काळाची काहीतरी गडबड व्हायला लागलीय. वर्तमानकाळात भूतकाळ मिक्स व्हायला लागलाय सारखा. दोन काळ अलग करता येत नाहीत. सहज कुठूनतरी बोलायला सुरूवात करतो आणि मागं मागंच जायला लागतो. पुढं जाण्यासारखं काही दिसत नसल्यावर माणूस मागं मागं जायला लागतो का? की वय झाल्यामुळं हे असं होत असेल? तुमचा काही अनुभव? तुमचं पण वय झालंय की काय? अरेरे! मग कसं करता? नाही, आत्ता लगेच सगळं सांगत बसू नका. नंतर सांगा सावकाश. आधी मला सांगू द्या. बाकी काय सांगत होतो मी?
हां. दुपारचे दोन वाजलेले आहेत. गाव उन्हानं मलूल पडलेलं आहे. रस्त्यावर शुकशुकाट आहे. कुठेही कसलाही आवाज नाही. सगळं निपचित पडलंय. माडगुळकरांनी 'बनगरवाडी'त इथल्या ऊन्हाचं चित्रण करून ठेवलंय. ते आजही तसंच आहे. आता ते आणखी दहशतगर्द झालं आहे. या ऊन्हाची सवय राहिली नाही. साला पांढरपेशे झालो आपण.
कुठूनतरी 'घुंघट की आड से दिलबर का..' ऐकू येतं. त्यासोबत घंटीचा आवाज जवळ जवळ यायला लागतो. रामप्रसाद आईस्क्रीमची गाडी घेऊन आला असेल. दर उन्हाळ्यात येतो. दोन अडीच महिने राहतो. पंचक्रोशीत थंडावा विकत फिरतो.
कुठं राजस्थान आणि कुठं हे बारकुलं गाव. एवढ्या दूर परमुलूखातून हा माणूस ठरल्या वेळी कसा प्रकट होतो, याचं अप्रूप. राजस्थानात सगळीकडे वाळूच आहे का ? आणि 'बॉर्डर'मध्ये सुनील शेट्टी वाळू हातात उचलून देशभक्ती दाखवतो, ती जागा तुमच्या गावापासून किती दूर आहे?
या प्रश्नांना रामप्रसाद हिंदीमिश्रित मराठीत न कंटाळता उत्तरं देतो. गावाची वेस न ओलांडलेल्या, काष्टा घालून नातवांना आईस्क्रीम द्यायला आलेल्या आज्ज्यांना हिंदी बोलण्याचा आत्मविश्वास देतो.
ऊन्हाळी सुट्ट्यात अंगणात गष्टेलनं नेम धरून कोया जिंकण्याचा खेळ खेळणारी पोरं. आता बापे होऊन बसलेल्या त्या सगळ्या शेंबड्यांना रामप्रसादनं चड्ड्या सावरताना बघितलेलंय. एकेकाला तो नावानिशी ओळखतो.
आता सगळे केस पांढरे होऊन गेलेला रामप्रसाद विचारपूस करतो, काय च्याललंय तुज्यावालं? कुटे आस्तो? किती मोटा झ्यालास? येत नाईस का गावामंदी?
आजवर किती ब्रॅण्ड्सचे फ्लेवर्सचे आईस्क्रीम्स खाल्ले असतील. पण ही चव आजही जिभेवर जशीच्या तशी. आईस्क्रीम बनवताना त्यात जीव ओवाळून टाकत असेल का हा? विचारायला पाहिजे.!
बेडच्या शेजारी रॅकमध्ये व्हीनस आणि टिप्स म्युझिक कंपनीच्या गाण्यांच्या कॅसेट्स रचून ठेवल्या आहेत. ही बघा दिलवाले दुल्हनियाची कॅसेट. तीस वर्षांपूर्वींची असेल. ही अशी टेपमध्ये घालायची. मला ते यू ट्यूब वगैरे जमत नाही. जाहिराती फार असतात. तो महेश मांजरेकर सारखा येतो आणि जंगली रमी खेळायला सांगतो. टेन्शन विसरायला जंगली रमी खेळा म्हणतो. आता या वयात रमी खेळून मिळालेल्या पैशाचं काय करणार?
'मेरे ख्वाबों में जो आए..'
आह् ! या गाण्यातली पांढरा टर्कीश टॉवेल गुंडाळून बेडवर उड्या मारत नाचणारी सावळी सावळी काजोल आठवते. तिला आठवत पुढचे चार दिवस उगाचच लाजत लाजत फिरत होतो, हे आठवतं. मग रोज दोन वेण्यांवर लाल रिबिन बांधून शाळेला येणारी एकजण आठवते. तिला विचारायचं होतं एकदा की तुझ्यावर पण तसा काही जादूटोणा झालाय का? तुझापण दिल मचलतो का वगैरे ? तूपण अशी अशी बेडवर उड्या मारत नाचत असतेस का? तसा काही विचार आहे का नजीकच्या भविष्यात वगैरे?
आणि मग ती डोळ्यांतून हजार फुलांचा पाऊस पाडत हसत हसत चंद्राकडं बोट नाचवत म्हणणार होती,
कर बैठा भूल वो, ले आया फूल वो,
उसे कहो जाए चाँद ले के आए
कोण होती बरं ती? हे असं होतं. काही आठवत नाही आता. आठवून तरी काय म्हणा. आता सगळा संसार पार कडेला पोचला असेल तिचा. वेळच्या वेळीच विचारायला पाहिजे होतं.
कॅसेट संपली वाटतं. दुसरी कॅसेट घेतो.
एका बाजूला 'साजन'मधली पाच गाणी. ती ऐकून झाल्यावर कॅसेट उलटी करून टाकतो. दुसऱ्या बाजूला 'दिल' मधली गाणी. 'मुझे नींद ना आए चैन ना आए' ऐकून झाल्यावर कॅसेट काढतो, रेनॉल्डचं निळं टोपण घालून फिरवतो, रिवाईंड करतो. असं केल्यावर तेच गाणं पुन्हा एकदा लागतं. ऐकत राहतो. का म्हणजे काय? चांगलं वाटतं. पुढं आमीरला देश सोडून जायला सांगणारे लोक येणार आहेत म्हणतात. त्याआधीच सगळं बघून ऐकून घेतलेलं बरं.
बाय द वे, माफ करा, पण आपण कोण? माझ्याकडेच आला आहात काय? कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय, पण नक्की ओळख लागत नाहीये.
सुंदर
सुंदर
>>>>>आणि मग ती डोळ्यांतून हजार फुलांचा पाऊस पाडत हसत हसत चंद्राकडं बोट नाचवत म्हणणार होती,
कर बैठा भूल वो, ले आया फूल वो,
उसे कहो जाए चाँद ले के आए
वाह! मस्त मस्त.
क्या बात है! मस्त लिहीलंय.
क्या बात है! मस्त लिहीलंय.
या लेखाच्या निमित्ताने मी पण नॉस्टॅल्जियात रमून घेतलं
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
पण अपुरं वाटतंय.अजून लिहा.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
सावली सारखं वाटतंय उन्हातल्या
मस्त लिहिलंय…..
मस्त लिहिलंय…..
फार पटकन संपलं असं वाटलं. अजून हवं होतं.
आवडलं लिखाण
आवडलं लिखाण
आणि जास्त लांबण नाही लावली हे तर अजूनच
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
सावली सारखं वाटतंय उन्हातल्या>> अगदी अगदी.
आवडलं.
आवडलं.