया उटी पुणे हायवेला जातात. जाताना स्वप्नात गाणं म्हणत जातात आणि गाणं संपल्यावर सँबोला भेटतात.

लहान मुलांना नकाशा काढून त्यात रंग भरायला दिल्यावर जे तयार होईल तसा नकाशा समोर ठेवून चिक्या ऑफिसात टिव्ही पहात बसलेला असतो. कावळा पुन्हा खोकायला लागतो. बाकी कोणालाही मारण्याआधी या कावळ्याला पकडून हाणावं असे हिंस्त्र विचार माझ्या डोक्यात यायला लागतात. टिव्हीवर दाखवतात की नेता रामगोपाल वर्मा आलोका भवनची सभा कॅन्सल करायला तयार नाही. ही देशाचे प्रॉब्लेम्स सोडवायला घेतली जाणारी सभा असते म्हणे. ते न आवडल्याने चिकारा त्याला आलोका भवनमधेच मारायचं ठरवतो. तेवढ्यात सुनील - ममता ला घेऊन सँबो येतो. सुनील चिक्याच्या हातात क्रिप्टनवाली बॅग देतो. अख्ख्या पिक्चरमधे पहिल्यांदा चिकाराच्या चेहर्‍यावरचा मख्खपणा जाऊन साधारणपणे ज्याला हसू म्हणता येईल असं काहीतरी दिसतं. चिकारा बाँबमधे फिट करण्याकरता क्रिप्टन त्याच्याकडच्या प्रोफेसर(!) कडे देतो. बाँबमधे सुद्धा एक कॅल्क्युलेटर फिट केलेला असतो. त्या ओरिजिनल रिसर्च लॅबची ही काहीतरी ठरलेली प्रोसेस असावी. तसंच क्रिप्टनच्या बाटलीच्या आकाराची रिंग आणि सॉकेट आधीच तयार असतं. हा क्रिप्टन काहीतरी स्टँडर्ड साईजमधे मिळत असणार. क्रिप्टन त्यात फिट केल्यावर त्यावेळच्या मोडेम मधून यायचे तसले आवाज यायला लागतात, बाँबवर लावलेले दिवे ब्लिंक व्हायला लागतात ( बाँबवरचे दिवे लुकलुकणं हे ८०ज/९०ज मधल्या पिक्चर्सचं व्यवच्छेदक लक्षण आहे ). थोडक्यात बाँब तयार होतो.

चिक्याच्या तुरूंगात आता दोनाचे चार होतात. म्हणजे विकास - आयेशा बरोबरच आता सुनील - ममता पण त्या तुरूंगात जातात. आता त्यांना जाणीव होते की चिकारा देशविघातक कृत्य करणार आहे. इथे सुनील म्हणतो , मी माझ्या डोळ्यांनी त्याला दोन बाँब बनवताना पाहिलं. हे माझ्या डोळ्यांना का दिसलं नाही याचा मी अजूनही विचार करतेय. शिवाय एका क्रिप्टनच्या बाटलीत किती बाँब बनणार?

इकडे चिक्याचे विदेशी मेहमान इंडियात येणार असतात ( अरे हे लिस्या मधे होते ना? हे ही विसरले?? ). पण त्यांना म्हणे रिसीव्ह करायला पोलिस रेकॉर्ड नसलेली माणसं हवी असतात जेणेकरून त्यांच्यावर रागोवला मारण्याचा संशय येणार नाही. आलोका भवनमधे ऑलरेडी बाँब फिट केलेला असतो. रिसीव्हर म्हणून सुनील-विकासला पाठवायचं ठरतं. पोरी यांच्या ताब्यात असल्यावर काय बिशाद ते काम करणार नाहीत? पण हे दोघे फॉरेनर्सना पोलिसांच्या ताब्यात देऊन नकली फॉरेनर्स चिक्याच्या गळ्यात मारायचं ठरवतात. एंटर मायकेल जॅक्सनसारख्या केसातला अनुपम खेर (त्याचे कपडे मात्र बँडवाल्याचे आहेत) विथ स्कर्ट्ब्लाऊज घातलेली बायको अरूणा इराणी आणि हॅट घातलेला, मस लावलेला टिकू. हे फॉरेनर्स आहेत यावर काळ्या कुत्र्याचा तरी विश्वास बसेल का? पण चिकारा आणि त्याच्या माणसांचा बसतो. खेर असंबद्ध बोलत असतो आणि वाक्यावाक्याला 'बीट इट' म्हणतो. याचं भाषांतर टिकू करत असतो. भाषांतराचा गोषवारा असा की ती पाठवलेली मुलं गद्दार होती आणि या फॉरेनर्सनी त्यांना मारून टाकलं आहे.

