अनाहूत कॉलर

Submitted by दत्तात्रय साळुंके on 21 September, 2024 - 11:37

वयाच्या त्या एका टप्प्यावर
जेव्हा लागते आयुष्य उतरणीला
व्यवहारी जगही लागते आता
तुम्हाला सोईस्कर विसरायला

मी वाट पहात असतो, कुणा
भेटीची सखा, आप्तेष्टांची
अशात फोन खणखणतो
कुणी तरी अनाहूत असतो

मोहरते माझे विद्ध मन
धन्य झाला आज दिन
कुणातरी यावी आठवण
क्रेडिट कार्ड घ्या कॉलर म्हणं

म्हणे वार्षिक शुल्क नाही काही
आहे अॅड‌ऑन कार्ड बायकोलाही
मी उत्तरलो
ही ऑफर घेऊ कुणासाठी
आता कुणीही नाही पाठी
आधाराचे चार शब्दही दुरापास्त
हीच रे बाबा माझी ऐपत

घडीभर आपण एक खेळू खेळ
मी तुमचा बाबा तुम्ही माझं बाळ
कॉलर म्हणे…
माफ करा बाबा मलाही पोट आहे
केवढं मोठं माझं विक्री टार्गेट हे

मला हाकारणे त्याचे बाबा म्हणून
गेले केवढे तरी सुखावून
मला पुन्हा असा अनोळखी कॉल हवाय
जगणं शुन्यच असतं की आशे शिवाय

© दत्तात्रय साळुंके

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

सुंदर कविता ...
मार्केटिंगच्या एखाद्या फोन कॉलवरून सुद्धा किती छान कल्पना सुचलीयं तुम्हांला ...!

वाह

@SharmilaR
@डॉ. विक्रांत..

अनेकानेक धन्यवाद

नवीन प्रतिसाद लिहा