आरोग्यदायी पेय - काळ्या गाजराची कांजी {अल्पना}

Submitted by अल्पना on 17 September, 2024 - 12:37

या वर्षी मार्च - एप्रिल मध्ये एका मैत्रिणीने मला लॅक्टो फरमंटेशन / किण्वन या प्रकाराशी तोंडओळख करून दिली. तिने कंबुचा चे विरजण दिलं, कसं करतात हे शिकवलं. तो प्रयोग करून बघितला आणि हे नवं पेय मला आवडलं. त्याच दरम्यान तिने घेतलेला एक या विषयावरचा कोर्स मला कराय्ला मिळाला. कंबुचा व्यतिरिक्त जिंजर बग आणि रेझिन वॉटर वापरून केलेले फ्रूट सोडा, मॅक्सिकन तपाचे, काफिर ग्रेन्स वापरून केलेले काफिर योगर्ट अश्या काही नव्या पेयांची आणि अजून बर्‍याच पदार्थांची माहिती या दरम्यान मिळाली. किण्वन केलेले भारतिय पदार्थ शोधताना काळ्या गाजराची कांजी, आंबिल या पदार्थांची नावं आठवली. यातली कांजी माझ्या सासरी पारंपारिक रित्या पूर्वापार केली जाते. माझे चुलत सासरे खूप छान कांजी बनवतात. त्यांना आणि सासूबाईंना विचारून मी यावेळी पहिल्यांदा कांजी बनवली.
दिल्लीमध्ये होळीला कांजी पिण्याची पद्धत आहे. माझ्या सासरी मात्र जरा उशिरा उन्हाळ्यात कांजी पितात. कांजी खूप थंड असते प्रकृतीसाठी. मार्च पर्यंत पंजाबमधला हिवाळा संपलेला नसतो, म्हणून सहसा उन्हाळा सुरु झाल्यावर पण गाजर बाजारात असेपर्यंतच्या काळात कांजी बनवतात आमच्या घरी.

साहित्य:
एक किलो काळे गाजर , एक चमचा मिरे, तिन चमचे राई, एक चमचा तिखट, दोन चमचे मीठ, एक चमचा काळं मीठ, दोन लीटर पाणी
कृती:
गाजर सोलून बोटभर लांबीचे आणि पेरभर जाडीचे उभे तुकडे करावेत. गाजरामध्ये असलेला आतला पांढरा भाग काढून टाकावा.
खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये मिरे आणि राई एकत्र जाडसर कुटून घ्यावी.
एखाद्या मोठ्या मातीच्या भांड्यात गाजराचे तुकडे, कुटलेले मीरे -राई आणि इतर साहित्य एकत्र करावं. व्यवस्थित हलवून त्या भांड्याच्या तोंडावर कापड बांधावे. हे भांडे ३ ते चार दिवस उन्हामध्ये ठेवावे.

WhatsApp Image 2024-09-16 at 7.34.55 PM (1).jpeg
कांजीची बरणी.

रोज एक -दोन वेळा सगळं मिश्रण हलवून परत कपडा बांधावा. ३-४ दिवसांत कांजी प्यायला तयार होते.

WhatsApp Image 2024-09-16 at 7.34.56 PM.jpeg

थोडी आंबूस, तिखट अशी चव असते कांजीची.
अधिक टिपा:
कांजी खूप थंड असल्याने उन्हात बसून किंवा दुपारच्या वेळी प्यावी असं म्हणतात. थंडीच्या दिवसांत कांजी प्यायल्यास बाधू शकते. मातीचे भांडे नसल्यास चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये कांजी बनवता येवू शकते. पण मातीच्या भांड्यात बनवलेल्या कांजीचा स्वाद वेगळाच येतो. ही कांजी १५-२० दिवस फ्रीजमध्ये टिकू शकते. काळे गाजर न मिळाल्यास साधे गाजर आणि बीट एकत्र करून कांजी बनवता येते.
कांजीमध्ये आरोग्यदायी चांगले जिवाणू असतात जे आतडयांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. खूप चांगलं प्रोबायोटिक पेय आहे हे.
शिवाय काळ्या गाजरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी ऑक्सिडंट्स असतात. नेहेमीच्या गाजरातली सगळी जीवनसत्वे तर असतातच.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

घरी बनवणार नाही(कंटाळा) पण कोणी आयते प्यायला दिले तर मस्त.>>>असे प्रतिसाद बघून खूप बरं वाटतं, नाहीतर नक्की करणार,कालच केली, अमुक तमुकच add करून केली असे खरोखर करून बघणाऱ्यांचे प्रतिसाद बघून (फक्त) गिल्ट येतो,

रंग खूप म्हणजे खूपच छान आलाय,आणि कांजी कधी ऐकली नव्हती,छान आहे लेख

हे पेय नक्की थंडीत पिणं चांगलं की उन्हाळ्यात? दोन्ही प्रकारची माहिती मिळते आहे म्हणून प्रश्न पडला आहे.
आत्ता पिऊन त्रास होऊ नये. किंवा थंडीत प्यायची असल्यास सीझन गेल्यावर कळायला नको.

माझ्या सासरच्यांकडून तरी मला हे खूप थंड असते आणि उन्हाळ्यात पितात असेच सांगितले गेले आहे. मार्च - एप्रिल मध्ये पिली जाते आमच्या कडे कांजी. शिवाय दुपारी उन्हात बसून प्यावी असंही सांगितलं आहे घरातल्या मोठ्या लोकांनी.

आज आमच्या भागातल्या फेस बुक ग्रुपवर कांजी वडा विकतो अशी पोस्ट दिसली. तिथे म्हटलंय - Have you tried our *Beetroot-Carrot Kanji* yet? It's the perfect winter-special drink!
हा धागा वाचला होता आणि हे उन्हाळी पेय आहे, असे वाचल्याचे आठवले, म्हणून तिथे तसे लिहिणार होतो. पण म्हटलं आणखी शोधाशोध करून पाहू. हा लेख सापडला. त्यातून - This gut-loving elixir made using black carrots or beetroots is packed with antioxidants. For many households in India, preparing kanji is actually a winter tradition.

... preparing kanji is actually a winter tradition....

ही माहिती नवीन आहे माझ्यासाठी.

आजच बाजारात काळी गाजरं दिसली आणि आमच्या घरी पण ही चर्चा झाली. नवऱ्याच्या मते पूर्वी हिवाळ्याच्या शेवटी कांजी बनवायचे आणि ती मातीच्या मडक्यात बनवली जायची. पंजाब भागातल्या थंडीत मडक्यात ठेवलेली कांजी fernent व्हायला बरेच दिवस लागतात. होळीला कांजी प्यायची पद्धत आहे कारण त्यावेळी थंडी जरा कमी झालेली असते. माझ्या सासूबाई कडून ऐकलं आहे की कांजी दुपारी उन्हात बसून प्यावी.

Pages