पाककृती स्पर्धा ३: पेरुची चटणी - आशिका

Submitted by आशिका on 15 September, 2024 - 08:22

चटणी हा पदार्थ पानात अगदी कमी प्रमाणात वाढला जात असला तरीही भारतीय खाद्यसंस्कृतीतील एक महत्वाचा पदार्थ आहे. पानाच्या डाव्या बाजुची रंगत वाढवणारा आणि कधी मुख्य भाजी वगैरे पुरवठ्याला कमी पडत असेल तर गृहिणींच्या मदतीला धावून येणारा शिवाय जेवणाची लज्जतही वाढवणारा असा हा पदार्थ. विशेष म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या सामुग्रीतून झटपट बनणारं हे तोंडीलावणं.

आज मी जी पा. कृ. देत आहे ती पेरुची चटणीही अशीच अगदी ६/७ घटक पदार्थांपासून पाचेक मिनिटांत बनणारी अशी आहे. तर यासाठी लागणारे साहित्य बघुयात.

साहित्यः-

१. पिकलेला पेरु - अर्धा - फोडी करुन
२. किसलेले आले - एक लहान चमचा
३ . बडीशेप - एक लहान चमचा
४. लाल तिखट - १ ते दीड लहान चमचा
५. मीठ - चवीनुसार
६. तेल - एक लहान चमचा
७ - हिरवी मिरची (ऐच्छिक) - १ लहान तुकडे करुन

कृती -

पेरु कापून त्याच्या लहान फोडी करुन घ्याव्यात. कढईत तेल घेऊन ते तापले की त्यात किसलेले आले आणि बडीशेप घालुन अर्धा मिनिट परतावे. (आले आणि बडीशेप हे दोन पदार्थ गोड आणि तिखट मिठाच्या पदार्थांना सांधणारे आहेत). त्यावर पेरुच्या फोडी , हिरवी मिरची, तिखट, मीठ घालून परतावे, २ ते ३ मिनिटांतच मिश्रण मिळून येईल. मग ते जरासे मॅश करुन एकजीव करावे. पेरुची चटणी तयार आहे.

ही चटणी चपाती, भाकरी यासोबत छान लागते तसेच मूग डाळ खिचडी किंवा साधा वरण भात यासोबतही छान लागते.

ingredients2.jpgperuchatni.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त पाककृती!
पण गूळ नाही का घालायचा?
Happy
तसेच बियांचे काय करावे?

आम्ही गूळ घालतो कारण मेथीदाणे घालतो, इथे बडीशोप आहे म्हणून नसावे कदाचित, बिया छान लागतात खाताना.

आशिका येईल सांगायला, माझा आपला उगाच अंदाज.

आम्ही गूळ घालतो कारण मेथीदाणे घालतो>> + १

बिया छान लागतात खाताना.>> या बियांमुळेच आवडायच नाही लहानपणी मला Lol आई यालाच पेरुच लोणचं म्हणायची

या पद्धतीने करुन बघेन

धन्यवाद प्रतिसादांसाठी
पण गूळ नाही का घालायचा?>>> पेरु पिकलेलाच घेतला आहे, तितकी गोडी पुरेशी वाटली, जास्त गोड हवे असेल तर गूळ घालू शकता.

तसेच बियांचे काय करावे?>>>> काही नाही, नुसता पेरु खातांनाही बिया येतातच, बिया काढून चटणी करायची असेल तर रेसिपीचा वेळ १० मिनिटांनी वाढवावा लागेल असं वाटतंय. मी बिया तशाच राहू दिल्या.

हो, खरे आहे.
पण बिया फारच मधे मधे येतात!!

मस्त.
मीही मेथी आणि गूळ घालून करते (आणि लोणचंच म्हणते), आता एकदा अशी करून बघेन.
अगदी मऊ शिजवून मग गाळण्यावर चमच्याने घोळत बिया 'गाळून' काढता येतील कदाचित - मग खरंच चटणी होईल ती. Happy

इंटरेस्टिंग आहे.. पण मी पेरू खात नाही स्टोन मुळे..
आई इतका खायची की तिला आम्ही पोपट म्हणायचो..
हल्ली सोडले आहे तिने खाणे.. पण तिला शेअर करायला हवे हे