यानंतर 'नृत्यगायनादि कलांचा भोक्ता' परंपरा चालू रहावी म्हणून चिकाराकडे डान्स आयटम आयोजित केलेला असतो. ज्यात महेश आनंद सुद्धा नाचतो ( याकरता घेतलंय तर याला पिक्चरमधे! ) . आयटम गर्ल्स अर्थात आयेशा आणि ममता. इन्स्पिरेशन 'गजर ने किया है इशारा' चं. यांच्या परफेक्ट मापाचे कपडे कोण कधी कसे शिवून आणतं हा प्रश्न पाडून घ्यायचं मी आता सोडून दिलं आहे. गाणं चालू असताना सुनील - विकास पोलिसांचा ताफा घेऊन चिक्याच्या पॅलेसला वेढा घालतात. मग टिकूला आठवतं की आज आलोका भवनमधे सगळ्या नेत्यांची सभा आहे म्हणून तो कोणालाही न दिसता निसटतो. मधेच खेरबाबाला नाचायची हुक्की येते. नाचता नाचता त्याचा विग निघून येतो. पण तोवर सुनील - विकास आत येऊन मारामारी करायला लागलेले असतात. मौकेका फायदा घेऊन चिकारा आणि महेश आनंद पण निसटतात. आता यांनी बाँब लावलाय ना तिकडे? मग स्वतः जायची काही गरज? मारामारीत पॅलेसमधे असलेली चिक्याची माणसं गारद होतात. सोनेरी मोजावाल्याचा हात मेटलचाच आहे हे आपल्याला पटवण्यासाठी सुनील त्याचा हात चालू दिवा फोडून त्याच्या सॉकेट्मधे घालतो. सोनेरी मोज्याभोवती विजेची निळी रेघ दिसते आणि तो खाली पडतो.

सगळे नेते सभेसाठी जमतात. टिकूही येतो. मला वाटलं तो रागोवला किंवा इतर नेत्यांना किंवा निदान पोलिसांना तरी बाँबबद्दल सांगेल. पण तो रागोवचं स्वागत करून त्याला आत न्यायला लागतो. मगाशी त्याला चिक्याच्या पॅलेसमधे कशाला नेलं होतं त्याला माहिती तरी होतं का? का विसरलाच? तेवढ्यात तिथे सुनील - विकास पोचतात आणि रागोवला बाँबबद्दल सांगतात. ते ऐकून टिकू सरप्राईज वगैरे होतो! रागोव सभा कॅन्सल करून निघतो आणि तेवढ्यात मागे बाँबस्फोट होतो. एवढा क्रिप्टॉन बाँब होता बरं का, पण कोणाला साधं खरचटत सुद्धा नाही. और तो और, सुनील आणि विकास छान मागे वळून डोळे भरून तो स्फोट पाहून घेतात. ही अशी माणसं असतील तर ती काय मिरवणुकीतल्या लेसरला घाबरणार?

