कसे कोण जाणे, कसे नजरेतून सुटले,
या झाडांनाही येतात एवढी सुंदर फुले?
वर्षभर नुसतीच हिरवी, टोकदार पाने लेऊन,
कशी उभी असतात की मुक्याने?
आज अचानक, पावसाच्या एका शिडकाव्यानंतर,
कुठून फुलले आहेत हे रंगित तुरें, फांदीफांदीवर?
कसे कळले तुम्हाला की आजचा दिवस आहे फुलायचा!
एकेकट्याने नाही, सगळ्यांनी मिळून सजायचा?
कोण गुणगुणते हे गुज तुमच्या कानात?
हीच ती वेळ हे कसे उमटते अंतरंगात?
आमच्या डोळ्यांना दिसते जे आत्ता आहे ते,
विसरून, हरवलेल्या संवेदनांचे रिकामे गाभारे.
तुमच्या आत आत अजूनही धागा जोडलेला.
न बोलताही फुलण्याचा मंत्र तुम्हाला कळलेला.
पावसाच्या सरी आधीच तुम्हाला समजते की तो येणार.
आमच्या साठी पाउस मात्र अनाहूत होऊन बरसणार!
तुमचे सारे हसणे, सोसणे, सोहळा होतो असण्याचा
आमच्या सा-या असण्याला अट्टाहास नसण्याचा
नाकारताना खरे रंग, बेरंगी आम्ही रंगलेलो
विविध गंध, रंगांचे विभ्रम सोडून, भरकटलो
आम्ही असे हरवलो, धागे तुटून विखुरलो
गाव आमुचे कुठे दूर, अन् आम्ही दिशा चुकलेलो.
तुमच्या हातात हात घालून ऋतु कूस बदलतात ना!
आमच्या गावचे कुणी लोक तुमच्या ओळखीचे हसतात ना?
घालून द्या आमची गाठ, थोडी ओळख पटू दे!
तुमचे गाणे ऐकता ऐकता निरगाठ सुटू दे!
मुक्त, मोकळा सूर सजू दे, ऋतु सुंदर हसू दे!
तुमचा-त्याचा नाद अनाहत, या गाभारी घुमू दे!
वाह... सुरेखच....
वाह... सुरेखच....
धन्यवाद शशांक जी!
धन्यवाद शशांक जी!
फार फार सुंदर!
फार फार सुंदर!
सामो, धन्यवाद!
सामो, धन्यवाद!