चटण्या.. भेंडीची चटणी... मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 15 September, 2024 - 03:33

भेंडीची चटणी

नाव बघून न वाचताच पुढे जाऊ नका भेंडी न आवडणाऱ्या आणि
आवडणाऱ्या मंडळींनी ही. खुप मस्त लागते ही चटणी. कोणी कोणी ठेचा ही म्हणत असतील पण आम्ही चटणीच म्हणतो.

साहित्य

अर्थातच धुऊन पुसून कापलेली एक मोठी वाटी भेंडी ( फार बारीक चिरायची नाही. ) लसूण पाच सहा पाकळ्या , हिरव्या मिरच्या दोन तीन मोठे तुकडे करून (किंवा आवडीप्रमाणे ) , भाजून सालं काढलेले शेंगदाणे दोन चमचे , कोथिंबीर थोडी ( काड्या होत्या घरात म्हणुन मी त्याच घातल्यात) जिरं, मीठ ,लिंबू
( ऐच्छिक )

कृती

शक्यतो लोखंडी कढईत अर्धा चमचा तेलात लसूण आणि मिरच्या मिरच्या त्यावर तपकिरी डाग येई पर्यंत परतून घ्या आणि काढून घ्या.
पुन्हा अर्धा चमचा तेल घालून मोठ्या गॅसवर भेंडी भराभर सतत हलवत परतून घ्या. म्हणजे ती चिकट होत नाही. थोडया वेळाने मीठ घाला म्हंजे भेंडी लवकर शिजते.
भेंडी, लसुण, मिरच्या, शेंगदाणे, जिरं, मीठ ( लागेल तसं ) कोथिंबीर सगळं पल्स मोडवर फिरवून घ्या. जास्त बारीक करायचं नाहीये. आता अर्धा चमचा तेलावर हे मिश्रण पुन्हा दोन मिनिटं परतून घ्या. चव ऍडजस्ट करा. आवडत असेल तर लिंबू पिळा. भेंडीची चटणी तयार आहे.

अधिक टिपा
ही चटणी मोकळी होते, चिकट अजिबात होत नाही.
भेंडीची भाजी आणि ही चटणी ह्यांच्या चवीत खुप फरक आहे. भेंडी न आवडणारे ही खातील एवढा.
भाकरी बरोबर सर्वात बेस्ट लागते पण भात, पोळी ह्या बरोबर ही छान लागते.

हा फोटो

20240915_121643.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसतेय!
बायकोच्या माहेरी शेंगदाणा मिरचीचा खर्डा करतात झणझणीत.. जो मलाही आवडतो. दिसायला तसेच दिसते आहे हे. फक्त भेंडी मला आवडत नाही. पण न सांगता खाऊ घातले तर हे आवडेलही.

नवीन आहे ही चटणी माझ्यासाठी

भाजीसाठी भेंडी आणली की करुन बघेन थोडी भेंडी बाजूला ठेवून>>+१११

येत्या आठवड्यात नक्की करेन.

कविन, ऋ, अल्पना, केया, SharmilaR आणि देवकी धन्यवाद...

ही चटणी फार अन कॉमन नाहीये तरी इथे कोणाला माहीत कशी नाही हे लिहीत असतानाच देवकी चा प्रतिसाद आला तिने करून बघितली आहे असा म्हणून छान वाटलं.
होय गवारी ची ही करतात अशी चटणी...

>> भाजीसाठी भेंडी आणली की करुन बघेन थोडी भेंडी बाजूला ठेवून>> ++१
फक्त लोखंडी कढई योकुकडून कशी आणायची ते बघावं लागेल Wink

मी भेंडी नुसती भाजून मिठ लावून खाते. ( एका भाजीवाली ने सांगितलं होतं लहानपणी, खाऊन बघा चांगली लागते) ही अशी चटणी तर छानच लागेल. ममोची रेसिपी आहे.
आणि ममोने लिहीलेली रेसिपी मी डोळे झाकून तंतोतंत follow करते. त्यात स्वतः चं डोकं चालवत नाही. एकतर ममोने केलेली रेसिपी म्हणजे परफेक्ट चं असणार ट्राइड & टेस्टेड.

20240916_093843-COLLAGE.jpg

ममो ताई..ही गुरू दक्षिणा..मस्त झालीय चटणी..हिरवी मिरची खात नाही त्यामुळे लाल तिखट घालून केली...चिकट नाही झाली पण जास्त pulse mode वर फिरवलं तर चिकट होईल असे वाटते.

फक्त लोखंडी कढई योकुकडून कशी आणायची ते बघावं लागेल Wink >> सायो, लोखंडी कढई लिहिताना मला ही योकुचीच आठवण येत होती.
ममोची रेसिपी आहे. आणि ममोने लिहीलेली रेसिपी मी डोळे झाकून तंतोतंत follow करते. त्यात स्वतः चं डोकं चालवत नाही. एकतर ममोने केलेली रेसिपी म्हणजे परफेक्ट चं असणार ट्राइड & टेस्टेड. >> धनुडी, थँक्यु सो मच.
केया , लगेच करून बघितलीस आणि आवडली ही म्हणून थँक्यु... छान दिसतेय. फोटो मस्तच आलाय . परफेक्ट दिसतेय.
होय , पल्स मोड वरच जरा ओबड धोबड अशीच करायची आहे ही चटणी. आयडीयली खलबत्त्यात कुटली जाडसर तर भारी होते पण आता नोकरी वगैरे संभाळून करायची तर मिक्सर च बेस्ट. आणि तेवढ टेस्ट मध्ये कॉम्प्रमाईज नक्कीच चालत.

नवा प्रकार. आहे भेंडी घरात. थोड्याची करून पाहातो. तसंही लोखंडात भाजलेल्या लसणी-मिरच्यांसोबत चविष्ट न लागेल असा कुठला प्रकार आहे का?
रच्याकने, लोखंडी कढईत केलेली एक रेस्पी इकडे आणायची राहीलीय. त्या तिकडे दिलेली, आणतो इथेपण.
इतक्यात कुठेतरी पहिलेलं की प्रेस्टीज चं लोखंडी कुकवेअर आलं आहे. जरा महाग असेल/आहे ब्रँड असल्यानी पण क्वालिटी चांगली असावी.

wow !!! माझा एकदम आवडता फेव्हरिट अँड हिट मेन्यू पोळी व भेंडीचा ठेचा!! पण मी मिक्सर ला नाही वाटत माझ्याकडे छोटा दगडी खलबत्ता आहे त्यात करते
अ प्र ति म लागतो हा ठेचा ! दरवेळी भेंडी आणली इ मी यासाठी ४ राखून ठेवतेच ठेवते

योकु , Anjali kool, साधना, भरत, स्वाती, sparkle, द. सा. , आबा ... धन्यवाद.

योकु , लोखंडी कढई लिहिताना खरचं तुझी आठवण येत होती, बरं वाटलं तुझा प्रतिसाद बघून. करुन बघ ही चटणी, छान लागते.

Anjali , छान वाटलं तूला आवडते हे वाचून. आहे आमच्याकडे ही खलबत्ता आणि मी कधी कधी करते खलबत्त्यात मुड असेल तर. चवी मध्ये निश्चितच फरक पडतो. इव्हन साधं दाण्याचं कूट ही खलबत्त्यात केलं तर एकदम टेस्टी होतं . असो. नेहमी नेहमी शक्य नाही पण.
भेंडी आवडत नाही पण हि चटणी आवडेल अस वाटतय >> आबा, ट्राय करा एकदा. भाकरी बरोबर भारी लागते.

आजच केली. मस्तच चव येते. भेंडीप्रेमी लेकीला तर खूपच आवडली. आधी थोडी चिकट झाली पण शेवटी तेलावर परतल्यावर मोकळी झाली.

धनवंती धन्यवाद. मुलीला आवडली हे वाचून जास्तच छान वाटलं .

होय, पुन्हा परतली की मोकळी होते एकदम. गॅस मोठा ठेवायचा आणि परतायची.

अभिनंदन..
पाकृ स्पर्धेत दोन बक्षिसे आली Happy

Pages