पोरं रागोवला घेऊन पोलिस हेडक्वॉर्टरला जातात. तर ते आधीच चिक्याने कॅप्चर केलेलं असतं. च्यामारी, पॅलेसमधे इतकी माणसं मारली याची तरी ही अजून कुठून आली? या घमासान मारामारीत इतके स्फोट आणि इतक्या गाड्या उडवल्यात की क्षणभर मला हा रोहित शेट्टीचा पिक्चर असावा असं वाटलं. सुनील - विकास रागोवला वाचवतात आणि एका बंद पडलेल्या मिलमधे लपवतात. पण चिक्या त्यांना बरोब्बर शोधून काढतो. लब्बाड! मग पुन्हा मारामारी, गोळ्यांच्या फैरी, धोतर सावरत लपत पळणारा रागोव वगैरे. फायनली चिक्याची राहिलेली माणसं पण मरतात. सुनील - विकास चिकाराला भरपूर धोपटून अर्धमेला करतात. तेवढ्यात पिक्चरमधली उरलेली समस्त पात्रं येतात. खेरने दिवार मधला अमिताभचा कॉश्च्युम त्याच्या बिल्ल्यासकट घातलेला असतो. तो पाहून मला पुढे काय घडणार याचा साधारण अंदाज आला आणि तस्संच घडलं. चिक्या पडल्या पडल्या रागोववर गोळी झाडतो आणि खेर मधे येतो. हे पाहून विकास तलवारीने चिक्याचं डोकं उडवतो ( होपफुली याबरोबरच त्या खोकला झालेल्या कावळ्याचा पण निकाल लागला असेल ) आणि चिक्याचा सरकटा बनतो. पण बिल्ल्यामुळे खेर वाचलेला असतो. आनंदीआनंद होतो. मग वक्त तुम्हारा है का हमारा है यावर एक चर्चा होते आणि असं ठरतं की नेताजी जिवंत राहिल्याने हा देश वाचलाय ( कसा काय? मला प्लीज सांगा कोणीतरी. ) त्यामुळे वक्त हमाराच है!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे सुनील म्हणतो , मी माझ्या डोळ्यांनी त्याला दोन बाँब बनवताना पाहिलं. हे माझ्या डोळ्यांना का दिसलं नाही याचा मी अजूनही विचार करतेय.
<<<<<< OMG!!! हिंदी सिनेमाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडले आहे. हा दिवस सुवर्णाच्या अक्षरांत आणि तिचं अक्षर चांगलं नसेल तर सोन्याच्या किंवा गोल्डन कलर फॉन्ट वापरून लॅपटॉपवर लिहून ठेवणे आवश्यक आहे.

आपले ज्येष्ठ अ नि अ समीक्षक श्री श्री श्री फारएन्ड यांनी अनेकवार उद्धृत केले आहे, त्यानुसार सहसा जेवढे दृश्य पडद्यावर प्रेक्षकाला दिसते तेवढेच फ्रेममधल्या इतर जनतेला दिसते. त्यामुळेच 'तिरंगा' मध्ये धूर कमी झाल्यावर गेंडास्वामीला ब्रिगेडियर दिसतो पण त्याच्या हातातले फ्युज कंडक्टर्स दिसत नाहीत.

येथेच 'वक्त हमारा है' बाकी सिनेमांना मागे टाकत पुढे निघून गेला आहे असे दिसते. इथे फ्रेममधल्या सुनीलला प्रेक्षकांपेक्षा जास्त गोष्टी दिसत आहेत व त्याचाच त्याने आपल्या संवादात उल्लेख केला आहे.

'वाऱ्यावरची वरात'मधला तो 'अमेरिकेत शेक्सपिअर'वाला प्रसंग आठवला.

रमड - एकच बॉम्ब बनला आहे....
सुनील - दोन बॉम्ब बनले आहेत. मी या डोळ्यांनी पाहिलं आहे.

rmd,
अफाट भारी लिहिलं आहे. हसून हसून मेलो.
खरं तर याच नाव लक्षात नव्हत, पण शीर्षकात क्रिप्टन लिहिल्याने मी हा मनोभावे पाहिलाय हे आठवलं.
पुन्हा पाहिला.
कावळ्याचा खोकला>>> Lol हाच खर तर या पिकचरचा प्राण आहे. सतत तो कलकारी (कावळ्याची ललकारी) देत असतो.
चिकाराचे कपडे>>>>>बँड वाले पण बरे. कॉलरची सोनेरी एम्ब्रोडरी सुमार दर्जाची.
विकास निवांत आयेशाबरोबर गाणी म्हणत उधळलेला असतो ( या गाण्याच्या शेवटी पण गाईगुरं आहेत.) >>>>>बदकं पण आहेत.
गाण्याचे बोल पण भारी
कच्ची कली कचनार की तोडी नाही जाती...(तूनळीवर subtitle: One should not pluck the tender bud) Lol

सुशे आणि अक्षय ची फायटिंग तेव्हा पण आवडली होती.
त्यात सुशेच्या शर्टाच्या कपड्याच ठिगळ जीन्सच्या एका बाहीला लावलय आणि त्यावर व्याघ्रांबराचे ठिगळ लावलय. अचाट फॅशन...
क्रिप्टनची चोरी तर अफलातून आहे. सिक्युरिटी तर काय वर्णावी. सगळ्यात कहर म्हणजे लाल घोटीव कागदाची बॉर्डर लावलेले कॅल्क्युलेटर दाराला लावले आहे Lol
आणि क्रिप्टन फॉर्मुलापण शाळेत कव्हर घालायला पेपर आणायचो तशी गुंडाळी करून आणलेला असतो....धमाल.
क्रिप्टन बॉम्ब चोरून कशात ठेवतात तर Turtles cartoon च्या बॅगेत. सायंटिस्ट ने चुकून त्या दिवशी आपल्या पोराची बॅग हापिसात नेली असणार.
नंतर सगळी नव्वदीतल्या सिनेमासारखी मजा आहे.
हे फॉरेनर्स आहेत यावर काळ्या कुत्र्याचा तरी विश्वास बसेल का? >>>>>>. Lol शास्त्र असतं ते.
सुनील आणि विकास छान मागे वळून डोळे भरून तो स्फोट पाहून घेतात.>>>>>> त्यांचे चेहऱ्यावरील भाव टडोपा होते.
खूप हसवले रमड. धन्यवाद

कच्ची कली कचनार की तोडी नाही जाती >>> ओह्ह हे गाणे यातले आहे का? मला बरेच वर्षं प्रश्न पडून राहिलाय की 'कचनार' म्हणजे काय.

अरे काय हे.
ह्हपुवा आहे हे प्रकरण

ममता च्या हातात नव्या कोर्‍या वह्या आहेत.
बहुदा नाडियादवाला कुटुंब कॉलेजात वगैरे गेले नसावे. एखाद्या ममव मराठी लेखकाने कादंबरी नायकाला फाईव्ह स्टार हॉटेलात पाठवावे व नायकाने ऐटीत कोथिंबीर वडी आणी केळीच्या शिकरणाची ऑर्डर द्यावी तसे काहीसे. त्यांच्याच आंदोलन सिनेमात संजय दत्त, व ममता कॉलेज विद्यार्थी आहेत व संजय दत्त ममताला 'इंजिनियरिंग के नोट्स' मागतो.

धन्यवाद सगळ्यांना Happy

बग आला तर कोण रिझॉल्व करणार? >>> Lol माझेमन, त्याच्याकडे एक कोणी प्रोफेसर असतो. त्याच्यावर भलताच विश्वास असावा चिकाराचा.
दिल्लीचे प्रॉब्लेम कुठल्याश्या स्टेडिअमवर सभा घेऊन का सोडवतात. विधानसभा, संसद वगैरे सगळं झूठ आहे >>> Lol

चिकाराला बघूनच थानोसची कल्पना >>> Proud मला त्या सोनेरी मोजेवाल्याकडे पाहून थॅनोस आठवत होता.

हा दिवस सुवर्णाच्या अक्षरांत आणि तिचं अक्षर चांगलं नसेल तर सोन्याच्या किंवा गोल्डन कलर फॉन्ट वापरून लॅपटॉपवर लिहून ठेवणे आवश्यक
>>> Rofl
वाऱ्यावरची वरात'मधला तो 'अमेरिकेत शेक्सपिअर'वाला प्रसंग आठवला.
रमड - एकच बॉम्ब बनला आहे....
सुनील - दोन बॉम्ब बनले आहेत. मी या डोळ्यांनी पाहिलं आहे.
>>> Lol श्र, परफेक्ट नियम आठवला आहे. हा पिक्चर क्रांतिकारक म्हणून घोषित करण्यात यावा!

कलकारी (कावळ्याची ललकारी)
व्याघ्रांबराचे ठिगळ
लाल घोटीव कागदाची बॉर्डर लावलेले कॅल्क्युलेटर
>>> ऋतुराज Lol

ममता च्या हातात नव्या कोर्‍या वह्या आहेत
बहुदा नाडियादवाला कुटुंब कॉलेजात वगैरे गेले नसावे.
>>> साजिद नाडियादवाला सीए आहे म्हणे. सीए करायला कॉलेजात जावं लागत नसल्यामुळे त्याला कल्पना नसणार Wink

जाताना स्वप्नात गाणं म्हणत जातात
>>>
हे खूप भारी होते .. एवढ्या भयानक गंभीर सिच्युएशन मध्ये सुद्धा गाणे म्हणतात Proud

दुसरा भाग अर्धाच वाचला आहे. बाकीचा वाचतो नंतर. पहिल्या भागापेक्षाही धमाल जमला आहे.

जबरदस्त सिक्युरिटी म्हणून ४ मिलिटरी सदृश दिसणारी माणसं >>
अरे तो क्रिप्टन इनर्ट गॅस आहे! तो वॉटरबॅगमधे भरून त्यापासून बाँब कसा बनवणार असतात? >>
मग इतका वेळ या लोकांनी त्याला त्या मेटलच्या गोळ्यात कशाला ठेवला होता? >>>
अरे त्या मोज्याला सुरकुत्या पडताहेत त्यांचं तरी भान ठेवायचं!! >>>
सोनेरी मोज्याच्या मसाजमुळे कमांडो मरून जातो. >>> (हे सर्वात कहर आहे) Lol

सँबो आहे की डेडली आत्या ? >>> _/\_ Happy Happy

क्रिप्टन अलगद बॅगमधून बाहेर येऊन बहुधा खुर्चीखाली वगैरे जातो. >>> Lol हा सगळा सिक्वेन्सच सुपरलोल वाटतोय. "इनर्ट" म्हणजे किती असावे एखाद्याने? नुसता पिशवीत ठेवला तरी लाजाळू पाळीव प्राण्यासारखा सीटखाली जाउन बसतो. किंवा रूम्बा सारखा.

दाराबाहेर चक्क एक कॅल्क्युलेटर लावलेला असतो >>> Lol किमान तो "सायंटिफिक" मोड मधे तरी होता का? की बेसिक बेरीज वजाबाकी?

गोळी लागायच्या आधीच मरणारे शास्त्रज्ञ आईनस्टाइन ची थिअरी सिद्ध करतात. काळाला वळवून चौथ्या मितीमधे बागडून मरतात. एकूणच ९०ज मधे शास्त्रज्ञ हा सर्वात रिस्की प्रोफेशन असावा असे दिसते. जितके शास्त्रज्ञ मारले गेले आहेत तितके मास्टरजीही नसतील मारले गेले. आणि क्रिप्टन मिळाल्यावर पुढे त्याला शास्त्रज्ञांची गरज पडणार नव्हती का? की पुढचे सगळे तो स्वतःच एखादे आयकिया टाइप पॅम्फ्लेट वाचून बनवणार होता? की प्रत्येक स्टेजला वेगवेगळे शास्त्रज्ञ शोधून त्यांना मारणार!

आता प्रतिक्रिया वाचतो Happy

नुसता पिशवीत ठेवला तरी लाजाळू पाळीव प्राण्यासारखा सीटखाली जाउन बसतो. किंवा रूम्बा सारखा >>> Lol

किमान तो "सायंटिफिक" मोड मधे तरी होता का? >>> एवढं सायन्स कळत असतं तर काय पाहिजे होतं? Proud नाही म्हणायला रूट फंक्शन वगैरे होतं बर्का! Proud

९०ज मधे शास्त्रज्ञ हा सर्वात रिस्की प्रोफेशन असावा असे दिसते. जितके शास्त्रज्ञ मारले गेले आहेत तितके मास्टरजीही नसतील मारले गेले >>> Lol

प्रत्येक स्टेजला वेगवेगळे शास्त्रज्ञ शोधून त्यांना मारणार >>> हे असू शकतं. शहाजहान सारखं प्रत्येक काम झाल्यावर मारणार असेल. विस्तारभयास्तव सगळी डिटेल्स नाही लिहीलीत, पण शेवटी एका पॉईंटला फक्त तो आणि महेश आनंद उरलेले असतात आणि महेश त्याला म्हणतो की 'आपलं मिशन तर फेल झालं'. केवळ फेल्युअरबद्दल बोलला म्हणून चिक्या महेशला गोळी घालतो. हे असं असेल तर 'हा माझा मार्ग एकला' ला पर्याय नाही. बहुधा या कारणामुळेच तो साम्राज्य नसलेला सम्राट असतो Proud

दुसरा भाग लेजंडरी झाला आहे. चिक्याला रमडने माबोच्या अ नि अ इतिहासात अजरामर केले आहे. Happy

>> इथे सुनील म्हणतो , मी माझ्या डोळ्यांनी त्याला दोन बाँब बनवताना पाहिलं. हे माझ्या डोळ्यांना का दिसलं नाही याचा मी अजूनही विचार करतेय. >> रमड - एकच बॉम्ब बनला आहे.... सुनील - दोन बॉम्ब बनले आहेत. मी या डोळ्यांनी पाहिलं आहे. >> हे निरीक्षण आणि श्र ची टिप्पणी दोन्ही खास आहेत.

सँबो क्रिप्टनची बॅग, चिक्याचे कपडे आणि एकंदरीतच वावर, तो अ‍ॅक्चुअल क्रिप्टन बाँब (यापेक्षा जास्त धूर तर गेंडास्वामीचा निकामी झालेल्या मिसाईल्सने केला होता), चिक्याचा सरकटा, काय काय आणि किती कोट करायचं.

खेरबाबा कुत्रे पकडणारी गाडी (कुत्र्यांसकट) घेऊन सुनील-ममता सह क्रिप्टन पोचवायला निघतो. >> हा आणि अनुपम खेर मायकल जॅक्सन बनतो तो सगळा पार्ट कहर आहे.

त्याच्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाल्याने चिकारा त्यालाही मारून टाकतो >> चिकाराने मॅडम डॉनकडे शिकवणी लावायला हवी. बाँब बनवणार्‍या शास्त्रज्ञाला असं कधी मारायचं नसतं.

सोनेरी मोजा >> त्या सुरकुत्या सोडल्या तरी हा भाग अशक्य अतर्क्य आहे. हे तर सिद्ध केलंय की तो हात स्टील/मेटलचा आहे. मग दोन शक्यता असू शकतात.
१) संपूर्ण मोजा/नकली पंजा सोन्याचा आहे. तसं असेल तर त्या मसाज सीनमध्ये तो माणूस मरण्याऐवजी याचा हात डिफॉर्म होऊन निकामी होईल. तसे झालेले नाही म्हणजे,
२) पंजा गोल्डप्लेटेड आहे. चिक्याच्या गळाबंद युनिफॉर्ममुळे हा सिनेमाभर खूप घामेजलेला आहे. यामुळे त्याच्या गोल्डप्लेटेड पंज्यात गॅल्व्हानिक करोजन होईल (कारण घामातले क्षार इलेक्ट्रोलाईटचे कार्य करतील). याने त्या प्लेटिंग खालचे मटेरियल गंजून नुसताच वर्ख उरेल. तरीच गेंडास्वामी, मॅडम डॉन सारख्या सायन्स सॅव्ही व्हिलन्सच्या रांगेत स्थान मिळवण्यात चिक्या अयशस्वी ठरला.

