जुनी कढई, नवीन उपमा

Submitted by संयोजक on 5 September, 2024 - 17:42

कविता म्हणजे काय? कुणी म्हणेल 'जे गद्य नाही ते पद्य'. कुणी म्हणेल 'ट' ला 'ट' आणि 'प्राची' ला 'गच्ची' लावून जी होते ती कविता. कुणी म्हणेल पाऊस पडला, प्रेम जडलं आणि मग मोडलं ही की जे 'होतं' ती कविता, तर कोणी म्हणेल वक्रोक्ती हा तर कवितेचा गाभा.

कविता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अलंकार, प्रतिके, प्रतिमा, मिथके अशा गोष्टींचा वापर करुन छंदबद्ध, वृत्तबद्ध किंवा मुक्तशैलीत लिहिलेली रचना येते. बर्‍याचदा कविता वाचली की काहीतरी खोलवर जाणवते. अरे हे तर आपल्याच मनीचे गूज होते, त्याची कविता कशी बनली याची मौज ही वाटते आणि ती कविता त्या कवीची न राहता आपलीच बनते.

प्रेम हा कवी आणि कवयित्रींचा आवडता विषय. प्रेम म्हटलं की 'दीपकाचे वरी प्राण देणार्‍या पतंगाची खरी प्रीत' आलीच पाहिजे, चंद्र आला पाहिजे. पाठोपाठ चांदणे आले तर चकोर तर मागे उभाच आहे, मंगेशा सारखा! ओल्या पाकळ्या, ओले सुगंध, ओले ओठ आणि ओले डोळे. ह्या अशा ठोकळेबाज उपमांचा साठा केला की मग एआय सुद्धा त्यांना वेगवेगळ्या तर्‍हेने गुंफुन कविता करेलच की. पण मग अचानक 'प्रेम कर भिल्लासारखं' असं कुसुमाग्रज म्हणतात, 'नैवेद्य मागणारा काळ' असं आरती प्रभू लिहुन जातात आणि ती ओळ वाचल्यावर त्वरित पुढची ओळ वाचणे शक्यच नसते. ती ओळ मनात मुरवत त्याचे आयाम जोखत त्यावर काही काळ हिंदोळे घेण्यावाचुन दुसरा पर्याय तरी काय असतो!

अशाच धर्तीवर आम्ही एक गंमत खेळ घेऊन आलो आलो आहोत. आम्ही एक कवितेचा ढोबळ विषय देऊ. तुम्हाला त्या विषयावर कविता करायची आहे, वृत्तबद्ध करा किंवा मुक्तछंदात करा. पटकन चारोळी केलीत तरी हरकत नाही. अट फक्त एकच! त्या विषयात ज्या ठोकळेबाज उपमा नेहेमी वापरात येतात त्यांचा वापर करायचा नाही. कढई जुनीच, उपमा मात्र नव्या हव्यात.

१. पाऊस
२. प्रेम

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खोटी शपथ ही तर झाली तुझी सवयच ग
बोगद्यात घालवला दिन आता तरी येशील ना ग
नाही नाही नाही नाही, टांग मारालीस ना ग

आरेसीचं असलं तरी विंडो सीट ना ग
तू तर विसराळू, टांग मारू बास ना ग

डोळे चोळत इंद्रायणी डेक्कन क्वीन ना ग
बोगद्यात वेट करी तू ये तिथे थेट ना ग

बोगद्यात गाडी आली आता करू प्रेम ना ग
नाही शेज नाही बेड! तू मी सेम ना ग

पाडगावकरांची क्षमा मागून.........

प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं बहुधा सेम नसतंच
पण तरीही ते प्रेम असतं

लोकलच्या इंडिकेटरखालची भेट प्रेम असतं
भेटून परतताना चेहऱ्यावरचं हसू प्रेम असतं
मनात नसताना तुझ्यासाठी वाचलेलं अभ्यासाचे पुस्तक प्रेम असतं
आणि एकमेकांची खिल्ली उडवत मारलेल्या गप्पाही प्रेम असतं

तुझ्या बाहीच्या चुकार स्पर्शाने उमटलेला शहारा प्रेम असतं
आणि एकमेकांना पराण्या टोचत दाखवलेला मार्गही प्रेम असतं
आठवांच्या उबदार कोशात गुरफटून जाणं प्रेम असतं
काळाच्या पल्याड तू, तुझं नसलेलं असणंसुद्धा गारुड करतं
तेव्हा ते प्रेम असतं......

याला जुना झब्बू

कुणी सांगितलं तुला?
मी तुझ्यावर प्रेम करते

तुझं नाव उच्चारताना
गालावर हलकेच पसरतो
त्या रक्तिम्यावर मी प्रेम करते

तुझ्या स्पर्शाच्या आठवणीने
अंगावर जो उमटतो
त्या रोमांचावर मी प्रेम करते

मी तुझ्यावर प्रेम करते का?
बहुतेक नाहीच
तुझ्यामुळे जिवंत होणाऱ्या
माझ्याच जगण्यावर मी प्रेम करते
मी तुझ्यावर प्रेम करतच नाही,
नक्कीच नाही!

तुझं माझं प्रेम कसं..
कप बशीचं नातं जसं
एकानं सांडलं तर दुसऱ्याने सावरायचं
एकाने चटके सोसत दुसऱ्याला जपायचं

तुझं माझं प्रेम कसं..
त्या वासाबी फ्लेवर च्या चण्यासारखं.
जिभेवर चरचरलं तरी परत परत चाखायचं.
उमामी उमामी करत ध्यास घेऊन रुमानी व्हायचं..

Pages