वन डिश मिल - मसूर बिर्याणी {अल्पना}

Submitted by अल्पना on 15 September, 2024 - 03:52

हा पदार्थ मी पहिल्यांदा लॉकडाउन मध्ये केला होता. त्याआधी मैत्रिणीकडून १-२ वेळा मसूर बिर्याणी हे नाव ऐकलं होते. पण घरात बिर्याणी म्हणजे मांसाहारीच हवी असं मानणारे सदस्य असल्याने कधी करून बघायचा विचार केला नव्हता. तसंही बिर्याणी सारखा कुटाण्याचा पदार्थ घरी करण्याइतका उरकही नाही आहे माझ्यामध्ये. पण लॉकडाऊन मध्ये सुरवातीला सगळंच घरी करावं लागत असताना वन डिश मिल म्हणून ही बिर्याणी केली. आणि चक्क आमच्या घरी ती सगळ्यांना आवडली. त्यानंतर अगदी नेहेमी नाही, पण बर्‍याचवेळा ही बिर्याणी घरी करून झाली आहे. शाकाहारी पाहूणे येणार असतील तर एक वेगळा पदार्थ म्हणून आम्ही ही आख्खा मसूर बिर्याणी करायला लागलो.
स्पर्धा जाहिर झाल्यावर वेगवेगळे सलाड आणि सूप व्यतिरिक्त मला आठवलेला पहिला पदार्थ हाच होता. हीच एक एंट्री द्यायचे ठरवलं होते मी. गेल्या आठवड्याभरात एकदा करून, भरपूर फोटो काढून मग पाककृती लिहायची हे ठरलं होते. पण आता गणेशोत्सव संपत आला तरी आमच्या घरी अजून तरी मसूर बिर्याणी केली गेली नाहीये. पुढच्या दोन दिवसांत केली जाईलच याची खात्री नाही. म्हणून जुनेच १-२ फोटो शोधून पाककृती लिहून ठेवतेय.

साहित्यः दिड वाटी तांदूळ, दिड वाटी आख्खा मसूर, २ मोठे कांदे मसाल्यासाठी, २ मोठे कांदे तळून घेण्यासाठी, १ मोठा टॉंमॅटो, भरपूर कोथिंबीर आणि पुदिना, १ मोठा बटाटा, १ वाटी - गाजर-बीन्स बारीक चिरून, थोडे खडे मसाले, १ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, २ चमचे धणे पुड, १/२ चमचा गरम मसाला, १ चमचा बिर्याणी मसाला, इंचभर आल्याचा तुकडा, ५-७ लसणाच्या पाकळ्या, थोडे केसर दुधात खलून, पाव वाटी पेक्षा थोडे कमी दही, चवीप्रमाणे मीठ, वर सजावटीसाठी तळलेले काजू, टॉमॅटोच्या चकत्या, पनीरचे तुकडे इत्यादी.

कृती:
थोडे खडे मसाले घालून बिर्याणी साठी भात शिजवून घ्यावा आणि मोकळा करावा. बिर्याणीसाठी करतात तसा थोडा अर्धवट शिजलेला असावा तांदळाचा दाणा.
गाजर आणि बीन्स चिरून, अर्धवट वाफवून भातात मिक्स करून थंड व्हायला ठेवावे. बिर्याणीला दम लावताना तांदूळ आणि या भाज्या परत शिजणार आहेत हे लक्षात ठेवून त्याप्रमाणेच हे दोन्ही पदार्थ अर्धवट शिजवून घ्यावेत.
आख्खे मसूर दोन तास भिजवून कुकरमध्ये कमी पाण्यात शिजवून मी कुकरमध्ये प्रेशर येईपर्यंत शिजवले होते. शिजवताना पाणी मात्र कमी घालायचे. अगदी पातळ आमटी नको व्हायला, थोडासा अंगासरशी रस मात्र असावा.
थोड्या तेलात जीरे, खडे मसाले याची फोडणी करावी, त्यात बारीक चिरलेले आले आणि लसूण किंवा आले -लसूण पेस्ट घालावी. यानंतर यात मसाल्यासाठी बारीक चिरलेला कांदा घालून परतावे. कांद्यामध्ये हळद, धण्याची पूड, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि तिखट घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. मसाला जळेल असं वाटायला लागल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परत तेल सुटेपर्यंत परतत रहावे. मसाला छान झाल्यावर त्यात थोडे दही घालून परतावे. या मसाल्यामध्ये भरपूर चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा चिरलेला पुदिना घालावा.
यानंतर यात शिजलेले आख्खे मसूर घातले. यात चवीप्रमाणे मीठ घालून मसूर मसाल्यामध्ये मंद आचेंवर मुरत ठेवले.
मग जाड बुडाच्या भांड्यात थोडे तुप घालून त्यावर बटाट्यांच्या चकत्याचा थर, त्यावर थोडा तळलेला कांदा, त्यावर मसुराचा एक थर , त्यावर चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याचा थर, मग भाज्या घातलेला भाताचा थर आणि परत कांद्याचा, मसूराचा आणि पुदिना -कोथिंबीरीचा थर असे थर दिले. बाजूने थोडे तूप सोडले. भातावर केसर वाले दूध घातले. सगळ्यात वर भातावर परत कांदा, काजू, कोथिंबीर, पुदिना, पनीर इ घालावे.
भांड्याचे झाकण लावून बिर्याणी मंद आंचेवर १०-१५ मिनिटे शिजू द्यावी. कणिक लावून झाकण घट्ट बंद करता येते. किंवा दुसरी पद्धत म्हणजे झाकण ठेवायच्या आधी एक स्वच्छ किचन टॉवेल बिर्याणीवर ठेवून त्यावर झाकण ठेवावे. वाफ बाहेर पडत नाही. पण असं करताना भांडं थोडे रिकामे असलेलं बरं. नाहीतर त्या कपड्याला बिर्याणी चिटकू शकते.
सगळ्यात शेवटी वरून टॉमॅटोच्या चकत्या ठेवाव्या.
असे थर काचेच्या भांड्यात देवून बिर्याणी मायक्रोव्हेव मध्ये १०-१५ मिनिटे ठेवून पण करता येईल.

फोटो जुने आहेत. लॉकडाऊन मधले फोटो असल्याने यात काही जिन्नस नाहीत. त्यावेळी भाज्या उपल्ब्ध नव्हत्या फारश्या. पुदिन्या ऐवजी पुदिना पूड वापरावी लागली होती.
IMG_20200413_204142.jpgIMG_20200413_223806_379.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त रेसिपी
कधी केला नाहीये हा पदार्थ पण ऐकून होते याबद्दल. अख्ख्या मसूराची आमटी आठवड्यातून एकदा होतेच, अधूनमधून त्याच शिजलेल्या मसूराची आमटी न करता घट्ट भाजी टाईप व्हेरिएशनही होते आणि घरात सगळ्यांना आवडते. त्यामुळे मसूर बिर्याणीही आवडेल असे वाटतेय

मस्त आहे ही रेसिपी.
मोड आलेल्या मटकीचा, भिजवलेल्या मुगाचा, हरभऱ्याचा आणि मसुरचा मसालेभात खाल्ला आहे. आता ही बिर्याणी करून पाहायला हवी. टेस्टी होत असणार.

मोड आलेल्या मटकीचा, भिजवलेल्या मुगाचा, हरभऱ्याचा आणि मसुरचा मसालेभात खाल्ला आहे.>> हे तिन्ही पदार्थ कधी खाल्ले नाहीत. यांच्या रेसेपि माहिती असतील तर लिहा.