गोल्डप्लेटेड पंज्यात गॅल्व्हानिक करोजन >>> अरारारा Rofl

ते सततचे तसले युनिफॉर्म आणि टोप्या घालून चिक्या आणि गँगचं जनरलच करोजन झालं असणार. तो खोकर्‍या कावळ्याचा आवाज पण करोजन झालेल्या पार्टसमधून निघत असावा Lol

इम्ह्या, व्हॉल्ड्या आणि आता चिक्या....! (शाळेतले दोस्तच जणू!) >>> Rofl आता यांच्या जोडीला थॅन्या, गेंड्या वगैरे पण आणावेत असा एक विचार डोक्यात येऊन गेला आहे

गेंडास्वामी, मॅडम डॉन सारख्या सायन्स सॅव्ही व्हिलन्सच्या रांगेत स्थान मिळवण्यात चिक्या अयशस्वी ठरला.
<<<<< टोटली! मोगॅम्बोसुद्धा प्रचंड सायन्स सॅव्ही होता.
'इस रास्ते की सारी लाल लाईटे जला दो.. मुझे पता चल गया है की मिस्टर इंडिया लाल रोशनी मे दिखाई देता है..' हे अगदी काही सेकंदात फिगर आउट करतो तो. शिवाय त्याच्या मिसाईल्स तो स्वतःही ऑपरेट करू शकत असतो, त्यामुळे शेवटच्या मारामारीत तो कुठल्याही सायंटिस्टला आधी बोलवा, मग काम करून घ्या, अयशस्वी झाल्यास सायंटिस्टला मारा, मग स्वतःच रँडम बटने दाबून फुसकी मिसाईल्स आकाशात उडवायचा प्रयत्न करा वगैरे प्रकार न करता स्वतः आधी योग्य ते बटन दाबून मिसाईल्स सुरू करून टाकतो.

'हिंदी चित्रपटातील खतरनाक क्षेपणास्त्रे व स्फोटके' अशी एक anthology च करायला हवी.
पहिला मान अर्थातच तिरंगा मधल्या एक वृत्तचिती आणी एक शंकू ( दोघांचा व्यास समान हवा), धूर आणी फ्यूज कंडक्टर वापरून तयार केलेले व 'ईस्ट', 'वेस्ट' , 'साऊथ', व 'नोर्थ' लिहिलेले मिसाईल्स.

पण कंट्रोल पॅनेल साठी पहिला नंबर केवळ बिझिनेस कॅलक्युलेटर वापरून केलेला या सिनेमातला अ‍ॅक्सेस कंट्रोल, त्यानंतर लाल व हिरवे दिवे लूकलूकणारे तिरंगा मधले मिसाईल कंट्रोल, 'शान' मधली शाकाल समोरची लिफ्टमन टाईप्स बटने.

पहिला व दुसरा भाग मस्त जमले आहेत हे वे सां न

ईस्ट', 'वेस्ट' , 'साऊथ', व 'नोर्थ'
<<<<< चूक! तीनच मिसाईल्स असतात. साऊथ साठी नसते मिसाईल!

साऊथ साठी नसते मिसाईल!>>>>>
रंजनीकांतमुळे त्यांनी प्लॅन कँसल केला असेल, हातात धरून दिवाळीच्या रॉकेटसारखे परत फेकले कर काय घ्या Lol

Lol फारच धमाल लिहिले आहेस. लेख एक क्राफ्ट म्हणूनही फ्लॉलेस आणि ओघवता वाटला. एकदम चकाचक , खरेच. Happy
सुनील शेट्टीला तीट लावलीये वाचून माझा अंधश्रद्धेवरचा विश्वास उडाला. Lol

धन्यवाद सगळ्यांना! Happy

श्र : मोगॅम्बी टोटली ब्रिलियंट होता ग. त्याची चिक्याशी तुलना करणं चुकीचंच आहे. चिक्याच्या चेहर्‍यावर एक जो आजन्म मठ्ठ्पणा आहे तो पाहून त्याला का ही ही कळत असेल असं वाटत नाही.

