पाककृती स्पर्धा ३: पेरुची चटणी - आशिका

Submitted by आशिका on 15 September, 2024 - 08:25

चटणी हा पदार्थ पानात अगदी कमी प्रमाणात वाढला जात असला तरीही भारतीय खाद्यसंस्कृतीतील एक महत्वाचा पदार्थ आहे. पानाच्या डाव्या बाजुची रंगत वाढवणारा आणि कधी मुख्य भाजी वगैरे पुरवठ्याला कमी पडत असेल तर गृहिणींच्या मदतीला धावून येणारा शिवाय जेवणाची लज्जतही वाढवणारा असा हा पदार्थ. विशेष म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या सामुग्रीतून झटपट बनणारं हे तोंडीलावणं.

आज मी जी पा. कृ. देत आहे ती पेरुची चटणीही अशीच अगदी ६/७ घटक पदार्थांपासून पाचेक मिनिटांत बनणारी अशी आहे. तर यासाठी लागणारे साहित्य बघुयात.

साहित्यः-

१. पिकलेला पेरु - अर्धा - फोडी करुन
२. किसलेले आले - एक लहान चमचा
३ . बडीशेप - एक लहान चमचा
४. लाल तिखट - १ ते दीड लहान चमचा
५. मीठ - चवीनुसार
६. तेल - एक लहान चमचा
७ - हिरवी मिरची (ऐच्छिक) - १ लहान तुकडे करुन

कृती -

पेरु कापून त्याच्या लहान फोडी करुन घ्याव्यात. कढईत तेल घेऊन ते तापले की त्यात किसलेले आले आणि बडीशेप घालुन अर्धा मिनिट परतावे. (आले आणि बडीशेप हे दोन पदार्थ गोड आणि तिखट मिठाच्या पदार्थांना सांधणारे आहेत). त्यावर पेरुच्या फोडी , हिरवी मिरची, तिखट, मीठ घालून परतावे, २ ते ३ मिनिटांतच मिश्रण मिळून येईल. मग ते जरासे मॅश करुन एकजीव करावे. पेरुची चटणी तयार आहे.

ही चटणी चपाती, भाकरी यासोबत छान लागते तसेच मूग डाळ खिचडी किंवा साधा वरण भात यासोबतही छान लागते.

ingredients2.jpgperuchatni.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults