रोमहर्षक जीवन प्रवास भाग ६
१९८६ मध्ये अंकलेश्वरला ONGC मध्ये NBCC चे (National Building Construction Corporation) यांचे सुमारे १००० प्लॅट चे भव्य प्रोजेक्ट चालू होते. त्यात माझाही सहभाग होता. दोघांची रिजिनल ऑफिसेस अहमदाबाद मध्ये होती. त्यावेळीस दर ८-१० दिवसांनी अंकलेश्वरला, दर १५-२० दिवसांनी अहमदाबादला जायचो. हा सर्व प्रवास त्यावेळी नवीनच असलेल्या मारुती 800 गाडीतून व्हायचा. एका अशाच प्रवासात मी बडोद्यात थांबलो होतो. दुसऱ्यादिवशी अहमदाबादला माझ्याबरोबर बडोद्यातील दोन मित्रही आले. त्यापैकी मनोज हा पुढे ड्राइवर शेजारी बसलो होता, त्याच्या मागे मी होतो आणि माझ्या उजव्या बाजूला शिरीष बसला होता. बडोदावरून निघाल्यावर हायवेवर साधारणतः दीड तास गेल्यावर उजवीकडून एक मोठा ट्रक येत होता. अचानक एक एस टी बस अतिशय वेगाने ट्रक ला ओव्हरटेक करून आमच्या दिशेने आली. ट्रक असल्यामुळे उजव्याबाजूला जाणे शक्य नव्हते आणि डाव्या बाजूला १२-१५ फूट रस्ता खाली गेला होता. धडक होणार हे लक्षात येताच मी खाली वाकून गुडघ्यावर डोके टेकले. काही सेकंदातच बस ची अतिशय जोराने धडक बसली. धडक इतकी प्रचंड होती कि आमची गाडी ३०-३५ फूट मागे फेकली गेली , एका झाडावर आपटली आणि दोन कोलांट्या उड्या घेऊन गाडी खड्यात गेली. गाडीचा पार चुराडा झाला होता. मनोज आणि माझे अंग ठणकायला लागले होते पण आम्ही शुद्धीवर होतो. इंजिन स्टेरिंग व्हील क्रॅश झाले होते पण उजव्या बाजूचा कोपरा आत वाकून ड्रायव्हरच्या डोक्याला प्रचंड जखम झाली होती. उजव्या बाजूच्या खिडकीची काच आणि फ्रेम आत वाकून शिरीषचा गाल फाटला होता. दोघंही बेशुद्ध होते. येथे गुज्जू भाईंचे कौतुक केलेच पाहिजे. काय झाले हे लक्षात येताच असंख्य गाड्या थांबल्या आणि लोकांनी खाली उतरून जवळ जवळ गाडी तोडून आम्हाला बाहेर काढले. ४-५ माणसांनी उचलून आंम्हाला खड्याच्या बाहेर रस्त्यावर आणले आणि ४-५ कार ची व्यवस्था करून आम्हाला जवळच असलेल्या अमूलच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. तेथेही कसलेही कागदपत्र , फॉर्मॅलिटी न पाहता उपचार सुरु झाली . तासभर आराम करून मी आणि मनोज ताजेतवाने झालो. पण ड्राइवर आणि शिरीष बेशुद्धच होते. मी आणि मनोज रिक्षा करून अक्सिडेंट पॉइंटवर आलॊ. तेथे पोहचल्यावर असे दिसले कि पोलिसांनी पंचनामा केला आहे आणि FIR मध्ये आम्हीच रॉंग साईडने जाऊन ST ला धडक दिली असे चित्र रंगवले होते. आम्ही पोलिसांना बरेच समजावले कि काचा कुठे पडल्यात , गाडीचे ब्रेक्स बघा, आमची गाडी किती खड्यात गेली ते बघा. पोलिसांची ऐकायची अजिबात तयारी नव्हती. शेवटी मी मनोजला थोडयाश्या चिडक्या स्वरातच म्हणालो ' मनोज , प्रसाद को फोन करके बता देते है सोलंकी चाचा को फोन करके सब बताओ तब इन पोलीसों की अकल ठिकाणे पर आ जायेगी'. मनोजने लोणकढी थाप ओळखली होती. तो लगेच म्हणाला ' Good Idea , चलो आनंद जाके फोन करेंगे '.
असे म्हणून आम्ही दोघेही गावाच्या दिशेने चालू लागलो. पोलिसांनी आम्हाला थांबवून विचारले ' ये सोलंकी चाचा कौन है ?' मी उत्तरलो ' भाई अपने CM का नाम तो याद रखों ' असे म्हणून आम्ही गावच्या दिशेने चालू लागलो. पाठीमागून पोलिसांच्या हाका ऐकू येत होत्या. आता आमची खरी अडचण होती या बेशुद्ध पडलेल्या दोघांना घेऊन बडोद्याला जाणे. तासाभरातच पोलीस हॉस्पिटल मध्ये आले आणि आमच्या बाजूने रंगवलेले FIR आम्हाला वाचायला दिला. आम्हाला एक कॉपी देऊन त्यांच्या कॉपीवर आमची सही घेतली आणि कडक सॅल्यूट ठोकून ते निघून गेले. अजून बडोद्याला जायचा प्रश्न शिल्लकच होता. पण माझ्या जीवनात इतके नाट्यमय प्रसंग आणि योगायोग घडत असतात की मला हिंदी पिक्चर मधील सर्व योगायोग अत्यंत खरे वाटतात.
आम्हाला वर आणत असताना शिरीष च्या एका मित्राने त्याला पहिले , हा मित्र बडोद्याला जाणाऱ्या बस मध्ये उजव्या खिडकीत बसला होता. अपघात स्थळी बस हळूहळू जात होती. साहजिकच त्याने उजवीकडे पहिले नेमके त्याच वेळेस शिरीषला घेऊन लोक वर येत होते. अर्थातच शिरीषचा रक्ताळलेला चेहरा आणि तो सुद्धा ४०-५० फुटांवरून चालत्या बस मधून पाहिल्याने मित्राला खात्री नव्हती . बडोद्यात गेल्यावर त्याने अजून ५-६ मित्रांना गोळा करून हकीकत सांगितली. त्यातल्या एकाने मग शिरीषच्या घरी फोन लावला आणि शिरीशसोबत बोलायचे आहे असे सांगितले. घरून त्याला शिरीष , जोशी के साथ अहमदाबाद गया है, असे उत्तर मिळाले. संघ्याकाळी ७-८ ला हे सर्व मित्र तीन कार आणि दोन ओम्नी व्हॅन घेऊन आनंद ला आले. तोपर्यंत डॉक्टर्स नी दोन्ही पेशंट आऊट ऑफ डेंजर असल्याचे सांगितले आणि त्यांना बडोद्याला नेण्यास हरकत नाही असे सांगितले. त्यांना पाहून आमची मुख्य अडचण दूर झाली. मुख्य म्हणजे या मित्रांनी जवळ जवळ ८०,००० रुपये गोळा करून आणले होते. फारच सिरीयस असेल तर खाजगी विमानाने ते आम्हाला मुंबईला घेऊन जाणार होते. सर्व सोपस्कार उरकून आम्ही रात्री १० वाजता बडोद्याच्या एका खाजगी रुग्णालयात पोहचलो. दोन्ही पेशन्टना ऍडमिट करून त्यांना Observation साठी ठेवण्यात आले. मी रात्री फोन करून सुमती परमारला सर्व हकीकत सांगितली. सकाळी सूर्योदयाअगोदरच भरत परमार आणि सुभाष मुथा बडोद्यात पोहचले. तेथील सर्वांची चौकशी करून आम्ही हॉटेल सूर्या मध्ये राहण्यास गेलो. अंग ठणकत होते आणि भयंकर भूक लागली होती. रूम मध्ये पोहचताच पोटभर खाऊन घेतले त्यात या दोन मित्रांच्या शिव्यांचाही भाग होता. दहा वाजण्याच्या सुमारास आम्ही ऑर्थोप्रेडिकस कडे गेलो संपूर्ण चेकिंग झाल्यावर असे कळले कि माझ्या नाकाला एक छोटीशी क्रॅक झाली आहै ,उजव्या हाताची करंगळी मोडली आहे आणि छातीच्या तीन बरगड्या क्रॅक झाल्या आहेत. छातीला वरपासून खालपर्यंत एक स्ट्रेच बँडेज लावले गेले. आता १५ दिवस तरी फारशी हालचाल न करण्याचा सल्ला दिला गेला. शिंकण्यावर आणि खोकण्यावरही बंदी घातली गेली. त्या दिवशी आराम करून दुसऱ्या दिवशी आमची वरात पुण्यात पोहचली.
रोमहर्षक जीवन प्रवास भाग ६
Submitted by अविनाश जोशी on 5 September, 2024 - 07:05
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारच थरारक आयुष्य आहे तुमचे.
फारच थरारक आयुष्य आहे तुमचे. हे सगळे वाचायचे कसे राहिले कोणास ठाऊक.
थरारक अनुभव!
थरारक अनुभव!
बापरे!!!!
बापरे!!!!
St वाला असा कसा काय न बघता overtake करत आला?