पण कंट्रोल पॅनेल साठी पहिला नंबर केवळ बिझिनेस कॅलक्युलेटर वापरून केलेला या सिनेमातला अ‍ॅक्सेस कंट्रोल, त्यानंतर लाल व हिरवे दिवे लूकलूकणारे तिरंगा मधले मिसाईल कंट्रोल, 'शान' मधली शाकाल समोरची लिफ्टमन टाईप्स बटने. >>> Lol

चूक! तीनच मिसाईल्स असतात. साऊथ साठी नसते मिसाईल! >>> काय अभ्यास काय अभ्यास! Proud

रंजनीकांतमुळे त्यांनी प्लॅन कँसल केला असेल, हातात धरून दिवाळीच्या रॉकेटसारखे परत फेकले कर काय घ्या >>> Lol मनो'रंजनी' झाले हे वाचून. खरंच आवडलं.

सुनील शेट्टीला तीट लावलीये वाचून माझा अंधश्रद्धेवरचा विश्वास उडाला >>> Rofl

लेख एक क्राफ्ट म्हणूनही फ्लॉलेस आणि ओघवता वाटला. एकदम चकाचक >>> _/\_

सुनील शेट्टीला तीट लावलीये वाचून माझा अंधश्रद्धेवरचा विश्वास उडाला
<<< Lol

श्र : मोगॅम्बी टोटली ब्रिलियंट होता ग. त्याची चिक्याशी तुलना करणं चुकीचंच आहे.
<<<<<< ह्ये मातुर आक्षी बरुबर!

सुनील शेट्टीला तीट लावलीये वाचून माझा अंधश्रद्धेवरचा विश्वास उडाला >>> Proud मला या पिक्चरचे नाव ऐकून सुनील शेट्टीचा तोच लूक पहिल्यांदा आठवला Proud
पण त्याला खरे तर असेच सूट होते. त्याची डायलॉग डिलीव्हरी आणि फायटींग कधी ॲक्शन हिरो सारखी मला वाटलीच नाही. अंगापिंडाने मजबूत आहे आणि अभिनय करताना चेहऱ्यावरची माशी हलत नाही म्हणून ॲक्शन हिरो म्हणायचे.
अन्यथा गोपी किशन मधील गोपी किंवा तो प्रिया गिल सोबतचा लॉटरीवाला पिक्चर (बडे दिलवाला?) अश्या सरळ साध्या माणसाच्या भूमिकातच तो मला चांगला वाटला होता.

आंदोलन सिनेमात संजय दत्त, व ममता कॉलेज विद्यार्थी आहेत व संजय दत्त ममताला 'इंजिनियरिंग के नोट्स' मागतो>>> Lol विकु.. जसं की ईंजिनियरींग हा १ विषय आहे अभ्यासक्रमातला

अशक्य भारी रिव्ह्यु लिहिला आहेस रमड. तो चिंकारा कोण ह्या उत्सुकतेने मी रविवारी बघितला थोडासा. बराच वेळ चिंकारा ला काही कामच नाही त्यामुळे पळवत पळवत चिंकारा पार्ट बघितला. खरोखर त्याच्या चेहऱ्यावरची माशी देखील हलत नाही.

माझा ९ वर्षांचा मुलगा माझ्या बरोबर बघत होता. त्याने मला विचारले, "आई, this guy is their friend or enemy?" त्याला हिंदी येत नाही. चिकार्याच्या न अभिनयाने त्याला गोंधळात टाकले. मग त्याला सांगितले. मग टीव्ही बंद केल्यावर तो म्हणाला, "आई, more than half of the movie is finished but they haven't told us he is colonel in which country's army!"

Pages