रोमहषर्क जीवन भाग 8
एका संद्याकाळी मी व माझे मित्र गांधी हे मालवणी मध्ये राहणाऱ्या एका मित्राकडे निघाले. रात्रीचे आठ-साडेआठ वाजले होते आणि ड्रायव्हरने नेहमीप्रमाणे गाडी बांद्राजवळून रिंग रोड वर घेतली. आमचेही त्याच्याकडे लक्ष नव्हते. हा ड्राइवर अत्यंत कुशल आणि विश्वासू होता आणि स्वभावाने गरीब होता. माझ्या बरोबर त्याने १५-१६ वर्ष काम केले. गाडी २-३ किलोमीटरवर गेल्यावर एका निर्जनस्थळी एक पोलीस पथक स्टेनगन घेऊन उभे होते. त्यांनी आम्हाला थांबण्याची खूण केली. ड्रायव्हरने न थांबताच गाडी पुढे नेली. पोलीस पथक गन घेऊन आमच्या मागे धावू लागले. ते लक्षात येताच मी गाडी थांबवून मागे नेण्यास सांगितले. त्यावेळी माझ्याकडे मारुती ओम्नी होती. गाडी मागे येताच पोलिसांनी गाडीला गराडा घातला आणि ड्राइवरला खाली खेचले. आम्ही दोघे खाली उतरून इंस्पेक्टरजवळ जाऊन उभे राहिलो.
'काय रे XXX , माज आला काय ?'
'काय झालं साहेब ?
'गाडी पुण्याची आहे, मला काय माहीत इथले ?'
'XXX पुण्यात काय वेगळे पोलीस असतात का? आम्ही थांबवलं तर थांबला का नाही ?'
'मला वाटले तुम्हाला फुकट लिफ्ट हवी आहे'
हे ऐकल्यानंतर पोलीस फारच भडकले, आम्ही शांतपणे इन्स्पेक्टर जवळ उभे होतो. तो पुण्याहून नुकताच बदलून मुंबई ला आला होता त्याने पोलिसांना आवरून गाडी तपासण्यास सांगितले. पोलिसही संधी शोधतच होते. त्यांनी ड्रायव्हरला गाडीच्या सर्व सीट्स बाहेर काढायला सांगितल्या. त्यानंतर मॅट्स आणि जेवढयाकाही वस्तू निघणे शक्य होते त्या सर्व काढायला सांगितल्या. सर्व बाहेर आल्यावर त्यांनी गाडीची आतून तपासणी केली. सर्व सीट्स मध्ये काही लपवले नाही ना हे तपासले. मग त्याने ड्रायव्हरला परत सर्व लावण्यास सांगितले. या सर्वात दीड-दोन तास निघून गेले होते. इन्स्पेक्टर सोबत आमच्या गप्पा बऱ्याच रंगात आल्या होत्या. त्याने मुंबईतील बऱ्याच घटना सांगितल्या. आम्हाला त्याने उपदेश केला कि ,आम्ही तीन चुका केल्या आहेत. एक म्हणजे रात्री साडेआठ नंतर या रस्त्यावर वर्दळ नसते आणि हा भाग बऱ्याचदा स्मगलिंग साठी वापरला जातो. दुसरे म्हणजे रात्री मालवणीला जाणे संशयास्पद आहे कारण तो भाग पूर्णतः मुस्लिम आहे. आणि तिसरे म्हणजे , मारुती ओम्नी अवैध्य धंद्यासाठी सर्रास वापरल्या जातात.
एवढ्यावेळे पर्यंत आम्ही निरुपद्रवी असल्याची त्याची खात्री पटली .
इन्स्पेक्टरने ड्राइवरला जवळ बोलावले आणि लायसन मागितले.
'काय नाव तुझं ?'
'दामोदर'
'XXX तुला तुझा बाप माहित नाही वाटत? पूर्ण नाव सांग'. दामोदरने पूर्ण नाव सांगितले
'कुठे राहतो ?'
'आता गरिबाला कुठला पत्ता, मिळेल तिथं पडायचं '
'XXX तुला दाखवतो तुझी जागा, उचला रे याला आणि १५ दिवस आत टाकून द्या '
'पण साहेब ,तुम्ही असे केले तर आमच्या साहेबांची पंचाईत होईल '
आपले हसू दाबत इन्स्पेक्टर त्याला म्हणाला, 'त्याची काळजी नको करू, आम्ही आमचा ड्रायव्हर देऊ '
इंस्पेक्टरही आता कंटाळा होता पण त्याला ड्रायव्हरला थोडा तरी त्रास द्यायचा होता. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले कि गाडीला काळ्या फिल्म्स बसवल्या आहेत.
इन्स्पेक्टरने ड्राइवरला तिथेच बसून, सर्व फिल्म्स काढायला सांगितले . तेथे पहाऱ्यासाठी असलेला पोलीस सोडून बाकीचं पथक निघून गेले. तोपर्यंत रात्रीचा एक वाजला होता. आता कोठेही जाणे शक्य नव्हते.
पुढच्याच आठवड्यात मी मारुती ओम्नी काढून , ११८NE गाडी घेतली हे सांगणे न लगे.
रोमहषर्क जीवन भाग 8
Submitted by अविनाश जोशी on 10 September, 2024 - 07:21
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा